अध्याय चोविसावा
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ ॐ नमो आदिनारायणा ॥ विश्वचाळका विश्वपाळणा ॥ चराचर जे कां रचना ॥ ते जाण तव सत्तें ॥ १ ॥
तेथें मी नमन कर्ता ॥ ही केउतीं पैं असे वार्ता ॥ म्हणोन मौन्याची वाग्लता ॥ चरणीं माथा ठेवित ॥ २ ॥
कुशळ करावी कविता ॥ हे सकळ तुझी सत्ता ॥ वदता आणि वदविता ॥ मनोरथ पुरविता तूंचि पै ॥ ३ ॥
ऐका श्रोतेहो संतसज्जन ॥ मागें विप्र कुमर गेला उद्धरून ॥ सद्गुरू नारायणें कृपा करून ॥ गोदानें उद्धरिला ॥ ४ ॥
आतां तयाची जे भगिनी ॥ ते तों वेश्येनें नेली चाळवूनी ॥ तयेची काय जाली करणी ॥ नारायणा मनीं ते चिंता ॥ ५ ॥
सद्गुरू ऐसा दयाळु पाहीं ॥ दुजा न देखों कवणे ठायीं ॥ विप्रकन्या बुडतसे पाहीं ॥ पापडोहीं अगम्य ॥ ६ ॥
तरी ते असे कवणे ठायीं ॥ तिये तें लावावें परमार्थ सोई ॥ म्हणोन निघाला लवलाहीं ॥ शोधी सर्वही भूमंडळा ॥ ७ ॥
तंव लक्षुमण नामें एक नगर ॥ असे विस्तीर्ण अग्ने कोणावर ॥ चारी वर्ण अपरंपार ॥ धनदाई सावकार सर्वही ॥ ८ ॥
तेथें ती विप्रकन्या पाहीं ॥ वेश्या घेऊन गेली लवलाही ॥ ठेविती जाली निजगृहीं ॥ अत्यादरें करूनी ॥ ९ ॥
उपवर जाली विप्रदुहिता ॥ सभाग्य तिये तें देखतां ॥ मागितलें धन देती हाता ॥ अतिसुंदरता देखुनी ॥ १० ॥
आधींच ब्राह्मणवर्णी ॥ गौरांगी सुंदरपणीं ॥ गंडस्थळें ठसठसूनी ॥ नासिककर्णी डोळसा ॥ ११ ॥
ऐसियेतें देखूनी शेटे महान ॥ मागितलें द्रव्य देती आणून ॥ येरी ही जालीसे निमग्न ॥ भरला मदन निजांगीं ॥ १२ ॥
तया नगरीं नारायण पाहीं ॥ अवचट पातला तया ठायीं ॥ शोध करितां वेश्यागृहीं ॥ कळला सर्व वृत्तांत ॥ १३ ॥
मग तिचिया गृहा पातला ॥ नयनीं देखिली विप्रबाळा ॥ मनीं म्हणे अहारे कपाळा ॥ हा तंव सोहळा केउता ॥ १४ ॥
गृहीं दासदासी अपार ॥ गजरथ वाजी शकट थोर ॥ नानावस्त्रें अलंकार ॥ तेणें सुंदर शोभली ॥ १५ ॥
ऐसी देखुनी सुंदरी तें ॥ निसंग चढला उपरी वरुतें ॥ येरी अवलोकितां तयातें ॥ असेल कोणी व्यसनी हा ॥ १६ ॥
येरी मनीं चाकाटली मनस्वी ॥ म्हणे हा तंव दिसताहे तपस्वी ॥ नेणों याची पूर्ण उर्मिसी ॥ म्हणोनि धामीं आलासे ॥ १७ ॥
आसन देऊनियां सत्वरा ॥ नमन केलें द्विजवरा ॥ येरू न दे आशीर्वादोत्तर ॥ न घे थारा निजासनीं ॥ १८ ॥
ती म्हणे स्वामी बैसावें येथें ॥ येरु हास्य वदनें बोले तीतें ॥ तुवां वोळखिलें नसे कीं आम्हांते ॥ बोले निरुते शुभानने ॥ १९ ॥
तुझा जन्म कवणे ठायीं ॥ कोठून आलीस या ठायीं ॥ ब्राह्मणकुळीं उपजोन पाहीं ॥ काय केलें सार्थक ॥ २० ॥
तुझी मातापिता पुण्यवान् ॥ तुझिया बंधूची दशा कवण ॥ येथें विषयीं आसक्त होऊन ॥ काय कर्माचरण आचरलीसी ॥ २१ ॥
उत्तम हा नरदेह पाहीं ॥ वारंवार लाधणार नाहीं ॥ याचें सार्थक करी कांहीं ॥ न पडे प्रवाहीं अनेक ॥ २२ ॥
पुढे नरकवास अति दारुण ॥ कुंभपाकीं घाली सूर्यनंदन ॥ तेथे सोडविता तूंते कोण ॥ असे तो सांगणे मजलागीं ॥ २३ ॥
हा तुझा समग्र परिवार ॥ दासदासी अपार ॥ हस्तीवाजी रथवर ॥ धन अपार गाठिसी ॥ २४ ॥
हे तंव राहील जेथील तेथे ॥ अंती एकले जाणे लागे तूते ॥ विचारून पाहे पुरते ॥ सांगतो सत्य तुजलागीं ॥ २५ ॥
ऐसी उपदेशयुक्त वोळखण ॥ तियेते देता जाला नारायण ॥ येरी पाहाती जाली निरखून ॥ तों ओळखिला पूर्ण निजमनीं ॥ २६ ॥
हा तंव माझा गुरुबंधु ॥ म्हणोन चाकाटली ते वधु ॥ काहीं न बोलेची अनुवादु ॥ मौनेची वंदिले तयातें ॥ २७ ॥
सद्गदीत परम अंतरीं ॥ होऊन तयाचे चरण धरी ॥ बोलती जाली ते सुंदरी ॥ अतिआदरें तयातें ॥ २८ ॥
मग मुळापासून समग्र ॥ तयातें सांगती जाली समाचार ॥ म्हणे माझें तंव कर्म अघोर ॥ भोगिल्याविण सुटेना ॥ २९ ॥
आतां कवण उपायातें करूं ॥ केवीं उतरेल पैलपारु ॥ कवण भेटेल ऐसा सद्गुरु ॥ नरक घोरु चुके जेणें ॥ ३० ॥
हा नरदेह अती उत्तम पाहीं ॥ तया उपरी ब्राह्मण वर्णदेहो ॥ आहा रे जनार्दना शेषशाई ॥ काय हे दैवीं महाराजा ॥ ३१ ॥
ऐसे म्हणोन ते वेळीं ॥ ढळढळा अशु गाळी ॥ चरणीचें मस्तक मौळी ॥ विप्रबाळी न सोडीच ॥ ३२ ॥
परम गहिंवर दाटला ॥ मग कंठ करूनिया मोकळा ॥ रडों लागलीं ते अबळा ॥ पडली गळां विप्राच्या ॥ ३३ ॥
म्हणे मायबापें सर्व गोत ॥ माझा तूं तंव परम आप्त ॥ नेणो बुद्धीची कोण गत ॥ माझी मात केउती घडे ॥ ३४ ॥
आम्हीं उभयतां भावंडें जाण ॥ दोघांच्या गती जाल्या दोन ॥ केउता कोपला नारायण ॥ कैसें प्राक्तन माझें हें ॥ ३५ ॥
आहा देवा केले काई ॥ माता-पित्याची सेवा घडली नाहीं ॥ बंधु तोही अवलोकिला नाहीं ॥ पडलें अपाई काळाच्या ॥ ३६ ॥
दानधर्म नेणेची वार्ता ॥ भजन पूजन न घडे सर्वथा ॥ विप्रभोजन न जाणें तत्वता ॥ नाहीं वार्ता पुण्याची ॥ ३७ ॥
संतसेवा घडली नाहीं जाण ॥ नायकों कथा पुराण श्रवण ॥ वृथा आलें जन्मा लागून ॥ केउता भगवान् कोपला ॥ ३८ ॥
अहारें दुष्टा चतुरानना ॥ हें काय वोढवलें माझिया प्राक्तना ॥ हे केशवाहे जनार्दना ॥ यमयातना निवारि हे ॥ ३९ ॥
ऐसी सद्गदीत अंतरीं ॥ परम घाबरली सुंदरी ॥ टपटप अश्रु गाळी नेत्रीं ॥ द्रवला अंतरी नारायण ॥ ४० ॥
मग तियेतें धरून ह्रदयीं ॥ संबोखिता जाला ते समयीं ॥ म्हणे चिंता न करीं काहीं ॥ शेषशाई निवारील ॥ ४१ ॥
ऐसें आश्वासुनी तिजला ॥ आपण निजासनीं बैसला ॥ मग म्हणे सांगेन जे ये वेळा ॥ ऐकसी कीं राजसे ॥ ४२ ॥
येरी वदे ते समयीं स्वामियां ॥ अमान्य नोहे वचना तुझिया ॥ सांगाल तेच क्रिया ॥ स्वयें आचरेन निर्धारें ॥ ४३ ॥
मग वदे तेव्हां नारायण ॥ म्हणे करीं सर्वस्व गृहदान ॥ राहें निराळी होऊन ॥ पुढें महिमान देखसी ॥ ४४ ॥
आप्त सेवक सर्वांतें ॥ निरोप देई सकळातें ॥ देऊन त्याचियां द्रव्यातें ॥ अर्पी ब्राह्मणातें सर्वही ॥ ४५ ॥
स्वयें करूनिया स्नान ॥ मग पाचारी ब्राह्मण ॥ समग्रही पूजा करून ॥ देई लुटुन भामिनिये ॥ ४६ ॥
तुळसीपत्र ठेवी गृहास ॥ कांहीं न धरीं मनीं आस ॥ होई सर्वस्व उदास ॥ सोडी आस सकळही ॥ ४७ ॥
ऐसें आचरता तुजलागीं ॥ नुपेक्षुनि क्षीराब्धिजायोगी ॥ उडी घालूनि निजांगीं ॥ होईल भयभंगीं दयाळु ॥ ४८ ॥
विश्वास मानिसी वचनीं ॥ तरीं मुक्त होसी येच क्षणीं ॥ पापद्रव्य देई टाकुनी ॥ चक्रपाणी तुष्टेल ॥ ४९ ॥
ऐसें वदतां तियेलागून ॥ येरी तैसेंच करिती जाली आपण ॥ तत्क्षणीं आली स्नान करुन ॥ पाचारी ब्राह्मण नगरीचे ॥ ५० ॥
मग संकल्प करूनि सकळ ॥ गृहावरी ठेविले तुळशीदल ॥ गाई म्हशी वाजी कल्होळ ॥ विप्र सकळ नेते जाले ॥ ५१ ॥
दास आणि दासी पाहीं ॥ द्रव्य देऊनी मुक्त केले तेही ॥ एकाकी एक वस्त्रानिशी पाहीं ॥ ऎसी नवाई जालीसे ॥ ५२ ॥
इतुकें कर्म सरेतो परियंत ॥ नारायणही होता तेथ ॥ मागुता वदे तियेते ॥ जातो बिराडाते पैं आम्हीं ॥ ५३ ॥
आतां तुवा एक करावे ॥ एका नेमाते स्वीकारावे ॥ तीन सहस्त्र द्रव्य घ्यावे ॥ तरीच आतळूं द्यावे शरीर ॥ ५४ ॥
तीन सहस्र अर्पील जो द्रव्य तूंतें ॥ तरींच पुरविजे तयाच्या मनोरथातें ॥ नाहीं तरी स्वस्थ बैसे निवांतें ॥ मानी वचनार्थ इतुका ॥ ५५ ॥
आम्ही येऊं प्रात:काळी ॥ आकर्णून तुझी नव्हाळी ॥ कृपाळू तो चंद्रमौळी ॥ संकटीं सांभाळी दासातें ॥ ५६ ॥
ऐसें वदोन चालता जाला ॥ येरीनें नमस्कारूनी बोळविला ॥ म्हणे अमान्य करीं वचनाला ॥ जो सांगितला धर्म पैं ॥ ५७ ॥
सूर्य अस्त पावला झाला ॥ तंव जार आलें ते वेळां ॥ तीन सहस्रांचा नेम ऐकिला ॥ परतळा मेळा सर्वही ॥ ५८ ॥
कोणाते न देववे इतकें द्रव्य ॥ मग परतते जाले सर्व ॥ येरी उपोषित असे पाहाहो ॥ तंव काय अपूर्व वर्तलें तेथे ॥ ५९ ॥
अंतरिक्ष जातां नारदमुनी ॥ कौतुक पाहिलें तेणें नयनीं॥ तैसेच येते जाले ब्रह्मभुवनीं ॥ ब्रह्मया लागुनि नमियेलें ॥ ६० ॥
स्वागत पुसतां ब्रह्मदेवें ॥ काय देखिलेजी अपूर्व ॥ मग हास्य करूनि मुनिपुंगव ॥ काय पाहाहो बोलतु ॥ ६१ ॥
काय तुमचिया लिखितार्था ॥ दिसो न आलि असें ताता ॥ मग समूळ निवेदिली वार्ता ॥ होय देखता जेथें पैं ॥ ६२ ॥
म्हणे विप्र कन्या सुंदर ॥ तियेने आचरावे कर्मजार ॥ तयायोग भरावे उदर ॥ हे तंव अक्षरस्वामीचे ॥ ६३ ॥
तरी तियेने सर्वस्व दान केले ॥ अलोट नेमाते स्वीकारिले ॥ तीन सहस्र द्रव्य देता भले ॥ तरींच घडे रती त्यासी ॥ ६४ ॥
ऐशा द्रव्याच्या नेमा लागुनी ॥ न देतां उपोषित कामिनी ॥ हे मी देखून नयनीं ॥ याठाया आलो असे ॥ ६५ ॥
ऐसे ऐकतां उत्तर ॥ मनी विचारी चतुर्वक्र ॥ म्हणे हे तों कर्म अघोर ॥ घडू आले दिसताहे ॥ ६६ ॥
मग उठोनियां झडकरी ॥ तीनसहस्र द्रव्य घेतले पदरीं ॥ त्वरे पातला त्या नगरीं ॥ अकस्मात द्वारीं उभा ठेला ॥ ६७ ॥
सौदागराचा वेष धरिला ॥ सत्वर उपरिवरी वेधला ॥ बोलतां जालासे बोला ॥ नेम ऐकिला निजकर्णी ॥ ६८ ॥
नेमयुक्त द्रव्य दिधलें ॥ म्हणें मी परतून येतो येवेळे ॥ सिद्धता असोंदे सकळ ॥ म्हणोन तात्काळ चालिला ॥ ६९ ॥
ऐसी करून नवाई ॥ गुप्त जाला ठाईंचे ठायीं ॥ येरी मार्ग लक्षीत बैसली पाहीं ॥ सूर्योदया पावेतो ॥ ७० ॥
परी येतां न देखे तयातें ॥ उपोषित बैसली तेथें ॥ नसिबेची द्रव्यातें ॥ कांहीं केलिया जाण पां ॥ ७१ ॥
तंव सूर्योदयो जाला ॥ आणि नारायण पातला ॥ येरीने वृत्तांत निवेदिला ॥ जो वर्तला निशीते ॥ ७२ ॥
म्हणे येऊन सौदागर ॥ द्र्व्य दिधले तीनसहस्र ॥ न देखो अद्यापवर ॥ पुढे प्रकार केउता ॥ ७३ ॥
ऐसे ऎकतांची उत्तर ॥ येरु हर्षला निर्भर ॥ म्हणे बोलावी धरामर ॥ वाटीं सर्व धन हे ॥ ७४ ॥
स्नान करून येई आतां ॥ बोलावूनि विप्रा समस्तां ॥ द्रव्य वेची हे तत्वतां ॥ नसे वार्ता अन्य कांहीं ॥ ७५ ॥
तथास्तु म्हणोन निज वाचा ॥ स्नान करून भावे साचा ॥ पाचारून मेळा विप्रांचा ॥ केला द्रव्याचा भणाणा ॥ ७६ ॥
मुष्टी आणि वोंजळ भरुनी ॥ द्रव्य वाटिती जाली कामिनी ॥ आश्चर्य करिती सकळजनी ॥ देखें नयनी नारायण ॥ ७७ ॥
दुसरे दिवसा लागुन ॥ नामुष्टी भरी अन्न ॥ तंव दिनमान झाला अस्तमान ॥ जाले कथन ब्रह्मदेवा ॥ ७८ ॥
पुनः नारदें जाऊनीं वार्ता निवेदिली ब्रह्मया कर्णी ॥ म्हणे तीन सहस्र ते कामिनी ॥ केवी हाणी द्रव्यतें ॥ ७९ ॥
काल तुह्मीं जें द्रव्य दिधलें ॥ तें तो सर्वही दानातें दिधलें ॥ पुढे पाहिजे विचारिलें ॥ उपोषित अबला ती ॥ ८० ॥
आजिचा तो दुसरा दिन ॥ उपोषित ते अंगना ॥ जार न येती कोणी सदना ॥ पुढें विचारण केउती ॥ ८१ ॥
जारत्वें उदर भरावें ॥ हें तो असत्य जाले आघवें ॥ ऐसें ऐकून ब्रह्मदेवें ॥ म्हणे हें तो बरवें दिसेना ॥ ८२ ॥
मग उठोनी लवलाही ॥ तीस सहस्र द्रव्य घेतलें पाहीं ॥ तात्काळ पातले निजगृहीं ॥ असे ज्या ठायीं वेशा ते ॥ ८३ ॥
जितुकें द्रव्य दान दिधलें ॥ तयाच्या दशगुणीत अर्पिले ॥ पाहिजे म्हणोनि शास्त्र बोलिले ॥ यदर्थी घेतले तीस सहस्र ॥ ८४ ॥
आपण जातसे सावकार ॥ जुंपोनियां रहंवर ॥ बरी द्रव्य तीस सहस्र ॥ पातला मंदीर लवलाहें ॥ ८५ ॥
समग्र द्रव्य पुढे ठेविले ॥ म्हणे हें ठेविजे गृहमेळें ॥ आम्हांतें व्यापिलें कामानळें ॥ येऊं भोगवेळ लक्षुनी ॥ ८६ ॥
आपण असो सावकार ॥ पाहून तूं तें स्वरूप सुंदर ॥ अंगीं दाटला कामज्वर ॥ म्हणोन सत्वर पातलों ॥ ८७ ॥
तरीं जें मागसी तेची देईन ॥ न करी कदां अनमान ॥ हें द्रव्य ठेवी सांठवून ॥ आम्हीं परतून येतसों ॥ ८८ ॥
पाहूनियां सुंदर कांती ॥ येरी चाकाटली चित्तीं ॥ मस्तक ठेवी चरणावरुती ॥ म्हणे विनंति परिसीजे ॥ ८९ ॥
अलोट असे नेम माझा ॥ तोचि परिसिजे महाराजा ॥ काल द्रव्यार्थ घेतलें वोजा ॥ जाल्यें भाता तयाची ॥ ९० ॥
तरी तो अद्याप देखिला नाहीं ॥ हें द्रव्य मी तो न सेवीं ॥ तयाचा मनोरथ पुरतांही ॥ सेवा तुमची स्वीकारूं ॥ ९१ ॥
ऐसें नेमोत्तर नारीचे जाण ॥ आकर्णून चतुरानन ॥ थकीत जाला निजमन ॥ हे तो कठीण दिसता हे ॥ ९२ ॥
मग तीते बोलतसे वचना ॥ तरी पुरवी तयाची कामना ॥ तोवरी हे द्रव्य ठेवीं साठवून ॥ येऊं परतून मागुती ॥ ९३ ॥
ऐसे तिये देवदूत ॥ गुप्त झाला तत्क्षण ॥ येरी चाकाटली मन ॥ केउती करती विपरीत ॥ ९४ ॥
ऐसे वर्तमान जालेते ठायीं ॥ तंव भाग्योदय झाला पाहीं ॥ नारायण आला लवलाहीं ॥ येरी ठेवीं पायीं मस्तक ॥ ९५ ॥
येरीनें वार्ता निवेदिली सकळ ॥ म्हणे देऊन द्रव्य तात्काळ ॥ गुप्त जाला न लागता वेळ ॥ नेणो खेळ कैसा हा ॥ ९६ ॥
येरु म्हणे बहुत जालें निकें ॥ तरी आतां एक ऐकें ॥ स्नान करूनियां निकें ॥ द्रव्य वाटीं विप्रातें ॥ ९७ ॥
मग बोलेते भामिनी ॥ केउती आचरूं हे करणी ॥ द्रव्य तो दिधलें दोघांनी ॥ न देखों नयनीं एक तो ॥ ९८ ॥
उत्तर देतसे नारायण ॥ तूंतें सांगतों तें करीं कारण ॥ तिनें तात्काळ स्नान करून ॥ विप्रवर्या हांकारिलें ॥ ९९ ॥
मग द्रव्याची भरून झोळी ॥ नेती जाली विप्रमंडळी ॥ येरी राहिलीसे निराळी ॥ नेत्रकमळी अवलोकित ॥ १०० ॥
ऐसा सर्व धनाचा व्यय केला ॥ त्रिरात्र उपोषित ते बाळा ॥ तंव दिनमान अस्तास गेला ॥ समाचार कळला ब्रह्मदेवा ॥ १ ॥
नारदे निवेदिलें समग्र ॥ घाबरला चतुर्वक्र ॥ म्हणे आतां केउता प्रकार ॥ न सुचे विचार कांहीं आतां ॥ २ ॥
ऐसें द्रव्य न्यावें कोठवरी ॥ तीतें आयुष्य तों शतवरी ॥ प्रतिदिनीं आचरतां सुंदरी ॥ दशपत द्यावें लागे पैं ॥ ३ ॥
सांप्रत द्यावें लागे तीनलक्ष ॥ ऐसें वाढतां दिवसोदिवस ॥ गणती वर्षे शतास ॥ तरी द्रव्य नाश कुबेराचा ॥ ४ ॥
ऐसें जाणून अंतरीं ॥ हंस विमान धाडिले झडकरी ॥ म्हणे घेऊन यावी ते सुंदरी ॥ आचरे परी ऐसी हे ॥ ५ ॥
आज्ञा होतां तात्काळीं ॥ विमान उतरले भूतळीं ॥ तात्काळ दिव्यरूप केली ॥ परी विमानी न बैसे ते ॥ ६ ॥
म्हणे सद्गुरु नारायण ॥ न देखतां न येतां जाण ॥ न सेवीं मी विमान ॥ जावे परतून माघारें ॥ ७ ॥
मग विमान करून स्थिर ॥ दूत गेले सत्वर ॥ नमूनियां चतुर्वक्र ॥ समाचार सांगितला ॥ ८ ॥
विना नारायणावांचूनी ॥ विमानी न बैसे भामिनी ॥ मग वदे कमळासनीं ॥ हे ही काहाणी अपूर्व ॥ ९ ॥
नारायणाते ठेवितां ॥ हे ही बरी न दिसे वार्ता ॥ तो ऐसेचि वारंवार करितां ॥ विपरीत वार्ता हो पावे ॥ १० ॥
ऐसे जाणूनि निजमनीं ॥ उभयतां आणिविली ते क्षणीं ॥ वाहूनियां हंसविमानीं ॥ निजवनीं आणिले ॥ ११ ॥
ऐसी ते शतायुषी जारीण ॥ उद्धरिली सद्गुरु वचने ॥ म्हणोनि अनन्य होऊन ॥ जावे शरण सद्गुरूते ॥ १२ ॥
परी मुख्य भाव असावा ॥ मग पाविजे देवाधि देवा ॥ म्हणोन सांगतों तुम्हां सर्वा ॥ भावार्थे आचरावा मलमास ॥ १३ ॥
जरीं सर्वी सर्वस्वें दान केलें ॥ तरीं तात्काळ पाविजे फळें ॥ संतुष्ट होऊन गोपाळें ॥ पद अढळ तो पावे ॥ ११४ ॥
स्वस्ति श्रीमलमहात्म ग्रंथ ॥ पद्मपुराणीचे संमत ॥ मनोहरसुत विरचित ॥ चतुर्विशततमोऽध्याय गोड हा ॥ २४ ॥
ओव्या ११४ ॥
॥ इति चतुर्विशतितमोऽध्यायः ॥