मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत एकनाथांचे अभंग|

वेणी-दाढीची ग्रंथी

संत एकनाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे.




गोकुळामाजीं कृष्णें नवल केलें । स्री आणि भ्रतारा विंदान दाविलें ॥१॥

खेळ मांडिला हो खेळ मांडिला । न कळे ब्रह्मादिका अगम्य त्याची लीळा वो ॥२॥

एके दिनीं गृहा गेले । चक्रपाणी बैसोनी ओसरी पाहे पाळतोनी लोणी ॥३॥

गौळणी आली घरां म्हणे शारंगपाणी । चोरीचे विंदान पाळती पाहसी मनीं ॥४॥

चोरी करावया जरी येसी सदनी । कृष्णा धरुनी तुझी शेंडी बांधीन खांबालागुनी ॥५॥

एका जनार्दनी ऐसें बोले व्रजबाळी । दाविलें लाघव ब्रह्मादिकां न कळे ते काळी ॥६॥

भावार्थ

एके दिवशी कृष्ण गौळणीच्या घरी जावून ओसरीत बसले तेथून लोण्याचे मडके कोठे बांधले आहे याचा अंदाज घेतला. गौळणीने शारंगपाणीच्या मनातिल हेतू जाणून हरीला ताकीद दिली कीं, चोरी करण्यासाठी घरांत आल्यास शेंडी खांबाला बांधली जाईल. एका जनार्दनी म्हणतात, त्या वेळी हरीने अशी लीला दाखवली कीं, ब्रह्मादी देवांना सुध्दां त्यातील रहस्य जाणतां आले नाही.



उठोनि मध्यरात्रीं तेथें आला सांवळा । सुखसेजे पहुडली देखे गोपी बाळा ॥१॥

पती आणि गौळणी एके सेजे पहुडली । बैसोनियां सेजे विपरीत करणी केली ॥२॥

धरूनी गोपी वेणी दाढी पतीची बांधली । न सुटे ब्रह्मादिका ऐशी गांठ दिधली ॥३॥

करुनी कारण आले आपुले मंदिरा । यशोदे म्हणे कृष्णा काय केलें सुंदरा ॥४॥

जाहला प्रात:काळ लगबग उठे कामिनी । वोढतसे दाढी जागा झाला ते क्षणीं ॥५॥

कां गे मातलीस दिली वेणी गांठी । एका जनार्दनी आण वाहे गोरटी ॥६॥

भावार्थ

मध्यरात्री पती सह गौळणी सुखसेजेवर झोपली असताना सावळा हरी तेथे आला. गोपीची वेणी, पतीची दाढी एकत्र बांधून ब्रह्मदिक देवांना सुध्दां सोडवता येणार नाही अशी गांठ दिली. हे काम करून श्रीहरी आपल्या मंदिरी परतले. प्रात:काळ होताच गोपी लगबगीने उठली, दाढी ओढली गेल्याने पतीदेव जागे झाले आणि संतापले. श्रीहरीच्या या विपरीत करणीचे वर्णन करून एका जनार्दनी सांगतात कीं, गौळणीने ही गोष्ट शपथेवर नाकारली.



उभयतां बैसोनि क्रोधे बोलती । कैशी जाहली करणी एकमेक रडती ॥१॥

गोदोहन राहिलें दिवस आला दुपारी । धाउनी शेजारी येती पहाती नवलपरी ॥२॥

शस्रे घेऊनिया ग्रंथी बळें कापिती । कापिताचि शस्रे न कांपे कल्पांतीं ॥३॥

घेऊनिया अग्नि लाविताती दाढी वेणी । न । जळेची वन्ही ऐशी केली कृष्णे करणी ॥४॥

ऐसा अनुभव लक्षावधि मिळाला । बोल बोलती बोला भलतेंचि बरळा ॥५॥

धांवुनिया नंदरायातें सांगती । एका जनार्दनीं नवल विपरित गती ॥६॥

भावार्थ

गौळण पतिसह संतापाने रुदन करीत असतां दुपार झाली. गाईंचे दूध काढायचे राहिले, शेजारी धावून आले, त्यांनी दाढी वेणीच्या गांठीचे नवल पाहिले. शस्रे घेऊन गांठ कापणे त्यांना जमेना, अग्नि लावून गांठ जाळण्याचा प्रयत्न केला पण ते ही जमेना, अग्नीच विझून गेला. अनेक लोकांनी हा चमत्कार बघितला. लोक तोंडाला येईल ते बोलू लागले. एका जनार्दनी म्हणतात, या विपरित करणीचे नवल नंदरायाला सांगण्यासाठी लोक राजमंदीराकडे धांवले.



नंदें आणविलें उभयतां राजबिंदी । गोवळे आणि गोवळी भोवतीं जनांची मांदी ॥१॥

येवोनि चावडीये उभयतां रडती । म्हणे नंदराव कैशी कामांची गती ॥२॥

अंकावरी बैसोनि सांवळा गदगदां हांसे । विंदान दाविलें तुज बांधिलें असे ॥३॥

आमुची तूं शेंडी काल बांधीन म्हणसी । न कळे देवाची माव देवें बांधिलें तुजसी ॥४॥

आतां माझी गती कैशी हरी ते सांगां । करुणाभरीत देखोनि गेलें लाघव वेगा ॥५॥

एका जनार्दनी रुणाकर मोक्षदानी । सहज दृष्टि पाहतां सुटली ग्रंथी दोनी ॥६॥

भावार्थ

नंदरायाच्या सेवकांनी गवळ्यासह गवळणीला चावडींत आणलें. ते दोघेही रडून आकांत करत असताना भोवतीं घरलोकांची गर्दी जमली. नंदरायाच्या मांडीवर बसून गदगदां हास्य करणारा सावळा हरी या विपरित करणीचे कारण व देवाचा न्याय स्पष्ट करतो. गौळण, गवळ्याचे दु:खित चेहरे बघून श्रीहरीचे मन दयेने भरले, त्याने लाघव करुन दोघांना मुक्त केले. एका जनार्दनी म्हणतात, करुणाकर, मोक्षदानी श्रीहरीने सहज दृष्टीने बघतांच वेणी दाढीची गांठ सुटली.



आल्हादयुक्त गोपिका आली आपुलें सदनीं । नंदासहित मोक्षदानी प्रवेशले भुवनी ॥१॥

म्हणे यशोदा बा कृष्णा न करी तूं खोडी । बोलती गोपिका वाईट त्या जगझोडी ॥२॥

एका जनार्दनी माझा अपराध नाहीं । जया जैसा भाव तया तोचि देहीं ॥३॥

भावार्थ

या प्रसंगानंतर गोपिका आपल्या घरीं आणि नंदासह श्री हरी राजभुवनी परतले तेव्हां कुष्णाने अशा खोड्या करु नयेत त्यामुळे गोपिका वाईट बोलतात असे यशोदेने स्पष्ट केले. एका जनार्दनी म्हणतात, यांत मोक्षदानी श्री हरीचा दोष नाही, ज्याच्या मनांत जसा भाव असेल त्याप्रमाणेच त्याला देव दिसतो.



घरोघरीं चोरी करितो हृषीकशी । गाऱ्हाणें सांगती येऊनी यशोदेसी ॥१॥

भली केली गोविंदा भली केली गोविंदा । निजभक्तांलागी दाखविसी लीला ॥२॥

कवाड उघडोनि शिंकें वो तोडिलें । दही दूध भक्षूनि ताक उलंडिलें ॥३॥

अंतर बाहेर मज व्यापियलें माया । एका जनार्दनी म्हणे न सोडी पाया ॥४॥

भावार्थ

गोपींच्या घरी जाऊन हृषीकेशी चोरी करतो, दार उघडून शिंके तोडून दही दूध खातो, ताकाचे भांडे लवंडून टाकतो. असे गाऱ्हाणे गोपी येऊन यशोदेला सांगतात. गोविंदाची ही करणी भक्तांना लीला दाखवण्यासाठी आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, भक्तांचे मन अंतर्बाह्य व्यापून टाकणार्‍या श्रीहरीचे चरण कधी सोडणार नाही.



एकमेक गौळणी करिती विचार । चोरी करी कान्हा नंदाचा कुमर ॥१॥

नायके वो बाई करुं गत काई । धरूं जातां पळून जातो न सांपडेचि बाई ॥२॥

दही दूध लोणी चोरी करूनियां खायें । पाहें जातां कवाड जैसें तैसें आहे ॥३॥

एका जनार्दनी न कळें लाघव तयाचें । न कळेचि ब्रह्मादिकां वेडावलें साचे ॥४॥

भावार्थ

गौळणी एकमेकींना भेटून विचार करतात नंदाचा कान्हा चोरी करून पळून जातो, धरायला गेलो तर सांपडत नाही. दही दूध लोणी चोरी करून खातो, नवल असे कीं, घराचे दार जसेच्या तसे बंद असते. एका जनार्दनी म्हणतात, श्रीहरीची ही लीला कुणालाच समजत नाही. ब्रह्मदिक देवांना सुध्दां ही माया कळत नाही.



मार्गी जातां विस्मय करीं । कैसे विंदान केलें नवल परीं ।

आम्ही अबला घालितो चोरी । श्रीहरी परापश्यंती वेगळा ॥१॥

नवल जाहलें काय सांगू माये । चोरी करितां धरिला पाहे ।

घरां घेऊनि जातां उभा आहे । न कळे विंदान सखे काय सांगू ॥२॥

एका जनार्दनी परिपूर्ण व्यापक सर्वांठायीं संपूर्ण ।

जनींवनीं जनार्दन । पाहतां महिमान न कळे ॥३॥

भावार्थ

श्रीहरीला चोरी करतांना धरले आणि यशोदेच्या घरी जाऊन पाहतां यशोदे जवळ कान्हा उभा आहे असे दिसले. ही काय जादू आहे हे गोपींना कळत नाही. हा काहीतरी चमत्कार आहे असे त्यांना वाटते. एका जनार्दनी म्हणतात, अबलांच्या घरी चोरी करणारा श्रीहरी परा आणि पश्यंती या वाणींच्या पलिकडे आहे परमेशाने हा अवतार धारण केला असून तो विश्वव्यापक, सर्वांठायी जनींवनीं पूर्णात्वाने भरून राहिला आहे.



यशोदेसी गौळणी सांगती गाऱ्हाणें । नट नाटक कपटी

सांभाळ आपुलें तान्हें । किती खोडीं याच्या सांगूं तुजकारणें ॥१॥

सहस्रमुख लाजला । निवांतचि ठेला ।

वेद परतला । गाती अनुछंदे ।

वेध लाविला गोविंदें । परमानंदें आनंदकंदें ॥ध्रु०॥

एके दिवशीं मी गेले यमुनातट जीवना । गाई गोप सांगाते घेऊनि आला कान्हा ।

करीं धरीं पदरा न सोडी तो जाणा । एकांत घातलीं मिठी ।

न सुटे गांठीं पाहिला दृष्टी । नित्य आनंदु । वेध लाविला ॥३॥

किती खोडी याच्या सांगु तुज साजणी । गुण यांचे लिहितां न पुरे मेदिनी ।

रूप सुंदर पाहतां न पुरे नयनीं । एका जनार्दनी देखिला ।

ध्यानीं धरिला । मनीं बैसला । सच्चिदानंद । वेध लाविला.

भावार्थ

श्रीहरी अतिशय नाटकी, कपटी असून तो नाना प्रकारे खोड्या काढतो, हजारमुखे असलेला शेष सुध्दां श्रीहरीचा महिमा वर्णन करुं शकला नाही, वेदवाणीही मुक झाली. परमानंद आनंदकंद गोविंदाने मनाला वेध लावले आहे. यमुना किनारी पाणी भरण्यासाठी गेले असतां गोपांसंगे गाई घेऊन कान्हा तेथें येवून एकांतात पदर धरुन घट्ट मिठी घालतो, जी सोडवतां येत नाही. केवळ दृष्टीने आनंदाचा वर्षाव करतो असे सांगून गोपी म्हणते, श्रीहरीच्या गुणांचे वर्णन करायचे ठरवले तर संपूर्ण पृथ्वी देखील अपुरी पडेल. हरीचे सुंदर रुप डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी नयन अपुरे पडतात, एका जनार्दनी म्हणतात, हा सच्चिदानंद श्री हरी डोळ्यांनी पाहिला, मनामध्ये रूतून बसला, ध्यानी, मनी वेध लागला.

१०

हासोनिया राधा बोले यशोदेसी । पहा वो हा चोर बोले विश्वासी ॥१॥

आण वाहतसे लाटकीची मामिसें । याचिया वचनीं सर्वास विश्वासे ॥२॥

खोडी न करी ऐशी वाहे तूं आण । गोरसांवांचुनि न करीं तुझी आण ॥३॥

एका जनार्दनी बोले विनोद वाणी । यशोदेसह हांसती गौळणी ॥४॥

भावार्थ

कान्हा नांवाचा चोर अत्यंत विश्वासाने बोलतो, कांहीतरी सबबी सांगून खोट्या शपथा घेतो असे असुनही याच्या शब्दावर सर्वांचा विश्वास बसतो. खोडी करणार नाही अशी शपथ घ्यायला सांगतांच गोरसाशिवाय शपथ घेणार नाही (गोरसाशिवाय दुसरी चोरी करणार नाही)असे म्हणतो असे राधा यशोदेला सांगून हसते. एका जनार्दनी म्हणतात, कान्हाच्या या गर्भितार्थी विनोद वाणीवर यशोदेसह सर्व गौळणी हांसतात.

११

मिळोनि अबला बैसली परसद्वारीं । येरेयेरे कृष्णा म्हणोनि वाहाती व्रजनारी ॥१॥

ऐशा लांचावल्या नंदनंदना । घरींच बैसती लक्ष लावीत कान्हा ॥२॥

वेदश्रृतीसी । न कळे जयांची शुध्दी । तो नवनीत खावया लाहे । लाहे घरामधीं ॥३॥

एका जनार्दनी ब्रह्म परिपूर्ण । तेणे वेधें वेधिलें आमुचे मनाचें मन ॥४॥

भावार्थ

गोकुळातील सगळ्या गोपिका मिळून परसद्वारीं बसतात आणि कृष्णाला बोलावतात, कृष्णाच्या (नंदनंदन) भेटीच्या लालसेने घरीच बसून असतांना त्यांचे सारे लक्ष कृष्णाकडे लागलेलें असते. वेदश्रुतींना देखील ज्याचा ठाव लागत नाही तो कान्हा लोणी खाण्यासाठी घरांत शिरतो. एका जनार्दनी म्हणतात, परिपूर्ण ब्रह्मरुपाने अवतरलेल्या श्री कृष्णाने सर्वांच्या अंतरंगाला वेध लावले आहेत.

१२

मार्गी जातां विस्मय करी । कैसें विंदान केले नवल परी ।

आम्हीं अबला घालितो चोरी । श्रीहरी परापश्यंती वेगळा ॥१॥

नवल जाहलें काय सांगू माये । चोरी करितां धरिला पाहे ।

घरां घेऊनि जातां उभा आहे । न कळे विंदान सये काय सांगू ॥२॥

एका जनार्दनी परिपूर्ण व्यापक सर्वांठायीं संपूर्ण । जनींवनीं जनार्दन ।

पाहतां महिमान न कळे ॥३॥

भावार्थ

रस्त्याने जातांना विस्मयचकित झालेल्या गोपी श्रीहरीने दाखवलेल्या चमत्कारा विषयी विचार करतात, चोरी करताना पकडलेल्या कान्हाला यशोदेकडे नेले तव्हां तो यशोदा जवळ उभा असलेला दिसतो. श्री हरीच्या लीलांचे रहस्य अगम्य असून तो परापश्यंती वाणीच्या पलिकडे आहे. एका जनार्दनी म्हणतात, परब्रह्मरुपी परमात्मा सर्वांच्या अंत:करणांत वसत असून व्यापक असून परिपूर्ण आहे. जनींवनीं दिसणार्या या जनार्दनाचा महिमा बुध्दीला आकलन होत नाही.

१३

आम्ही असता माजघरी । रात्र झाली दोन प्रहरी ।

मी असता पतिशेजारी । अवचित हरी तुझा आला ॥१॥

काय सांगू सखये बाई । वेदशास्त्रा अगम्य पाही ।

आगमानिगमा न कळे कांही । मन पवन पांगुळले गे बाई ॥२॥

आम्ही असतां निदसुरी । मुंगुस घेऊनी आपुले करी ।

सोडियेले दोघा माझारी । तंव ते बोचकरी आम्हांते ॥३॥

आम्ही भ्यालो उभयतां । चीर फिटलें बाई तत्वता ।

नग्नचि जाहले मी सर्वथा । भूतभूत म्हणोनि भ्याले ॥४॥

ऐसे करूनि आपण पळाला । जाउनि माये आड लपला ।

एका जनार्दनी म्हणे भला । आता सापडता न सोडी त्याला ॥५॥

भावार्थ

गोकुळीची एक गोपी तिचे गाऱ्हाणे सखीला सांगतांना म्हणते, रात्रीच्या दोन प्रहरी माजघरात पतीसह शयन केले असतांना वेदशास्त्रांना अगम्य असणारा श्रीहरी हातात मुंगुस घेऊन घरात शिरला आणि दोघांमध्ये मुंगुस सोडले. त्या मुंगसाने बोचकारून हैराण केले, अंगावरची वस्त्रे फाडली. दोघे भयाने गर्भगळीत झाले. ही खोडी काढून कान्हा घरी जाऊन आईमागे लपला. एका जनार्दनी म्हणतात, हे सावळे परब्रह्म हाती सापडल्यास मोकळे सोडणार नाही.

१४

गौळणी बारा सोळा । होउनी येके ठायी मेळा ।

म्हणती गे कृष्णाला । धरु आजी ॥५३॥

कवाड लाउनी । बैसल्या सकळजणी ।

रात्र होतांचि माध्यानीं । आला कृष्ण ॥२॥

दहीं दूध तूप लोणी । यांची भाजनें आणुनी ।

रितीं केलीं तत्क्षणीं । परी तयां न कळे ॥३॥

थोर लाघव दाविलें । सकळां निद्रेनें व्यापिलें ।

द्वार तें नाहीं उघडिलें । जैसें तैसेंचि ॥४॥

खाउनी सकळ । मुखा लाविलें कवळ ।

आपण तात्काळ । पळे बाहेरी ॥५॥

एका जनार्दनी । ऐशी करूनी करणी ।

यशोदे जवळी येउनी । वोसंगा बैसे ॥६॥

भावार्थ

बारा ते सोळा गौळणी एकत्र जमून कृष्णाला चोरी करतांना पकडण्याचा विचार करतात. दार बंद करून दबा धरून बसतात. मध्य रात्रीं श्री कृष्ण आपले लाघव दाखवतो, दार न उघडता घरांत शिरतो, चमत्कार करून सर्वांना निद्राधीन करतो. दही, दूध तूप, लोणी यांची मडकी आणून सर्व काही खाऊन फस्त करतो. कुणालाही न कळत मडकी रिकामी करून पळ काढतो. यशोदे जवळ साळसूदपणे येऊन बसतो, असे एका जनार्दनी या अभंगात कथन करतात.
यशोदा राधा संवाद

१५

नानापरी समजाविलें न परी राहे श्रीहरी । दहीभात कालवोनी दिला वेगीं झडकरीं ।

कडेवरी घेऊनिया फिरलें मी द्वारोद्वारी॥१॥

राधे राधे राधे राधे घेई श्यामसुंदरा । नेई आतां झडकरीं आपुलिया मंदिरा ॥ध्रु० ॥

क्षणभरी घरी असतां करी खोडी शारंगपाणी । खेळावया बाहेरी जातां आळ घेती गौळणी ।

थापटोनि निजवितां पळोनि जातो राजद्वारा ॥२॥

राधा घेऊनि हरिला त्वरें जात मंदिरीं । हृदयमंचकी पहुडविला श्रीहरी ।

एका जनार्दनी हरीला भगी राधा सुंदरा ॥३॥

भावार्थ

यशोदा राधेला सांगते, श्रीहरीला दही भात कालवून दिला, कडेवर घेऊन दारोदारीं फिरले. अनेक प्रकारे त्याला समजावले. घरांत क्षणभर सुध्दां खोड्या केल्याशिवाय राहात नाही. खेळायला बाहेर गेला कीं, गौळणी गाऱ्हाणी घेऊन येतात. थापटून झोपवण्याचा प्रयत्न केला तर राजद्वारीं पळून जातो. राधा हरीला घेऊन घाईघाईने घरी येते. अत्यंत प्रेमाने त्याला मंचकावर झोपवतें. एका जनार्दनी म्हणतात, प्रेमरुप भक्तिभावाने राधिका श्रीहरीला आपलेसे करते.

१६

करूं देईना मज दूध तूप बाई । मथितां दधि तो धरीं रवी ठायीं ठायीं ।

हट्टे हा कदापि नुमजे समजाविल्यास काई । समजावुनी यातें तुझ्या घरांत नेई नेई ॥१॥

राधे हा मुकुंद कडिये उचलोनि घेई घेई । रडतांना राहिना करुं यांस गत काई काई ॥ध्रु०॥

हरिसी आनंदे राधा मृदु मृदु बोलविते । पाळण्यांत तुला कृष्णा निजवोनी हालवितें ।

गृहा नेऊनियां दहीं भात कालवितें । यशोदेसी सोडी कान्हा माझ्याजवळी येई येई ॥२॥

हट्ट मोठा घेतो मला छळितो गे राधे पाहाणें । असाच हा नित्य राधे हरिघरा नेत जाणें ।

उगाचि हा निश्चळ कैसा राहे त्वां समजावल्याने । तुझी धरितें हनुवटी यासी गृहा नेई नेई ॥३॥

गोविंदा गोपाळा कृष्णा मुकुंदा शेषशाई । जगज्जीवना गोकुळभुषणा गोपी भुलवणा बाई ।

उगा नको रडूं कृष्णा यशोदेसी सोडीं तूंही । एका जनार्दनी शरण राधे घेऊनी यासी जाई जाई ॥४॥

भावार्थ'

दही घुसळत असतांना कान्हा परत परत रवी धरुन ठेवतो, कितिही समजावले तरी त्याला समजत नाही. या कान्हाला कडेवर उचलून घरी घेऊन जाण्यास यशोदा राधेला सांगते. राधा आनंदाने हरीला हळुवार पणे बोलवतें, पाळण्यांत निजवून झोके देण्याचे, दही भात कालवून देण्याचे, अमिष दाखवते. यशोदेला सोडून येण्यासाठी कान्हाची विनवणी करते. तेव्हां हरि निश्चळ होतो. एका जनार्दनी म्हणतात, शेषशाई भगवान गोकुळाचे भुषण बनून गोविंद, गोपाळ, कृष्ण, मुकुंद ही नावे धारण करून गोकुळीच्या गवळणींना भुलवतो.

१७

एके दिवशीं शारंगपाणीं । खेळत असतां राजभुवनीं ।

तेव्हां देखिलीं नयनीं । गौळणी ते राधिका ॥१॥

मीस करुनी पाणीयाचें । राधा आली तेथें साचें ।

मुख पहावया कृष्णाचें । आवड मोठी ॥२॥

देव उचलोनि घेतला । चुंबन देउनि आलंगिला ।

सुख संतोष जाहला । राधेलागीं ॥३॥

यशोदा म्हणे राधिकेसी । क्षणभरी नेई गे कृष्णासी ।

कडे घेउनी वेगेसीं आणिला घरा ॥४॥

हृदयमंचकी बैसविला । एकांत समय देखिला ।

हळूच म्हणे कृष्णाला । लहान असशी ॥५॥

कृष्ण म्हणे राधिकेसी । मंत्र आहे मजपाशीं ।

थोर होतों निश्चयेंसी । पाहें या आतां ॥६॥

वैकुंठीचा मनमोहन । सर्व जगाचे जीवन ।

एका जनार्दनी विंदान । लाघव दावीं ॥७॥

भावार्थ

एके दिवशी श्रीकृष्ण (शारंगपाणी) राजवाड्यांत खेळत असतांना गौळण राधिकेने पाहिला. कृष्णाला बघण्यासाठी पाणी आणण्याचे निमित्त करून राधा गौळण तेथें गेली. कृष्णाला उचलून घेऊन आलिंगन देऊन चुंबन घेतले आणि सुख-संतोष पावली. यशोदेने राधिकेला कृष्णाला तिच्या घरी घेऊन जाण्यास सांगितले आणि राधा कान्हाला घेऊन घरी आली. एकांतात लहान आहेस असे राधिकेने कृष्णाला सांगताच आपल्याकडे थोर होण्याचा मंत्र आहे असे कृष्णाने स्पष्ट केले. एका जनार्दनी म्हणतात, मनमोहन, जगत् जीवन, वैकुंठीचा राणा आपले लिला लाघव जगाला दाखवत आहे.

१८

हर्ष न माये अंबरीं । येऊनियां झडकरी ।

द्वार उघडी निर्भरी । आनंदमय ॥१॥

वृध्दा येऊनियां पाहें । उचलोनि लवलाहे ।

मुख चुंबिलें तें पाहे । कृष्णाचें देखा ॥२॥

मोहिलें वृध्देचें मन । नाठवे आपपर जाण ।

लाघवी तो नारायण । करूनियां अकर्ता ॥३॥

दोहीं करें उचलिला । राधिकेजवळीं तो दिला ।

म्हणे राधेसी ते वेळां । यासी नित्य आणी ॥४॥

तुज न गमे एकटी । आणित जाई जगजेठी ।

एका जनार्दनीचे भेटी । रे कांहीं विकल्प ॥५॥

भावार्थ

राधा गौळण हरीला घेऊन घरी येतांच वृध्देने दार उघडून बघितले आणि कृष्ण दर्शनाने झालेला आनंद गगनांत मावेनासा झाला, घाईघाईने कृष्णाला उचलून तिने त्याचे चुंबन घेतांच तिचे मन मोहरलें, मनातला आपपर भाव क्षणांत मावळला. कान्हाला राधेकडे देवून तिने सांगितले एकटेपणा घालवण्यासाठी याला नेहमी घरी आणावे. एका जनार्दनी म्हणतात, हा जगजेठी श्री कृष्ण अत्यंत मायावी, लाघवी असून सर्व कांही करूनही अकर्ता आहे, मनातले सगळे विकल्प नाहीसे करणारा आहे.

१९

निमासुर वदन । शंखचक्रांकित भूषण ।

शोभतसे राजीवनयन । राधेजवळी ॥१॥

नवल मांडिलें विंदान । वेदां न कळे महिमान ।

वेडावली दरुशनें । न कळे तयां ॥२॥

रत्नजडित पर्यंकी । पहुडले हर्ष सुखे ।

नवल जाहलें तें ऐकीं । सासू आली घरा ॥३॥

वृद्धा म्हणे राधेसीं । दार उघड वेगेंशीं ।

गुह्य गोष्टी बोलसी । कवणाशीं आंत ॥४॥

राधा म्हणे मामिसे । गृहामध्यें कृष्ण असे ।

मज गमावया सरिसें ।आणिला घरीं ॥५॥

क्षणभरीं स्थिर रहा । भाले पायीं आंत न या ।

भोजन जाहलिया । उघडिलें द्वार ॥६॥

म्हणे कृष्णा आतां कैसें । द्वारी वृध्दा बैसलिसे ।

लज्जा जात अनायासें उभयतांसी ॥७॥

कृष्ण म्हणे राधेसी । मंत्र नाठवें मजसी ।

काय उपाय गोष्टीसी । सांगे तूं मज ॥८॥

नेणो कैसी पडली भुलीं । मंत्र चळला यां वेळीं ।

ऐकोनी राधा घाबरली । दीनवदन ॥९॥

करुणा वचनें बोले राधा । विनोद नोहे हा गोविंदा ।

माझी होईल आपदा । जगामाजी ॥१०॥

भक्त वत्सल मनमोहन । शरण एका जनार्दन ।

ऐकोनी राधेचें वचन । सान जाहला ॥११॥

भावार्थ

कमला सारखे नयन, सुंदर मुखचंद्रमा, हातामध्यें शंख, चक्र धारण केलेला श्रीहरी राधे समीप रत्नजडित मंचकावर आनंदांत सुखाने पहुडला असतांना विस्मयकारक गोष्ट घडली. राधेची सासु घरी येऊन दार उघडायला सांगते. घरांत कृष्ण असून भोजनाला बसला आहे तेव्हां थोडा वेळ थांबा, बाहेरच्या पावलांनी आंत येऊं नका असे राधा सासुला विनविते. दारांत वृध्द सासु बसली असून दोघांना ही गोष्ट लज्जास्पद आहे असे ती कृष्णाला सांगते. आतां आपण मंत्र विसरलो असून कसा विसर पडला हे सांगता येत नाही असे कृष्णाने सांगताच राधा अतिशय घाबरली. लोकांत आपली निंदा नालस्ती होईल या विचाराने दीन वदनाने ती कृष्णाची करुणा भाकते. एका जनार्दन म्हणतात, शरणागत झालेल्या राधेची शोकमग्न अवस्था पाहून भक्तवत्सल श्रीहरी परत सानरुप धारण करतो.

२०

मथुरेसी गोरस विकूं जातां नितंबिनी । तयामाजीं देखिली राधिका गौळणी ।

जवळीं जाऊनियां धरिली तिची वेणी ॥१॥

सोडीं सोडीं कान्हा शारंगपाणी । माझीया संसारा घातिलें पाणी ।

नांव रूप माझे बुडविलें जनीं । राधा म्हणे येथुनियां बहु चाट होसी ।

घरीं चोरीबकरूनिया वाट आडविसी । ओढोनिया नेते आतां तुज मातेपाशीं ॥३॥

धरिलीं पदरीं राधा न सोडीच निरी । दान दे आमुचे म्हणे मुरारी ।

भोवतालीं हांसती व्रज सुंदरीं ॥४॥

भक्तीचियां पोटीं राधा समरस जाली । कृष्णरुप पाहूनियां देहभावा विसरली ।

एका जनार्दनी राधा शेजें पहुडली ॥५॥

भावार्थ

गोकुळीच्या गौळणी दूध विकण्यसाठी मथुरेला जाण्यासाठी निघाल्या असतां कान्हाने राधिकेला पाहिले. जवळ जाऊन तिची वेणी धरली. घरांत चोरी करून वाट आडवणार्या लोकांमध्ये नाव रुपाला काळिमा लावणार्‍या शारंगपाणीला ओढून यशोदा कडे नेते अशी धमकी राधेने दिली असतां कान्हा साडीचा पदर पकडून आपले गोरसाचे दान मागू लागला. हे पाहून बाकीच्या गौळणी हसू लागल्या. एका जनार्दनीं म्हणतात, भक्तीप्रेमाने राधा देहभान विसरून श्रीहरीशी समरस झाली.

२१

फणस जंबीर कर्दळी दाटा । हातीं घेऊनी नारंगी फाटा॥१॥

वारियानें कुंडल हाले । डोळे मोडीत राधा चाले ॥२॥

राधा पाहून भरले हरी । बैल दुभे नंदाघरीं ॥३॥

हरी पाहुनि भुलली चित्ता । राधा घुसळी डेरा रिता ॥४॥

मन मिनलेसें मना । एका भुलला जनार्दना ॥५॥

भावार्थ

फणस, डाळिंब कर्दळी यांचा लाकुडफांटा घैऊन मार्गीं चाललेल्या राधेच्या कानातील कुंडल वार्‍याने हालत आहेत आणि कावरी बावरी नजर कान्हाला शोधत आहे असे वर्णन करून या अभंगात एका जनार्दनी म्हणतात, राधेला पाहून भुललेले श्रीहरी नंदाघरी बैलाचे दूध काढतात तर हरीला पाहून भुललेली राधा रिकामा डेरा घुसळते. भक्तीरसांत मने समरस होतात.

२२

आल्या पांच गौळणी पांच रंगाचे शृंगार करूनी ॥ध्रु० ॥

पहिली गौळण रंग सफेद । जशी चंद्राची ज्योत ।

गगनीं चांदणी लखलखित । ऐका तिची मात ।

मंथन करीत होती दारांत । धरून कृष्णाचा हात ।

ऐशा आल्या पांच गौळणी ॥१॥

दुसरी गौळण साधीभोळी । रंग हळदीहुनि पिवळी ।

पिवळा पितांबर नेसून आली । अंगी बुटेदार चोळी ।

एक लहान तनु उमर कवळी । जशी चांफ्यांची कळी ।

ऐशा आल्या पांच गवळणी ॥२॥

तिसरी गौळणी रंग काळा । नेसून चंद्रकळा ।

काळे काजळ लेऊन डोळा । रंग तिचा सांवळा ।

काळीं गरसोळी लेऊन गळां । आली राजस बाळा ।

ऐशा आल्या पांच गौळणी ॥३॥

चवथी गौळण रंग लाल । लाल लालही लाल ।

कपाळीं कुंकुम चिरी लाल । भांगीं भरून गुलाल ।

मुखी विडा रंग लाल । जसे डाळिंबांचे फूल ।

ऐशा आल्या पांच गौळणी ॥४॥

पांचवी गौळण हिरवा रंग । अवघ्या झाल्या दंग ।

हिरव्या कांकणांचा पहा रंग । जसे आरशीत जडलें भिंग ।

फुगडी खेळतां कृष्णासंग । एकनाथ अभंग ।

ऐशा आल्या पांच गौळणी ॥५॥

भावार्थ

या अभंगांत संत एकनाथ पांच रंगाचा शृंगार करून आलेल्या पांच गवळणींचे प्रत्ययकारी वर्णन करतात. पहिली गौळण सफेद रंगाचा साज चढवून आली असून आकाशातील चमकदार चांदणी प्रमाणे शोभून दिसते. चंद्राच्या प्रकाशांत न्हाऊन निघाल्या सारखी ही गौळण दारात उभी राहून कृष्णाचा हात धरून दह्याचा डेरा घुसळीत आहे. दुसरी गौळण साधीभोळी असून हळदी सारखी पिवळ्या रंगाची असून पिवळा पितांबर नेसून आली असून अंगांत बुट्टेदार चोळी घातली आहे. तिसरी कोवळ्या वयातील सुबक, सुंदर लहान बांधा चाफेकळी सारखा चंद्रकळा नेसलेली , सांवळ्या रंगाची असून तिने डोळ्यांत काजळ घातले असून गळ्यांत काळी गरसोळी शोभून दिसते आहे आहे. चवथी गौळण लाल शृंगार लेऊन आली आहे. भागामध्ये लाल गुलाल, कपाळावर लाल कुंकुम टिळा, तोंडात लाल विडा, डाळिंबाच्या फुलासारखी. पांचवी गौळण, हिरवा साज चढवला असून करांत हिरवी कांकण (बांगड्या) घालून कृष्णा बरोबर फुगडी खेळते.

२३

देखे देखे गे जशोदा मायछे । तोरे छोरीयानें मुजें गारी देवछे ॥१॥

जमूनाके पानीयां मे जावछे । बीच मीलके घागरीया फोडछे ॥२॥

मैनें जाके हात पकरछे । देखे आपही रोवछे मायना ॥३॥

एका जनार्दन गुन गावछे । फेर जन्म नही आवछे मायना ॥४॥

भावार्थ

गोकुळातील एक गवळण यशोदेला कान्हाचे गाह्राणे सांगते. गौळण यमुनेवर पाणी आणण्यासाठी गेली असतां कान्हाने सवंगडी जमवून घागर फोडली. गौळणीने कान्हाचे हात पकडले. कांगावा करुन कान्हा आपणच रडू लागला. एका जनार्दन श्री हरीचे गुण वर्णन करतांना म्हणतात, श्रीहरी जन्म मरणाच्या फेर्‍यातून सुटका करणारे परमात्मा आहेत.

२४

माई मोरे घर आयो शामछे । गावढी छोडी मोरे मनछे ॥१॥

दधी दूध माखन चुरावें हमछे । छोकरीया खालावत देवछे ॥२॥

मारी सुसोवन लगाछे । बालन उनके पकड लीनछे ॥३॥

एका जनार्दन थारो छोडछे । वेड लगाये माई हमछे ॥४॥

भावार्थ

एक गौळण कान्हाची तक्रार करते कीं, संध्याकाळी श्यामने गोठ्यांत दावणीला बांधलेली गाय सोडून दिली. घरातील दही, दूध, लोणी चोरून नेऊन बालगोपाळांना खाऊं घातले. सुनेने प्रतिकार केला तेंव्हा तिचे केस पकडले. एका जनार्दन म्हणतात, यशोदेच्या कान्हाने सर्वांना वेड लावून सतावून सोडलं.

२५

हो भलो तुम नंदन लालछे । गांवढी बतावछे ॥१॥

आगल पिछिल ध्यानमें आवछे । मंगल नाम तोरा मे गावछे ॥२॥

तारो सुंदर रूप मोरे मनछे । प्रीत लगी कान्हा हमसे ॥३॥

एका जनार्दनी तोरे नामछे गावत घ्यावत हृदयमेछे ॥४॥

भावार्थ

गोकुळीची गौळण सांगते, नंदलाल नंदाचा लाडला असून त्याचे मंगलमय नाम आणि सुंदर रूप मनामध्ये ठसले आहे, सर्वांना त्याने भक्तीप्रेमानें जिंकले आहे. वारंवार मनाला त्याचे ध्यान लागते. एका जनार्दन सतत श्री हरीचे नामस्मरण करतात, हृदयात ध्यान लावतात.

२६

मारी गावडी चुकलीसे भाई । देखन देखन त्रिभुवनसे आई ।

उन शोधन लागछे भाई । अब कैसी गत करूछे आई ॥१॥

मथुरा लमानीन मारो नामछे । गावढी देखत आई गांवछे ।

दृष्टी देखन नहीं मनछे । कैसे भुलाय कन्हयानछे ॥२॥

भूली भूली जाई मानछे । कहीं मिलन मोरे ध्यानछे ।

एका जनार्दनसे पगछे । अखंड चित्त जडो गावढीसे ॥३॥

भावार्थ

लमानी नावाची मथुरेची गौळण वाट चुकलेल्या आपल्या गाईला त्रिभुवनांत शोधून आली असून कन्हैयाला पाहून भुलून गेली. आपले मनच हरवून बसली. कन्हैया ने आपल्याला ध्यांनात दर्शन द्यावे अशी ती प्रार्थना करते. एका जनार्दनी म्हणतात, कन्हैयाच्या चरणकमलाशी अखंड चित्त जडावें.

२७

दिसे सगुण परि निर्गुण । आगमां निगमां न कळे महिमान ।

परा पश्यंती खुंटलीया जाण । त्याचें न कळे शिवासी महिमान ॥१॥

पहा हो सांवळा नंदाघरीं । नवनीताची करीतसे चोरी ।

गौळणी गाह्राणी सांगती नानापरी । त्याचें महिमान न कळे श्रमले सहाचारी ॥२॥

कोणी म्हणती यासी शिक लावूं । कोणी म्हणती आला बाऊ ।

दाखवी लाघव नवलाऊ । अगम्य खेळ ज्याचा कवणा न कळे कांहीं ॥३॥

चोरी करितां बांधिती उखळी दावें । येतो काकुळती माते मज सोडावें ।

एका जनार्दनी दावीं सोंग बरवें ।ज्याची कीर्ति ऐकतां अघ नासे सर्वे ॥४॥

भावार्थ

नंदाघरी सावळा श्रीहरी नवनीताची चोरी करतो. गोकुळीच्या गौळणी नाना प्रकारे कन्हैयाच्या तक्रारी यशोदेकडे करतात. कोणी म्हणतात याला चांगली अद्दल घडवून आणली पाहिजे. श्रीहरी आश्चर्य वाटतील अशा अनेक लीला करतो. हरीचे हे खेळ कुणालाही न कळणारे अगम्य वाटतात. चोरी करताना पकडून त्याला दोरीने उखळाला बांधतात तेव्हां हा त्रिभुवनपती काकुळतीला येऊन सुटकेसाठी यशोदा मातेची विनवणी करतो. एका जनार्दनी म्हणतात, सगुणरूपात दिसणारा हा परमात्मा निर्गुण आहे, त्याचा महिमा वेद आणि श्रुतींना देखील अगम्य वाटतो. त्याचे वर्णन वैखरी, मध्यमाच नव्हे तर परा आणि पश्यंती या वाणी सुध्दा करु शकत नाहीत. निरनिराळी सोंग घेऊन मती गुंग करतो कीं, शिव शंकराला सुध्दां त्याचे रहस्य उलगडून दाखवतां येत नाही. या परमेशाची कीर्ती केवळ श्रवणाने सर्व पापांचा नाश करते.

२८

आवरी आवरी आपुला हरी । दुर्बळ्याची केली चोरी ।

घरा जावयाची उरी ।कृष्णे ठेविली नाहीं ॥१॥

गोळणी उतावेळी । आली यशोदेजवळी ।

आवरी आपुला वनमाळी । प्रळय आम्हां दिधला ॥२॥

कवाड भ्रांतीचें उघडिलें । कुलूप मायेचे मोडिलें शिंके अविद्येचे तोडिलें ।

बाई तुझिया कृष्णें ॥३॥

होती क्रोधाची कर्गळा । हळूचि काढिलेसे बळां ।

होती अज्ञानाची खिळा तीहि निर्मूळ केली ॥४॥

डेरा फोडिला दंभाचा । त्रिगुण तिवईस ठाव कैसा ।

प्रपंच सडा हा ताकाचा । केला तुझिया कृ जे जे मी मीष्णे॥५॥

अहंकार होता ठोंबा । उपडिला धुसळखांबा ।

तोही टाकिला स्वयंभू । बाई तुझिया कृष्णें ॥६॥

संचित हे शिळें लोणी । याचि केली धुळधाणीं ।

संकल्प विकल्प दुधाणीं । तींही फोडिलीं कृष्णें ॥७॥

प्रारब्ध हें शिळें दहीं । माझें खादलें गे बाई ।

क्रियमाण दूध साई । तींही मुखीं वोतिली ॥८॥

द्वेष रांजण सगळे । स्पर्शे होती हात काळे ।

होतें कामाचें तें पाळें । तेंहि फोडिलें कृष्णें ॥९॥

सुचित दुश्चित घृत घागरी । लोभें भरल्या होत्या घरीं ।

त्याहीं टाकिल्या बाहेरी । तुझिया कृष्णें ॥१०॥

कल्पनेची उतरंडी । याची केली फोडाफोडी ।

होती आयुष्याची दुरडी । तेंही मोडिली कृष्णें ॥११॥

पोर रे अचपळ आमुची । संगती धरली या कृष्णाची ।

मिळणी मिळाली तयांची । संसाराची शुध्द नाहीं ॥१२॥

ऐशीं वार्ता श्रवणीं पडे । मग मी धावोनि आलें पुढें ।

होतें द्वैताचें लुगडें । तेंही फिटोनि गेलें ॥१३॥

आपआपणा विसरलें । कृष्णस्वरूपीं मिळालें ।

एका जनार्दनी केलें । बाई नवल चोज ॥१४॥

भावार्थ

कन्हैयाच्या चमत्कारिक लिलांनी हैराण झालेली गवळण उताविळपणे यशोदेकडे येऊन आपली तक्रार दाखल करते, जो अतिशय दुर्बल आहे त्याच्या घरीं कृष्ण चोरी करतो, संसार मायेने भ्रांत(भयभीत) झालेल्या चित्ताची कवाडे उघडून श्रीहरी मायेचे कुलूप मोडून टाकतो. शिरावर असलेलें अविद्येचे शिंके (अज्ञान) फोडून गळ्यांत असलेली क्रोधाची शृंखला सहजपणें दूर करतो. अज्ञान समूळ नाहिसे करतो. सत्व, रज, तमोगुणाच्या तिवुईवर उभारलेला दंभाचा डेरा फोडून जीवाची प्रपंचातून सुटका करतो. अहंकार रूपी मजबूत खांब समूळ उपटून टाकतो. जन्मोजन्मीच्या पापपुण्याचा संचय म्हणजे शिळे लोणी, या संचिताची श्रीहरी धूळधाण करुन जीवाची मुक्तता करतो. संकल्प आणि विकल्प यांच्या पासून मन मुक्त करतो. प्रारब्ध रूपी शिळे दही खाऊन संपवतो. माणसाचे भलेबुरे कर्म म्हणजे दुधावरची साय! ह्या कर्मफलापासून सुटका करतो. मानवी मन म्हणजे द्वेषाने भरलेले रांजण, त्याला स्पर्श करताच हात काळे होतात, या द्वेषापासून श्रीहरी मनाची सुटका करतो. लोभीपणाने भरून ठेवलेल्या सुचित आणि दुश्चित रूपी तुपाच्या घागरी श्रीकृष्ण बाहेर काढतो, कल्पनांची उतरंडी फोडून आणि आयुष्याची दुरडी मोडून मुक्तीचा मार्ग मोकळा करतो. कृष्णरूपाशी एकरूप होतांच देहबुध्दी लयास जाऊन द्वैताचे बंधन फिटून जाते, आपपर भाव संपून चित्त कृष्णस्वरुपांत मिळून जाते असे एका जनार्दनी सांगतात.


References : N/A
Last Updated : April 01, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP