गुरुद्वादशी - श्रीपाद-चरित्र-सार

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


मंगळवार ता. २९-१०-२९ ( प्रात:काळ )

उत्सवाचा दिन आज हा तुमचा । आम्हां आनंदाचा गुरुराया ॥१॥
अदृश्य जाहलां कुरुवपुरामाजी । दत्तजी हो आजी तुम्ही नाथा ॥२॥
धन्य केली कृष्णा धन्य केले स्थान । प्रगट महिमान थोर केले ॥३॥
रजकावरी केला राज्ययोग मला । देईन दर्शनाला दिली भाक ॥४॥
विधवास्त्रीचे पोटी पुत्र अज्ञ होता । तया सज्ञानता दिली नाथा ॥५॥
बंधु होते दोघे आंधळे पांगळे । तया योगबळे सुष्ठु केले ॥६॥
काशी बदरी वना तैसे गोकर्णासी । तैसे तीर्थयात्रेसी गमन केले ॥७॥
अपार महिमा कोण जाणे भला । कोणी न वर्णिला अशक्य ते ॥८॥
महिमा थोर झाला बहुजन येती । विपुल मागती योगक्षेम ॥९॥
उपाधि बहु होय, म्हणोनी समाधि । घेतली निरवधि तुम्ही नाथा ॥१०॥
अश्विन वद्य तुम्ही द्वादशी योजिली । अदृश्यता धरिली तुम्ही नाथा ॥११॥
पाहतां गंगेमाजी अदृश्य जाहला । श्रीगुरुदयाळा श्रीपादजी ॥१२॥
तोच दिन आजी परम मंगलाचा । श्रीगुरुराया साचा आम्हां व्हावा ॥१३॥
प्रदोषकाळी करुं यशाचे वर्णन । माहात्म्य गायन करुं नाथा ॥१४॥
करुं भजनाते करुं उत्सवाते । अशा चिन्तनाते करीतसे ॥१५॥
संकल्प हा माझा नाथ पूर्ण करा । श्रीगुरु उद्धारा मजलागी ॥१६॥
साक्षात्कारी येथे प्रगटा प्रदोषासी । घ्यावे निज सेवेसी करवूनी ॥१७॥
तुमचा आनंद तुम्हीच करणार । तुम्हीच देणार सर्व आम्हां ॥१८॥
विनायक म्हणे करुणासागरा । मनोरथ करा पूर्ण माझा ॥१९॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP