तीन पूर्वा, हस्त, चित्रा, स्वाती, मूळ, आश्लेषा, आर्द्रा, व श्रवण या नक्षत्रांवर ऋग्वेद्याची मुंज करणें प्रशस्त होय; रोहिणी, मृग पुष्य, पुनर्वसु, तीन उत्तरा, हस्त, अनुराधा, चित्रा व रेवती या नक्षत्रीं यजुर्वेद्यांची मुंज करणें प्रशस्त होय; अश्विनी, पुष्य, तीन उत्तरा, आर्द्रा, हस्त, धनिष्ठा व श्रवण या नक्षत्रीं सामवेद्याची मुंज करणें प्रशस्त होय. आणि अश्विनी, मृग, अनुराधा, हस्त, धनिष्ठा, पुनर्वसु व रेवती या नक्षत्रांवर अथर्ववेद्याची मुंज करणें प्रशस्त होय. हीं नक्षत्रें साधणें शक्य नसल्यास-भरणी, कृत्तिका, मघा, विशाखा, ज्येष्ठा व शततारका हीं नक्षत्रें तेवढीं सोडून बाकीचीं सर्व नक्षत्रें घ्यावींत. राजमार्तण्डांत पुनर्वसु नक्षत्राचा जो निषेध सांगितला आहे, त्याला मूळांत आधार नसल्याचें अनेक ग्रन्थकारांनीं प्रतिपादिलें आहे, ऋग्वेदी व सामवेदी यांना पुनर्वसु नक्षत्र निषिद्ध असल्याचें कांहीं ग्रन्थकार सांगतात.व्यतीपात, वैधृति, परिघाचें अर्ध, विष्कम्भ वगैरेंच्या निषिद्ध घटका (विष्कम्भाच्या ३, व्याघाताच्या ९१, शूलाच्या ५, वज्राच्या ९, गण्डाच्या ६ व अतिगण्डाच्या ६ अशा पहिल्या घटका), भद्रा व ग्रहण यांवर मुंज करुं नये.