मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|अधिकमास माहात्म्य पोथी|

अधिकमास माहात्म्य - अध्याय सातवा

अधिकमास माहात्म्य - अध्याय सातवा

अध्याय सातवा

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीराम जयराम राघवा ॥ पतितपावना रमाधवा ॥ करुणानिधे दयार्णवा ॥ देवाधिदेवा दीनबंधो ॥ १ ॥

तव चरणसरोजीं मीन ॥ राहो सदा होऊनि मन ॥ ऐसें देई मज वरदान ॥ कृपा निधान राघवा ॥ २ ॥

तव कृपाबळें समस्त ॥ वदेन म्हणतसें हा ग्रंथ ॥ पुरवीं माझा मनोरथ ॥ कृपावंता दीनाचा ॥ ३ ॥

श्रीरुवाच ॥ देवेश्वरं रमानाथ पुनर्दीपफलंवद ॥ यथ येन कृतो दीपेविध्वस्तेः किं च पातकं ॥ १ ॥

लक्ष्मी म्हणेहो देवाधिदेवा ॥ प्रश्नाक्षर परिसावा ॥ पुनः दीपदानाते परिसावा ॥ कृपा करूनि स्वामिया ॥ ४ ॥

मागील अध्यायीं कथन ॥ दीपसरसावितां जाण ॥ मार्जार गेला उद्धरून ॥ नवल विंदान ऐकिलें ॥ ५ ॥

तरी दीप सरसावितां । इतुकें पुण्यजी तत्वता ॥ मग दीपातें विध्वंसिता ॥ कवण वार्ता तयाची ॥ ६ ।

ऐसा प्रश्नाक्षर रमेचा ॥ आकर्णून वदे स्ववाचा ॥ स्वामी जो दीनजनाचा ॥ वदता झाला ते काळीं ॥ ७ ॥

श्रीकृष्ण उवाच ॥ पुनरन्यत्प्रवक्ष्यामि दीपस्य फलमुत्तमं ॥ दीपविध्वंसने पुण्यं सर्व नश्यति यत्कृतं ॥ २ ॥

मग वदे वासुदेवा ॥ ऐकें दीप विध्वंसनाचा प्रभावो ॥ ये विषयींचा इतिहास पहा हो ॥ श्रवण करा हो आदरें ॥ ८ ॥

पूर्वी मधुवनाचे ठायीं ॥ एक सामवेदी विप्र असे पाही ॥ शांकली नाम तया देहीं ॥ असे निजगृहीं आनंदें ॥ ९ ॥

सदाचारी शुचिष्मंत ॥ स्नानसंध्या वेदपारंगत ॥ देवार्चनीं नित्यरत ॥ पुराण सांगत स्वगृहीं ॥ १० ॥

दुष्ट प्रतिगृह न घे कवणाचा ॥ उपार्जना नसे दीनवाचा ॥ स्वधर्म पाळून नेमाचा ॥ काळक्रमणें चालवीत ॥ ११ ॥

तयातें भार्या उभयतां दोघी ॥ विमलिका सुशीला पाही ॥ एकमय वर्तती त्रिवर्गही ॥ नसे कांहीं विपरीत ॥ १२ ॥

तयामाजी ज्येष्ठ सुशीला ॥ सदां सादर पतिवचनाला ॥ अंतर पडो नेदी वाचेला ॥ परम तत्पर दिवसनिशी ॥ १३ ॥

त्याहीवरी अतीत अभ्यागत ॥ कथापुराण श्रवण करी नित्य ॥ गृहाचारींही नित्य नैमित्य ॥ असे चालवित यथा विभागें ॥ १४ ॥

ज्यावेळीं प्रसंग पडे जैसा ॥ संसार प्रसंग चालवी तैसा ॥ सत्कर्मी लावितसे वयसा ॥ क्रमित ऐसा काळ पै ॥ १५ ॥

धन्य धन्य ऐशी कामिनी ॥ पतिव्रता शिरोमणी ॥ सदां सादर पती भजनीं ॥ पूर्वपुण्यें लाधिजे ॥ १६ ॥

