पूर्वी त्रिपुरासुर नावाचा राक्षस होता. तो गंगा व सागर यांचा पुत्र. तो फार शक्तिमान होता. पण या शक्तीच्या जोरावर त्याने सर्व देव व मनुष्यलोक यास सळो की पळो करून सोडले होते. तेव्हा श्रीशंकरांनी त्याचा नाश करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी सर्व देव, तीर्थे, पंचभूते व दिव्यौषधी यांच्या शक्ती एकत्र करून सहस्रधारांचे एक चक्र बनवले. हेच सुदर्शनचक्र होय. याच्या साह्याने त्यांनी त्या राक्षसाचा नाश केला. सर्व जण त्यांना त्रिपुरारी म्हणून लागले. मग शंकरांनी ते चक्र आपल्या मस्तकावर धारण केले. विष्णूचे शंकर हे आराध्य दैवत होय. दररोज पाताळातून एक हजार कमळे आणून त्यांनी ते शंकरांची पूजा करीत. एकदा विष्णूची परीक्षा पाहण्याच्या हेतूने शंकरांनी त्या हजारांपैकी एक कमळ लपवून ठेवले. विष्णूच्या नकळत ही गोष्ट त्यांनी केली. इकडे पूजेच्या वेळी एक कमळ कमी असल्याने आपला नियमभंग होणार या भीतीने विष्णू हळहळले. पूजा करताना मध्येच न उठण्याचा नियम असल्याने पुन्हा पाताळात जाऊन कमळ आणणे शक्य नव्हते. तेव्हा सुवर्णकमळाऐवजी आपला एक डोळा काढून म्हणजेच नेत्रकमळ वाहून पूजा पूर्ण करावी, असा त्याने विचार केला व त्याप्रमाणे आपला एक डोळा शंकराला अर्पण केला. विष्णूची ती विलक्षण भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले व "जी इच्छा असेल, ते माग" म्हणाले. तेव्हा विष्णूने आपणास सुदर्शनचक्र प्राप्त व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. महादेवांनी मोठ्या आनंदाने ते चक्र विष्णूच्या स्वाधीन केले. आता विष्णूने गदा कशी मिळवली ती कथा अशी-
लवणासुर नावाच्या जुलमी राक्षसाला विष्णूने ठार केले. त्याचा पुत्र गद याने या गोष्टीचा सूड घेण्याचे ठरवले. त्याने शंकरांना प्रसन्न करून घेऊन असा वर मागितला, की विष्णूचा माझ्या हातून पराभव व्हावा, त्रिभुवनभाराचे शस्त्र ज्याच्याकडे असेल, त्याच्याचकडून फक्त माझा नाश व्हावा. मग त्याने विष्णूशी युद्ध पुकारले. विष्णू सुदर्शनचक्र गदावर सोडणार, एवढ्यात ब्रह्मदेवाने त्याला शंकरांनी दिलेल्या वराबद्दल सांगितले. मग विष्णूने एक लांब देठाचे कमळ तोडून त्यात त्रिभुवनातील शक्ती साठवली व त्याने गदाचा नाश केला. त्या शस्त्राचे त्याने "गदा' असे नाव ठेवले व ते आपल्या हातात नेहमी वागवू लागले.