गुरुद्वादशी - पतिव्रतेस वरदान

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


परम विस्मिता होय पतिव्रता । क्षणैक स्तब्धता पावली ते ॥१॥
समजली मनी अत्रिचे नंदन । घेतसे लोळण पायांवरी ॥२॥
उठविती नारी बहु आश्वासिती । जाहलो म्हणती तुष्ट तुज ॥३॥
माग माते कांही अभीष्ट तुजसी । वर द्यावयासी पावलो मी ॥४॥
तुझीया भक्तीने व्रत-नियमाने । संतुष्ट मी मने झालो असे ।\५॥
तरी माग माते अभीष्ट मनींचे । तुज जे का रुचे अत्यर्थकी ॥६॥
क्षणभरी करी विचार अंतरी । पतिव्रता नारी सुहासनी ॥७॥
तुज सर्वज्ञासी कायसे सांगवे । तुज सर्व ठावे अंतरीचे ॥८॥
विश्वाच्या मनींचे सकळ तुज ज्ञात । भूत-ह्रदयस्थ परमात्मा ॥९॥
तुज परमात्मासी कायसे मागावे । कथन करावे काय तुज ॥१०॥
तरी विचारितां म्हणोनि सांगते । सत्य वचनाते करा नाथा ॥११॥
माते ऐसे मज वदलांत देवा । तोच शब्द व्हावा खरा आतां ॥१२॥
तुम्हांसम पुत्र व्हावा माझे कुशी । वन्द्य ज्ञानराशि धर्मशील ॥१३॥
विनायक म्हणे चरित्र देवाचे । अद्भुत रसाचे ऐका तुम्ही ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP