गुरुद्वादशी - अवतार समाप्ति

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


वाढला लौकिक सर्व जन येती । प्रसाद मागती दुष्ट पापी ॥१॥
म्हणोनि लौकिकार्थ अदृश्य होवोनी । रहावे हे मनी आणियेले ॥२॥
आश्विन वद्यासि द्वादशी तिथीसी । सूर्य मध्यन्हासी येत जाणा ॥३॥
कृष्णेमाजी देव स्वरुप पावती । समाधि लावती श्रीपाद ते ॥४॥
अदृश्यरुपाने कुरवपुरांत । अद्यापी वसत आहेत ते ॥५॥
अनेक दृष्टांत असती कथिले । अनुभव भले साधुसंती ॥६॥
कृष्णेवरि प्रीति बहु या दत्ताची । आवड तेथिची बहुतची ॥७॥
प्रिय ती नर्मदा दत्त-जन्म भूमि । तेथे आत्मकामी वर्ते दत्त ॥८॥
वंदूं नर्मदेसी वंदूं त्या कृष्णेसी । वंदूं त्या अत्रिसी विनयाने ॥९॥
वंदूं अनसूया माता ते दत्ताची । शुद्धी अंतराची साधूंया की ॥१०॥
गळेल असूया वंदितां मातेसी । म्हणोनी प्रेमेसी स्मरुं तीसी ॥११॥
ऐसा पुण्यदिन आजिचा साजरा । करुं गुरुवारा तुझ्या कृपे ॥१२॥
आमुचे जे कार्य नाथ पूर्ण व्हावे । वैभव दावावे वात्सल्याचे ॥१३॥
आम्ही कामनीक भक्त तुझे देवा । आशिर्वाद द्यावा संप्राप्तिचा ॥१४॥
पूर्ण काम आम्हां करी गुरुनाथा । चरणासी माथा वाहिला मी ॥१५॥
आजवरि घडले मज जे सेवन । फ़ळाते येऊन सिद्ध व्हावे ॥१६॥
माझेठायी दावा कृपेचा प्रभाव । गुरुद्त्तदेव सेवा सिद्धी ॥१७॥
सिद्ध मज करा अंतरी संचरा । जयकरुणाकरा गुरुनाथा ॥१८॥
विनायक घेतो पायी लोटांगण । हेतु याचे पूर्ण करा दत्ता ॥१९॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP