श्रीरामांच्या अश्वमेधाचा घोडा कुंडल नगरीत राजा सुरथाच्या देशात आला. राजा सुरथ व त्याची प्रजा श्रीरामाचे एकनिष्ठ भक्त होती. घोडा पकडल्यावर आपल्याला नक्कीच श्रीरामांचे दर्शन होईल या विचाराने सुरथाने अश्वाला पकडून ठेवण्यास सांगितले. एके दिवशी यमराज मुनीचा वेष घेऊन राजाच्या दरबारात आले. सुरथाने त्यांचा सन्मान करून प्रभू रामचंद्रांची कथा ऐकवावी, अशी विनंती केली. यावर मुनी मोठ्या हसून म्हणाले,"कोण प्रभू रामचंद्र? त्यांचे ते महत्त्व काय? प्रत्येक माणूस आपल्या कर्मानुसार जगतो." या बोलण्याचा राग येऊन सुरथाने त्यांना निघून जाण्यास सांगितले. मग यमधर्माने आपले खरे स्वरूप दाखवून राजाला वर मागण्यास सांगितले. "रामचंद्रांचे दर्शन होईपर्यंत मला मरण नको,"असा वर सुरथाने मागितला.
इकडे अश्वाला सुरथाने पकडल्याचे शत्रुघ्नाला समजले. तो रामभक्त असल्याने एकदम युद्ध करण्यापेक्षा त्याच्याशी भेटून निर्णय घ्यावा असे ठरले. त्याप्रमाणे अंगद सुरथाला भेटला व शत्रुघ्नाने अश्वाला सोडायला सांगितले आहे, असा निरोप त्याने दिला. यावर सुरथ राजा म्हणाला,"शत्रुघ्नाला भिऊन अश्वाला सोडणे बरोबर नाही. जर श्रीराम स्वतः इथे आले तर मी त्यांना शरण जाईन. नाही तर मी युद्धाची तयारी करतो." मग राजा सुरथ व शत्रुघ्न यांचे युद्ध झाले. हनुमान व शत्रुघ्न यांना जिंकून सुरथाने राजधानीत नेले. त्याने हनुमानास रामचंद्रांचे स्मरण करण्यास सांगितले. आपले सर्व वीर बंधनात अडकलेले पाहून हनुमानाने रामाची प्रार्थना केली.
रामचंद्र हे लक्ष्मण व भरतासह पुष्पक विमानात बसून आले. राजा सुरथाने त्यांना प्रणाम केला. हनुमानासारख्या वीराला बंधनात ठेवण्याचा पराक्रम केल्याबद्दल श्रीरामांनी त्याचे कौतुक केले. तो क्षत्रीय धर्मानुसार वागला म्हणून त्याला क्षमा केली. मग ते परत अयोध्येस गेले. राजा सुरथाने यज्ञाचा अश्व परत केला व तोही आपल्या सेनेसह शत्रुघ्नाला सामील झाला.