कौरव पांडवांच्या महायुद्धात कौरवांचा नाश झाला. पण या युद्धात अर्जुनपुत्र अभिमन्यू तसेच भीम व पद्मावती यांचा एक मुलगा धारातीर्थी पडला. अभिमन्यूची तर तो पडल्यावरही कौरवांनी विटंबना केली. यामुळे अर्जुनाचा राग अनावर झाला. आपणही कौरवांच्या पोराबाळांचा नाश करावा, असे त्याला वाटले. कौरवांचे पुत्र तसेच उदरातील पुरुषगर्भ या सर्वांचा नाश करणारा वज्रबाण त्याने अभिमंत्रून सोडला. त्याच्या प्रभावाने कौरवांचे हजारो पुत्र मरण पावले. याच वेळी कर्णाची एक पत्नी प्रभावती प्रसूत होऊन तिला वृषकेतू नावाचा मुलगा झाला होता. कर्ण दोनच दिवसांपूर्वी रणात पडला होता. आता निदान हा वृषकेतू तरी वाचावा म्हणून ती धृतराष्ट्राकडे त्याला घेऊन गेली व त्याचे संरक्षण करण्यासाठी विनवू लागली. पण धृतराष्ट्राने असहायता व्यक्त केली. यानंतर प्रभावती वृषकेतूला घेऊन कुंतीकडे गेली. कुंतीला त्याला पाहून कर्णाची आठवण झाली. त्याच्या मुलाला आपण वाचवले पाहिजे, असे तिला वाटले. एवढ्यात अर्जुनाचा बाण तेथे आला. पण कुंतीने त्याला परत जाण्याची आज्ञा केली. याप्रमाणे वृषकेतूची जबाबदारी कुंतीवर सोपवून प्रभावती कर्णाबरोबर सती गेली. कुंती मोठ्या प्रेमाने पण गुप्तपणे त्याचे पालनपोषण करू लागली. पुढे वृषकेतू थोडा मोठा झाल्यावर त्याला हे असे राहणे नकोसे वाटू लागले. कुंतीने त्याला सर्व हकिगत सांगितल्यावरही तो आपल्या नशिबावर विसंबून उघडपणे राहतो म्हणू लागला. पुढे तो द्रौपदीच्या दृष्टीस पडला. हा सुंदर व तेजस्वी मुलगा तिला आवडला. कुंतीप्रमाणे तीही त्याच्याशी प्रेमाने वागू लागली. द्रुपदराजाकडून मिळालेले एक धनुष्यही त्याला दिले. कुंती वृषकेतूला धर्मार्जुनापासून काही त्रास होऊ नये म्हणून जपत असे. तो स्वसंरक्षणासाठी सिद्ध व्हावा म्हणून तिने सूर्याचे स्मरण केले. कर्ण सूर्याचा मुलगा असल्याने सूर्याने वृषकेतूला सर्व विद्या शिकवल्या.
पुढे अश्वमेध यज्ञप्रसंगी कुंती वृषकेतूला घेऊन पांडवांकडे गेली. जो आपल्या कुळाला सोडून शत्रुपक्षाकडे गेला, धर्मासारख्या साधूचा ज्याने आश्रय सोडला, त्या आपल्या पित्याला पांडवांनी मारल्याबद्दल आता त्याला फारसा विषाद वाटेना. कर्णपुत्राची एकंदर हकिगत ऐकून सर्व पांडवांना कर्णाबद्दल अतिशय वाईट वाटले. कर्णपुत्राचा लाभ झाला म्हणून त्यांना बरे वाटले.