स्कंध १२ वा - अध्याय १२ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥९७॥
सूत म्हणे आतां वंदितों धर्मासी । तेंवी श्रीकृष्णासी नमन असो ॥१॥
सकल ब्राह्मणां असो नमस्कार । निवेदीन सर्व विषय आता ॥२॥
भागवतामाजी कथिलें जें तेंचि । व्हावें एकदांचि दर्शन तें ॥३॥
प्रामुख्यें या ग्रंथीं विष्णूचें वर्णन । षड्‍गुणनिधान पावन जो ॥४॥
मुक्तिसाधनेंही वर्णिलीं समग्र । ग्रंथाचा सारांश कथितों आतां ॥५॥
वासुदेव म्हणे संक्षेप स्कंधांचा । देऊनियां चित्ता ऐकूं आतां ॥६॥

॥९८॥
परीक्षितीकथा, नारदोपाख्यान । विप्रशाप जाण राज्यत्याग ॥१॥
ईशकथागान, श्रवण-निश्चय । पुढती शुक-राव संवाद तो ॥२॥
प्रथमस्कंधीं हें कथियेलें वृत्त । श्रेष्ठ भागवत प्रारंभ हा ॥३॥
द्वितीय स्कंधीं तें योगाचें वर्णव । अवतारकथन विराटादि ॥४॥
तृतिय स्कंधांत उध्द्व-विदुर । विदुर-मैत्रेयसंवाद तो ॥५॥
पुराण- संहिता प्रश्न, सृष्टयुत्पत्ति । पुढती हिरण्याक्षाची कथिली कथा ॥६॥
सर्ग, रुद्र, मनु, शतरुपाजन्म । कपिलोक्त ज्ञान मातेप्रति ॥७॥
वासुदेव म्हणे देवहूति धन्य । ज्ञान तें ऐकून ईश्वरोक्त ॥८॥

॥९९॥
चतुर्थ स्कंधांत प्रजापतीजन्म । धर्मवंश जाण कथिला तेंवी ॥१॥
दक्षयज्ञ ध्रुव, पृथु ही चरित्रें । प्राचीनबर्हीतें नारदोक्ति ॥२॥
पंचमस्कंधीं ते प्रियव्रत, नाभि । ऋषभदेवही भरतकथा ॥३॥
भूगोल, खगोल, पाताल, नरक । वर्णिलें समस्त बोधप्रद ॥४॥
षष्ठस्कंधामाजी दक्षयज्ञकन्या । वृत्रकथागाना केलें असे ॥५॥
सप्तमीं तें पूर्ण प्रल्हादचरित्र । अष्टमीं गजेंद्रमोक्ष तेंवी ॥६॥
समुद्रमंथन, वामनचरित्र । तेंवी हयग्रीववृत्त असे ॥७॥
वासुदेव म्हणे कथा त्या अपूर्व । स्मरणेंही भाव वृध्दिंगत ॥८॥

॥१००॥
नवमीं इक्ष्वाकु, सुद्युम्नचरित्र । तेंवी हयग्रीववृत्त असे ॥१॥
शशाद, नगादि नृपाचीं चरित्रें । वृत्त शर्यातीचें कन्येसवें ॥२॥
ककुत्स्थ, खट्‍वांग, मांधाता, सौभरि । सगर, रावणारि चरित्र तें ॥३॥
जनकाचा वंश, परशुरामवृत्त । ययाति, नहुष भरतादिही ॥४॥
यदुवंशकथा, श्रीहरीचें वृत्त । संक्षेपें समस्त कथिलें अंतीं ॥५॥
वासुदेव म्हणे श्रीकृष्णकथेचा । प्रस्ताव हा चित्ता हर्षकारी ॥६॥

॥१०१॥
दशमस्कंधांत श्रीकृष्णचरित्र । पूतनादि वध गोकुळांत ॥१॥
कालियामर्दन, नंदविमोचन । यज्ञपत्न्याख्यान, गिरिपूजा ॥२॥
रासक्रीडा, शंखचूडादिक वध । कंसाचें दूतत्व अक्रूरासी ॥३॥
मथुरागमन, गोपींचा विलाप । पुढती धनुर्याग, कंसवध ॥४॥
गुरुगृहींवास, मगधासैन्यनाश । द्वारकानिवास श्रीहरीचा ॥५॥
रुक्मिणीहरण, सभा ते सुधर्मा । शासन त्या बाणा उषेस्तव ॥६॥
भौमासुरवध, राजकन्यामुक्ति । शिक्षा शिशुपालादि दैत्यांलागीं ॥७॥
द्विविदाविनाश, वाराणसी दाह । भूमिभारोध्दार ऐशा लीला ॥८॥
वासुदेव म्हणे दशम हा स्कंध । प्रत्यक्ष स्वरुप श्रीकृष्णाचें ॥९॥

