११०
आवडी करिता हरि-कीर्तन । हृदयी प्रगटे जनार्दन । थोर कीर्तनाचे सुख । स्वये तिष्ठे आपण देख । घात आलिया नावाची । चक्र गदा घेउनी करी । कीर्तनी होऊनी सादर । एका जनार्दनी तत्पर ।
भावार्थ:
आवडीने हरिचे कीर्तन करतांना मनाला जे सुख मिळते त्याची तुलना दुसर्या कोणत्याही सुखाची होऊ शकत नाही. हे सुख अप्रतिम असते कारण त्या वेळी प्रत्यक्ष जनार्दन हृदयात प्रगट होतात. काही संकट आल्यास चक्र, गदा हाती घेऊन येतात व त्या संकटाचे निवारण करतात म्हणुनच एका जनार्दनी कीर्तनभक्ती सर्वांत श्रेष्ठ भक्ती आहे असे मानतात.
१११
कीर्तनाची आवडी देवा । वैकुंठाहुनी घाली धावा नवल वैकुंठीच नसे । तो कीर्तनी नाचतसे । भोळ्या भावासाठी । धावे त्याच्या पाठोपाठी । आपुले सुख तया द्यावे । दु:ख आपण भोगावे । दीन-नाथ पतित-पावन । एका जनार्दनी वचन ।
भावार्थ:
दीनांचा नाथ, पतित-पावन अशा देवाला कीर्तनाची इतकी आवड आहे की तो कीर्तनासाठी वैकुंठाहून धावत येतो आणि नवल असे की, तो संताच्या मेळ्यात, कीर्तनाच्या रंगात रंगून नाचतो. भोळ्या भाविकांच्या भावासाठी देव त्यांच्यापाठोपाठ धावत येतो. त्यांचे दु:ख आपण भोगतो आणि त्यांच्या सुखाचा भागीदार बनतो. हे एका जनार्दनीचे वचन सार्थ आहे.
११२
नवल रोग पडिपाडु । गोड परमार्थ झाला कडु । विषय व्याधीचा उफाडा । हरि-कथेचा घेई काढा । ऐसा रोग देखोनि गाढा । एका जनार्दनी धावे पुढा ।
भावार्थ:
अंगामध्ये ताप असला की, जिभेची चव जाते आणि गोड पदार्थ कडु लागतात. तसेच इंद्रियविषयांचा मोहरुपी रोग जडला की, परमार्थ कडु वाटतो. हा रोग बळावला असता हरिकथेचा काढा घ्यावा आणि रोग विकोपाला गेला तर गुरुचरणांना शरण जावे असे एका जनार्दनी म्हणतात.
११३
हरि-कीर्तने चित्त शुध्द । जाय भेद निरसूनि । काम-क्रोध पळती दुरी । होत बोहरी महापापा । गजरे हरीचे कीर्तन । पशुपक्षी होती पावन । एका जनार्दनी उपाय । तरावया भव-नदीसी ।
भावार्थ:
हरिकीर्तनाने चित्त शुध्द होते. मी-तूपणाचा द्वैतभाव लयास जातो. काम-क्रोधरुपी शत्रु परागंदा होतात. महापापांची होळी होते. हरिकीर्तनाच्या गजराने पशुपक्षीसुध्दा पावन होतात. एका जनार्दनी म्हणतात, संसारसरिता तरून जाण्याचा हरिकीर्तन हा एकच उपाय आहे.
११४
करिता कीर्तन श्रवण । अंतर्मळाचे होत क्षालन । तुमचे कीर्तन पवित्र कथा । पावन होत श्रोता वक्ता । तुमचे कीर्तनी आनंद । गाता तरले ध्रुव प्रल्हाद । एका जनार्दनी कीर्तन । तिन्ही देव वंदिती रण ।
भावार्थ:
परमेश्वराचे कीर्तन म्हणजे त्याच्या पवित्र कथांचे श्रवण. या श्रवणभक्तीने अंत:करणातील वाईट भावनांचे निर्मूलन होते, कीर्तन करणारा आणि ऐकणारा दोघेही पावन होतात. भक्त प्रल्हाद आणि ध्रुव दोघेही कीर्तनभक्तीने मोक्षाप्रत गेले. एका जनार्दनी म्हणतात, ब्रह्माविष्णुमहेश हे तिन्ही देव कीर्तनकारांना वंदन करतात.
११५
तुमचे वर्णिता पोवाडे । कळिकाळ पाया पडे । तुमची वर्णिता बाळलीळा । ते तुज आवडे गोपाळा । तुमचें वर्णील हास्य-मुख । त्याचे छेदिसी संसार-दु:ख । तुमचे दृष्टीचे दर्शन । एका जनार्दनी ते ध्यान ।
भावार्थ:
देवाच्या कीर्तीचे गुणगान कळीकाळालासुध्दा वंदनीय आहे. आपल्या बाळलीळांचे वर्णन गोपाळकृष्णाला ऐकायला आवडते. देवाच्या हास्यमुखाचे वर्णन करणार्या भक्तांचे संसारदु:ख देव नाहीसे करतो. एका जनार्दनी म्हणतात, देवाच्या कृपादृष्टीचे मनाला ध्यान लागते.
११६
मागणे ते आम्ही मागु देवा । देई हेवा कीर्तनी । दुजा हेत नाही मनी । कीर्तनावाचूनि तुमचिया । प्रेमे हरिदास नाचत । कीर्तन होत गजरी । एका जनार्दनी कीर्तन । पावन होती चराचर जाण ।
भावार्थ:
हरिकीर्तनाच्या गजरात हरिदास जेव्हा आनंदाने नाचतात, तेव्हा सर्व चराचर सृष्टी पावन होते. या कीर्तनसुखाची मागणी एका जनार्दनी देवाकडे करतात. याशिवाय दुसरी कोणतीही मागणी नाही असे ते देवाला सांगतात.
N/A
References : N/A
Last Updated : August 29, 2025

TOP