अभंग - ३० ते ४०
निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.
Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner.
३०
वसुदेव देवकीचिये उदरी । कृष्ण जन्मले मथुरेभितरीं । कंसाचिये बंदिशाळे माझारी । श्रावण कृष्णाष्टमीं मध्यरात्री ॥१॥
अयोनिसंभव चतुर्भज । शंक चक्र गदांबुज । चहूं करी आयुधें सुतेज । मुगुट कुंडलें वनमाळा ॥२॥
कासे पींतांबर कसिला । कंठी कौस्तुभ तेजागळा । श्रीवत्सलांछन शोभला । माजी मेखळा जडिताची ॥३॥
मस्तकी मुगुट रत्नखेवणी । रत्नमय कुंडलें उभय कर्णी । देखोनियां देवकी नयनीं । म्हणे या कैसोनि आच्छादूं ॥४॥
देखतां वसुदेवहि विस्मित । म्हणे बाळ नव्हे हा जगन्नाथ । सायुधें भूषणे घवघवित । तेज:पुंज निजात्मा ॥५॥
देवकी लागोनियां पायांशीं । म्हणे गोकुळां नेऊनि लपवा यासी । विदित झालिया रायासी । नेदी वांचो या बाळका ॥६॥
निळा म्हणे ऐसी चिंता । जाकळुनी ठेली तया उभयतां । हें देखोनियां श्रीकृष्णनाथा । कळों सरलें ह्रग्दत ॥७॥
३१
मग बोले मंजुळा उत्तरी । मज न्या जी गोकुळाभितरी । ठेवुनी नंदयशोदेच्या घरी । तुम्हीं यावे तेच क्षणी ॥१॥
ऐकोनी तयाचे उत्तर । वसुदेव विस्मित आणि चिंतातूर । म्हणे कैसा करावा विचार । बंधने गोविलें मजलागी ॥२॥
ऐशिया मोहें त्या कवळित । तंव तुटली बंधने झाला मुक्त । म्हणे आतां हा कृष्णनाथ । नेईन गोकुळांत ठेवीन ॥३॥
मग घेऊनियां निज बोधेशीं । आला वासुदेव गोकुळाशीं । देऊनिया त्या नंदापाशीं । म्हणे हें स्वीकारा बाळक ॥४॥
जन्मलें देवकीचिये उदरीं । परि हे ठेवितां नये घरीं । अहं कंसाचे भय भारी । यालागी तुम्हां हें कृष्णापर्ण ॥५॥
ऐशिया उत्तरी बोलिला । बाळक त्यापाशी दिधला । उघडोनि नंदे जो पाहिला । तंव तो देखिला चतुभुर्ज ॥६॥
निळा म्हणे वोळलें भाग्य । घरां आले पुसत चांग । उध्दरावया सात्विक जग । केला वास तया घरी ॥७॥
३२
कोटी मदनाचा बाप । प्रभा फांकली तेज अमूप । भूषणें विराजलीं दिव्य स्वरुप । नंदे पाहिला निज नयनीं ॥१॥
मग याशोदेपाशीं आणिला । म्हणे हा वसुदेव दिधला । येरी म्हणे हा चोरियेला । कोणाचा तानुला न कळे हें ॥२॥
वसुदेव सदाचा भिकारी । बंदी कंसाचिये चिरकाळ वरी । बालक सुलक्षण हा निर्धारी । असेल सभाग्या समर्थाचा ॥३॥
येरु म्हणे आहे पोंटीचा । आत्मा जिवलगु हा आमुचा । नाहीं वो आणिका लोकांचा । म्हणोनियां देतों तुम्हांप्रती ॥४॥
येरो म्हणे आमुचें कन्यारत्न । याच्या पालटा न्या करा यत्न । कंसा पुसतांचि तया दाउन । चुकवा अरिष्ट सकळांचे ॥५॥
यावरी कृष्णातें निरवून । वसुदेव निघाला माया घेउन । पुढती बंधने पावला बंदिखान । विचित्र विदांन शक्तींचे ।६॥
श्रीकृष्णदेवेसी अंतरावो । होतांचि प्राप्त झाला मोहो । अविद्यायोगें चिंताप्रवाहो । महार्णर्वी पडियेला ॥७॥
निळा म्हणे हिताहित । नाठवेचि कांही झाला भ्रांत । मायादेवाची हा प्रघात । झाला आप्त वसुदेवा ॥८॥
३३
श्रीकृष्ण सांडूनि जातांचि दुरी । वसुदेवातें दैन्य अवदसा वरी । मग देवकीजवळी देतां ते कुमरी । महाआक्रोशें गर्जिन्नली ॥१॥
ऐकूनि कंस भयचकित । असुरसैन्यक भयें कांपत । सेवक धांवोनि रायते म्हणत । जन्मला सुत देवकिये ॥२॥
महाकाळ कृतांत ऐसा । गर्जे ब्रम्हांड कोंदल्या दिशा । राज म्हणे हा आमुच्या वंशा । निर्दाळील निश्चयें आठवा ॥३॥
घेऊनियां मग निशाचरभारा । आला बंदिशाळे सत्वरा । सावध करिताती येरयेरां । म्हणती विकळ जाऊं नका ॥४॥
भयभीत देवकींते हाकारी । म्हणे आठवा आणि वो बाहेरी । येरी करुणा भाकूनियां भारी । विनवि येवडे तरी वाचवा ॥५॥
ऐसे बोलोनियां सुंदरी । आणोनि दिधली कौसा करी । येरु पाहे तव तव कुमारी । म्हणे आठवा लपविला ॥६॥
तोहि आणेनियां देई । येरी म्हणे दुसरें नाही । झाडा घेऊनियां पाहीं । आण तुझीचि वाहतसें ॥७॥
येरु म्हणे ईतें सोडूं । मग तयाचाहि सूड काढू । निळा म्हणे गर्वारुढू । नेणे मदांध हरि महिमा ॥८॥
३५
येरीकडे गोकुळाभीतरी । येतांचि परमात्मा श्रीहरी । विश्वकर्मा येऊनियां निमिशावरी । नगर शृंगारी कौतुके ॥१॥
निजेलीचे असतां नारीकुमरें । शृंगारिलीं वस्त्रे अळंकारें । वृध्द होताती ते निमासुरे । रुंपे मंडित योजिलीं ॥२॥
धन कनक घरोघरी । नाना धान्याचिया परी । सुख सोहळा वर्ते शरीरीं । पलंग सुपत्या न्याहालीया ॥३॥
नाना फळफळावळी । सुमने वरुषती वृक्षातळी । एकैक सुखाची नव्हाळी । वर्ते गोकुळी निजानंर्दे ॥४॥
कामधेनु ऐशीं गुरें । नंदिनीचिये परीचे वासुरे । प्राप्त:काळी देखती नारीनरें । परम विस्मयें दाटली ॥५॥
लक्ष्मी न समाय गोकुळांत । लेणीं लुगडीं अंळकारमंडित । धन संपत्ती नाही गणित । जेथे श्रीकांत वस्ती आला ॥६॥
निळा म्हणे सुखाची मरणी । गाई गोवळा आली गौळणी । सारस्वतें घोकिली तैशी वाणी । मधुर शब्दें अनुवादती ॥७॥
३६
कंसे बैसोनियां सभेसी । विडा मांडिला पैंजेसी । म्हणे जो वधील बाळकासी । जाऊनियां गोकुळा ॥१॥
त्यासी देईन हें अर्धराज्य । न करीं अन्यथा आपुली पैज । जया सांधेल हें काज । तेणें विलंब न करावा ॥२॥
भगिनी पुतना प्रधानरासी । ऐकतांची उठियेली अति आवेशी । म्हणे जाऊनियां गोकुळाशी । निर्दाळीन कुमर नंदाचा ॥३॥
आज्ञा घेऊनियां ते त्वरित । विष स्तनामाजी भरित । म्हणे पाजूनियां कृष्णनाथ । करीन घात शस्त्रेंविण ॥४॥
घेऊनियां बाळलेणी । मनगटीं बांधिली खेळणी । जिवती वाघनखें माळा मणी । आंगडे टोपडें बाळंतविडा ॥५॥
मग सुखासनी विराजित । दासी परिचारिका वेष्टित । येऊिनियां गोकुळा आंत । यशोदेगृहीं प्रवेशली ॥६॥
निळा म्हणे नवल कथा । वर्तेल ते येथें आतां । पूतना पावेल सायोज्यता । श्रीकृष्णनाथदर्शने ॥७॥
३७
यशोदा म्हणे हे राजभगिनी । कां पां आलिसे थांबोनी । जाईल बाळका झडपोनी । कैसे करुं हे राक्षसी ॥१॥
बहुत उपचारेंसी पूजिली । पूतना सन्मानें बैसविली । मग ते म्हणे ये यशोदे भली । पुत्रवंती झालिसी ॥२॥
आणि नाही सांगोनियां धाडिलें । ऐंसें निष्ठुरपण त्वां धरीलें । श्रवणीं ऐकतांचि धावोनियां आलें । आनंदले ह्रदयांत ॥३॥
आणिली विचित्र बाळलेणी । बाळंतविडाही तुजलागुनी । आणीगें तान्हुलें पाहों दे नयनी । ऐकोनी यशोदा मनी गजबजिली ॥४॥
म्हणें कैसे तरी करुं ईसी । राजभगिनी हे राक्षसी । दिठाविल माझिया सुकुमारासी । दिठीचि कठीण इयेचि ॥५॥
मग म्हणे आतांचि न्हाणिलें । बाळक पालखीं निजविले । हे ऐकतांचि नवल केलें । बाळक उठलें न राहेंचि ॥६॥
निळा म्हणे पूतना तेथें । रोषें बोलें यशोदेतें । काय गे नष्टपण हें तूंते । मिथ्याचि झकविशी मजलागी ॥७॥
३८
आतां तरी बालका आणी । आपल्या करें मी लेववीन लेणीं । यशोदा म्हणे मांडिली हाणी । निवांत पोरटें नसेची ॥१॥
मग जाऊनियां पालखाजवळी । म्हणे मृत्यु पाचारिंतो तूंते वनमाळी । उगाचि असतासि जरि ये कळीं । तरि वांचतासी काय करुं ॥२॥
ऐसें बोलोनियां आणिला । पूतने वोसंगा बैसविला । देखतांचि पूतने वोसंडला । उभंड प्रेमाचा न सावरे ॥३॥
सुंदरपणाचि झाली सीमा । उपदेशी मदना अंगी काळीमा । अवलोकूनियां पुरुषोत्तमा । तनुमनप्राणें निवालीं ॥४॥
म्हणे गे यशोदे साजणी । परम सुखाची हे लाधलीसी धणी । जतन करी पुत्रमणी । दुर्लभ भाग्येंचि पावलिसी ॥५॥
पूतना राक्षसी अति क्रूर । तेही देखोनियां कृष्णचंद्र । नयनी अश्रु आणूनियां वारंवार । श्रीमुखकमळ अवलोकी ॥६॥
निळा म्हणे अगाध बुध्दी । होउनी परतली प्रालब्द सिध्दी । म्हणे कार्य साधूनियां त्रिशुदी । जावें सत्वर राजभुवना ॥७॥
३९
पूतना म्हणे भुकेला कान्हा । मग झडकरी उघडूनी लाविला स्तना । यशोदा म्हणे वो राजीवनयना । न सोसे
दूध आणिकीचें ॥१॥
स्तनीं लागतांचि त्याचे वदन । विश तें अमृतसमान । शोषूनियां रक्त मांस-जीवन । पंचहि प्राण आकर्शिले ॥२॥
न सोसवे वेदना ते पूतने । म्हणे ओढीं ओढीं यशोदे तान्हें । ऐसें बाळ हें ही काय जाणें । वेंचले प्राण धांव धांव ॥३॥
तंव तो न सुटेचि सर्वथा । शिणल्या दासी परिचारिकाही ओडितां । नाना शब्दें आक्रंदतां । बिहालीं तत्वतां पळती लोकें ॥४॥
रक्त मांस अस्थींचे उदक । करुनियां चर्महि शोषियलें । देऊनियां सायुज्यसुखनीं स्थापियली ॥५॥
हें देखोनी दासी परिचारिका । भेणेंचि पळती अधो मुखा । जाऊनियां मथुरा लोंका । सांगती वार्ता रायसी ॥६॥
निळा म्हणे ऐकतां कानी । राजा चिंतावला बहुत मनीं । पुसे वर्तमान तया लागुनी । कैसे वर्तलें ते सांगा ॥७॥
४०
तवं त्या करिती शंखस्फूरण । दीर्धवरें आक्रदन । तें ऐकांनियां नागरीक जन । हाहाभूत वोरसले ॥१॥
तयांते पुसता त्य म्हणती । दु:खर्णवी पडिलों हो भूपती । सांगता पुतनेची गती । मूच्छित पडती धरणीये ॥२॥
म्हणती जातांचिं गोकुळाभीतरी । प्रवेशतां नंद यशोदे घरी । उभयतां येऊनियां सामोरी । बहुत सन्माने गौरविले ॥३॥
विडे उपचार भोजन । पूतनाईतें तोषवून । मग आणिलें राजीवनयन । बाळ तान्हुले दाखविती ॥४॥
तंव तें घन:श्याम सांवळे । राजीवाक्ष राप रेखिलें । बाळलेणें विराजलें । नयनचि गोविलें देखतां ॥५॥
मग ते घेऊनियां जवळी । सतनीं लावितांचि तात्काळीं । सुरासुरा शोषुनियां वेल्हाळी । न सोडी जिवें प्राण जाता ॥६॥
निळा म्हणे त्या सोडविता । न सुटे पूतना आक्रंदतां । आम्हीही स्वशक्ती ओढितां । हरिलें तत्वतां प्राण तिचे ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : August 21, 2026

TOP