उत्सवाची मागणी - बलसमृद्धि व दु:संगनाशाची मागणी
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
सोमवार ता. ९-१२-१९२९
उत्सव तुझा जवळी आला । पाहिजे तो सिद्ध केला ॥१॥
आम्हांसाठी गुरुवरा । उत्सव कार्य सिद्ध करा ॥२॥
कार्य आपुले प्रगटावे । वैभवेसी उभारावे ॥३॥
सकळ बळाची समृद्धि । सकळाची असो वृद्धी ॥४॥
चमत्कार दाखवावा । अपूर्व योग घडवावी ॥५॥
साह्य नाही कोणी मम । तुजवीण पुरुषोत्तम ॥६॥
वैरी थोर असती नाथा । त्याची बाधा करि अनर्था ॥७॥
भलतेच ऐकवती । भलतेच प्रतिपादिती ॥८॥
भलतेच उठविती । भलतेच आरोपिती ॥९॥
अस्वस्थता तेणे होई । शांती मनाची ती जाई ॥१०॥
असंगाचा संग खोटा । विपत्तीसी नाही तोटा ॥११॥
सहस्त्रवृश्चिकांचे दंश । त्याहुनी पीडा देई द्वेष ॥१२॥
अकारण वैरी अमुचे । पुतळे जणुं मत्सराचे ॥१३॥
दु:संगाचा ऐसा योग । आम्हां नसो रमारंग ॥१४॥
दु:संगाने आम्ही कष्टी । किती सांगुं परमेष्टी ॥१५॥
दु:संगाचे निवारण । करा करा नारायणा ॥१६॥
जेणे जाय भय मनिंचे । धैर्य होय सिद्ध साचे ॥१७॥
धैर्य वृत्ति उपजेल । होईल दास तुझा अचळ ॥१८॥
उत्सव कार्य तव रंगाया । आम्हांलागी शिकवाया ॥१९॥
दु:संगाते टाकवावे । साधु संगतीते द्यावे ॥२०॥
विनायक विनविती । साधुसंगाते मागतो ॥२१॥
३६०)
मंगळवार ता. १०-१२-१९२९
उत्सव तुमचा जवळी आला । पाहिजे तो सिद्ध केला ॥१॥
उल्हसली अमुची मने । वाट पहात प्रेमाने ॥२॥
कार्यासाठी येईल देव । धरिल येथे प्रगट भाव ॥३॥
साक्षात्कारे तो भेटेल । आम्हां लागी सुखवील ॥४॥
कधी येई तो शुभदिन । करितो मी हे चिंतन ॥५॥
घडेल त्याचा सहवास । उताविळ झालो खास ॥६॥
लेकुरास जैसी आई । वांसरासी जैशी गाई ॥७॥
कधी भेटे करुणा मूर्ति । कधी होय इच्छापूर्ति ॥८॥
उत्कंठा हे बहु लागली । वृत्ति बहु उल्हसली ॥९॥
कधी येई माझा पिता । माझे अर्थ पुरविता ॥१०॥
कधी लोळेन चरणी । कधिं धरिन त्याचा पाणि ॥१२॥
पायी शिर मी ठेवीन । त्याजपाशी कधी खेळेन ॥१३॥
ऐसे झाले मज देवा । हेतु माझा हा पुरवा ॥१४॥
प्रगट व्हावे रमापती । संपादा या कार्याप्रति ॥१५॥
वैभवेसी कार्य व्हावे । चित्त माझे तोषवावे ॥१६॥
हेतु माझा पुरवावा । तुमच्या कृपेसी बरवा ॥१७॥
विनायक तुमचा दास । अनुग्रह व्हावा यास ॥१८॥
३६१)
बुधवार ता. ११-१२-१९९९
उत्सव तूझा जवळि आला । पाहिजे तो सिद्ध केला ॥१॥
आम्ही तुझे पददास । आम्हांलागी तुझी आस ॥२॥
आम्ही तुझे पददास । आम्हांलागी तुझी आस ॥२॥
आम्ही करुं भजनास । वानूं तुझीये यशास ॥३॥
उपचार अर्पू तुज । तूज महाराज ॥४॥
आम्हां खेळवायालागी । अवतरलासी जगी ॥५॥
उत्सव तुझा सिद्ध व्हावा । चमत्कार आम्हां दाखवा ॥६॥
साक्षात्कारे प्रगटावे । आम्हांलागी अनुग्र्हावे ॥७॥
विनायक तुमचा दास । पुरवावी याची आस ॥८॥
३६२)
गुरुवार ता. १२-१२-१९२९
उत्सव तुझा जवळि आला । पाहिजे तो सिद्ध केला ॥१॥
आम्ही पायासी शरण । वाहियेले अंत:करण ॥२॥
आमुचीया भावासाठी । प्रगट आतां जगजेठी ॥३॥
मागतो मी उत्सवाला । पुरवी आमुच्या कामाला ॥४॥
कामधेनू चिंतामणि । कल्पवृक्ष तूंच झणी ॥५॥
आम्हां असे तुझी आस । धरिली भजनाची कांस ॥६॥
पाजी आम्हांते अमृत । जेणे होऊं आम्ही पूर्त ॥७॥
याचसाठी गुरुराया । प्रगटावे अत्रितनया ॥८॥
आपुले कार्य करवावे । आम्हांलागी आनंदवावे ॥९॥
विनायक म्हणे पुरवी । उत्सवाची आशा बरवी ॥१०॥
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2020
TOP