अभंग - ९१ ते १००

निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.

Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner.


९१

म्हणोनियां तेथें उगाचि उभा । यावया जवळी पहननाभा । तोहि सर्वसाक्षी ओथंबा । जाणे हदगत केशियाचें ॥१॥

मग चालत मंजुळ चाली । हळूहळूचि गेला जवळी । लगाम धरुनिया निज करतळी । हातें कुरवाळी मुखांतरी ॥२॥

मग रिकेबी देवोनि पावो । चढला वरी यादवरावो । हालों नंदितांचि नवलवो । घातला भार त्रिभुवनांचा ॥३॥

केशीया पाहे उडावया । तंव ओझें भारी नुचलवे पायां । म्हणे गेली व्यर्थचि माया । रचिलें येवढें लाघव तें ॥४॥

मग न चलवे ऐसें जाणेनि हरी । बारवा फोडिला चाबुकावरी । केशिया ह्रदयींचि रुदन करी । म्हणे घेतला प्राण निश्रचयेसी ॥५॥

हालों नेदीची हा गोंवळ । महाबलीया आमुचा काळ । कृष्ण म्हणे हें मुसळ । व्यर्थचि पोसिलें बेटियानें ॥६॥

चारुनियां दाणाचार । पुष्ट केला बहु थोर । नाही मिनला चाबुक स्वार । तोंचिवरी शोंभला ॥७॥

मग उतरला झडकरी । हातीं धरिली लगाम दोरी । तंव तो उपायीं येऊनियां वरी । हाणों धांवे टापेनें ॥८॥

मागे पेर वाळे झाडित । आडवाचि उडे मग कुकात । तोंड  पसरुनियां विचकी दांत । डसावया श्रीहरी ॥९॥

येरु आतळोंचि नेदी त्या अंगा । धरिलें आंवरुनियां तुरंगा । घायांतळी आणूनियां चांगा । ताडिला मुष्ठीप्रहरें करुनि ॥१०॥

तेणेंचि तया आली तव । म्हणे कंसा वेगी धांव धांव । वेंचलों जीवेम करी कणव । सोडवीं मज याच्या हाती ॥११॥

तुझिया काजा वधावा हरी । म्हणोनियां आलों येथवरी । तव हा लाघविया मुरारी । बैसला जिव्हारी काय करुं ॥१२॥

पायीं बांधोनियां टाकिलें माझियाचि भूषणी मज गोंविलें । नाही अंतरी हें मज कळलें । कैसे करुं हदयासी ॥१३॥

ऐसी या विलापें आक्रंदतां । प्राण सोडिले तत्वतां । म्हणे मी फिरांनियां मागुता । न येचि येथें श्रीकृष्णा ॥१४॥

निळा म्हणे ऐकोनि श्रीकृष्ण । म्हणे वाग्देवी तुझी तुज प्रसन्न । जारे मुक्ति पदीं बैसोन । वस्ती करी तेथे सुखें ॥१५॥

९२

ऐसें केशियाचें हनन । केलें देखोनियां सकळ जन गोकुळीचें विस्मयपत्र म्हणती न कळे महिमान श्रीहरिचें ॥१॥

कृत्रिम वेषिया तुरंगम । आला इच्छूनियां सग्राम । कैसा जाणूनियां मेघ:शाम । तयावरी सरसावला ॥२॥

त्याची केलीचि कार्यसिध्द । तोडूनियां आधिव्याधि । बैसविला तो सभासंधी । मुक्तिस्थानीं मुक्ताचियें ॥३॥

वार्ता गेली कंसासुरा । मर्दिलें केशिया महावीरा । गोकुळी आनंद नारीनारां । हषें साखरा वांटिती ॥४॥

कंस म्हणे विपरीत भाग्य । झालें ओढवलें उपसर्ग । गेले माझे हे अंगलग । आतां विश्वास  कोणाचा ॥५॥

गगनवाणी ऐकियेली जेव्हां । सुत देवकीचा आठवा । तोचि वधील दैत्यां सर्वां । तों हें विपरीत वर्तलें ॥६॥

गोकुळामाजीं तुझा वैरी । नाहीं ऐकिलें भविष्यांतरी । एकचि वदली ते कुमारी । जें कां निष्ठिली हातींची ॥७॥

व्यर्थचि पिडियेली देवकी । आणि वसुदेवही पुण्यश्रलोकी । होणार न चुकेचि कीं सेखीं । विघ्न आणिकचि उदेलें ॥८॥

निळा म्हणे ऐसियापरी । कंस निमग्न दु:खसागरीं । गेली ऐश्रवर्याची धारी । पडिला शरीरीं निचेष्टित ॥९॥

९३

यावरी गौळणी सुंदरी । नूऊनियां निजमंदिरीं । खेळविती परमात्मया श्रीहरी । नाना उपचारी पूजिती ॥१॥

देऊनियां चंदनउटी । केशरी टिळक लाविती लल्लाटीं । नाना सुमनहार कंठी । घालिती वरवंटी श्रीकृष्णा ॥२॥

गुंफूनी सुमनटोप शिरीं विचित्र तुरे खोंविती वरी । लेवूनियां दिव्य अळंकारीं । वस्त्रें परिधानें गौरविती ॥३॥

एकी जाणविती विंजणवारा । एकी चवरी विंजती सुंदरा । म्हणती वो नंदकुमारा । दासी आम्ही तुमचिया ॥४॥

शर्करा घृत परिपक्व लाडू । नाना स्वाद फळांचे घडू । आणूनियां करिती सुरवाडु । कृष्ण वदनीं समर्पिती ॥५॥

एकी उचलूनियां कडिये घेती । एकीं खांदिये बैसविती । एकी ह्रदयींची आळंगिती । चुंबन देती पैं एकी ॥६॥

निळा म्हणे परब्रम्ह सेजे । आवडीं घेऊनि निजतीं निजें । ऐशिया सुखाचीं नाचती भोजें । परमात्मा आप्त झालिया ॥७॥

९४

आमुचा जिवलग सांगती । जन्मोजन्मींचा श्रीपती । एकीसवें एकी बोलती । आणि आळंगिती हदयेसीं ॥१॥

नाना परीच्या विनोदवार्ता । सांगाती बोलती अनंता । तुझेनि भाग्यें भाग्यवंता । म्हणती आम्ही संसारी ॥२॥

कृष्णा आत्मया सुखानंदा । परात्परा जी आनंदकंदा । नित्या अचिंत्या अभेधा । देवत्रयां तूं वंदय ॥३॥

ऐसा असोनियां आम्हां आरजा । खेळणें झालासी आजिच्या काजा । धन्य आम्हीही गरुडध्वजा । तुझे पादपध देखतों ॥४॥

आणखीही एक नवल थोर । परमात्मया तूं परात्पर । आम्हालागीं रुप साकार । आवडी ऐसेंचि धरियेलें ॥५॥

कृष्णा म्हणोनियां पाचारितां । वो म्हणोनियां येसी धावंतां । येरवी वेदाचियांही संमता । उरविसी रुप निर्धारिं ॥६॥

निळा म्हणे ऐशिया प्रेमें । अनुसरल्या त्या भक्तिसंभ्रमे । तैसेंचि जाणोनियां त्या परब्रहमें । पुरविले त्यांचे सोहळे ॥७॥

९५

मग त्या मिळोनियां सकळ जनीं । मध्यें बैसवूनियां शारंगपाणी । भोंवत्या खेळविती खेळणीं । नाचती नाचणीं गीतस्वरें ॥१॥

कृष्णा म्हणोनियां आळविती । मधुर स्वरें गायनें गाती । तेणेंचि मिसें त्या कृष्णासि स्तविती । आणि रंजविती परमात्मया ॥२॥

म्हणती गे नंदयशोदेचें पुण्य । उरलें त्रैलोक्या पुरोन । आम्हां झालें तें सुप्रसन्न । कृष्णाकृती या काळें ॥३॥

म्हणोनियां जिवेंप्राणें । ओवाळिती तनुमनें । घालूनियां दिव्यासनें । वरी कृष्णातें बैसविती ॥ ४॥

करुनियां आनंद सोहळा । खेळती नानापरीच्या खेळा । लई लई लखोटें पिंगे सकळा । फुगडया घलिती निज वारें ॥५॥

हेटी मेटी । कपाळ झेटी । पक्कें  घालिती  नमन लल्लाटीं । टोकर खडेही झेलिती बेटी । नाचती टिपरी घेऊनियां ॥६॥

निळा म्हणे ऐशियापरी । रंजविती जगदात्मयाहरी । आणि घेऊनियां अंकावरी । क्रीडा विनोदें खेळविती ॥७॥

९६

म्हणती कृष्ण आवडे कैसा । जीवप्राण का पढिये जैसा । एकी म्हणती गे मानसा । भुलवाणाचि सुंदरपणें ॥१॥

यातें पाहों जातां दिठी । पहाते पहाणेंचि नुरें शेवटीं । संचरोनियां हा पाठीपोटीं । करी आपणासारिखें ॥२॥

वेधूचि लावियेला मना । येणें गोविलें वो लोचना । आमुच्या चित्ताचिया वासना । येणेंचि हिरोनियां घेतल्या ॥३॥

वाटे तयासीचि परिचार । करुनी असावें निरंतर । क्षणही एक न व्हावा दूर । माया माहेर आमुचा हा ॥४॥

विनोद चर्चा याशींच करणें । आवडे कृष्णासीं बोलणें । यावीण दुजें दृष्टी । नावडो याविण आणिकी गोष्टी । विश्रवा आधीं हा शेवटीं । पाहावा पोटीं हेंचि आवस्था ॥६॥

निळा म्हणे ऐशीं कृष्णें । हिरोनी घेतलि यांचि मनें । मग या राजीवलोचनें । मांडिली विंदानें आणिकही ॥७॥

९७

घरीं आपुलिया मातेपाशीं । देखोनियां मागें शशी । म्हणे देंईवा खेळावयासी । आणूनी तो मज हातीं ॥१॥

येरी म्हणे परिसे ताता । गगनींचा तो नये हाता । नको छळूं रे कृष्णनाथा । नाहीं तेंचि मागों नको ॥२॥

येरुं म्हणे रे पैल दिसे । नाहीं त्यासी म्हणसी कैसें । येरे म्हणे असाध्य तें असें । नाहींपणाचि सारिखें ॥३॥

राया घरींची संपदा । दुर्बळा घरीं कैंची सदां । येरु हांसोनियां गदगदां । मुखचंद्रातें दाखवितु ॥४॥

म्हणे पाहे दसवंतिये । हा गे जवळींच चंद्र आहे । तारे तुटती लवलाहे । षोडशकळीं प्रकाशला ॥५॥

यशोदा म्हणे न कळे महिमा । तुझा आम्हां पुरुषोत्तमा । दिठावसील रे मेघ:शामा नको विंदाने करुं ऐशीं ॥६॥

निळा म्हणे ओंवाळून । सांडी वरुनी निंबलोण । मग त्या वोसंगा घेऊन । म्हणे भोजन करीं बापा ॥७॥

९८

मग बैसवूनियां पाटावरी । ताटीं वाढिल्या नानापरी । दूध दहीं तूप साय वरी । शर्करा तेही ठेवियेली ॥१॥

कृष्ण म्हणे कालवी आतां । जेववीं मज तें वो जेवितां । येरी म्हणे परिसें ताता । रुचि त्याच्या भिन्न भिन्न ॥२॥

येरु म्हणे रसनायक । भिन्न कैंचे वो आणिक । येरी  म्हणे तुझी एकैक । नवाईच शब्दाची ॥३॥

मग कालवूनि एके ठायीं । म्हणें कृष्णा आतां घेंई । येरु म्हणे वेगळें देंई । करुनियां हें ठायीचें ॥४॥

तंव ते म्हणे न चले युक्ती । नको छळुं रे श्रीपती । त्यांची एकत्र करविलें अंती । मज कां म्हणसीं निवडी हें ॥५॥

ऐसें कोणा आहे ज्ञान । मिश्रित झालें तें करी भिन्न । येरें पालवें झांकून । दाविले पदार्थ वेगळाले ॥६॥

निळा म्हणे देखोनिया माता । आश्रचर्य मानी ते तत्वतां । म्हणे याचिये हातीं सर्वहि सत्ता । आहे सकळ विश्रवाची ॥७॥

९९

यावरी गडियांसीं खेळत । आला यमुनेतीरा आंत । क्रीडा करितां करितां आर्त । देखिलें ऐसें यमुनेचें ॥१॥

जैशा येऊनियां गौळणी । कृष्णमुखीं घालिती लोणी । मीच अंतरलें गे पापिणी । होऊनियां पाणी वाहातुसे ॥२॥

कृष्ण म्हणे तुझिाया पोटीं । आहेती नवनिताचिया खोटी । काढूनी गाळ तो जगजेठी । सुखें भक्षितु बैसला ॥३॥

हें देखोनियां ते गडे । म्हणती बैसोनि एकीकडे । माती खातो हा निवाडें । सांगों धाविले यशोदे ॥४॥

म्हणती मृतिका आणूनि हरि । बैसला भक्षीत आवडीं करीं । ऐसें ऐकोनियां सुदरी । धांवली क्रोधें आवेशें ॥५॥

हातीं घेऊनिया सिपुटी । आली जवळीके नेहटीं । येरें देखोनियां ते दिठीं । मृत्तिका लपवुनी पळतसे ॥६॥

निळा म्हणे हाकारिते । माया धांवे आटोपित । नाटोपेचि मग ते म्हणत । घरां आलिया ताडीन ॥७॥

१००

येरें शब्द ते ऐकोन । उभा ठाकला जगज्जीवन । माता म्हणे हे अवगुण । कांरे ऐसे करितोसी ॥१॥

ठायीं वाडिलिया न जेविसी । आणि येथें माती खाशी । येरु म्हणे नाहीं ऐशी । प्रतिज्ञा मी दावीन ॥२॥

तंव ते म्हणे दावीं मुख । येरु म्हणे तरी हें देख । पाहे तंव माजीं त्रैलोकय । चंद्रसूर्य तारांगणें ॥३॥

मेरुकुळाचाळ पर्वत । नदादि नदीयांचे ओघ वहात । सप्तहि सागर भरतें येत । ऐसें देखत वदनामाजीं ॥४॥

भोवंडी आली पहातां नयनां । मग म्हणे निमटी निमटी आतां वदना । माव तुझी जगज्जीवना । नकळेचि आम्हां प्राकृतां ॥५॥

मग धरुनियां तो करतळीं आलिंगिला हदयमेळीं । विस्मयें दाटोनियां वेल्हाळी । आली घेउनी मंदिरां ॥६॥

निळा म्हणे सांगे लोकां । अपूर्व देखिलें म्यां कौतुका । मृत्तिकामिसें माजी त्रैलोक्या । पाहिलें वदनीं हरिचिया ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : August 21, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP