अभंग - १४१ ते १५०

निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.

Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner.


१४१

जांताचि गोकुळा बाहेरी । कृष्णपाउलांचिया हारी । उमटल्या देखोनि महीवरी । प्रेमा अंतरीं न संटे ॥१॥

चरणमुद्रांकित चिन्हें । देखोनि घाली लोटांगणें । अंतर्निष्ठेंचें हें लेणें । लेउनी निमग्न ते ठायी ॥२॥

आनंदाश्रु गळती नेत्रीं । स्वेदरोमांच उठती गात्रीं । कंप स्फुंदनें विकळ गात्रीं । सद्रदितु मुरकुंडें ॥३॥

सर्व साक्षी नारायण । जाणेनियां त्याचें चिन्ह । आला अति त्वरें धांवोन । तया उमजवून आलिंगी ॥४॥

दोघां हो सरली भेटी । पडिली आनंदाची मिठी । मग अचळ पुसोनियां मुखवटीं । परम कृपेनें न्याहाळी ॥५॥

पुसे अंतरीचें गुज । तयापाशीं अधोक्षज । येरें वंदूनियां चरणरज । मंजुळा उत्तरीं बोलतु ॥६॥

निळा म्हणे स्तवन करी । मग नि:स्तब्ध्‍ा निमिषवरी । अवलोकुनियां चरणावरीं । ठेवीं मस्त्क क्षणाक्षणा ॥७॥

१४२

मग सांगें गुह्य गोष्टी । मामा पाचारितो भेटी । इतुकेंचि ऐकोनियां पोटीं । कृष्णा आनंद न समाय ॥१॥

मग म्हणे बळिरामासी । जाऊं मामाचिये भेटीसी  कृप करुनियां अक्रूरासी । मूळ आम्हांसी पाठविला ॥२॥

म्हणती बळिरामही चलावें । वोरसें मामासी भेटोनी यावें । आपणंसिही जिवें भावें । आर्त तयाचें अखंड ॥३॥

घेऊनि पांचशें गोवळ । समागमें आपुलें दळ । निघते झाले उतावेळ । आले घरासी पुसावया ॥४॥

मग नंदयशोदेप्रती । उभयतांहि नमस्कार करिती । मामासी भेटी जाऊं म्हणती । दयावी आज्ञा आशिर्वादें ॥५॥

तें म्हणती कंस व्देषी । महादृष्ट पापराशी । देखतांचि घेरतील रे दोघासीं । सर्वथा तेथें न जावें ॥६॥

निळा म्हणे ऐकोनि हरि । म्हणे न चिंतावें हें अंतरीं । आम्हांसी आप्त या संसारीं । कोण मामाहुनी जिवलग ॥७॥

१४३

आम्ही लेंकुरें लळेवाडें । तुमचीं तैसीं त्याहि पुढें । क्रीडा करुनी वाडे कोडें । येऊं भेटोनियां वोरसें ॥१॥

नाहीं तया पोटीं मैल । अत्यादरें धाडिलें असे मूळ । अक्रूर सांगताहे केवळ । भेटी आमुची इच्छितो ॥२॥

तुम्ही न धरावा संशय । तेथें आम्हां नाहीं भय । मामाभेटी जातां काय आमुची इच्छितो ॥२॥

तुम्ही न धरावा संशय । तेथें आम्हां नाहीं भय । मामा भेटी जातां काय । उव्देग घडती भाचिया ॥३॥

ते म्हणती रे नव्हे कृष्णा । तुम्ही त्याचा भावार्थ नेणां । कालिची पहा पां पूतना । आली होती घातावया ॥४॥

केवढी दाऊनियां माया । बसलीं तुंतें स्तन धावया । कृष्णा म्हणे मी धालों तिचिया । स्तनपानेंची आजिवरी ॥५॥

तिणें वेचोनियां कायाशक्ती । आम्हांसि तोषविलें प्राणांतीं । उपकार तिचेहि श्रीपती । म्हणे मुखें मी काय वानूं ॥६॥

निळा म्हणें बोलो‍नि ऐसें । न रहातीचि चालिले उददेशें । गोपिका गौळणीही ऐकोनि ऐसें । आल्या धांवत हरिपाशीं ॥७॥

१४४

म्हणती नको नको जाऊं हरी । सांडोनी आम्हां कोठें दुरी । तुजवांचोनिया संसारी । कोण आम्हां जिवलग ॥१॥

जातील प्राण तुतें जातां । वियोग न साहावे तें व्यथा । पळमात्रचि वेंगळे पडतां । जेविं कां मासोळी जळांतील ॥२॥

नव्हे अक्रूर झाढीवर । करुं आला येथें संहार । जीवन नेलिया यदुवीर । आम्हां सहजचि प्राणांतु ॥३॥

इतुक्यांचिही येईल हत्या । जरि तू कृष्णा नसील आतां । ऐसे बोलोनियां समस्ता । लोळती कृष्णचरणावरीं ॥४॥

वधुनी आम्हां आपुल्या हातें । जाई मग तूं जाणें तेथें । करुनियां दीर्घ् रुदनातें । उकसाबुकसी स्फुंदती ॥५॥

आमुचा जीव तूंचि प्राण । तुजविण न वाचों तुझीचि आण । नको आमुचें हें निर्वाण । पाहों आपुले निज नेत्रीं ॥६॥

निळा म्हणे यावरी हरी । शांतवी तया निज उत्तरीं । म्हणें आम्ही वरावरी । येऊं भेटोनी मामासी ॥७॥

१४५

नका होऊं खेदक्षीण । घ्या भाष माझें बंधन । तुम्हां वांचूनियां मजही कोण । आहे तें आप्त इहलोकीं ॥१॥

जैसा तुमचा मजवरी भाव । माझीही तैसाची तुम्हांवरी जीव । नाही येथें संदेहा ॥ ठाव । चित्ताचित्त साक्ष असे ॥२॥

तुम्ही निरंतर मातेंचि ध्यातां । मीही न विसंबे तुम्हींची देखतां । ऐसें परस्परें बोलतां । लोटती उभयतां नेत्री पूर ॥३॥

वियोग न साहवें कृष्णासी । त्याही होती कासावीसी । परी धैर्याचिया अती आवेशीं । पुढील साधिती कार्यार्थू ॥४॥

भक्तकृपाळू श्रीहरी । अवघा प्रेमा भक्तांचि वरी । त्याचि कार्या अवतार धरी । न विसंबे क्षणभरी नव्हे परता ॥५॥

अनावरा आवरिलें जिहीं । जिव प्राण ठेवूनि पांई । हाही तयातें निज ह्रदयीं । सर्वकाळ आठवितु ॥६॥

निळा म्हणे संबोखिल्या । ऐसिया उत्तरीं स्थिराविल्या । मनोरथ करुनियां ठेविल्या । आपुलीये चिंतनीं सादर ॥७॥

१४६

मग लेइले दिव्य अळंकार । उभयतांहि बंधु अति नागर । मुगुट कुंडले एकावळी हार । झळकती पदकें जडितांची ॥१॥

बाहूभूषणें वीरकंकणें । मुद्रिका अंगुळिया शोभल्या लेणें । वेष्टुनी पितांबराची परिधानें । घेतली निशाणें निजकरीं ॥२॥

आधींचि मदनाचे हे बाप । दिव्य तेज प्रभा अमून । सकळहीं लावण्य सांटोप । धरुनियां आली निज वस्ती ॥३॥

अवघें चि सुख मुसावलें । कृष्णाकृति तें वोतलें नयना पाहुणेर देऊं आलें । जे जे देखती तयाच्या ॥४॥

कृष्ण लावण्याची मूर्ती । बळिदेवही तैसीचि आकृती । ठाणे माणें समान दिप्ती । प्रतापकीर्ति यशवंत ॥५॥

दंडी मुडपी विराजमान । शोभले राजीवलोचन । पाहों येती नागरिकजन । निळा म्हणे तया रामकृष्णासी ॥६॥

१४७

ऐसे बैसला रथावरी । भोंवते गोवळ चालती फेरी । हें देखोनियां नगर नारी । अत्यंत प्राण विकल त्यांचे ॥१॥

आतां कृष्णा येसील केव्हां । भेटसील प्राण शितळ तेव्हां । आठव आमुचाहि धरावा । तेथें पाहुणेरी गुंततां ॥२॥

ऐकोनियां त्यांचीं वचनें संतोशीजे उभयतां मनें । मग त्या देउनी आश्वास नें । आज्ञा करिती ते अक्रूरा ॥३॥

आतां रथ चालवीं वेगीं विलंब नव्हे ऐसा मार्गी । माता पिता गौळणी लागीं । रहाविलें अत्यादरें ॥४॥

मार्गी चालतां परम संतोषी । करिती संवाद येरेयेरांसी । म्हणती धरिलिया अवतारासी । आजि झालें सार्थक ॥५॥

होतां मामासवें भेटी । पडेल जिवें जीवा गांठी । परमानंद होईल सृष्टी । दृष्ट कंटक निमालिया ॥६॥

निळा म्हणे ऐसिया लाभा । उभयतां‍हि अंगीं शौर्यशोभा । दाटली तेणें ऐश्रवर्य शोभा । जातासे हें अक्रूरा जाणवलें ॥७॥

१४८

करितांचि सीमा उल्लंगन । म्हणती अक्रूरा ऐकें वचन । तुवां जावें रथ घेऊन । सांगावें वर्तमान रायासी ॥१॥

तेणें आज्ञा वंदुनी शिरीं । चालिला पुढें वेगें करी । बळराम कृष्ण गोवळ भारी । आले बळिया रजकापें ॥२॥

तंव तो वस्त्रें वाळवीत । उभा असे बळप्रमत्त । गोवळांते असे पुसंत । तुम्ही आलेती कोठुनी ॥३॥

ते म्हणती गोकुळवासी । जातों रायाचे भेटीसी । आदरें बोलाविलें कृष्णासी । आणि बळीराम सुजाणा ॥४॥

येरु म्हणे कोणता कृष्ण । गोवळ तुम्ही अवघे जण । आंलेती घोंगडी पांघरोन । जाल कैसेन रायापुढें ॥५॥

तंव कृष्ण बळिराम म्हणे त्यासी । आम्हां देंई उत्तम वस्त्रांसी । भेटोनी आलीया रायासी । देऊं उचित आणी तुझी वस्त्रें ॥६॥

तंव तो म्हणे भाग्यासी याल । बोलतांचि ऐसें ताडण पावाल । राजवस्त्रें हीं तुम्ही ल्याल । तैंचि वेंचाल जीवें प्राणें ॥७॥

बळिरामें हें ऐकतांचि कानीं । म्हणे वस्त्रें आणा रे लुटुनी । शंका मात्र न धरितां मनीं । हरा आवडती ज्या जैसीं ॥८॥

निळा म्हणे धांवले सकळ । बळिये अतुर्बळी गोवळ । तेथें झाला हालकल्होळ । रजक बळिया धांविन्नला ॥९॥

१४९

येतां देखोनियां बळिरामें । आकळिला तो अति विक्रमें । म्हणे पापिया तुवां अधर्म । बहुत केली कृष्णनिंदा ॥१॥

तया दोषाचें प्रयश्रिचत । आजी घे पा यथोचित । होई देहापासूनि मुक्त । म्हणोनि टांगेसी धरियेला ॥२॥

तेणेंहि उदंड वेचिली शक्ती । परि तयापुढें न चालेचि युक्ती । मग बोभाइला अदृष्टाप्रति । म्हणे नाडलों रे अभिमानें ॥३॥

बळिया बलिष्ट शिरोमणी । बळिराम आणि चक्रपाणी । नेणतां महिमा वेंचिली वाणी । पावलों फळ तें साध्यांचि‍ ॥४॥

ऐसें बोलोनियां निश्रचळ । अवलोकिलें स्वरुप सकळ । झांकूनियां मग नेत्रकमळ । ध्यान हदय दृढाविलें ॥५॥

तंव बळरामें वेग केला । अंगाभोंवता ओवाळिला । आणि तेथेंचि पहा हो सोबकिला । प्रचंड खडकीं निघातें ॥६॥

निळा म्हणे दिधली मुक्ती । उत्तम कैवल्याही परती । कृपावंत हा श्रीपती । भक्तां वैरिया सारिखाचि ॥७॥

१५०

चिरें आणूनियां वेंष्टलें । गोवळ अवघेचि शृंगारले । येरेयेरां म्हणती भले । गौरव घ्या रे मामाचा ॥१॥

चिरें गुंडिती माजेसी । उंच पटके ते पायासी । झगे वेष्टूनियां शिरासी । विजारा टाकिती खांदयावरी ॥२॥

ऐसे  शृंगारिले गोवळ । पुढें चालिले भार सकळ । तंव ते धनुरयागींचे वीर प्रबळ । घ्या घ्या म्हणोनी धांविले ॥३॥

कृष्णें बळरामें देखिलें । अवघ्यांपुढे मग ते झाले । धनुर्धारी वेग केले । परि तें न चले बळ त्यांचे ॥४॥

घ्या घ्या म्हणोनी हांका देती । शंकस्फुरणें ठाईंचि करिती । परी ते गोवळची समस्तीं । वेष्टूनियां घेतले ॥५॥

धनुष्या लाऊनि बाण । विंधावे तों माजि शिरोन । गोवळीं घेतली ते हिरोन । आणि मोडुनी सांडिली ॥६॥

निळा म्हणे एक एका । नपुरतीची युध्द तबका ॥ निपातिले फेडिली शंका । आणि पुढें संचरले ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : August 21, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP