भक्ताचा संकल्प
प्राकृतात ग्रंथरचना करण्याची ज्ञानेश्वरापासून चालत आलेली परंपरा नाथांनीही पुढे चालविली .
१८५ आम्हांसी तो पुरे विठ्ठ चि एक । वाउगा चि देख दुजा न मनीं ध्यान धरुं विठ्ठल करुं त्याचे कीर्तन । आणिक चिंतन नाही न ध्येय ध्याता ध्यान खुंटला पै शब्द । विठ्ठल उद्बोध सुख आ एका जनार्दनी विठ्ठल भरला । रिता ठाव उरला कोठें सांगा
भावार्थ भक्तांच्या मनांत एका विठ्ठला शिवाय दुसरी कोणतीही गोष्ट नाही. विठ्ठलाचे सतत ध्यान करावें त्याच्या कीर्तनात रमावें या शिवाय कशाचेही चिंतन एकनिष्ठ भक्त करीत नाही. ध्यानाची क्रिया, ध्यान करणारा आणि ज्याचे ध्यान करायचे तो विठ्ठल ही त्रिपुटी संपून भक्त देवाशी एकरूप होतो तेव्हां अणुरेणु सह सर्व विश्व एकाच परमात्मा तत्वाने व्यापले आहे, असा साक्षात्कार होऊन परमानंद होतो. असे एका जनार्दनी म्हणतात.
१८६ गाऊं तरी एक विठ्ठल चि गाऊन । ध्यान तरी विठ्ठल चि पाहून तरी एक विठ्ठल चा पाहून । आणिक न गोवूं वासना ही आठवून तो एक विठ्ठल आठवूं ।आणिक न सांठवूं हृदयामाजी एकाजनार्दनी जडला जिव्हारी । विठ्ठल चराचरी व्यापून ठेका
भावार्थ एका जनार्दनी म्हणतात, एकाग्रतेने ध्यान लावून विठ्ठलाची च मूर्ति पहावी. किर्तनांत विठ्ठलाचे च गुण गावेत. मनांत विठ्ठला शिवाय कोणतिही वासना नसावी. विठ्ठलाचे अखंड स्मरण करावें, हृदयात विठ्ठलाची मूर्ती सांठवून ठेवावी. चराचराला व्यापून राहिलेला विठ्ठल जिव्हारी बसला आहे.
१८७
तुमचे नाम-संकीर्तन । हें चि माझें संध्या-स्नान तुमच्या पायाचें वंदन । हें चि माझें अनुष्ठान तुमच्या पायाचा साक्षेप । हा चि माझा काळ-क्षेप तुमच्या प्रेमे आली निद्रा । ही च माझी ध्यान-मुद्रा एका जनार्दनी सार । ब्रह्म-रुप हा संसार
भावार्थ सद्गुरू जनार्दन स्वामींचे संकीर्तन हें च आपले संध्या-स्नान असून त्यांच्या चरणांचे वंदन हेच अनुष्ठान आहे. सद्गुरूंची चरण-सेवा हाच मनाचा विरंगुळा, स्वामींच्या नामस्मरणांत आलेली निद्रा हीच ध्यान-मुद्रा. हा सर्व संसार ब्रह्म-रुप आहे हे जाणून घेणे हे च परमार्थाचे सार आहे असे एका जनार्दनी सांगतात.
१८८
गातों एका ध्याती एका । अंतर्बाही पाहतों एका अगुणी एका सगुणी एका । गुणातीत पाहतो एका जनीं एका वनीं एका । निरंजनी देखो एका संतजना पडिये एका । जनार्दनी कडिये एका
भावार्थ एका जनार्दनी कीर्तनांत परमेश्वराचे गुण गातात, ध्यानमग्न होऊन अंतरंगांत आणि जन-वनांत परमात्म्याचे च दर्शन घेतात एका जनार्दनी देवाला सगुण, निर्गुण या दोन्ही स्वरुपात पाहतात तसेच सृष्टीतील गुणातित रुपही जाणतात. जनार्दन स्वामींच्या कृपा-प्रसादाने देवाचे निरंजन रूपांत एकाकार होतात.
१८९
चरणांची सेवा आवडी करीन । काया वाचा मन धरुनी जीवीं या परते साधन न करीं तुझी आण । हा चि परिपूर्ण नेम माझा एका जनार्दनी एकत्वें पाहीन । ह़दयीं ध्याईन जनार्दन
भावार्थ देह, मन वाचा एकाग्र करून गुरु-चरणांची सेवा अत्यंत आवडीने करीन. याशिवाय कोणतिही वेगळी साधना करणार नाही हाच एकमेव नेम निष्ठेने करीन असे एका जनार्दनी शपथ घेऊन सांगतात. हृदयांत सद्गुरूंचे निरंतर ध्यान करीत असताना अद्वैत-भक्तीचे आचरण करावे असे मत व्यक्त करतात.
१९०
जगदात्मा श्रीहरि आनंदे पूजीन । अंतरी करीन महोत्सव द्वैत विसरुनि करीन पाद-पूजा । तेणें गरुड-ध्वजा पंचामृत शुध्दोदक स्नान घालीन मानसीं । ज्ञाने स्वरूपासी परिमार्जन सत्व क्षीरोदक देवा नेसवीन । राजस प्रावरण पीतांबर दिव्य अलंकार तोडर सोज्वळ ।सहजस्थिति लेईलस्वामीमाझा भक्ति नवविधा घालुनी सिंहासन । एका जनार्दन पूजा करी
भावार्थ
अंत:करणामध्यें जगताचा आत्मा जो श्री हरी त्याचे आनंदाने पूजन करुन भक्तिचा सोहळा साजरा करीन असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, देव-भक्तातिल द्वैत विसरून एकात्मतेने चरणांची पूजा करीन ही अद्वैत भक्ती हे च ज्याचे वाहन गरूड आहे अशा श्री हरिच्या पूजेतिल पंचामृत होय. मनातील शुध्द भावना हे स्नानासाठी उदक तर ज्ञान रुपी चंदनाने श्री हरीला परिमार्जन करीन. सत्व गुणाचे धवल वस्त्र जगदिश्वराला नेसवून रजोगुणाचा पिवळा शेला पांघरायला देईन. सोज्वळ तोडर हा दिव्य अलंकार घालून नव-विधा भक्तीच्या सिंहासनावर श्री हरीची प्रतिस्थापना करुन षोडपचारे पूजा करीन असे एका जनार्दनी म्हणतात.
N/A
References : N/A
Last Updated : August 29, 2025

TOP