परि भावे गुण गाता प्रसन्न होतोस तू असे ठावे ।
जाले सज्जनसंगे, प्रेम कसे ते मनात सांठावे ? ॥८१॥
शाहणपणे न रिझसी, मूर्खपणे न खिजसी, भले म्हणती; ।
प्रेमळ भलताहि असो, करिसी त्याची स्वसेवकि गणती ॥८२॥
होसी प्रसन्न भावे, देसी सर्वस्व आपुले भजका ।
सत्संगी बसतो मी, न कळे इतुकेहि राघवा ! मज का ॥८३॥
संतांच्या वदने मी आयिकिली बा ! तुजी जयि चरिते ।
त्यजुनि विषय मन केले भरावया गुणसुधा तयीच रिते ॥८४॥
साकेतपते ! रामा ! नाकेशनुता ! त्वदीय गुण गाता ।
हाकेसरिसा येवुनि हा केवळ दीन उद्धरी आता ॥८५॥
चापशरधरा धीरा आपद्ग्रस्तासि मज नको विसरू ।
या परम संकटी मी बा ! पदर दुज्यापुढे किती पसरू? ॥८६॥
आधार तू जनाचा, बाधा हरणार एक तू दक्ष ।
साधावया यशाते बा ! धाव, तुला नमस्कृती लक्ष ॥८७॥
जळदनिभा ! बळसिंधो ! खळमथना ! सूर्यकुळमणे ! कृपण !
मी विकळ जाहलो बहु; काय तुजे लोपले दयाळुपन ? ॥८८॥
मज भणगाला वरदा ! वर जरि करुणा करूनि देशील ।
तरि मानवती सज्जनमने जयाला असेचि दे शील ॥८९॥
विश्व तुज्याठायी, तू नामी, ते नाम साधुच्याचि मुखी ।
तत्संग दे मला, मग गुंतेना मी कदापि तुच्छ सुखी ॥९०॥
लक्षापराध घडले, रक्षावे परि तुला शरण आलो; ।
दक्षाध्वहरचिंत्या ! दक्षा ! मी मग्न संकटी जालो ॥९१॥
संग धरुनि विषयांचा भंगचि मन पावले, परी न विटे; ।
साधुसमागमभेषज साधुनि देशील तरिच मोह फिटे ॥९२॥
चित्त अनावर रामा ! वित्तस्त्रीपुत्रचिंतनींचि रते ।
मधुलिप्तक्षुरधारा चाटी ते जीभ तत्क्षणी चिरते ॥९३॥
निपटुनि विषय त्यजिता सुखमुख दृष्टी पडे, झडे ताप; ।
हे सत्य अत्यबाधित तेथे संताप जे स्थळी व्याप ॥९४॥
तनुनिर्वाहापुरता संग धरुनिही अनर्थ मज घडला ।
सावध तर्ही निसरड्या मार्गी विचकूनि दात मुख पडला ॥९५॥
शुद्धचरित्रा रामा ! युद्धपटुभुजा ! प्रबुद्धसेव्यपदा ! ।
उद्धवनिधे ! दयाळा ! उद्धरि मजला, नमीन तूज सदा ॥९६॥
शर्वप्रियसच्चरिता ! सर्वजगत्पाळका ! अगा बापा ! ।
पर्वसुधकरकररुचिगर्वहरस्मितमुखा ! हरी तापा ॥९७॥
नाना भये विलोकुनि पावतसे फार फार तनु कंपा; ।
शिर ठेविले पदांवरि, उशिर न लाव, करीच अनुकंपा ॥९८॥
मन हे घातक वेडे विषयव्याळासवे करी क्रीडा ।
पीडाहि पावते, परि सावध नोहे, न ते धरी व्रीडा ॥९९॥
या कोटग्या मनाला विषयी या काय वाटते गोडी ? ।
खोडी तुज्या प्रतापावाचुनिया राघवा ! न हे सोडी ॥१००॥