॥१०२॥
एकादशस्कंधीं यादवांसी शाप । उध्द्वासी बोध श्रीकृष्णाचा ॥१॥
कर्म, ज्ञान, भक्ति कथिली विस्तृत । धर्मही साचार निवेदिला ॥२॥
यादवकुलाचा संहार, निर्याण । श्रीहरीचें जाण, कथिलें सर्व ॥३॥
द्वादशांत युगवर्णन, प्रलय । परीक्षितिरावमुक्तिवृत्त ॥४॥
वेदांचे वर्णन, मार्कंडेयकथा । देह विराटाचा सूर्यव्यूह ॥५॥
वासुदेव म्हणे स्कंध हे द्वादश । जाणावे आदित्य, भक्तिरुप ॥६॥

॥१०३॥
शौनकासी सूत निवेदी नामाचें । सामर्थ्य तें असे अलौकिक ॥१॥
सकल संकटे नसती निश्चयें । उच्चारितां भावें हरयेनमः ॥२॥
कथा-श्रवणादि साधन मोक्षाचें । एकमेव कसे नरजन्मीं ॥३॥
भगवत्प्रभाव चिंतिती जे सदा । वसूनि तयांच्या ह्रदयीं प्रभु ॥४॥
चित्तशुध्दि करी स्वयेंचि तयांची । सायुज्यता अंतीं तयां लाभे ॥५॥
वासुदेव म्हणे नामाचा महिमा । वर्णवे न जाणा कोणातेंही ॥६॥

॥१०४॥
अहो, ईशगुण वर्णिल्यावांचूनि । पुण्यप्रद वाणी समजूं नये ॥१॥
केवळ पदांचें लालित्य न भूषा । अर्थाच्या लालित्या सत्य मोल ॥२॥
केवळ शब्दांचें सौंदर्य तें व्यर्थ । जाणा काकतीर्थ हंसा त्याज्य ॥३॥
नीरसही ग्रंथ ईशलीलायुक्त । जाणा जगद्वंद्य सर्वाशानें ॥४॥
सज्जन त्या ग्रंथा घेताती मस्तकीं । पठण करिती भावें त्याचें ॥६॥
वासुदेव म्हणे श्रवण-मनन । ग्रंथाचें सज्जन करिती त्याचि ॥७॥

॥१०५॥
भक्तीनेंचि ईशपद प्राप्त होई । कर्म, ज्ञान पाही गौण तेथें ॥१॥
भक्ति-योगसिध्दि ईशकथागानें । श्रवण-कीर्तनें साधकाची ॥२॥
कृष्णपदरुप ध्यानें चित्तशुध्दि । पापविनाशही शांतिलाभ ॥३॥
अद्वैतावबोधें ब्रह्मसाक्षात्कार । सन्मुनीनो, थोर तुमचें भाग्य ॥४॥
सुसंधि ईश्वरकथागायनाची । लाभली मजसी तुम्हांस्तव ॥५॥
सर्वदा यास्तव तुमचा मी ऋणि । सूताची हे वाणी सत्य सत्य ॥६॥
वासुदेव म्हणे श्रोते हो, हें भाग्य । प्राप्त झालें मज तुम्हांयोगें ॥७॥

॥१०६॥
वासुदेवकथा श्रवणें पठणें । मुक्ति निश्चयानें मुनिवर्य हो ॥१॥
एकादशी किंवा द्वादशी तिथीसी । गातां आयुर्वृध्दि होई तेणें ॥२॥
शुचिर्भूतचित्तें भोजनाचे पूर्वी । पठणें या मुक्ति लाभतसे ॥३॥
मथुरा, द्वारका अथवा पुष्कर । तीर्थी, हें उध्दार पठणें करी ॥४॥
व्रतस्थ त्या स्थानी होती उपोषित्त । तयांसी हा ग्रंथ पठणें तारी ॥५॥
निरुपणें याच्या वक्त्यालागीं देव । पितर, मुनि, सिध्द, नृपादिही ॥६॥
नानाविध भोग अर्पिताती प्रेमें । कृतार्थता गानें वासुदेवा ॥७॥

॥१०७॥
विप्रालागीं वेदाध्ययनाचें पुण्य । राज्य सार्वभौम क्षत्रियासी ॥१॥
विपुल संपदा लाभते वैश्यासी । पातकें शूद्राचीं नष्ट होती ॥२॥
कलिमलहारि ईश्वरवर्णन । ऐसें अन्यत्र न कवण्या ग्रंथीं ॥३॥
मुनीद्रहो, आतां अनादि अनंता । त्या जगच्चालका वंदितों मी ॥४॥
महातत्त्वप्रकाशक भगवान । शुकांचे चरण वंदितों मी ॥५॥
पामरांसी मोक्ष व्हावया सुलभ । रचिलें भागवत व्यासपुत्रें ॥६॥
वारंवार तया शुकांसी वंदून । होऊं आतां धन्य सूत म्हणे ॥७॥
वासुदेव म्हणे श्रोत्यांसवें मीहि । लोटांगण पाई घालितों त्या ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP