उत्सवाची मागणी - उत्सवाची मागणी

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.



गुरुवार
उत्सव तुमचा जवळी आला । पाहिजे तो सिद्ध केला ॥१॥
स्वये येथे प्रगटोनी । आम्हां लागी बळ देवोनी ॥२॥
निज कृपेते करोनी । आनुकूल्याते देवोनी ॥३॥
समर्थ आम्हांलागी करा । श्रीगुरुराया अत्रिकुमरा ॥४॥
कृपादृष्टी आम्हां पहावे । आम्हांठायी संचरावे ॥५॥
बलवंत आम्हां करा । संपन्न आम्हांलागी करा ॥६॥
कार्य तुमचे उत्सव तुमचा । दासही हा असे तुमचा ॥७॥
याच्यासाठी क्रुपावरा । प्रगट भाव येथे धरा ॥८॥
विनायक  तुमचा दास । पुरवावी त्याची आस ॥९॥
==
गुरुवार ता. २७-६-१९२९
उत्सव तुमचा जवळी आला । पाहिजे तो सिद्ध केला ॥१॥
स्वये नाथा प्रगटोनी । कार्य घ्यावे करवोनी ॥२॥
आम्हांलागी सिद्धी द्यावी । पूर्ण कृपा तुमची व्हावी ॥३॥
आपुले कार्य असे म्हणा । प्रगट व्हावे नारायण ॥४॥
सकळ येथे देव येतील । मज सहाय होतील ॥५॥
कार्य निज करवावे । दासा ठायी प्रगटावे ॥६॥
विनायक विनवणी । करीतसे शूलपाणी ॥७॥
==
गुरुवार ता. ४-७-१९३०
उत्सव तुमचा जवळी आला । पाहिजे तो पूर्ण केला ॥१॥
स्वामी येथे प्रगटावे । माझे ठायी संचरावे ॥२॥
सकळ ब्रम्हाण्डाचे साह्य । मज देई दत्तात्रेय ॥३॥
तेज येथे प्रगटवावे । भजनांते वाढवावे ॥४॥
व्हावी भजन समृद्धी । प्रगटवी मूर्त सिद्धी ॥५॥
योगसिद्धीतं आणावे । स्वये प्रगट असावे ॥६॥
विनायक म्हणे कृपा । करा माझे मायबापा ॥७॥
==
गुरुवार २१-११-१९२९
उत्सवकार्य तुझे देवा जवळी आले । आम्हां अनुग्रहीले पाहिजे की ॥१॥
प्रगटपणी येथे करणे साक्षात्कार । श्रीसद्गुरुवर आम्हांसाठी ॥२॥
आम्हां दासांसाठी येथे प्रगटणे । आम्हां वागविणे निजकार्यी ॥३॥
तुम्ही यजमान तुम्हांसी शोभेल । कार्य विस्तारेल ऐसे करा ॥४॥
पूर्ण वैभवेसी कार्य संपादावे । परिपूर्ण व्हावे सर्वत्वाने ॥५॥
न्यून कांही देवा नको ह्या कार्यात । परिपूर्ण होत ऐसे करा ॥६॥
विनायक म्हणे निर्विघ्न करावे । आम्हां यश द्यावे निजकार्यी ॥७॥
==
गुरुवार ता. २८-११-१९२९
उत्सव तुझा जवळी आला । पाहिजे तो सिद्ध केला ॥१॥
भक्तांसाठी अवतार । झाला तुझा अवनीवर ॥२॥
अनसूया पोटी बाळ । जन्मलासी तूं वेल्हाळ ॥३॥
तपश्चर्या त्या अत्रिची । साच केली देवा साची ॥४॥
पुत्रत्वाने लाभलासी । जाण तूं त्या दंपतीसी ॥५॥
कौतुक तुझे करिताती । प्रेमभरी तुज पाळिती ॥६॥
योग-सिद्ध व्हाया जन । आलासी तूं दयाघन ॥७॥
भजन उपासना ज्ञान । कथिसी सविस्तरे पूर्ण ॥८॥
सकळां तुझा उपदेश । नित्य भजनाचा ईश ॥९॥
वेदांत गुरु आणि ईश्वर । सेवणे हे निरंतर ॥१०॥
उपदेश तुझा ऐसा । आम्हां असे देवा खासा ॥११॥
म्हणुनिया उत्सव कार्य । करणे आम्हां दत्तात्रेय ॥१२॥
उपासनेसाठी देवा । उत्सव आपुला हा करवा ॥१३॥
सकळ साह्य आम्हां द्यावे । मनोरथ पूर्ण व्हावे ॥१४॥
बळ द्यावे मनुष्याचे । बळ द्यावे आम्हां धनाचे ॥१५॥
बळ द्यावे साधनांचे । बळ द्यावे कौशल्याचे ॥१६॥
जे जे कांही  इष्ट परम । ते ते द्यावे पुरुषोत्तम ॥१७॥
अभिमान आमुचा धरा । श्रीगुरुराया अत्रिकुमरा ॥१८॥
आम्हां ठायी संचरावे । अमुच्या देहा वागवावे ॥१९॥
निजहित चिंतवावे । ऐसे नाथजी करावे ॥२०॥
कर्तृत्वाचा अभिमान । तोच असे खरा शीण ॥२१॥
क्षमा करा श्रीसमर्था । क्षमा करा दत्तनाथा ॥२२॥
चैतन्यस्थानासी आणावे । स्थानी आपण रहावे ॥२३॥
आम्हांकडुनी सेवा घ्यावी । परम कृपा आम्हां व्हावी ॥२४॥
विनायक चरणि दास । पुरवावी याची आस ॥२५॥
==
आनुकूल्य मागणी
गुरुवार ता. ५-१२-१९२९
उत्सव तुझा जवळि आला । पाहिजे तो सिद्ध केला ॥१॥
दृढपायांसी शरण । घालितसे लोटांगण ॥२॥
भाव तुज समर्पून । ह्र्दयांत तुज चिंतून ॥३॥
करितो मी तुझी प्रार्थना । श्रीगुरुराया दयाघना ॥४॥
कार्य तुझे उत्सव तुझा । पूर्ण व्हावा हेतु माझा ॥५॥
स्वये यावे प्रगटोन । साक्षात्कारे द्यावे दर्शन ॥६॥
भजन पूजनाचा भर । कीर्तनाचा बडिवार ॥७॥
सकळ समृद्धीचा योग । खुलुनी यावा पूर्ण रंग ॥८॥
प्रसाद-अनुभव यावा । शुभयोग साधवावा ॥९॥
असो येथे अधिष्ठान । तुमचेच भगवान ॥१०॥
सांप्रदाय तुमचाच । रुढ व्हावा येथे साच ॥११॥
स्थान तेजवंत व्हावे । प्रखर तेज तळपावे ॥१२॥
जागरुक येथे दंड । असो तुमचा उदंड ॥१३॥
अन्यायासी शिक्षा व्हावी । निज मर्यादा रक्षावी ॥१४॥
पूर्ण ज्योत प्रगटावी । अखंड स्थानी या असावी ॥१५॥
सार्वभौम वैभवाला । प्रगटवी अवलीळा ॥१६॥
न्य़ून येथे कांही नसावे । सर्व पूर्ण कार्य व्हावे ॥१७॥
कलि दोष न बाधावा । इडा पीडा-योग टळावा ॥१८॥
प्रतिबंध सर्व हरावे । कार्य निर्विघ्न करावे ॥१९॥
वैरीयांचा व्हावा घात । जळुनि जावे ते समस्त ॥२०॥
पाखंडाचा व्हावा नाश । नास्तिक्याचा नसो लेश ॥२१॥
अधर्माचा व्हावा र्‍हास । विजय धर्माचाच खास ॥२२॥
दुष्ट सकळ निवटावे । साधुपूजन घडावे ॥२३॥
साधनाची परिपूर्णता । करि येथे भगवंता ॥२४॥
आळस निद्रा नसो येथ । जावो येथोनियां स्वार्थ ॥२५॥
रोगभय नसो कांही । आपत्ति दूर व्हावी पाही ॥२६॥
चिंता रोग भय जावो । सकळ आनंद उद्भवा ॥२७॥
निभर्यता वावरावी । निर्ममता सिद्ध व्हावी ॥२८॥
विनायक म्हणे दत्ता । प्रगट करा निज सत्ता ॥२९॥
==
शनिवार ता. ७-१२-१९२९
उत्सव तुझा जवळी आला । पाहिजे तो सिद्ध केला ॥१॥
दृढ आहे पायी शरण । घालितसे लोटांगण ॥२॥
जन्मदिन तुझा आला । आनंदाचा आम्हां भला ॥३॥
सुकाळ होय आनंदाचा । तैसा जाण प्रेमरसाचा ॥४॥
समाधि सुख आम्हां लाभेल । देहभाव हारपेल ॥५॥
चुकेल तेव्हा सासुरवास । आम्ही लाभुं माहेरास ॥६॥
म्हणुनी कार्य सिद्ध करी । आम्हांसाठी नरहरी ॥७॥
उपासना कार्यासाठी । स्थान महात्म्याचे साठी ॥८॥
सिद्ध करी तुझे कार्य । पापक्षय जेणे होय ॥९॥
विनायक तुझा दास । याची पुरवावी आस ॥१०॥
==
रविवार ता. ८-१२-१९२९
उत्सव तुझा जवळि आला । पाहिजे तो सिद्ध केला ॥१॥
कार्य तुझे उत्सव तुझा । मीही जाण असे तुझा ॥२॥
माझा एक निश्चय भाव । तुजवरी दत्तदेव ॥३॥
तुजविण भरंवसा । कोठे नाही जगन्निवासा ॥४॥
ह्रदयाचा प्राणेश्वर । जीवींचा तूं जीवेश्वर ॥५॥
आत्माराम माझा तूंच । मानितो मी तुज साच ॥६॥
उभा माझ्या पाठीमागे । माझ्य़ासाठी तोच जागे ॥७॥
निवारितो संकटाते । संपादितो मम शुभाते ॥८॥
तोच विघ्नांचा नायक । तोच सिद्धीचा दायक ॥९॥
तोच सकळ देव जाणा । म्हणुनि शरण त्याचे चरणा ॥१०॥
पाव आतां मजलागी । ध्याईतो मी अंतरंगी ॥११॥
कार्य निज सिद्ध करी । माझा भाव तुजवरी ॥१२॥
विनायकाचा हा काम । पुरवावा पुरुषोत्तम ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP