मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत एकनाथांचे अभंग|

श्रीरामनाममहिमा

संत एकनाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे.




शिवाचे हृदयीं नांदसी श्रीरामा । काय वर्णू महिमा न कळे आगमानिगमा ॥१॥
वेदशास्त्रे मौनावलीं पुराणें भांबावलीं । श्रुति म्हणती नेति नेति शब्दें खुंटली ॥२॥
वाच्य वाचक जगन्नाथ स्वये शिवाचा आत्माराम । एका जनार्दनीं सुख तयांसी गातां निष्काम ॥३॥

भावार्थ

वाणीने ज्याचे सतत स्मरण करावे तो जगन्नाथ शिवशंकराचे ह्रदयांत नांदणारा श्रीराम असून तोच शिवाचा आत्माराम आहे. या आत्मारामाचा महिमा अगाध असून वेदशास्त्रे मौन होतात. पुराणे कोड्यांत पडतात. श्रुती या विश्वंभराचे वर्णन करतांना नि:शब्द होतात. एका जनार्दनीं म्हणतात, या जनार्दनाचे नाम गात असतांना अपार सुख मिळते आणि चित्त निष्काम होते.



मानवा रामनामीं भजें ।
तेणें तुझें कार्य होतें सहजें ॥१॥
अनुभव घेई अनुभव घेई ।
अनुभव घेई रामनामीं ॥२॥
शंकरादि तरले वाल्मिकादि उध्दरले ।
तें तूं वहिलें घेई रामनाम ॥३॥
एका जनार्दनीं नामाचा परिपाठीं ।
दोष पातकें पळती कोटी ४॥

भावार्थ

रामनामाच्या भजनाने वाल्याचा वाल्मिकी झाला , त्याचा उध्दार झाला. शिवशंकर रामाचे सतत चिंतन केल्याने तरुन गेले. कोणतेही कार्य सहज सफल होण्यासाठी मानवाने रामनाम भजावे या वचनाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, नामाचा परिपाठ ठेवल्याने माणसाचे अनेक दोष आणि कोटी पातकें पळून जातात.



कासयासी हटयोग धूम्रपान । घालुनी आसन चिंती वेगीं ॥१॥
सोपा रे मंत्र राम अक्षरे दोनीं । जपतां चुके आयणी चौर्यांशीची ॥२॥
मागें बहुतांचा उपदेश हाची । तरलें रामनामेंची पातकी जन ॥३॥
एका जनार्दनीं रामनाम ख्याती । जाहली पैं विश्रांति शंकरासी ॥४॥

भावार्थ

दोन अक्षरी रामनामाचा सोपा मंत्र असून त्याचा जप केल्याने चौर्यांशी लक्ष जन्म मरणाचे फेरे चुकतात. रामनामाने पातकी जन तरून जातात असा उपदेश पूर्वी अनेक ब्रह्मज्ञानी ऋषी, मुनीनी केला आहे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, समुद्र मंथनातून निघालेल्या विषाचा दाह संपवण्यासाठी शिवशंकरांनी रामनामाची मात्रा घेतली आणि विश्रांति मिळाली. हटयोग, धूम्रपान या सारख्या खडतर तपश्चर्या करण्यापेक्षा आसनावर बसून रामनाम जपणे हा सहजसोपा मार्ग आहे.



सुख रामनामें अपार । शंकर जाणें तो विचार ॥१॥
गणिका जाणें रामनाम । गजेंद्र उध्दरिला राम ॥२॥
शिळा मुक्त केली । रामनामें पदा गेलीं ॥३॥
तारिले वानर । रामनामें ते साचार ॥४॥
रामनामे ऐसी ख्याती । एका जनार्दनीं प्रीती ॥५॥

भावार्थ

रामनामांत अपार सुख आहे हे शिवशंकर जाणतात. याच रामनामाने गणिका संसार सागर तरुन गेली आणि गजेंद्राची संकटातून सुटका झाली आणि उध्दार झाला. अहिल्या शापातून मुक्त होऊन रामनामाने रामपदां गेली. रामनामाने अनेक वानर तरून गेले. रामनामाचा महिमा सांगतांना एका जनार्दनीं अशी अनेक उदाहरणे देतात.



श्रीराम जयराम वदतां वाचे । पातकें जाती कोटी जन्माची ॥१॥
जयजय राम जयजय राम । तुमचे नाम गाये शंकर उमा ॥२॥
नाम थोर तिहीं लोकीं साजे । उफराटे वदतां पातक नासले वाल्हयाचे ॥३॥
एका जनार्दनीं नाम साराचें सार । नामस्मरणें तुटे भवबंध येरझार ॥४॥

भावार्थ

श्रीरामाच्या नामाचा जयजयकार करून शंकर पार्वती रामनाम गातात. रामनामाचा उफराटा (मरा) उच्चार करूनही वाल्याचे महापातक नाहीसे होऊन तो वाल्मिकी या महान पदाला पोचला. रामनामाची थोरवी तिन्ही लोकी गाजते. एका जनार्दनीं म्हणतात, रामनाम सर्व साधनेचे सार असून कोटी जन्मांचे पाप नाहिसे करण्याचे सामर्थ्य नामांत आहे. भवबंधन तोडून जन्म मरणाच्या फेरा नामस्मरणाने चुकवतां येतो.



आणिकांचे नामें कोण हो तरला । ऐसें सांगा मला निवडोनी ॥१॥
या रामनामें पातकी पतीत । जीव असंख्यात उध्दरिले ॥२॥
जुनाट हा पंथ शिवाचे हे ध्येय । रामनाम गाणे स्मशानीं तो ॥३॥
गिरजेसी आवडी रामनामें गोडी । एका जनार्दनीं जोडी हेंचि आम्हां ॥४॥

भावार्थ

रामनामाने असंख्य पतित पातकी जीवांचा उध्दार होतो. रामनामाची ही ख्याती पूर्वीपार चालत असून शिवशंकर स्मशानात रामनामाचा जप करीत असे. शिवशंकराप्रमाणे गिरजेला सुध्दां रामनामाची अवीट गोडी वाटे. याच रामनामाचा छंद आपल्यालाही जडावा अशी प्रार्थना एका जनार्दनीं करतात.



रामना उच्चार होटीं । संसाराची होय तुटी ॥१॥
संसार तो समूळ जाय । राम उच्चारूनी पाहे ॥२॥
मागें अनुभवा आलें । गजेंद्रादि ऊध्दरिले ॥३॥
शिव ध्यातो मानसी । रामनाम अहर्निशीं ४॥
एका जनार्दनीं राम । पूर्ण परब्रह्म निष्काम ॥५॥

भावार्थ

मुखाने रामनामाचा जप म्हणजेच संसारसुखाविषयीं विन्मुखता. रामनामाच्या अखंडित जपाने गजेंद्राची प्राणसंकटातून सुटका झाली असा अनुभव आहे. राम हा परब्रह्म स्वरूप असून पूर्ण निष्काम आहे असे एका जनार्दनीं म्हणतात.



नाम उत्तम चांगले । त्रिभुवनीं तें मिरविलें ।
जे शंभूने धरिलें । निजमानसीं आदरें ॥१॥
धन्य मंत्र रामनाम । उच्चारितां होय सकाम ।
जन्म कर्म आणि धर्म । होय सुलभ प्राणिया ॥२॥
एका जनार्दनीं वाचे । ध्यान सदा श्रीरामाचे ।
कोटी तें यज्ञांचे । फळ तात्काळ जिव्हेसी ॥३॥

भावार्थ

रामनाम त्रिभुवनांत सर्वोत्तम मंत्र असून शिवशंकरांनी आदराने या मंत्राचा स्विकार केला आहे. रामनाम उच्चारताच सर्व कामना पूर्ण होऊन जीवनाचे सार्थक होते कारण रामनामाने जन्म, कर्म आणि धर्म यांचे आचरण करणे सुलभ होते. एका जनार्दनीं म्हणतात, वाचेने रामनाम, श्रीराममूर्तीचे सर्वकाळ ध्यान केल्याने कोटी यज्ञाचे फळ साधकाला तात्काळ प्राप्त होते.



शिव सांगे गिरजेप्रती । रामनामें उत्तम गती ॥१॥
असो अधम चांडाळ । नामें पावन होय कुळ ॥२॥
नाम सारांचे पैं सार । भवसिंधू उतरीं पार ३॥
नाम श्रेष्ठांचे पैं श्रेष्ठ । एका जनार्दनीं वरिष्ठ ॥४॥

भावार्थ

शिवशंकर गिरजेला सांगतात की रामनामानें जीवाला उत्तम गती मिळते. अत्यंत पापी चांडाळाचे कुळ पावन करण्याचे सामर्थ्य रामनामांत आहे. श्रेष्ठ साधकांचा हा अत्यंत श्रेष्ठ मंत्र असून भवसिंधू तरून नेणारी नौका आहे असे एका जनार्दनीं म्हणतात.

१०

अहर्निशीं ध्यान शंकर धरीं ज्याचें । तो श्रीराम वाचें कां रे नाठविसी ॥१॥
रामनाम म्हणतां तुटेल बंधन ॥होईल खंडन कर्माकर्मीं ॥२॥
रामनामें गणिका नेली मोक्षपदां । तुटली आपदा गर्भवास ॥३॥
रामनाम जप नित्य ती समाधीं । एका जनार्दनीं उपाधि तुटोनि गेली ॥४॥

भावार्थ

रात्रंदिवस शिवशंकर ज्याचे ध्यान करतात तो श्रीराम वाचेने निरंतर आठवावा. रामनामजपानें कर्म, अकर्माची बंधने तुटतिल. रामनामाने गणिका मोक्षपदाला पात्र झाली. अनेक भक्तांच्या संकटांचे निवारण झाले. एका जनार्दनीं म्हणतात, रामनामाचा जप म्हणजे नित्य समाधी अवस्था, ज्या अवस्थेत सर्व उपाधी संपून जातात.


References : N/A
Last Updated : April 02, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP