१
व्रजांत कोणे एक वेळेशी । आले गर्गाचार्य ऋषी । त्यासी दाखवितां कृष्णासी । चिन्हें बोलतां झाला. ॥१॥
यशोदाबाई ऐक पुत्राची लक्षणें ॥ध्रु० ॥मध्यें मुख्य यशोदा बाळा । सन्मुख रोहिणी वेल्हाळा ।
भोंवता गोपिकांचा पाळा । त्या गोपाळा दाखविती ॥२॥
करील दह्या दुधाची चोरी । भोगिल गौळियांच्या पोरी । सकळ सिंदळांत चौधरी । निवडेल निलाजरा ॥३॥
चोरूनी नेईल त्यांची लुगडीं । त्यांचे संगे घेईल फुगडी । मेळवुनी गोवळ गडी । सुगडी फोडी शिंकींचीं । ॥४॥
पांडव राजियांचे वेळी । काडील उष्टया पत्रावळी । ढोरें तुमच्या घरची वळी । निवडेल निलाजरा ॥।५॥
यावरी कलवंडतील झाडें ।लत्ता खळाळ हाणील घोडे । महा हत्ती धरील सोंडें । परी ती विघ्ने मावळतीं ॥६॥
यावरी गाडा एक पडावा ।अथवा डोहामाजीं बुडावा । वावटुळीनें उडुनी जावा ।सांपडावा वैरीयाला ॥७॥
कारण सच्चिनंदाचें । बीज नोहे हें नंदाचें । जन्मांतर गोविंदाचे नव्हे कथिल्या मथिल्यांचें ॥८॥
हृदयीं श्रीवत्सलांछन । ब्राह्मणलत्तेचें भूषण ।हा होईल ब्राह्मण जन । एका जनार्दनीं घरींचा ॥९॥
भावार्थ
एकदां व्रजभूमीत गर्गाचार्य ऋषी आले , त्यांनी कृष्णाची बाल-लक्षणे अवलोकन करून यशोदेला भविष्यात घडून येणार्या कृष्ण -लीलां वर्णन करुन सांगितल्या. मध्यें यशोदेचा कृष्ण, त्याच्या समोर रोहिणीचा बलराम, भोवती गोपाळांचा मेळा भरला असतांना ऋषी श्रीकृष्णाचे जातक सांगतात. हा कृष्ण गोकुळांत दह्यादुधाची चोरी करील, गौळणींची लुगडी चोरून नेऊन त्यांच्या खोड्या काढील गोपाळ-गडी जमवून गवळ्यांच्या घरांत शिरून शिंक्यावरची दह्यादुधाची भांडी फोडील. गोप-गोपिकांना जमवून रासक्रीडा, फुगडी असे खेळ करील नंद-यशोदेच्या घरच्या गाई राखिल. बालपणी कृष्णावर अनेक संकटे येतील. बालकृष्णावर झाडे कोसळतील, घोड्यांच्या टापांचे प्रहार होतील, बलाढ्य हत्ती सोंडेत पकडतील , या शिवाय गाडा अंगावर पडणे, डोहांत पडणे, वावटळीने उडून जाऊन वैर्याच्या हाती सापडणे अशा अनेक दुर्घटना घडून येतील परंतू ही सर्व विघ्ने मावळतील. पांडवांच्या शराजसूय यज्ञाच्या वेळी श्रीकृष्ण उष्टया पत्रावळी काढील. कारण नंदाचे बीज नसून सच्चिदानंदाचा अवतार आहे. त्याने गोविंद रुपाने जन्म घेतला असून हृदयावर ब्राह्मणाने मारलेल्या लाथेचा प्रहाराने झालेल्या जखमा भूषण म्हणून धारण करील. श्रीकृष्णाचे ऋषींनी सांगितलेले जातक एका जनार्दनी या अभंगात वर्णन करुन सांगतात.
नंदास विश्वरुप दर्शन
२
एके दिनी नवल जालें । ऐकावें भावें वहिलें ॥१॥
घरीं असतां श्रीकृष्ण । योगियांचे निजध्यान॥२॥
नंद पुजेसी बैसला । देव जवळी बोलाविला ॥३॥
शाळीग्राम देखोनि । मुखांत घाली चक्रपाणी ॥४॥
नंद पाहे भोंवतालें । एका जनार्दनी बोले ॥५॥
भावार्थ
एका जनार्दनी एक दिवस घडलेली नवलाची गोष्ट या अभंगात कथन करीत आहेत. योग्यांच्या निजध्यानाचा विषय असलेला श्रीकृष्ण तेव्हां घरात असतांना नंदराजा पुजेला बसले होते. त्यांनी श्रीकृष्णाला जवळ बोलावून घेतले. पुजेच्या देवामधील शाळीग्राम पाहून कृष्णाने तो तोंडात घातला. नंदराजा भोवताली शाळीग्राम शोधू लागले.
३
म्हणे कृष्णराया शाळीग्राम देई । येरे लवलाही वदन पसरी ॥१॥
चवदा भुवनें सम ती पाताळें ।देखियेलीं तात्काळें मुखामाजी ॥२॥
स्वर्गीचे देव मुखामाजी दिसती । भुलला चित्तवृति नंदराव ॥३॥
एका जनार्दनी नाठवे भावना । नंद आपणा विसरला ॥४॥
भावार्थ
नंदरायाने कृष्णा कडे शाळीग्राम मागितला असतां श्रीकृष्णाने लगेच मुख पसरून दाखविले, तेव्हां नंदरायाला वदनामध्ये चौदा भुवने सप्त पाताळांचे दर्शन घडलें तसेच स्वर्गीय देवांचे दर्शंन घडले. हा चमत्कार बघून नंदाच्या चित्तवृत्ती लोप पावल्या, नंदराया स्वता:चे अस्तित्व विसरून गेले. एका जनार्दनी म्हणतात, नंदराया सर्व ऐहिक भावना विसरून गेले.
४
घालुनी माया म्हणे नंदराया । भजे यादव राया कायावाचा ॥१॥
संसारसुख भोगाल चिरकाल । परब्रह्म निर्मळ तया भजे ॥२॥
नंद म्हणे देव दूर आहे बापा । आम्हांसी तो, सोपा कैसा होय ॥३॥
ऐकतांचि वचन काय करी नारायण । प्रगटरूप जाण दाखविलें ॥४॥
शंख चक्र गदा पद्म तें हस्तकीं मुगुट मस्तकीं शोभायमान ॥५॥
ऐसा पाहतां हरी आनंद पै झाला । एका जनार्दनी भेटला जीवेंभावें ॥६॥
भावार्थ
मायेचे हे नवल बघून नंदराया काया, वाचा, मनानें यादव रायाचे भजन करु लागला, तेव्हां निर्मळ परब्रह्माचे सतत भजन केल्यास चिरकाल संसारसुख भोगतां येईल परंतु देव भक्तापासून खूप दूर असल्याने भक्तांना तो सहजसुलभ कसा होईल हे नंदरायाचे वचन ऐकतांच नारायणानें शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले, मस्तकावर सुंदर मुगुट असलेले आपले शोभायमान रूप प्रगट केले. हरीचे हे मनोहर रुप पाहून नंदरायास अवर्णनीय आनंद झाला. एका जनार्दनी म्हणतात, नंदाला श्रीहरी जीवेभावे भेटला.