धन्य तयाचा संसार ॥ जेणें पूर्वी अर्चिला रमावर ॥ म्हणोनि ऐसियेसीं संसार ॥ करणें घडे तयातें ॥ १७ ॥

नाहीं तरी दुर्मुखी भार्या ॥ मिळतां संसार गेला वायां ॥ तेथें पुण्य मार्गाची क्रिया ॥ तया प्राणिया कोठुनी ॥ १८ ॥

परी ऐसी नव्हे ती सुशीला ॥ परम पतिव्रता मंगला ॥ ऐसियेचें नाम घेतां आगळां ॥ दोषमळ परिहरती ॥ १९ ॥

तंव कवण एक अवसरीं ॥ पुराण श्रवणीं बैसे ते नारी ॥ तंव तेथें अधिकमास परी ॥ केलें निर्धारी श्रवण ॥ २० ॥

मग निजध्यास धरुनि मनीं ॥ परम विनीत होऊनी ॥ भ्रतारातें बोलतसे वाणी ॥ मधुर वचनीं तेधवां ॥ २१ ॥

भगवत्प्रष्टुमिच्छामि क्रोधं कर्तुनचार्हंसी ॥ अद्यकः पुण्यदिवसोलोकोयाति रवेःसुतां ॥ ३ ॥

हे नाथ हे स्वामीदेवा ॥ आज कवण पर्वणीचा ठेवा ॥ सर्व जनाचा मिळोन थवा ॥ जाती रेवातीरा स्नानार्थ ॥ २२ ॥

जरी कृपा करूनियां मज ॥ आज्ञा दिधलिया सहज ॥ तरी स्नाना जाऊनियां चोज ॥ निरखूं आज निजनयनीं ॥ २३ ॥

ऐकून ऐसी मंजुळवाणी ॥ शांकली बोले ते क्षणीं ॥ म्हणे आजिचिये पर्वणीं ॥ प्राप्त जाला मळमास ॥ २४ ॥

हा तंव पुरुषोत्तममास ॥ म्हणोनी जन जाता स्नानास ॥ हे व्रत करावें सायास ॥ धरूनि हव्यास निजमनीं ॥ २५ ॥

एक मासावरी चालवितां नेम ॥ तरी सकळ पापें होती भस्म ॥ संतुष्टोनी पुरुषोत्तम ॥ पावती आराम स्वपदीं ॥ २६ ॥

शांकलिरुवाच ॥ श्रृणुभद्रे प्रवक्ष्यामि यदर्थ यांति नागराः ॥ असंक्रांतः समायातोमासः श्रीपतिवल्लभः ॥ ४ ॥

तरी माझिये आज्ञेवरी ॥ तूं ह्या व्रतातें स्वीकारी ॥ प्रातःस्नान करून आदरीं ॥ दीपदानातें करी सुशीले ॥ २७ ॥

ऐसी आज्ञा होतां ते काळीं ॥ परमहर्षयुक्त जाली ते बाळी ॥ मग नमन करूनि गंगाजळीं ॥ स्नानालागीं पातली ॥ २८ ॥

स्नान करून यथाविधीं ॥ परतुनी आली गृहासंधी ॥ करून देवतार्चन विधी ॥ दीपदान संधी पाहात ॥ २९ ॥

तंव येणें प्रकारें जाणा ॥ प्रथम दिवसीं करिती जाली अंगना ॥ पासूनियां द्वितीयदिना ॥ यथानुक्रमें करीतसे ॥ ३० ॥

ताम्रपात्री सुकृतेंसी ॥ दीप ठेवीतसे सायासीं ॥ तया तळवटीं मृन्मय कुंभासीं ॥ भरून ठेवीतसे आदरें ॥ ३१ ॥

मग तयाची पूजा विधियुक्तें ॥ करून पाचारीं ब्राह्मणातें ॥ तयाची पूजा करून नमस्ते ॥ दक्षिणेसहीत अर्पीतसे ॥ ३२ ॥

श्रोते घेतील आशंका ऐसी ॥ केवि वदतां मृत्तिका कुंभासी ॥ न चाले अवांतर धातूसी ॥ म्हणोनि मृण्मयासी वदलेती ॥ ३३ ॥

ऐसी आशंका श्रोते चतुर ॥ घेता ऐकाहो प्रत्युत्तर ॥ तरी दरिद्रव्यथा ऐसी थोर ॥ नसे निर्धार जगातें ॥ ३४ ॥

म्हणोनि ती सुशीला पाहीं ॥ दरिद्रव्याप्त निजगृहीं ॥ इतर धातूचा स्पर्श तोही नाहीं ॥ मृत्तिका पात्र या लागीं ॥ ३५ ॥

जयावरी कृपा श्रीची ॥ तयानें कीजे इतर धातूचीं ॥ यदर्थी वार्ता संशयाची ॥ मना नाणिजे श्रोतेहो ॥ ३६ ॥

ऐसें करितां व्रताचरण ॥ सुशीला नित्य करी आपण ॥ तंव सापत्‍न भाव मनीं कल्पून ॥ करीतसे विघ्नविमला पैं ॥ ३७ ॥

व्रत करीते नाम सुशीला ॥ नामासारखी करणी अचळा ॥ दुजीते नामाभिधान विमळा ॥ परी द्वेष कल्लोळा ह्रदयीं वसे ॥ ३८ ॥

एका पुरुषातें दोघी नारी ॥ पहातां दोघीची विपरीत परी ॥ एक मळातें त्यागी स्वीकारी ॥ हे खूण चतुरीं जाणिजे ॥ ३९ ॥

असो ते विमळ नारी ॥ निशीदिनी टपतसे निर्धारी ॥ जेवी मूषका लागीं अंतरीं ॥ बिडाळकू जैसा ॥ ४० ॥

तैशापरी अहोरात्रीं ॥ जपतसे ते सुंदरी ॥ मत्सर धरून अंतरीं ॥ विघ्ना लागीं उदित ॥ ४१ ॥

पहा दुर्जनाचा स्वभावो ॥ दुजियातें करावा अपावो ॥ हा तरी सहजीं स्वभावो ॥ अंगप्रभावो दुर्जनाचा ॥ ४२ ॥

यालागीं श्रीरघुपती ॥ नको हे दुर्जनाची संगती ॥ तात्काळ भ्रमे सुमती ॥ लागतां संगती तयाच्या ॥ ४३ ॥

ऐसें जपत असतां विमळेस ॥ संधी साधी मासार्ध दिवस ॥ तंव सुशीला गेली स्नानास ॥ लक्षुनी दिवस एकादशी ॥ ४४ ॥

सिद्ध करूनि दीपपान ॥ मग गेली स्नानालागून ॥ तंव येरी काय करी कारण ॥ दीप मालवूनि विझविला ॥ ४५ ॥

दीपघृतातेंही उलंडिलें ॥ रिक्तपात्र करून ठेविले ॥ ऐसें करिता तये वेळें ॥ तो स्नानाहून आली सुशीला ॥ ४६ ॥

करूनि देव देवतार्चन ॥ म्हणे द्यावें आतां दीपदान ॥ नेत्रीं पाहे जें विलोकून ॥ तों घृतेसहीत विझोनी दीप गेला ॥ ४७ ॥

चित्तीं म्हणे मार्जार करणी ॥ करूनि गेलें येक्षणीं ॥ पुनः साहित्य मेळवूनीं ॥ करी कामिनी दीपदान ॥ ४८ ॥

ऐसें प्रत्यही होत जाय ॥ येरी म्हणे होतसे काय ॥ घडत असे जो पर्याय ॥ विदित नव्हे तयेतें ॥ ४९ ॥

ऐशिया परी ते विमळा पाहीं ॥ कर्म करूनि विचरे स्वगृहीं ॥ सुशीळा खेद करी ह्रदयीं ॥ म्हणे कवण अपायीं प्रवर्तला ॥ ५० ॥

नेणो जन्मांतरीचा ठेवा ॥ मज कैचें घडेल पुण्य देवा ॥ हे जनार्दना माधवा ॥ कवण उपाया करूं मी ॥ ५१ ॥

ऐसी चिंता करितां ते कामिनी ॥ जपत बैसली ते क्षणीं ॥ तों नित्य प्रकार करणी ॥ करून गेली विमळा ती ॥ ५२ ॥

परी तयां दिनीं काय केलें ॥ विमलेनें मनीं जाणितलें ॥ म्हणोन घृत पात्रीं भरून ठेविलें ॥ उर्वरीत स्नेह दीपाचें ॥ ५३ ॥

हें पाहून आपुले नयनीं ॥ खेद करिती झाली मनीं ॥ म्हणें देवदेवा चक्रपाणि ॥ यासीं यालागुनी करूं काय ॥ ५४ ॥

वृत्तांत सांगितला भ्रतारासीं ॥ तो तंव विहित धर्म नोहे मजसी ॥ सवती मत्सर म्हणोन तयासीं ॥ निजमानसीं क्रोधें भरलें ॥ ५५ ॥

ऐसें विचारून अंतरीं ॥ कांहीं न बोले ते सुंदरी ॥ कुसमुसुनि राहे अंतरीं ॥ गृहाचारी वर्ततसे ॥ ५६ ॥

येणें प्रकारें करून ॥ व्रत करिती जाली संपूर्ण ॥ करूनियां उद्यापन जाण ॥ ब्राह्मण संतर्पण यथाविधी ॥ ५७ ॥

संपूर्ण एकमास भरतां ॥ काय प्रवर्तली कथा ॥ तिघे पुत्र विमळेसीं असतां ॥ मृत्युपंथाते गेले ॥ ५८ ॥

एकामागें एक ॥ मरण पावले हो सम्यक ॥ नेत्र जाऊनि अंधत्व देख ॥ तेही देख पावली ॥ ५९ ॥

नेत्री न दिसेचि कांहीं ॥ चाचपीत वावरे स्वगृहीं ॥ मग आठवीतसे ह्रदयीं ॥ शेषशायी परमात्मा ॥ ६० ॥

ह्रदयीं परम गहिवरोन ॥ मग आठवी पूर्व कर्मातें जाण ॥ हे भगवान जनार्दन ॥ जाणून कर्म हें केलें ॥ ६१ ॥

मी तव अपराधी बहुत ॥ पुढें केवी होय माझा प्रांत ॥ म्हणोनि तळमळे ह्रदयांत ॥ निशिदिवस तळमळी ॥ ६२ ॥

आधीं कर्म जैसें करावें ॥ तात्काळ लागे तें भोगावें ॥ पुढें यमयातना ते स्वभावें ॥ न चुके कल्पांत काळीं ॥ ६३ ॥

यालागीं विवेकें करूनि ॥ सावध वर्तावें हो जनी ॥ पुढें अवघड यमजाचणी ॥ नरक विंदानीं सुटेना ॥ ६४ ॥

व्यासादिक महाऋषी ॥ वाल्मीकादी तपोराशी ॥ पुराणें करून ठेविली जगासी ॥ तरणोपायासी निर्धारें ॥ ६५ ॥

परी जग हें अलगट मोठें ॥ कोणी न जाती त्या वाटे ॥ म्हणोनि दुःखी होती अचाटे ॥ जातात वाटे यमपुराच्या ॥ ६६ ॥

असो ते विमळा सुंदरी ॥ दिवसनिशीं खेदकरी ॥ म्हणे धन्यतेची नारी ॥ भ्रतार आज्ञेनें वर्तत ॥ ६७ ॥

मी तंव अभागी मोठी ॥ परम दैवाची करंटी ॥ नेणें कांहीं हातवटी ॥ व्रतदानें उद्यापनें ॥ ६८ ॥

ऐसी करितां चिंता ॥ कालांतरें ती मृत्युपंथा ॥ पावती जाली ते तत्वता ॥ यमव्यथा दारुण ॥ ६९ ॥

यमदूतीं नेलें मारीत ॥ चित्रगुप्तें काढिलें लिखित ॥ मग ते जाचणीं नित्यानित्य ॥ भोगवीत तियेतें ॥ ७० ॥

दारुण ते यमयातना ॥ शास्त्रें बोलिली प्रकार नाना ॥ तदनुसार ते कमिनी ॥ भोगिती जाली दुःखातें ॥ ७१ ॥

आठवून आपुले आचरण ॥ अट्टहास्ये रडे आपण ॥ परी तेथें सोडविता कवण ॥ असे जाण सांग पा ॥ ७२ ॥

सोयरे आणि आप्त पाहीं ॥ हे तंव राहाती ठायींचे ठायीं ॥ परी तेथीची न जाणती सोई ॥ पाडिती अपाई प्राणिया ॥ ७३ ॥

मिळोन आप्तवर्ग सकळ ॥ घृत शर्करेचे मारिती कवळ ॥ म्हणती उत्तम प्रकारे काळ ॥ क्रमिला याचिया संगती ॥ ७४ ॥

सर्वसुखाचे सांगाती ॥ शेवटी कोणी कामा न येती ॥ ही तंव जनाची असे प्रवृत्ती ॥ न जाणति हिताहित ॥ ७५ ॥

कोणीही म्हणती ऐसे ॥ परलोकीं सार्थक करी हव्यासे ॥ ऐशिया लागी उपदेशे ॥ न सांगती कोणीही ॥ ७६ ॥

जरी ऐसा करिती उपदेश ॥ मग सकळही लागती पुण्यपंथास ॥ तंव यमपुरी पडतां वोस ॥ म्हणोनि पुण्यमार्गास नेणती ॥ ७७ ॥

असो ते विमला सुंदरी ॥ यातना भोगूनियां भारी ॥ मग टाकिली नरक अघोरीं ॥ कुंभपाकीं तियेते ॥ ७८ ॥

ऐशी ते कुंभपाकीं पडत ॥ रौरवाते झाली भोग प्राप्त ॥ क्रमितां वर्षे गणित ॥ छत्तिस सहस्र गर्जना पैं ॥ ७९ ॥

दीपनिर्नाशनात्सद्यो विमला दुःखिताभवत् ॥ तस्याः पुत्रतयं नष्टमधत्वं समुपागता ॥ ५ ॥

अदीर्घे तैव कालेन निधनं समुपागता ॥ त्रिंशद्वर्षसहस्त्रापि रौरवे नरकेस्थिता ॥ ६ ॥

मग जन्मा घातली ग्रामसूकरी ॥ मग व्याघ्र जन्मा दुसरी ॥ श्रृगाळ जन्म तीसरी ॥ वडवाघळी चौथीं पैं ॥ ८० ॥

पुनः मानवदेह पावोन ॥ निशादी जाली ते कामिन ॥ तेथें हिंसा कर्म दारुण ॥ घडलें जाण तिये तें ॥ ८१ ॥

मग मीन होऊनियां जळीं ॥ थिल्लरोदकांत तळमळी ॥ तयावरी ते घार जाली ॥ आकाश पोकळी फिरत ॥ ८२ ॥

ऐसे जन्म भोग भोगितां ॥ परम कष्ट जाले तत्वतां ॥ नको नको हे जन्मव्यथा ॥ श्रीरघुनाथा घडूं देऊं ॥ ८३ ॥

यापरी दीप विध्वंसन ॥ तेंचि कथिलें होय कारण ॥ ऐका पुढील कथन ॥ सुशीलेचें कैसें तें ॥ ८४ ॥

काळांतरें करून जाण ॥ तेही पावली असे मरण ॥ विष्णुदूतीं विमानीं वाहून ॥ नेलें पैं तियेतें ॥ ८५ ॥

एवं तया विमलयादीपप्रशमनात्फलं ॥ प्राप्तं दुःखं वियोगेन सुशीला सद्गतिंगता ॥ ७ ॥

नारी वापि नरोवापि यः करोति मलिम्लुचे ॥ स्नानं वा दीपकं वापि विप्रसेवनमेवच ॥ ८ ॥

यालागीं पुरुष अथवा नारी ॥ व्रत कीजे हो निर्धारी ॥ इये कलियुगा माझारी ॥ उपाव श्रीहरी पैं केला ॥ ८६ ॥

परम दयाळू दीननाथ ॥ ब्रीद सत्य करावया व्रत ॥ होऊनियां कृपावंत ॥ आदरें सांगत लक्ष्मीसी ॥ ८७ ॥

एवं दोघी स्त्रियांची दोन गती ॥ एक सद्गती एक अधोगती ॥ परी शांकली तें कवणगती ॥ ऐकिजे पुढती श्रोतेजन ॥ ८८ ॥

दोघी स्त्रिया पावतां निधन ॥ चित्तीं उदास तो ब्राह्मण ॥ तिघे पुत्र पावले मरण ॥ पुढें संतान नसेची ॥ ८९ ॥

म्हणोन तळमळ मानसीं ॥ रात्रंदिवस कुसुमुसी ॥ हे नवसंगती संगदोषीं ॥ घडे अनायासीं प्राणिया ॥ ९० ॥

पातक जें कायिक वाचिक ॥ तैसेंचि हें सांसर्गिक ॥ शास्त्राधार असे देख ॥ म्हणोन पातक बोलिजे ॥ ९१ ॥

यापरी कष्टी तो ब्राह्मण ॥ पावता झाला परम शीण ॥ काळांतरे पावला मरण ॥ नेला बांधून यमदूती ॥ ९२ ॥

पहिलाच ब्राह्मण पुण्यशीळ ॥ दानधर्म आचारशीळ ॥ यालागीं तयाते केवळ ॥ नसे हळहळ जाचणीची ॥ ९३ ॥

परी विष्णुलोकीं सुशीळेतें ॥ नारदें कथिलें तियेतें ॥ तिणें प्रार्थून विष्णुतें ॥ करुणामृत वचनें करूनी ॥ ९४ ॥

म्हणे देवदेवा ह्रषीकेशी ॥ तूं तव कृपाळू होसी ॥ तरी कोण दशा भ्रताराशीं ॥ निजमानसीं विचारा ॥ ९५ ॥

मग संतुष्ट होऊन नारायण ॥ तया आणवी धाडून विमान ॥ मग उभयतां दोघेजण ॥ वैकुंठ भुवना पावली ते ॥ ९६ ॥

संस्थाप्य संततिं भूमौ वैकुंठ निलयंगता ॥ सायुज्यं पति संयुक्ता पुनरावृत्ति दुर्लभं ॥ ९॥

याप्रकारें श्लोकार्थ बरवा ॥ श्रोति आदरें परिसावा ॥ न्यून पूर्ण क्षमा करावा ॥ दोष न ठेवावा मजलागीं ॥ ९७ ॥

पाहूनियां संमतातें ॥ अर्थान्वय वर्णिला येथें ॥ प्राकृत भाषा म्हणोन तीतें ॥ अव्हेर संतीं न करावा ॥ ९८ ॥

समर्था केला पाहुणेर बरवा ॥ म्हणोन दुर्बळातें अव्हेरावा ॥ हें केवी उचित थोरिवा ॥ विहित भावा न दिसे ॥ ९९ ॥

स्वस्ति श्रीमलमास महात्म ग्रंथ ॥ पद्मपुराणींचें संमत ॥ मनोहरसुत विरचित ॥ सप्तमोऽध्याय गोड हा ॥ ७ ॥ ओव्या ॥ ९९ श्लोक ॥ ९ ॥

॥ इति सप्तमोऽध्यायः ॥

N/A

N/A
Last Updated : October 12, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP