मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत एकनाथांचीं भजनें|
नाममहिमा

नाममहिमा

प्राकृतात ग्रंथरचना करण्याची ज्ञानेश्वरापासून चालत आलेली परंपरा नाथांनीही पुढे चालविली.


ऐका नामाचे महिमान । नाम पावन तें जाण ॥१॥ हास्य विनोदें घेतां नाम । तरती जन ते अधम ॥२॥ एका जनार्दनीं धरीं विश्वास । नामे नासती दोष कळिकाळाचे ॥३॥
भावार्थ
हरिनाम अत्यंत पावन असून त्याचा महिमा श्रवण करावा. अतिशय पापी लोकांनी हास्य विनोद करतांना जरी हरिनामाचा उच्चार केला तरी ते पापमुक्त होऊन हरिपदाला पोचतात. एका जनार्दनीं म्हणतात, नामजपाने जन्म-मृत्युचे सारे दोष लयास जातात. 

दोषी पापराशी नामाचे धारक । होतां तिन्ही लोक वंदिती माथां ॥१॥ नामाचें महिमान नामाचें महिमान । नामाचे महिमान शिव जाणे ॥२॥ जाणती ते ज्ञानी दत्त कपिल मुनी । शुकादिक जनीं धन्य जाहलें ॥३॥ एका जनार्दनीं नाम परिपूर्ण । सांपडली खूण गुरूकृपें ॥४॥
भावार्थ
अतिशय दुराचारी, पापी लोक जर नामसाधनेला लागले तर ते तिन्ही लोकांत वंदनीय होतात. नामाचा महिमा शिवशंकर चांगल्याप्रकारे जाणतात. दत्तगुरू, कपिल मुनी, शुकमुनी हे सर्व ज्ञानी नामाचा महिमा जाणून धन्य झाले. एका जनार्दनीं म्हणतात, जनार्दन स्वामींच्या कृपेने नामाचा परिपूर्ण महिमा जाणतां आला. ही गुरुकृपेची खूण आहे. 

नाम तें उत्तम नाम तें सगुण । नाम तें निर्गुण सनातन॥१॥ नाम तें ध्यान नाम तें धारणा । नाम तें हें जना तारक नाम ॥२॥ नाम तें पावन नाम तें कारण । नामापरतें साधन आन नाहीं ॥३॥ नाम ध्यानीं मनीं गातसे वदनीं । एका जनार्दनीं श्रेष्ठ नाम ॥४॥
भावार्थ
नाम ही सगुण उपासना आहे कारण परमेश्वराची मूर्ती चित्तामध्यें धारण करून उपासक चिंतन करीत असतो. ही उपासना निर्गुण, सनातन आहे परमात्म तत्व हे परब्रह्म स्वरूप असल्याने ते प्रत्यक्ष दृष्टीपथांत येत नाही. ध्यानमार्गाने उपासना करणार्या साधकांना नाम हे ध्यान व धारणा असते याच मार्गाने ते समाधी अवस्था प्राप्त करू शकतात. नाम हे पावन असून साधकांना तारून नेणारे साधन आहे. नाम भक्तांच्या परमेश्वर प्राप्तीचे कारण आहे. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, नामासारखे श्रेष्ठ साधन नाही. ध्यानीं, मनीं, वदनी अखंड नामाचा जप करावा. 

नामाचा धारक । हरिहरा त्याचा धाक ॥१॥ ऐसें नाम समर्थ । त्रिभुवनीं तें विख्यात ॥२॥ नामें यज्ञयाग घडती । नामें उत्तम लोकीं गती ॥३॥ नामें भुक्ति मुक्ति तिष्ठें । नामें वरिष्ठा वरिष्ठें ॥४॥ नामें सर्व सत्ता हातीं । नामें वैकुंठी वसती ॥५॥ नामें होती चतर्भुज । एका जनार्दनीं सतेज ॥६॥
भावार्थ
नामाचा महिमा अपार असून ते त्रिभुवनांत प्रसिध्द आहे. शिव आणि विष्णु नाम धारक भक्तांचा आदर करतात. नामाने यज्ञयाग संपन्न होतात आणि साधकांना उत्तम गती प्राप्त होवून वैकुंठलोकी वस्ती होऊ शकते. भक्ति, मुक्ति या नामसाधकाच्या दासी बनतात. नाम हे श्रेष्ठ साधनांपैकी सर्वश्रेष्ठ साधन आहे. नामाने साधकास सरूपता मुक्ती प्राप्त होऊन तो विष्णुस्वरूप सतेज होऊन सर्व सत्ताधारी होतो असे एका जनार्दनीं ग्वाही देतात. 

सकळ साधनांचा सार । मुखीं नामाचा उच्चार ॥१॥ सकळ तपांचे जें सार । मुखीं नामाचा उच्चार ॥२॥ सकळ ज्ञानाचे जें सार । मुखीं नामाचा उच्चार ॥३॥ सकळ ब्रह्म विद्येचे जें सार । एका जनार्दनीचें माहेर ॥४॥
भावार्थ
परमेश्वर प्राप्तीसाठीं दान, धर्म, योग, याग, तप, अनुष्ठान करून जे फल साध्य होते ते सर्व नामजपाने मिळते. वेद, शास्त्रे, पुराणे वाचून परमेश्वरी तत्वाचे जे ज्ञान प्राप्त होते ते सर्व नामपठनाने ज्ञात होते. ब्रह्म विद्येचे रहस्य केवळ नामाच्या उच्चाराने उलगडते. असे मत स्पष्ट करून एका जनार्दनीं म्हणतात, नाम हे भक्तांच्या विसाव्याचे ठिकाण (माहेरघर) आहे. 

साधन सोपें नाम वाचे । पर्वत भंगती पापांचें । विश्वासियातें साचें । नाम तारक कलियुगीं ॥१॥ अहोरात्र वदतां वाणी । ऐसा छंद ज्याचे मनीं । त्याचेनि धन्य ही मेदिनी । तारक तो सर्वांसी ॥२॥ एका जनार्दनीं नाम । भाविकांचे पुरे काम । अभागियांतें वर्म । नव्हे नव्हे सोपारें ॥३॥
भावार्थ
नामजप हे सहजसोपी भक्तीसाधना असून पापांचे पर्वत भंग करण्याचे सामर्थ्य या साधनेंत आहे. या नामसाधनेवर विश्वास असणार्‍या भक्तांसाठी कलियुगातील हे उत्तम साधन आहे. अहोरात्र नामस्मरण करण्याचा छंद जडलेला साधकामुळे ही पृथ्वी धन्य झाली आहे. असा साधक सर्वांचा तारणहार बनतो. 

नाम पावन तिन्हीं लोकीं । मुक्त जालें महा पातकी ॥१॥ नाम श्रेष्ठाचें हें श्रेष्ठ । नाम जपे तो वरिष्ठ ॥२॥ नाम जपे नीलकंठ । वंदिताती श्रेष्ठ श्रेष्ठ ॥३॥ नाम जपे हनुमंत । तेणें अंगीं शक्तिवंत ॥४॥ नाम जपे पुंडलिक । उभा वैकुंठनायक ॥५॥ नाम ध्यानीं मनीं देखा । जपे जनार्दनीं एका ॥६॥
भावार्थ
स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या तिन्हीं लोकांत नाम पावन समजले जाते. शिवशंकरा सारख्या वरिष्ठ देवाला नामस्मरण श्रेष्ठ आहे असे वाटते. भक्त शिरोमणी हनुमंत रामनामाचा जप केल्याने सर्व शक्तिमान बनला. भक्तराज पुंडलिकाच्या नामजपाने वैकुंठनायक विटेवर उभा राहिला. नामधारकांची अशी उदाहरणे देऊन एका जनार्दनीं नामभक्तीचा महिमा सांगतात. 

पशु पक्षी वनचरें । श्वान श्वापदादि सूकरें ॥१॥ पडतां नाम घोष कानीं पावन होती इये जनीं ॥२॥ चतुष्पाद आणि तरूवर । नामें उध्दार सर्वांसी ॥३॥ उंच नीच नको याती । ब्रह्मणादि सर्व तरती ॥४॥ एका जनार्दनीं अभेद । नामीं नाहीं भेदाभेद ॥५॥
भावार्थ
पशु पक्षी, वानरे, हिंस्त्र जंगली प्राणी, कुत्रे आणि डुकरे यांच्या कानावर जर परमेश्वराचा नामघोष पडला तर ते याच लोकी पावन होतात. चार पायांचे प्राणीच नव्हे तर झाडेवेलींचा नाम श्रवणानें उध्दार होतो. उच्चनीचतेचा भेद संपून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र सर्वांचा उध्दार नामसाधनेने होतो. एका जनार्दनींम्हणतात, नामधारकांमध्ये भेदाभेद नाही. नामसाधना अभेद आहे. नामजपाचा सर्वांना अधिकार आणि समान फलप्राप्ती आहे. 

तारलें नामें अपार जन । ऐसे महिमान नामाचें ॥१ ॥ अधम तरले नवल काय । पाषाण ते पाहें तारियेले ॥२॥ दैत्यदानव ते राक्षस । नामें सर्वास मुक्तिपद ॥३॥ एका जनार्दनीं नाम सार । जपा निरंतर हृदयीं ॥४॥
भावार्थ
नामाचा महिमा असा आहे की, त्याने अगणित लोकांचा उध्दार झाला. नामसाधनेने पाषाण तरले तर महापापी जन तरले यांत नवल नाही. नामस्मरणाने दैत्य, दानव, राक्षस या सर्वांना मुक्तीपद प्राप्त झाले. एका जनार्दनीं म्हणतात, नामजप हे भक्तीचे सार आहे. परमेश्वराचे नाम निरंतर जपावे. 
१०
नाम तारक ये मेदिनी । नाम सर्वांचे मुगुटमणी । नाम जपे शूळपाणी । अहोरात्र सर्वदा ॥१॥ तें हें सुलभ सोपारें । कामक्रोध येणें सरे । मोह मद मत्सर । नुरे नाममात्रें त्रिजगतीं ॥२॥ घेउनी नामाचे अमृत । एका जनार्दनीं झाला तृप्त । म्हणोनि सर्वांतें सांगत । नाम वाचे वदावें ॥३॥
भावार्थ
नाम सर्व साधनेचा मुगुटमणी असून पृथ्वीला तारणारे आहे. शिवशंकर अहोरात्र नाम जपतात. नामजप हे वाचेसी अतिशय सुलभ व आचरणास सोपे आहे. कामक्रोध, मद, मत्सर आणि मोह या मानसिक शत्रुंचा नाश करणारे आहे. एका जनार्दनीं सांगतात आपण नामामृत प्राशन करून तृप्त झालो आहे. स्वअनुभवाने सर्वांना नामस्मरण साधना करावी असे सुचवत आहे. 
११
नाम षावन पावन ।नाम दोषासि दहन । नाम पतितपावन । कलीमाजीं उध्दार ॥१॥ गातां नित्य हरिकथा । पावन होय वक्ता । नाम गाऊनि टाळ वाजतां । नित्य मुक्त प्राणी तो ॥२॥ एका जनार्दनीं नाम । भवसिंधु तारक नाम । सोपे सुगम वर्म । भाविकांसी निर्धारें ॥३॥
भावार्थ
सर्व दोषांचे दहन करणारे नाम अग्नीप्रमाणे पावन आहे. पतितांना पावन करण्याचे सामर्थ्य नामांत आहे. नेहमी हरिकथा गाणारा पावन होतो. टाळी वाजवून नाम गाणारा भवबंधनातून मुक्त होतो. एका जनार्दनीं म्हणतात, नाम भवसिंधु तारक असून भाविकांसाठी सोपे, सुगम साधन आहे हे निश्चित. 
१२
नामे पावन हीन याती । नाम जपतां अहोरात्रीं । नामापरतीं विश्रांती । दुजी नाहीं प्राणियां ॥१॥ नका भ्रमू सैरावैरा । वाउगे साधन पसारा । योग याग अवधारा । नामें एका साधतसे ॥२॥ व्रत तप हवन दान । नामें घडे तीर्थ स्नान । एका जनार्दनीं मन । स्थिर करूनि नाम जपा ॥३॥
भावार्थ
रामनाम हा विश्वाचा विश्राम असून या नश्वर जीवनांत नामा सारखे दुसरे विश्रांतिचे स्थान नाही. व्रत, तप, हवन, दान, योग, याग, तीर्थ स्नान हे सर्व एका नामसाधनेनें प्राप्त होते. नामाने हीन याती सुध्दां पावन होतात. बाकी निरर्थक प्रयास न करतां मन परमात्म्याचे ठिकाणी स्थिर करून नामजप करावा. असा उपदेश एका जनार्दनीं या अभंगात करतात. 
१३
दोष दुरितांचें पाळें ।पळती बळें नाम घेतां ॥१॥ नाम प्रताप गहन । भवतारक हरिनाम ॥२॥ आणीक नको दुजी चाड । नाम गोड विठ्ठल ॥३॥ एका जनार्दनीं नाम । तरलें तरती निष्काम ॥४॥
भावार्थ
हरिनामाचे सतत गायन करणार्या दुरितांचे सारे दोष नामजपाने नाहिसे होतात. हरिनाम भवतारक असून मनाला निष्काम करते. नामाची माधुरी चाखल्यावर दुसरी कोणतिही कामना उरत नाही. एका जनार्दनीं म्हणतात, नामाचा महिमा चिरकाल टिकणारा असून नाम निष्काम साधकाचे तारणहार आहे. 
१४
नामे घडे निज शांति । तेथें वसे भुक्ति मुक्ति । नाम तारक त्रिजगतीं । दृढभावे आठवितां ॥१॥ म्हणोनि घेतलासे लाहो । रात्रंदिवस नाम गावो । कळिकाळाचे भेवो । सहज तेथें पळतसे ॥२॥ मज मानला भरंवसा । नामीं आहे निजठसा । एका जनार्दनीं सर्वेशा । नाम जपे अंतरीं ॥३॥
भावार्थ
एकाग्रतेने चित्तांत दृढभाव धरून नामस्मरण केल्यास मनाला नितांत शांतता लाभते. भुक्ति मुक्ति चित्तांत वास करतात. नामाचा ध्यास घेऊन रात्रंदिवस हरिनामांत राहिल्यास कळीकाळाचे भय संपून जाते. एका जनार्दनीं आत्मविश्वासाने सांगतात की, अखंड नामजपाने नामाचा उत्तम संस्कार अंतरंगात उमटला आहे. 
१५
नाम प्राप्त नित्यानंद । नामें होय परम पद । नामें निरसे भवकंद । नाम तारक निर्धार ॥१॥ हेचि मना दृढ धरीं । वायां नको पडूं फेरी । तेणे होसी हाव भरी । मग पतनीं पडशील ॥२॥ म्हणे एका जनार्दन । नामें तरती अधम जन । नामें होय प्राप्त पेणें । वैकुंठचि निर्धारें ॥३॥
भावार्थ
परमेश्वराच्या नामसाधनेने नित्य आनंद मिळतो. श्रेष्ठ पद प्राप्ती होते. संसारतापा पासून मुक्ती मिळते. हा भक्तीभाव मनांत दृढ धरावा. व्यर्थ जन्म-मरणाच्या फेर्यांत गुंतून पतनीं पडूं नये असा उपदेश करून एका जनार्दनीं म्हणतात, पापी लोकांचा उद्धार करणारे हरिनाम जपल्याने वैकुंठपद प्राप्त होते. 
१६
नामें तारिलें पातकी । नाम थोर तिहीं लोकीं । नामें साधे भुक्ति मुक्ति । नाम कली तारक ॥१॥ नको जाऊं वनांतरीं । रानी वनीं आणि डोंगरीं । बैसोनियां घरीं । स्थिर चित्त निमग्न ॥२॥ नामें साधलें साधन । तुटलें बहुतांचे बंधन । एका जनार्दनीं शरण । नाम वाचे उच्चारी ॥३॥
भावार्थ
नामसाधनेने अनेक पातकी जनांचा उध्दार झाला असून नामाची थोरवी तिन्हीं लोकांत गायली जाते. रानात, वनांत, डोंगरी, कपारी कोठेही न जातां घरांतच बसून, शांतचित्ताने हरिनामांत मग्न व्हावे. नामसाधना साधून अनेक साधक भवबंधनातून मुक्त झाले आहेत. जनार्दन स्वामींचरणी शरणागत असलेले एका जनार्दनीं सदोदित वाचेने नामस्मरण करतात. 

१७
जितुका आकार दिसत । नाशिवंत जात लया ॥१॥ एक नाम सत्य सार । वाउगा संसार शीण तो ॥२॥ नामें प्राप्त ब्रह्मपद । नामें देह होय गोविंद ॥३॥ एका जनार्दनीं नाम । सर्व निरसें क्रोधकाम ॥४॥
भावार्थ
जे जे डोळ्यांना दिसते ते सर्व नाशवंत असल्याने लयास जाते. एक हरिनाम सत्य, अविनाशी असून बाकी सर्व संसार व्यर्थ शीण आहे. वदनीं नाम धारण करणारा देहधारी गोविंदस्वरूप होऊन ब्रह्मपद मिळवू शकतो. एका जनार्दनीं सुचवतात, नामसाधनाने कामक्रोधावर विजय मिळवतां येतो. 
१८
श्रुतीशास्त्रांचा आधार । पुराणांचा परिसर । दरूशनें सांगती बडिवार । वाचे नाम उच्चार ॥१॥ तारक जगीं हें नाम । जपतां निष्काम सकाम । पावे स्वर्ग मोक्ष धाम । कलिमाजीं प्रत्यक्ष ॥२॥ म्हणोनि धरिलें शिवें कंठीं । तेणें हळाहळ शमलें पोटीं । एका जनार्दनीं गुह्य गोष्टी । गिरजेप्रति अनुवाद ॥३॥
भावार्थ
नामसाधनेला श्रुती आणि साही शास्त्रांचा आधार आहे. अठराहि पुराणे हरिनामाचे गुणगान करतात. दर्शने हरिनामाचा महिमा वर्णन करतात. जगाचा उध्दार करणारे हरिनाम वाचेने जपल्याने सकाम साधक निष्काम होवून मोक्षपद, स्वर्गसुख कलियुगात सुध्दां प्राप्त करू शकतात. रामनामाचा महिमा जाणून शिवशंकरानी समुद्रमंथनातून निघालेले हळाहळ (विषाचे) शमन करण्यासाठी रामनाम कंठीं धारण केले. हे रहस्य शिवशंकर स्वता:पार्वतिला सांगतात असे एका जनार्दनीं स्पष्ट करतात. 
१९
वेदांचा संवाद श्रुतींचा अनुवाद । नामाचा मकरंद पुराण वदे ॥१॥ शास्त्रांचे मत नामांचा इतिहास । यापरती भाष नाहीं नाहीं ॥२॥ एका जनार्दनीं संतांचे हें मत । नामें तरतुद पतित असंख्यात ॥३॥
भावार्थ
चारी वेदातून मिळणारे परमात्म तत्वाचे ज्ञान, श्रुतींनी केलेला या तत्वांचा अनुवाद, अठरा पुराण कथांमधून वर्णिलेली हरिकथा रसाची माधुरी आणि साही शास्त्रांनी मान्य केलेला हरिचरित्राचा इतिहास या पेक्षा श्रेष्ठ असे कोणतेही भाष(लिखित साधन) उपलब्ध नाही असे संतांचे मत आहे असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात. 
२०
कष्ट न करतां योग्य जरी साधी । श्रम तें उपाधी वाउगी कां बा ॥१॥ नाम तें सोपें श्रम नाहीं कांहीं । उच्चारितां पाही सर्व जोडे ॥२॥ एका जनार्दनीं नको योगयाग । म्हणावा श्रीरंग वाचे सदा ॥३॥
भावार्थ
कोणतेही विशेष सायास न करता एखादी गोष्ट साध्य झाली तरी ते श्रम वायां गेले असे म्हणणे योग्य नाही. नामजप हे सहज सोपे साधन असून नामजपाने सर्व काही साध्य होते. एका जनार्दनीं म्हणतात, योगयागाची अवघड साधना करण्यापेक्षा वाचेने सदासर्वदा श्रीरंगाला आठवावे. 
२१
योगयाग तप व्रतें आचरितां । नाम सोपें गातां सर्व जोडे ॥१॥ पाहोनियां प्रचित नाम घे अनंत । तुटे नाना घात जपे नाम ॥२॥ एका जनार्दनीं नामाचा महिमा । वर्णितां उपरमा शेष आला ॥३ ।
भावार्थ
योगयाग, अनेक प्रकारची खडतर तपे, कठिण व्रते करण्याने जे पुण्यफळ मिळते ते सर्व सहज सोपे नाम घेतल्याने साध्य होते. याची एकदा प्रचिति घ्यावी. नामजपाने नाना संकटांचे निवारण होते. एका जनार्दनीं म्हणतात, नामाचा महिमा वर्णन करतांना सहस्त्र मुखे असलेला शेष सुध्दां थकून स्तब्ध झाला. 
२२
करितां साधनांच्या कोटी । नामाहूनि त्या हिंपुटीं ॥१॥ नाम वाचे आठवितां । साधने सर्व येती हातां ॥२॥ नामापरता दुजा मंत्र ।नाहीं नाहीं धुंडिता शास्त्र ॥३॥ एका जनार्दनीं नाम । शुध्द चैतन्य निष्काम ॥४॥
भावार्थ
या अभंगात नाममहिमा सांगतांना एका जनार्दनीं म्हणतात, वाचेने परमात्म नामाचे पठण केल्याने सर्व साधना साधली जातात. नामा सारखा दुसरा मंत्र नाही हे शास्त्रांचा मागोवा घेतल्याने कळून येते. कोटी साधने केली तरी नामसाधनेच्या तुलनेने हिणकस ठरतात. परमेश्वराचे नाम हे शुध्द चैतन्य असून साधकाला ते निष्काम बनवते. 
२३
नाम श्रेष्ठ तिहीं लोकीं । म्हणोनि शिव नित्य घोकी ॥१॥ सदा समाधी शयनीं । राम चिंती ध्यानीं मनीं ॥२॥ अखंड वैराग्य बाणलें अंगी म्हणोनि वंद्य सर्वा जगीं ॥३॥ एका जनार्दनीं वाचे । नाम वदे सर्वदा साचें ॥४॥
भावार्थ
नाम तिनही लोकी श्रेष्ठ आहे हे जाणून शिवशंकर सदा समाधिस्थ राहून, ध्यानस्थ किंवा निद्राधीन असतांना श्री रामाचे चिंतन करतात. या चिंतनाने त्यांना अखंड वैराग्याचा लाभ होऊन ते सर्व जगाला वंदनीय झाले. एका जनार्दनीं वाचने अखंड नाम वदावे असे सांगतात. 
२४
कळिकाळा नाहीं बळ । नाम जपे तो सबळ ॥१॥ ऐसें नाम सदा जपे । कळिकाळा घाली खेपे ॥२॥ हरीचिया दासा साचें । भय नाहीं कळिकाळाचें ॥३॥ एका जनार्दनीं । काळ होय कृपाळ ॥४॥
भावार्थ
हरिनाम धारकाला कळीकाळाचे भय नाहीं कारण नामधारक कळिकाळापेक्षा अधिक सामर्थशाली आहे. नामसाधकासाठी कळिकाळ कृपाळु बनतो. असे एका जनार्दनीं सुचवतात. 
२५
जेणें नाम धरिलें कंठीं ।धांवे त्याच्या पाठी पोटीं ॥१॥ नाम गातां जनीं वनीं । आपण उभा तेथें जाउनी ॥२॥ नामासाठीं मागें धांवें । इच्छिले तेणे पुरवावे ॥३॥ यातीकुळ तयाचें । न पाहे कांहीं साचे ॥४॥ वर्णाची तो चाड नाहीं । नाम गातां उभा पाहीं ॥५॥ एका जनार्दनीं भोळा । नामासाठीं अंकित जाला ॥६॥
भावार्थ
हरीनाम कंठांत धारण करणार्या साधकाचे जाती, कुळ, वर्ण यांचा विचार न करता देव त्याच्या मागे पुढे धावत जातो. नामसाधक जनांत अथवा वनांत कोठेही जात असला तरी देव त्याला इच्छित साधन पुरवण्यासाठी उभा राहतो. एका जनार्दनीं म्हणतात, भोळ्याभाबड्या भक्तांच्या भक्तीप्रेमाने देव भक्तांचा अंकित होतो. 
२६
एका नामासाठी । प्रगटतसे कोरडे काष्ठीं । भक्त वचनाची आवडीं मोठीं । हाय जगजेठी अंकित ॥१॥ एका घरीं उच्छिष्ट काढणें । एका द्वारीं द्वारपाल करणें । एका घरीं गुरें राखणें । लोणी खाणें चोरूनी ॥२॥ एकाची उगेचि धरूनी आस । उभा राहे युगें अठ्ठावीस । एका जनार्दनीं त्याचा दास । नामें आपुल्या अंकित ॥३॥
भावार्थ
भक्त वचनाची अतिशय आवड असलेला विश्वंभर एका नामासाठी कोरड्या खांबातून नरसिंहाचे. रुपाने प्रगट होतो. पांडवांच्या राजसूय यज्ञाचे वेळी उच्छिष्ट काढतो. बळीच्या घरीं द्वारपाल होतो. नंदाघरीं गुरे राखतो आणि गवळणींच्या घरचे लोणी चोरून खातो. भक्त पुंडलिकाची वाट पहात अठ्ठाविस युगे विटेवर उभा राहतो. एका जनार्दनीं या हरीचा दास असून त्याच्या नामाचा अंकित आहे असे म्हणतात. 
२७
आपुल्या नामा आपण वाढवीं । भक्तपण स्वयें मिरवीं । अवतार नाना दावीं । लाघव आपुलें ॥१॥ करीं भक्तांचे पाळण । वाढली त्यांचे महिमान । तयासी नेदी उणीव जाण । वागवी ब्रीद नामाचें ॥२॥ करी नीच काम नाहीं थोरपण । खाय भाजीचें पान । तृप्त होय एका जनार्दन । तेणें समाधान होतसे ॥३॥
भावार्थ
श्रीहरी आपल्या नामाचा महिमा आपणच वाढवतो. नाना अवतार धारण करून अनेक प्रकारच्या लीला करतो. भक्तांचे पालन, रक्षण करतो. भक्तांच्या सर्व कामना पूर्ण करतो. कसलीच उणीव भासू देत नाही. थोरपणाचा बडिवार न करता हलकी कामे करुन श्रमाचा महिमा वाढवतो. द्रौपदीच्या थाळीतिल भाजीचे पान खाऊन तृप्त होतो आणि विश्वाला तृप्त करतो. एका जनार्दनीं म्हणतात, या सार्‍या चरित्रकथा ऐकून मनाला समाधान वाटते. 
२८
नाम घेतां ही वैखरीं । चित्त धांवें विषयांवरी ॥१॥ कैसे होता हे स्मरण । स्मरणामाजीं विस्मरण ॥२॥ नामरुपा नव्हता मेळ । नुसता वाचेचा गोंधळ ॥३॥ एका जनार्दनीं छंद । बोलामाजीं परमानंद ॥४॥
भावार्थ
कांहीवेळा साधक वाचेने नामजप करीत असतो परंतू त्याचे चित्त नामांत रममाण झालेले नसते. मन इंद्रिय विषयांकडे धावत असते. हरिस्मरणांत हे विषयांचे स्मरण होऊन हरिनामरुपाचा मेळ नाहिसा होतो . अशा वेळीं नामजप म्हणजे केवळ शब्दांचा गोंधळ ठरतो. एका जनार्दनीं म्हणतात, हरिनामाचा छंद लागला की हरिनाम जपांत परम आनंद मिळतो. 
२९
शुकादिक योगी रंगले श्रीरंगीं ।नाम पवित्र जगीं जपा आधीं ॥१॥ साधनें साधितां कष्ट होती जीवा । नाम सोपे सर्वां गोड गातां ॥२॥ परंपरा नाम वाचे तें सुगम । सनकादिक श्रम न करिती ॥३॥ एका जनार्दनीं नाम तें पावन । वाचे उच्चारितां जाण श्रम हरे ॥४॥
भावार्थ
हरिनाम पवित्र असून वाचेने गाताना गोड वाटते. सर्वांसाठी नामजपाची साधना सोपी आहे. यज्ञयाग, तप, तीर्थयात्रा ही सर्व कष्टाची साधने आहेत. शुकमुनी सारखे योगी श्रीरंगाच्या रंगात रंगून जातात. सनकादिक ऋषी इतर सांधनांचे श्रम न करता केवळ नामसाधना करतात. एका जनार्दनीं म्हणतात, नाम उच्चारतांच सर्व श्रमांचा परिहार होतो. 
३०
वेदांचे वचन शास्त्रांचे अनुमोदन ।पुराणीं कथन हेचिं केलें ॥१॥ कलियुगामाजीं नाम एक सार । व्यासाची निर्धार वचनोक्ती ॥२॥ तरतील येणें विश्वासी जे नर । तत्संगे दुराचार उध्दरती ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा हा अनुभव । प्रत्यक्ष सांगे देव उध्दवासी ॥४॥
भावार्थ
कलियुगात नामस्मरण ही साधना सर्व साधनेत श्रेष्ठ आहे हे व्यासांचे वचन आहे. वेदांतही हेच कथन केले असून शास्त्रांनी या वेद, व्यास वचनास अनुमोदन देऊन मान्यता दिली आहे. या वेदवचनावर जे जन विश्वास ठेवतील ते तर तरतीलच , आपल्या बरोबर ते अनेक दुराचारी जनांचा उध्दार करतील. एका जनार्दनीं म्हणतात, हे अनुभवाचे बोल असून प्रत्यक्ष श्रीहरीने उध्दवास उपदेश करतांना सांगितले आहेत. 
३१
नाम एक उच्चारितां । गणिका नेली वैकुंठपंथा । नामें पशू तो तत्वता । उध्दरिला गजेंद्र ॥१॥ ऐसा नामाचा बडिवार । जगीं सर्वांसी माहेर । नामापरतें थोर । योगयागादि न होती ॥२॥ नामें तरला कोळी वाल्हा । करा नामाचा गलबला । नामें एका जनार्दनीं धाला । कृत्यकृत्य झाला संसार ॥३॥
भावार्थ
हरीनामाचा उच्चार करुन गणिका वैकुंठपदी पोचू शकते. गजेंद्र सारखा पशू हरिनाम स्मरणाने उध्दरून जातो. वाल्हा कोळी सारखा दुराचारी सुध्दां नामभक्तीने वाल्मिकी बनून रामायणासारखी महान ग्रंथ रचना करु शकतो. असे नामाचे महिमान आहे. नाम हे सर्वांसाठी विश्रांतीचे स्थान आहे. योगयागादि साधने नामस्मरणा इतके थोर नाहीत. असे सांगून एका जनार्दनीं नामाचा गजर करा असे आवाहन करतात. नामजपाने आपण कृतार्थ होऊन पूर्ण समाधान पावलो असे सांगतात. 
३२
अवघ्या लोकीं जाहलीं मात । नामें पतीत तरती ॥१॥ तोचि घेउनी अनुभव । गाती वैष्णव नाम तें ॥२॥ तेणें त्रिभुवनीं सत्ता । उध्दरती पतिता अनायासें ॥३॥ एका जनार्दनीं गाजली हांक । नाम दाहक पापांसी ॥४॥
भावार्थ
हरिनामाने पतितांचा उध्दार होतो अशी नामाची किर्ती सर्व लोकीं पसरली. हाच अनुभव घेउन वैष्णव जन सतत नामगायनीं दंग झाले. या वैष्णवांची त्रिभुवनीं सत्ता निर्माण झाली. पतितांचा विनासायास उध्दार होऊ लागला. हरिनाम पाप दाहक आहे असे एका जनार्दनीं म्हणतात. 
३३
भाग्याचें भाग्य धन्य ते संसारी । सांठविती हरी हृदयामाजीं ॥१॥ धन्य त्याचे कूळ धन्य त्याचे कर्म । धन्य त्याचा स्वधर्म नाम मुखा ॥२॥ संकटीं सुखांत नाम सदा गाय । न विसंबे देवराय क्षण एक ॥३॥ एका जनार्दनीं धन्य त्यांचें दैव । उभा स्वयमेव देव घरी ॥४॥
भावार्थ
जे भक्त संकटांत किंवा सुखांत असतांना सतत हरिनामाचे आनंदाने गायन करतात, अंत:करणांत हरिचे रूप सांठवतात, देवाला एक क्षणही विसंबत नाहीत ते भाग्यवान असून संसारी धन्य होतात. ते ज्या कुळांत जन्म घेतात ते कुळ धन्य होय कारण त्या भक्तांचे कर्म पावन आहे. एका जनार्दनीं म्हणतात, या भक्तांच्या घरीं देव येऊन उभा राहतो. 
३४
राजाला आळस संन्याशाला सायास । विधवेसी विलास विटंबना ॥१॥ व्याघ्रासी शांतता गाईसी उग्रता । वेश्येसी हरिकथा विटंबना ॥२॥ दानेंविण पाणी । घ्राणेविण घाणी । नामेविण वाणी विटंबना ॥३॥ एका जनार्दनीं भावभक्तीविना । पुण्य केलें नाना विटंबना ॥४॥
भावार्थ
राजाने प्रजेच्या कल्याणकारी कामांत किंवा न्यायदानांत आळस करणे, संन्याशाने नाना खटपटी करणे आणि विधवेने विलास करणे निंदनीय आहे. वाघासारख्या हिंस्त्र प्राण्याने शांत राहाणे, गाई सारख्या मवाळ प्राण्याने उग्र रूप धारण करणे, वेश्येने हरिकथा करणे विपरित आहे. दान न देता हातावर पाणी सोडणे, नाकाशिवाय दुर्गंधी, देवाचे नाम जप न करणारी वाणी असणे निरर्थक आहे असे दाखले देवून एका जनार्दनीं म्हणतात, भावभक्ती शिवाय पुण्य करणे ही विटंबना आहे. 
३५
आपुलें कल्याण इच्छिणें जयासी । तेणें या नामासी विसंबूं नये ॥१॥ करील परिपूर्ण मनींचे हेत । ठेवलियां चित्त नामापाशीं ॥२॥ भुक्ति आणि मुक्ति वोळंगती सिध्दी । होईल कीं वृध्दी आत्मनिष्ठे ॥३॥ एका जनार्दनीं जपतां हें नाम । पुरवील काम जो जो हेतु ॥४॥
भावार्थ
आपल्या कल्याणाची ईच्छा करणार्या साधकांनी हरिनामाचा आळस करू नये. ज्याचे चित्त हरिनामांत गुंतले आहे त्याच्या मनींचे सर्व हेतू पुर्ण होतात. भुक्ति आणि मुक्ति या सिध्दी नामधारकाच्या पायाशी लोळण घेतात. आत्मनिष्ठेची वृध्दी होते. एका जनार्दनीं म्हणतात. नामजप साधनेने मनातिल सर्व हेतू कामना पूर्ण होतात. 
३६
जयाचें देखतां चरण । तुटेल जन्म जरा मरण ॥१॥ तो हा चंद्रभागेच्या तीरी । कट धरुनियां करीं ॥२॥ नाम घेतां आवडीं । तुटेल संसाराची बेडी ॥३॥ भाविकांसी पावे । मागें मागे त्यांच्या धावे ॥४॥ म्हणे जनार्दनाचा एका । आवडीनें नाम घोका ॥५॥
भावार्थ
चंद्रभागेच्या तीरावर कटीवर कर ठेवून उभा असलेल्या श्रीहरीचे चरणांचे दर्शन होतांच जन्म, जरा, मरण ही साखळी तुटून जाईल. संसाराच्या सगळ्या बंधननातून मुक्त होण्यासाठी आवडीने नाम घ्यावे. नामाचे ब्रीद राखण्यासाठी श्रीहरी भाविकांच्या मागे धावतो. असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात. 
३७
मुखीं नाम हातें टाळी ।साधन कलीं उत्तम हें ॥१॥ न घडे योगयाग तप । नाहीं संकल्प दुसरा ॥२॥ संतांपायीं सदा मन । हृदयीं ध्यान मूर्तीचे ॥३॥ एका जनार्दनीं सेवा । हीचि देवा उत्तम ॥४॥
भावार्थ
हाताने टाळी वाजवत मुखाने हरिनामाचा गजर करणे ही नामसाधना उत्तम आहे कारण कलियुगांत योगयाग तप ही साधना घडत नाही. दुसरा कोणताही संकल्प पुरा होत नाही. संताच्या चरणांशी मन एकाग्र करून हृदयांत पांडुरंगाचे ध्यान करावे. एका जनार्दनीं सुचवतात, श्रीहरीची हीच सेवा सर्वश्रेष्ठ आहे. 
३८
काया वाचा आणि मन । जयाचे ध्यान संतचरणीं ॥१॥ तोचि पावन जाहला जगीं । दुजे अंगीं कांहीं नेणें ॥२॥ सदा वाचे गाय नाम । न करी काम आणीक तो ॥३॥ एका जनार्दनीं देव । नेदी तया दुजा ठाव ॥४॥
भावार्थ
देहाने वाणीने आणि मनाने जो साधक संतांचे ध्यान करतो, तो दुसरे कांही जाणत नाही. तो पावन होतो. सतत वाचेने हरिनामाचा जप एव्हढीच साधना तो नित्यनेमाने करतो. एका जनार्दनीं म्हणतात, अशा साधकाला देव सायुज्यमुक्ती देवून वैकुंठांत चिरंतन स्थान देतो. 
३९
निवांत बैसोनि सुखें गाय नाम । भेदाभेद परते सांडी ॥१॥ हेचि एक खूण परमार्थ पुरता । मोक्ष सायुज्यता हातां चढे ॥२॥ लौकिक व्वेहार आहे तैसा पाहे । जो जे होत जायें जो जे वेळे ॥३॥ कर्म धर्म तत्वतां बीज हे सर्वथा । एका जनार्दनीं पुरता योग साधे ॥४॥
भावार्थ
शांत चित्ताने निवांत ठिकाणी बसून जो हरिनामाचे गायन करतो त्या साधकाच्या मनातील सर्व द्वैत सारे संशय नाहिसे झालेले असतात. हीच परमार्थ साधण्याची खूण समजावी. सायुज्यता मुक्तीचा तो अधिकारी होतो. जे जे ज्या ज्या वेळेला होईल त्याप्रमाणे तो साधक व्यवहार संभाळतो. कर्म, धर्म या तत्वांची योग्य सांगड घालतो. हेच योगसाधनेचे बीज आहे असे एका जनार्दनीं स्पष्ट करतात. 
४०
नाहीं कधी वाचे नाम । तो अधम न पहावा ॥१॥ होतां त्याचें दरूशन । सचैल स्नान करावें ॥२॥ तयाची ते ऐकतां मात । होय घात शरिराचा ॥३॥ ऐसा अधम तो जनीं । नामहीन असतो प्राणी ॥४॥ म्हणोनि नाम आठवावें ।एका जनार्दनीं जीवेंभावें ॥५॥

भावार्थ
जो मुखाने कधी परमेश्वराचे नामस्मरण करीत नाही त्या अधम माणसाचे दर्शन घेऊ नये. चुकून नजरेस पडला तर डोक्यावरून स्नान करावे. त्याची दर्पोक्ती ऐकून शरिराचा घात होतो. असा नामहीन प्राणी जगांत पापी समजला जातो. या साठी भावभक्तीने देवाला स्मरावे असा उपदेश एका जनार्दनीं करतात. 
४१
हेंचि साचें बा साधन । मुखीं नाम हृदयीं ध्यान ॥१॥ येणें तुटे नाना कंद । पीडा रोग भवछंद ॥२॥ नको रे वाउगी खटपट । मन करी एकनिष्ठ ॥३॥ घडे साधन समाधी । तेथें अवघी उपाधी ॥४॥ एका जनार्दनीं ध्यान । साधी परमार्थ साधन ॥५॥
भावार्थ
अंतरांत परमात्म रूपाचे ध्यान आणि मुखांत देवाचे नाम हीच खरी साधना आहे. या साधनेने मानसिक पीडा आणि शारिरीक रोग लयास जातात. वेगळी निरर्थक खटपट करावी लागत नाही. मन एकाग्र करून चिंतन केले तर समाधीसाधन घडते. सारे प्रयास संपून जातात. एका जनार्दनीं स्वानुभवातून स्पष्ट करतात ध्यान, धारणा समाधी या मार्गाने परमार्थ साधतो. 
४२
एक नाम गाये । तेथे सदा सुख आहे ॥१॥ नाम गातांची वदनीं । उभा असे चक्रपाणी ॥२॥ नामाचिये हाकें । उडी घाली कवतुकें ॥३॥ घात आघात निवारी । उभा राहे सदा दारीं ॥४॥ एका जनार्दनीं नामासाठीं । धांवे भक्तांचिये पाठी ॥५॥
भावार्थ
नामधारक जेव्हां नामजप करीत असतो तेव्हां श्रीहरी सुदर्शन चक्र हातात धरून उभा असतो. भक्ताची हाक ऐकताच तत्परतेने भक्ताच्या घात आघातांचे निवारण करतो. एका जनार्दनीं म्हणतात, भक्तीप्रेमाने वेडा होऊनि भक्तांच्या मागे धावत असतो. 
४३
पशु आणि पक्षी तरले स्मरणें । तो तुम्हा कारणें उपेक्षिना ॥१॥ धरूनि विश्वास आठवावें नाम । सद्गद् तें प्रेम असो द्यावें ॥२॥ सुखदु:ख कोटी येती आणि जाती । नामाविण विश्रांती नाहीं जगीं ॥३॥ एका जनार्दनीं नामाचा प्रताप । नुरेती तेथें पाप वोखदासी ॥४ ॥
भावार्थ
देवाच्या नामस्मरणाने पशु पक्षी तरून जातात ते नामस्मरण साधकाची उपेक्षा करणार नाही असा विश्वास धरून सतत नामजप करावा. सद्गतींत राहून अखंड साधना करावी. सुखदु:ख येतात आणि जातात, नामाशिवाय मनाला खरी विश्रांति मिळणार नाही. एका जनार्दनीं सांगतात, नामाचा महिमा असा आहे की, नाम जेथे आहे तेथे औषधाला सुध्दां पाप उरणार नाही. 
४४
नाहीं जया भाव पोटीं । तया चावटीं वाटे नाम ॥१॥ परी येतां अनुभव । चुकवी हाव संसार ॥२॥ वेरझारीं पडे चिरा । नाहीं थारा जन्माचा ॥३॥ एका जनार्दनीं खंडे कर्म । सोपे वर्म हातां लागे ॥४॥
भावार्थ
ज्या साधकाच्या मनांत भक्तिभाव नाही त्याला नामजप म्हणजे वाचाळता वाटते. परंतू अनुभवांती नामस्मरणाने संसार सुखाविषयी वैराग्य निर्माण होते हे नामधारकाला समजून येते. या वैराग्याने जन्म मरणाच्या फेर्‍यातून सुटका होते. एका जनार्दनीं म्हणतात, भक्तियुक्त नामजपाने कर्मशृखंला खंडित होते हा सोपा उपाय लक्षांत येतो. 
४५
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । चांडाळादि अधिकार ॥१॥ एका भावें गावें नाम । सोडोनिया क्रोधकाम ॥२॥ आशा ममता टाका दुरी । मग इच्छा कल्पना काय करी ॥३॥ एका जनार्दनीं मन । करा देवासी अर्पण ॥४॥
भावार्थ
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या चारी वर्णांसह चांडाळांना सुध्दा नामजप साधनेचा अधिकार आहे असे सांगून एका जनार्दनीं सुचवतात, क्रोध, काम यांचा त्याग करून भक्तिभावाने हरीचे नाम गावे. सुखाची आशा आणि माझेपणाने येणारी ममता दूर सारल्यास मनाच्या इच्छा आणि पोकळ कल्पना यांना मनांत ठाव राहात नाही. असे शुध्द झालेले मन देवाला अर्पण करावें. 
४६
गुणदोष नायकावे कानीं । सदा वाचा नामस्मरणीं ॥१॥ हेंचि परमार्थाचे सार । मोक्ष मुक्तीचे भांडार ॥२॥ साधे सर्व योगस्थिती । द्वेष धरूं नये भूतीं ॥३॥ सर्वांठायीं जनार्दन । म्हणोनि वंदावें तें जन॥४॥ खूण सांगे जनार्दन ।एका जनार्दनीं पूर्ण ॥५॥
भावार्थ
कोणाच्याही गुणदोषांचे वर्णन कानाने ऐकू नये. वाचेनें सतत हरिनाम घ्यावे. हेच मोक्ष मुक्तीचे साधन असून परमार्थाचे सार आहे. नामस्मरणाने ध्यान, ज्ञान, कर्म, भक्ती या चारी योगस्थिती साध्य होतात. कोणाविषयी द्वेषभावना मनात असू नये. सर्वांच्या ठिकाणी सद्गुरू जनार्दन वसत आहे असे समजून त्यांना वंदन करावे. हे गुरूवचन आहे असे एका जनार्दनीं सांगतात. 
४७
सदा वाचे नामावळी । नित्य जिव्हा ज्याची चाळी । पातकांची होळी । होत तेणें कली ये ॥१॥ नको ध्यान धारणा आसन । वाचे सदा नारायण । केलिया ऐसा नेम जाण । मेरूसमान सुकृत ॥२॥ उपमा नव्हे तया नरा । जनार्दन तो निर्धार । एका जनार्दनीं बरा । त्याचा सांगात घडतां ॥३॥
भावार्थ
ज्या साधकाने नित्य नारायण नामाचा जप करण्याचा नेम केला आहे त्याचे सुकृत मेरूपर्वता प्रमाणे अढळ राहील यांत संदेह नाही. या साधकाच्या भाग्याला उपमा नाही. तो जनार्दन स्वामींप्रमाणे गुरूस्थानीं मानावा. त्या साधकाची संगती जोडावी, असे एका जनार्दनीं सुचवतात. 
४८
वेदाभ्यास नको सायास ज्योतिष । नामाचा तो लेश तेथें नाही ॥१॥ बहुत व्युत्पत्ती सांगती पुराण । व्यर्थ तेचि स्मरण नाम नाहीं ॥२॥ अनंत हे नाम जयापासुनी जालें । ते वर्म चुकले संतसेवा ॥३॥ संतांसी शरण गेलिया वांचुनि । एका जनार्दनीं न कळे नाम ॥४॥
भावार्थ
वेद मंत्रांच्या ऋच्या समजून घेण्याचा अभ्यास नको कारण वेदांत नाममाधुरी नाही. पुराणे परमेश्वराची अनंत नामे कशी रूढ झाली याच्या अनेक कथा सांगतात परंतू तेथे नामस्मरण नसल्याने ते व्यर्थ आहे. अनंत हे नाम संत या नामातून आले आहे हे जाणून न घेतल्याने संतसेवेचा मार्ग चुकला. संतांना शरण गेल्या शिवाय नामाचा महिमा कळणार नाही असे एका जनार्दनीं सुचवतात. 
४९
ज्या नामें पाषाण जळांत तरलें । नामे त्या रक्षिलें प्रल्हादासी ॥१॥ अग्नि विष बाधा नामेंचि निवारीं । गिरीं आणि कंदरीं रक्षी नाम ॥२॥ ब्रह्महत्यारी वाल्हा नामेंचि तरला । त्रैलोकीं मिरवला बडिवार ॥३॥ एका जनार्दनीं नामेंचि तरलें । जडजीव उध्दरले युगायुगीं ॥४॥
भावार्थ
ज्या रामनामाने सेतुबंधन प्रसंगी पाषाण पाण्यांत तरंगले त्याच नामाने प्रल्हादाचे अग्नी व विष बाधेपासून रक्षण केले. उत्तुंग पर्वत आणि खोल दरी यांतून रामनाम भक्तांचे रक्षण करते. ब्राह्मण हत्येचे पातक करणारा वाल्हा कोळ्याचा रामनामाने उध्दार होऊन रामायणकर्ता म्हणून त्रैलोक्यांत आदरणीय ठरला. रामनामाने अनेक युगांत जडजीवांचा उध्दार झाला आहे असे एका जनार्दनीं या अभंगात स्पष्ट करतात. 
५०
रंक बैसतां पालखीसी । उपेक्षी पहिल्या पदवीसी ॥१॥ तैसें नाम मुखीं गातां । कोण ब्रह्म ज्ञान वार्ता ॥२॥ मुळींच जाहलें नाहीं खंडन । वादविवाद अभेदी जाण ॥३॥ एका जनार्दनीं शरण । ब्रह्मज्ञानाची कोण आठवण ॥४॥
भावार्थ
एखादी निर्धन व्यक्ती सधन बनून पालखीचा मानकरी बनली तर त्याच्या आधीच्या परिस्थितिला विसरून जाते. तसेच मुखाने हरिनाम संकीर्तना छंद जडला आणि त्यातला आनंद कळला तर ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्याने होणारा आनंद तुच्छ वाटतो. नामसाधनेंत मतांचे खंडन नाही, शूद्र भेदाभेद नाहीत आणि वादविवाद नाहीत. असे जनार्दन स्वामींना शरणागत असलेले एका जनार्दनीं म्हणतात. 
५१
आम्ही धारक नामाचे । आम्हां भय नाहीं काळाचें ॥१॥ ऐसी नामाची ती थोरी । कळिकाळ दास्य करी ॥२॥ येरां अवघियां उध्दार ।नाममंत्र परिकर ॥३॥ एका जनार्दनीं पोटी । नाम गावें सदा होटीं ॥४॥
भावार्थ
नामधारकांना काळाचे भय नसते. नामाचे श्रेष्ठत्व असे आहे कीं, कळीकाळ नामधारकांचे दास्यत्व करतो. नाममंत्र इतके समर्थ आहे की ते सर्वांचा उद्धार करते. मुखाने हरीचे नामस्मरण करावे असे एका जनार्दनीं सांगतात. 
५२
नामाचे धारक विष्णुरूप देख । त्रिभुवनींचे सुख तया ठायीं ॥१॥ ब्रह्मा विष्णु हर येतात सामोरे । नामधारक निर्धारिं तयां वंद्य ॥२॥ त्रिभुवनापरता नामाचा महिमा । जाणे शंकर उमा सत्य सत्य ॥३॥ एका जनार्दनीं पतित पावन नाम । गातां निजधाम जोडे मुक्ती ॥४॥
भावार्थ
नामधारक हे विष्णुरूप असून त्रिभुवनीचे सुख त्याच्या ठिकाणी एकवटलेलें असते. ब्रह्मा, विष्णु, महेश सामोरे जाऊन नामधारी भक्तांचे स्वागत करतात, वंदनीय मानतात. नामाचा महिमा त्रिभुवनाला पुरून उरणारा आहे हे शिवशंकर व पार्वती जाणतात. एका जनार्दनीं म्हणतात, हरिनाम पतितांना पावन करणारे असून वैकुंठपदाची प्राप्ती करून देणारे आहे. 
५३
मोक्ष मुक्तीचे लिगाड । वागवी अवघड कासया ॥१॥ एक नाम जया कंठीं । राखती मुक्ती देखा ॥२॥ मोक्ष तेथें जोडोनि हात । उभाचि तिष्ठत सर्वदा ॥३॥ एका जनार्दनीं देखा । मुक्ती फुका राबती ॥४॥
भावार्थ
मोक्ष मुक्ती या कल्पनांचे अवघड ओझे मनांत न आणता मुक्त कंठाने जो हरिनाम गातो त्या साधकाच्या पुढे मोक्ष हात जोडून सर्वदा तिष्ठत उभा राहतो. एका जनार्दनीं म्हणतात, मुक्ती तेथे फुकट दास्यत्व करतात. 
५४
धन्य धन्य श्रीहरीचे गुण । नाम पावन ऐकतां ॥१॥ जें जें अवतारचरित्र । वर्णितां पवित्र वाणी होय ॥२॥ कीर्ति वर्णिता उध्दार जीवां । कलीयुगीं सर्वा उपदेश ॥३॥ एका जनार्दनीं सोपे वर्म । गुण कर्म वर्णितां ॥४॥
भावार्थ
श्रीहरीचे गुण गाणारा आणि हरिचे पावन नाम ऐकणारा, धन्य होत. जे भक्त श्रीहरीचे अवतारचरित्र वर्णन करतात त्यांची वाणी पवित्र होते. हरीची किर्ति वर्णन करणार्या जीवांचा उध्दार होतो. कलियुगांत हाच सर्वांना उपदेश आहे की, हरीच्या गुण कर्मांचे वर्णन करावे असे एका जनार्दनीं सुचवतात. 
५५
जपतां नाम पडे धाक । पातकें पळती त्रिवाटे देख । कळिकाळाचें नासे दु:ख । ऐसे नामीं सामर्थ्य ॥१॥ जप तप नामावळी । आणिक नको मंत्रावळी । ब्रह्मज्ञान बोली । वायां शीण आटाआटी ॥२॥ साधनें पुण्य असेल गांठीं । तरीच नाम येईल होटीं । एका जनार्दनीं पोटीं । दया शांति आकळे ॥३॥
भावार्थ
हरीनामाचे सामर्थ्य असे की कळिकाळाचे दु:ख नाहिसे करते. नाम जपतांच पातके भयभीत होऊन तिन्हीं वाटांनी पळत सुटतात. परमेश्वर प्राप्तीसाठी जप, तप, मंत्र, तंत्र, ब्रह्मज्ञान ही साधने म्हणजे व्यर्थ शीण आहे . नामसाधनेचे पुण्य गांठी असेल तर वाचेने नामसाधना होऊ शकेल. चित्तांत दया, शांती नांदू लागेल असे एका जनार्दनीं सांगतात. 

N/A

References : N/A
Last Updated : August 31, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP