भौमासुर राक्षसाच्या वधानंतर त्याच्या पत्नीने श्रीकृष्णाला वैजयंतीमाला व इतर दिव्य वस्तू अर्पण केल्या. त्या वैजयंतीमालेच्या उत्पत्तीची ही कथा.
पूर्वी विष्णूच्या दाराशी जय आणि विजय असे सख्खे भाऊ दाखल होते. त्यांचा पिता सुशील हा नावाप्रमाणेच सदाचारी व विष्णुभक्त होता. रोज त्याच्या घरचा नैवेद्य विष्णुलोकी जात असे. जय व विजय यांच्या पत्नी उत्कृष्ट स्वयंपाक करून दोघींपैकी एक तो नैवेद्य सुशीलजवळ आणून ठेवी. नैवेद्य समर्पण केल्यावर ते ताट आपोआप विष्णुलोकी जात असे. असे कित्येक वर्षे चालले होते. पण एकदा विजयची पत्नी जयंती हिने नैवेद्य दाखवण्यापूर्वी भाजीची चव बघितल्याने तो नैवेद्य विष्णुलोकी जाईना. सुशीलला जेव्हा खरी हकिगत कळली, तेव्हा रागाच्या भरात त्याने जयंतीला तू शिळा होऊन पडशील अशा शाप दिला. राग शांत झाल्यावर तिची दया येऊन श्रीहरीचा हात लागताच तुझा उद्धार होईल असा उःशाप दिला. त्याप्रमाणे जयंती मेरूपर्वताच्या माथ्यावर सिद्धसरोवरात शिळा होऊन पडली. जयंतीच्या विरहाने वेडा होऊन विजयही त्या सरोवराकाठी सूर्याचे अनुष्ठान करीत बसला. एके दिवशी त्याच्यापुढे एक सुंदर असे कमलपुष्प येऊन पडले. ते दिव्य कमळ शेषांनी सूर्याला अर्पण केलेल्यांपैकी होते. त्याला पाहून विजयला जयंतीची जास्त तीव्रतेने आठवण होऊन त्याने ते कमळ त्या शिलारूपी जयंतीस वाहिले. याप्रमाणे सूर्याकडून मिळालेली एकशेआठ कमळे त्याने त्या शिळेवर वाहिली. त्या एकशेआठ सुवर्णकमळांची त्याने माला गुंफली.
इकडे सर्व देवांच्या आग्रहाखातर भगवान विष्णू शंकरांकडे जात असता, वाटेत सिद्धसरोवरापाशी थांबले. ती सुवर्णकमळांची माला त्यांना फारच आवडली व त्यांनी ती शिळेवरून उचलली. माला उचलताना शिळेस हात लागून जयंती पूर्वरूपात आली. मग विजय व जयंती यांना आशीर्वाद देऊन त्या दोघांचे स्मृतिचिन्ह म्हणून विष्णूने ती माला गळ्यात धारण केली. विजय व जयंती या नावांवरून तिचे नाव वैजयंती असे ठेवले व आपल्या भक्ताची स्मृती म्हणून गळ्यात वागवले