१
आजि वो कां हो कृष्ण नाहीं आला । म्हणोनि खेद करी गोळणी बाळा । काय हो ऐसा देहीं लागला चाळा । का रे ना येसी बाळा नंदाचिया ॥१॥ कवण देवा नवसीं नवसूं । कवणा गुरुतें मार्ग पुसून । कैं भेटेल हा हृषिकेशु म्हणोनि । मन जाहलें उदासू ॥२॥ आतां काय करुं यासी उपाय । एका जनार्दनी धरुं जाय पाय । तेंच दरुशन होय आजीं याचें ॥३॥
भावार्थ
नंदाचा बाळ श्रीहरीची वाट पाहाणार्या गोपिका खेद करीत आहेत. त्यांचे मन उदास झाले आहे. कोणत्या देवाला नवस करावा, कोणत्या गुरुचे मार्गदर्शन घ्यावे, कोणत्या उपायाने कृष्ण भेटेल याचा विचार करीत आहेत. एका जनार्दनी म्हणतात, संपूर्ण शरणागती पत्करून श्रीहरी चरणांशी लीन होणे हाच परमेश्वरप्राप्तीचा एकमेव मार्ग आहे.
२ कोण्या वियोगे गुंतला कवणे हाती । परा पश्यंती मध्यमा जया ध्याती । श्रुति शास्त्र जया भांडती । तो का हा रुसला श्रीपती ॥१॥ येई येई कान्हा देई आलिंगन । भेटी देऊन पुरवी मनोरथ पूर्ण । विरह विरहा करी समाधान । दावी तू आपुले चरण ॥२॥ येथे अपराध आमुचा नाही । खेळ सर्व तुझा पाही । एका जनार्दनी नवल काई । एकदा येऊनी भेटी देई ॥३॥
भावार्थ
परा-पश्यंती-मध्यमा या वाणी निरंतर ज्याचे ध्यान करतात, श्रुति आणि सहा शास्त्रे ज्याच्यासाठी वादविवाद करतात असा श्रीपती कोणी अडवला, तो का रुसला असा प्रश्न विचारून गोपी कान्हाने भेट देऊन त्यांचे मनोरथ पूर्ण करावे अशी विनवणी करीत आहेत. यात आपला काही अपराध नसून हा सर्व श्रीहरीचा खेळ आहे हे सांगण्यास गोपी विसरत नाही. एका जनार्दनी म्हणतात, अनन्य भक्तांसाठी श्रीकृष्ण धावून येवून भेट देतात यात नवल नाही.
३
नको नको रे दूर देशी । आम्हा ठेवी चरणापाशी । मग या विरहा कोण पुसी । ऐसी इच्छा देई आम्हांसी ॥१॥ पुरे पुरे संसार विरह छंद । तेणे तू अंतरसी गोविंद । द्वैताचा नसो देऊ बाध । ह्रदयी प्रगटोनी दावी बोध ॥२॥ विरह हरी सत्वर देवराया । परेपरता प्रगटोनी दावी पाया । दुजें मागणें आणिक नाहीं कान्हा । एका जनार्दनी शरण तुझिया पायां ॥३॥
भावार्थ
गोकुळीच्या गोपिका श्री कृष्णाला प्रार्थना करतात कीं, ह्या संसार छंदातून सुटका करावी कारण त्यामुळे गोविंद दुरावतो. श्रीहरीने अंतरांत प्रगट होऊन मनातिल द्वैत भावना दूर करावी. विरहव्यथा समूळ नाहिसी करून हरिचरणाशी ठाव द्यावा. एका जनार्दनी म्हणतात विरही गोपिकांप्रमाणे सर्व अनन्य भक्तांची हीच मागणी असते.
४
समचरणीं मन माझें वेधलें । तें वेगळें होतां विरह बोलें । हर्षामर्षा चित्त उन्मन ठेलें । म्हणोनि विरहिणी विरह बोले ॥१॥ सांवळिया कान्हया नको जाऊं दुरी । राहे परेपरता परतोनि हरी । पश्यंती मध्यमा मरुनी वैखरी । चारी वाचा तटस्थ जाहल्या हरी ॥२॥ तुझ्या वियोगाचा न व्हावा संग । अखंड नामीं असो अनुसंधान । शरण एका जनार्दन । काया वाचा मनें जाणोन ॥३॥
भावार्थ
या अभंगात एका जनार्दनी गोपिकांच्या विरहिणी च्या माध्यमातून आपली मनोव्यथा प्रगट करीत आहेत. विठ्ठलाच्या समचरणाशी एकाग्र झालेल्या मनाच्या हर्ष आणि विषाद या भावना विलयास जाऊन मनाचे उन्मन झाले. त्यां समचरणांचा विरह होतांच चित्त अस्वस्थ होते. वैखरी, मध्यमा, परा, पश्यंति या चारी वाणी तटस्थ होतात. श्रीहरिचा कधीहि वियोग होऊं नये, हरिनामाचे अखंड अनुसंधान राहावें , अशी प्रार्थना काया, वाचा, मनाने सद्गुरु चरणांशी शरणागत झालेले एका जनार्दनी करतात.
५
जन्म जन्मांतरीं विरहिणी । होती दुश्चित अंत:करणी । दु:ख सोशिलें होतें मागें जन्मीं । ये खेपे निरसलें स्थळ कारणीं ॥१॥ येऊनी भेटी देही देहातील । तयाचा विरह मजलागीं होत । मना समूळ मन पहात । तो भेटला गोपीनाथ ॥२॥ दु:ख फिटलें सुख जालें थोर । हर्षे आनंदें आनंद तुषार । एका जनार्दनी भेटला परात्पर । तेणें संसार विरह गेला निर्धार ॥३॥
भावार्थ
श्रीहरीचा अनेक जन्मांचा विरह विरहिणीने सहन केल्यानें तिचे चित्त दुश्चित झाले. मागील जन्मीं सोसलेल्या सर्व दु:खाचे या खेपेस निर्मूलन होईल. देहातीत परमात्मा येऊन भेट देईल, ज्याचा विरह सहन करावा लागला तो गोपीनाथ मनोमनीं भेटला. एका जनार्दनी सांगतात, विरही मनाचे सारे दु:ख मावळलें. अपार सुख झाले. आनंदाच्या तुषारांत मन न्हाऊन निघाले. परात्पर परमेशाची भेंट होऊन संसार विरह संपला.
६
काम क्रोध वैरी हे खेळ । लोभ अहंकार आशा बरळ । कर्म बळीवंत लागलें सबळ । तेणें वेधिलें आमुतें निखळ॥१॥ नको नको वियोग हरी । येईं येईं तूं झडकरी । आम्हा भेटें नको धरूं दुरी । वियोग झाला तो आवरीं ॥२॥ तुझिया भेटीचें आर्त मनीं । याकारणें विरह बोलणें वाणी । एका शरण जनार्दनी वियोग गेला पाहतां समचरणीं ॥३॥
भावार्थ
श्रीहरीचा वियोग झालेल्या गोपी कृष्णाला विनवितात कीं, त्याने लवकर येऊन हा वियोग संपवावा, काम, क्रोध हे वैरी असून लोभ, अहंकार आशा हे निरर्थक आहेत. कर्म अत्यंत बलवान असून त्याने वेढून टाकले आहे. परमात्म भेटीची तळमळ लागून राहिली आहे. एका जनार्दनी म्हणतात, विटेवरील विठ्ठलाच्या समचरणांचे दर्शंन होताच वियोगव्यथा संपून जाते.
७
विषय विरह गुंतलें संसारीं । तया जन्म जन्मांतरी फेरीं । कोणी न सोडवी निर्धारीं । यालागीं न गुंता संसारीं ॥१॥ मज सोडवा तुम्ही संतजन । या विषयविरहापासोन ॥ध्रु०॥ क्षणिक विषय संसार । भरला दिसे भवसागर । यांतुनी उतरीं पैलपार । संतसंग मिळलिया ॥२॥यासी शरण गेलिया वांचुनी । संतसंग न जोडे त्रिभुवनीं । शरण एकाभावें जनार्दनीं । विरह गेला समूळ निरसोनी ॥३॥
भावार्थ
संसारातिल विषय विरहांत गुंतून पडलेला जीवाची जन्म मरणाच्या फेर्यातून जन्म जन्मांतरी सुटका होत नाही. या साठी या संसार पासून निर्धाराने दूर राहिलें पाहिजे. हा भवसागर क्षणभंगूर असून तो पैलपार होण्यासाठी संतसज्जनांची संगती जोडावी असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, सद्गुरू कृपेशिवाय हा संतसंग त्रिभुवन शोधून मिळणार नाही. अन्यनपणे सद्गुरू जनार्दन स्वमींना शरण गेल्यानंतर श्रीहरीपदाचा विरह संपूर्ण निरसून गेला.
८
ऐशीं निर्धारें विरहिणी करीं । परेपरता देखेन श्रीहरी । मन पवन साधन न करीं । संतसंग घडलिया धन्य संसारीं ॥१॥ धन्य धन्य संतमहिमा । विरह गेला पावलें सुखधामा ॥ध्रु०॥ नामविरहित विरह तो कोण । विषय विरह थुंकीन मी जाण । नामाविंचुनी नेणें साधन । तो विरह न व्हावा पूर्ण ॥२॥ एका जनार्दनी सत्य वचन । विरहाविरह गेला मुळींहून । नाम जपतां स्थिर झालें मन । विरह गेला त्यागून ॥३॥
भावार्थ
मन पवनाचे कोणतीही साधना न करतां संत-संगतीनें परा वाणीच्या पलिकडे असलेल्या श्रीहरीचे दर्शन घेण्याचा निर्धार विरहिणी गोपी करते. श्रीहरिचे नामस्मरण हाच परमेश्वर प्राप्तीचा एकमेव मार्ग आहे, नामांत रंगलेल्या मनाला विरह जाणवत नाही. एका जनार्दनीचे हे सत्यवचन आहे, नामसाधना करतांना विरहिणीचा विरह समूळ नाश पावला. मन स्थिर झाले.
९
रात्रंदिवस मन रंजलें । हरिचरणी चित्त जडलें । विरहाचे दु:ख फिटलें । धन्य झालें संसारी ॥१॥ विरह गेला सुख झालें वो माय । पंढतोपुढती आनंद न समाये ॥ध्रु०॥ संतसंग घडला धन्य आजी । मोह ममता तुटली माझी । भ्रांती फिटोनि गेली सहजीं । विरह गेला सुख झालें सहजीं ॥२॥ धन्य धन्य संतसंगती । अवघी झाली विश्रांती । एका जनार्दनी चित्तीं । विरहभ्रांती निरसली॥३॥
भावार्थ
रात्रंदिवस मनाला श्रीहरीचा छंद जडला, हरिचरणांशी चित्त गुंतून गेलें. विरहाचे दु:ख सरून सुख झाले. संसार आनंदाने फुलला, संत-संगतीने मोह ममता विलयास गेली, चित्तावरील भ्रांतीचे पटल सहजपणे गळून पडले. विरहिणी गोपीचा संसार धन्य झाला. असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, संतांच्या संगतीने विरहभ्रांती निरसून चित्ताला पूर्ण विश्रांती मिळाली. असे संत धन्य होत.
१०
युगायुगीं पीडिली विरहिणी । नाठवी ध्यानीं मनीं चक्रपाणी । म्हणोनि वियोगाची जाचणी । तो भेटला संतसंग साजणी ॥१॥ विरह गेला सुख झालें अपार । जन्मोजन्मीची तुटे येरझारा वो ॥ध्रु०॥ घडतां संतसंग विश्रांती । तुटली माया पडळभ्रांति । भव संसार याची झाली शांती । संतमहिमा वर्णावा किती ॥२॥ महिमा वर्णितां विरहा फिटलें । एका जनार्दनी तया भेटलें । सुख अनुभवें अंतरीं दाटलें । विरहाचे बीज भाजिलें वो ॥३॥
भावार्थ
अनेक युगामध्ये विरहिणीने वियोगाची जाचणी सहन केली कारण ध्यानी मनी गोपीला चक्रपाणी श्रीधराचा विसर पडला. संतकृपेने साजणीचा विरह संपून अपार सुख झाले. जन्ममृत्युचे चक्र थांबलें. मायेचा पडदा दूर होऊन भवसंसाराची शांती झाली. एका जनार्दनी म्हणतात संतांचा महिमा वर्णन करताना शब्द अपुरे पडतात. अंतरांत सुखाचा अनुभव दाटून येतो. विरहाचे बीज भाजून निघाल्याने त्याला कधीच अंकूर फुटून ते फोफावत नाही.