नित्य व नैमित्तिक असे दोन्ही प्रकारचे अनध्याय प्रायश्चित्तरूपाने मौजीप्रकरणामध्ये सांगितले त्याशिवाय इतरही अनध्याय आहेत. नित्य व नैमित्तिक असे दोन्ही प्रकारचे अनेक अनध्याय ग्रंथामध्ये सांगितले आहेत. त्यांचे येथे प्रतिपादन केले नाही. कारण हे सर्व अनध्याय पाळणे कलियुगामध्ये मतिमंद लोकांना अशक्य आहे. हेमाद्रि ग्रंथामध्ये स्मृतिवचन आहे ते असे- 'चतुर्दशी, अष्टमी, पर्वणी, प्रतिपदा आणि मधून गमन हे मतिमंद लोकांनी सर्वदा अनध्याय मानावे.' यावरून कलियुगामध्ये दोन प्रतिपदा, दोन अष्टमी, दोन चतुर्दशी, पूर्णिमा, दर्श, कर्क आणि मकर या दोन संक्रांति एवढेच अनध्याय होत. हे सोडून बाकीच्या दिवशी वेदशास्त्रादिकांचे अध्ययन करावे. कारण कलियुगामध्ये पुरुष प्रायः मतिमंद असतात. शिष्टाचार देखील याच प्रकारचा आहे. पूर्व दिवशी सायंकाळी आणि दुसर्या दिवशी प्रातःकाळी सहा घटिका अन्ध्याय तिथि असेल तर "उदयकाली अथवा अस्तकाली तिथि आल्यास अनध्याय समजावा" या वचनाने दोन दिवस अनध्याय प्राप्त होतो. करिता त्याविषयी दुसरे वचन कोणी ग्रंथकारांनी सांगितले आहे ते असे- "ज्या दिवशी अनध्याय तिथीच्या जितक्या घटिका असतील तितकाच अनध्याय मानावा. दुसर्या दिवशी अनध्याय तिथीच्या घटिका असल्या तथापि अनध्याय नाही." हे वचन देखील अल्पमति जनांकरिताच आहे. चतुर्थी, सप्तमी इत्यादि तिथींचे दिवशी प्रदोष असतो त्याचा निर्णय पूर्वी सांगितला आहे. 'प्रदोषकाली स्मरण करू नये व उच्चार करू नये' असे वचन आहे, याकरिता इतर अनध्यायांपेक्षा प्रदोषकालि अधिक दोष आहे. वेदांची अंगे, इतिहास, पुराणे, धर्मशास्त्र यांना अनध्याय नाही. ही केवळ पर्वदिवशीच वर्ज्य करावी. नित्य कर्म, जप, काम्यकर्म, यज्ञ, पारायण याविषयी अनध्याय नाही. वेदांचे अध्ययन व अध्यापन याविषयी मात्र अनध्याय आहे.