परमानंदा परम पुरुषोत्तमा रामा ।
अच्युत अनंता हरि मेघश्यामा ॥
अविनाशा अलक्षा परता परब्रह्मा ।
अकळकळा कमलापति ना कळे महिमा ॥ १ ॥
जय देव जय देव जय जय श्रीपती ।
मंगेळशुभदायका करीन आरती ॥ धृ. ॥
गोविंद गोपाळा गोकुळरक्षणा ।
गिरिवरधर भवसागर तारक दधिमंथना ॥
मधुसुदन मुनिजीवन धरणींश्रमहरणा ।
दीनवत्सला सकळां मूळ जयनींधाना ॥ २ ॥
विश्वंभर सर्वेश्वर तूं जगदोद्धारा ।
चक्रधर करुणाकर पावसी गजेंद्रा ॥
सुखसागर गुणआगर मुकुटमणी शूरां ।
कल्याण कैवल्यमूर्ति मनोहरा ॥ जय. ॥ ३ ॥
गरुडासना शेष शयना नरहरीं ।
नारायणध्याना सुरवर हर गौरी ॥
नंदानंदवंदित त्रिभुन भीतरीं ।
अनंत नामीं ठसा अवतारावरीं ॥ जय. ॥ ४ ॥
सगुणनिर्गुणसाक्ष श्रीमंता संता ।
भगवान भगवंता काळ कृतांता ॥
उत्पतिपाळण पासुनि संहारणसत्ता ।
शरण तुकयाबंधु तारी बहुतां ॥ जय. ॥ ५ ॥