ऋणानुबंध - संग्रह १०

मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.


सासुरवाशीण - २

अशिलाची लेक अशिल माझा खाणवटा

आईवरी शिव्या नको देऊं आगरटा

अशिलाची लेक कमशील कामून होईन

पित्याच्या नांवाला बट्‌टा कामून लावीन

वाघाच्या पोटीची मी त आहे ग वाघीण

बोलला गव्हर झाली देहाची आगीन ॥

वाघाच्या पोटीची मला वाघाचें कलम

काय करुं बाईं पडला अस्तुरी जलम ॥

*

माझ्या माहेराचा जासूद आला बाइ

सातपुडी आंबा मिर्‍यावाणी त्याची कोइ ॥

माझ्या माहेरीच्या जासुदा खालीं बस

सातपुडी आम्बा गंधावाणी त्याचा रस ॥

जासुदाच्या मुला जेव जेव दूधकाला

माझ्या माहेराचा खुशाली सांग मला ॥

जासुदाच्या मुला सांग गिन्यानी भांवाला

बोलला गव्हर बोल लागला जीवाला ॥

सांगून धाडितें मी त तुला लवलाह्या

तिथं जेवलास इथं यावं पाणी प्याया ॥

*

मायबापाजी दोन्ही लावणीचीं रोपं

त्यांच्या सावलीला मला लागे गाढ झोप ॥

आईवांचून माया, माया कोणाला फुटेना

पावसावांचून रान हिरवं दिसेना ॥

*

नेणंता मुर्‍हाळी खूण सांगतें रेखियली

दारीं गोंदन पिकयली ॥

नेणंता मुर्‍हाळी, खूण सांगतें वाडियाची

दारीं चौकट चांदियेची ॥

*

नेणंता मुर्‍हाळी नको लावू माझ्या बापा

वाडयामध्यें चांफा शिंगी खाते गपागपा ॥

नेणंता मुर्‍हाळी नको लावू माझे आई

वाडयामध्यें जाई, शिंगी आवरत नाहीं ॥

नेणंता मुर्‍हाळी रहा म्हणतां राहीना

अवकळ्या पाऊस पाणी चौकांत माईना ॥

*

नेणंता मुर्‍हाळी येऊन कौलाला द्डाला

बधवाच्या माझ्या उजेड चंद्राचा पडला ॥

*

चाल शिंगीबाई तूं ग हंसत हिसत

तुझ्या पाठीवरुन माझं माहेर दिसतं ॥

माहेराच्या वाटे घोडा कुणाचा पळतो

आली नागरपंचीम भाई बहिणीला नेतो ॥

*

माझिया माहेरीं मीं त जातें आनंदानं

भाऊ माझे दिले मला देवा गोविंदानं ॥

*

माझ्या माहेराची वेस मी त उघडितें अंगं

पाठीचा बंधु माझा मुकादम माझ्या संग ॥

*

सासुरवासिनी माझ्या बंधुनें पाईल्या

हातीं दिले तांबे तोंड धुवाया लावल्या ॥

सासुरवासिनी माझ्या बंधुच्या बहिणी

खांद्यावरी माळा, आला वैराळ होऊनि ॥

वैराळदादा हात रीता ठेवूं नको

संसारी माझा पिता उधारीला भिऊं नको ॥

*

लक्ष्मी आली, आली उठत बसत

बंधवाचा माझा वाडा गवळ्याचा पुसत ॥

लक्ष्मीबाई कोणीकडं केलं येणं

बंधुचं दुबळंपण तुला सांगितो कोण ? ॥

आई लक्ष्मी तुला शेवायाचा थाळा

सुखांत राहूं दे माझ्या माहेराचा मेळा ॥

*

फाटली माझी चोळी मी त झालें दैनगती

बंधवाला माझ्या सांगून धाडूं कोण्याहातीं ? ॥

फाटली माझी चोळी लुगडं आलं आकाराला

बंधवाला माझ्या सांगून धाडीन सरकाराला ॥

फाटली माझी चोळी नाहीं ठिगळ द्यायाचं

बंधुच्या ग माझ्या गांवा सख्याच्या जायाचं ॥

*

बोलतो भाऊ बहिणीला वाढी तूप

बोलती भावजय तेल्यानं नेलं माप ॥

बोलतो भाऊ बहिणीला वाढ दही

बोलती भावजय रात्रीं विरजलं नाहीं ॥

*

बंधू करी बोळवण भावजय मारी हांका

साडीची बोळवण मोठी चोळी घेऊं नका ॥

बंधू घेतो चोळी भावजय तिथं गेली

रुपयाचा खण पावली कमी केली ॥

*

बंधू घेतो चोळी भावजय डोळे मोडी

चाटी दादा घाल घडी चोळीची काय गोडी ? ॥

*

जंवर मायबाप तंवर माहेराची गोडी

कोणाचे भाऊभाचे दोन्ही अधारत्या मेडी ॥

जंवर मायबाप तंवर माहेर आपलं,

भावजयीबाई राज सांभाळ तुपलं ॥

वेडया माझ्या जीवा तुला उलीस कळना

आईबापासारखी कुठं दौलत मिळना ॥

आईबापाच्या राजीं शिंक्‍यावरलं खोबरं

भावजयीच्या राजीं चौक्या बसल्या जबर ॥

आईबापाच्या राजीं शिंक्यावरलं ग लोणी

भावजयीच्या राजीं जेव म्हणेना ग कोणी ॥

*

चोळ्या बांगडयाच्या आशेकरितां नव्हतें आलें

पाठीच्या बंधू माझ्या भेटीला लईदी झाले ॥

चोळी बांगडीची नाहीं मजला असोशी

पाठीच्या बंधू माझ्या तूं सुखी मी संतोषी ॥

*

बापाची सासुरवाडी लेकानं बळकविली

बाळानं ग माझ्या मेदुणी राणी केली ॥

*

काळी कुळकुळीत जांभळ, जांभळ पिकली शिवाला

लेकीची समसम आईबापाच्या जीवाला ! ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-09T20:29:44.7430000