दैत्यभारें पिडली पृथिवी बाळा ।
म्हणवुनि तुला येणें लागे गोपाळा ॥
भक्तप्रतिपालक उत्साह सोहळा ।
मंगळ तुजला गाती नर आणि अबला ॥ १ ॥
जय देव जय देव जय गरुडध्वजा ।
आरती ओंवाळूं तुज भक्तकाजा ॥ धृ. ॥
गुण रुप नाम नाही जयासी ।
जिवीताची तैसा होसी तयासी ॥
मत्स्य कूर्म वराह नृसिंह झालासी ।
असुरां काळा ऎसा पुढें टाकसी ॥ २ ॥
सहस्त्रनामरुपें सावळा ना गोरा ।
श्रुति नेति नेति म्हणति तुज विश्वंभरा ॥
जीवना जीवन तूंची होसी दातारा ।
न कळें पार ब्रह्मादिकां सुरवरां ॥ ३ ॥
संता महंता घरी म्हणवी म्हणियारा ।
शंख चक्र गदा आयुधांच्या भारा ॥
दिव्य सुदर्शन घरटी फिरे अवसरा ।
सुकुमार ना स्थूल होसी गोजीरा ॥ ४ ॥
भावेंविण तुझें न घडे पूजन ।
सकळहि गंगा झाल्या तुजपासून ॥
उत्पत्ति प्रलय तूचि करिसी पाळण ।
धरुनि राहिला तुका निश्चयी चरण ॥ जय देव. ॥ ५ ॥