स्कंध १२ वा - अध्याय ८ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥६५॥
शौनक सूतातें कथिती कुशल । अज्ञानांकार घालाविसी ॥१॥
यास्तव आमुच्या शंका करी दूर । मुनि चिरंजीव मार्कंडेय ॥२॥
प्रलयांत केंवी राहिला तो कथीं । भृगुवंशीं त्यासी केंवी जन्म ॥३॥
वटपत्रद्रोणीं तया भगवान । दिसले, तें संपूर्ण कथीं आम्हां ॥४॥
सूत म्हणे कलिदोषनिवारक । ऐकावें चरित्र कथितों तेंचि ॥५॥
वासुदेव म्हणे मार्कंडेयवृत्त । ऐकावें समस्त दक्षतेनें ॥६॥

॥६६॥
आधानापासूनि उपनयनान्त । संस्कार समस्त द्विजत्वार्थ ॥१॥
पिता उपनयन करी द्क्षतेनें । द्विजत्व लाभलें मुनिसी तदा ॥२॥
अध्ययन तप तेणें आरंभिलें । नैष्ठिक वरिलें ब्रह्मचर्य ॥३॥
विकार त्यागिले रागद्वेषादिक । वाढविले केश जटारुपें ॥४॥
वल्कलें लेवूनि कटीसी मेखला । कमंडलु ल्याला करांमाजी ॥५॥
यज्ञोपवीत तैं घेई मृगचर्म । कंठामाजी जाण रुद्राक्षही ॥६॥
सन्निध आपुल्या ठेवूनियां दर्भ । आरंभी विहित धर्म स्वयें ॥७॥
वासुदेव म्हणे अग्नि-सूर्य सेवा । करुनि आचार्या तोष देई ॥८॥

॥६७॥
पूर्वाण्हीं तैं मागे अपराण्हीं भिक्षा । श्रीगुरुआज्ञेचा मार्ग क्रमी ॥१॥
लक्षावधि वर्षे आचरी हें कर्म । अमरत्व जाण तेणें तया ॥२॥
त्रैलोक्यांत होई यापरी आश्चर्य । सहा मन्वंतर निघूनि जाती ॥३॥
पुढती सांप्रत मन्वंतरामाजी । पुरंदर त्यासी विघ्न करी ॥४॥
हरील हा स्थान आपुलें म्हणोनि । तपोभंग मनीं इच्छी त्याचा ॥५॥
गंधर्व, अप्सरा, मदन, वसंत । मलयसुगंध, भोगेच्छाही ॥६॥
अविवेकासवें पाठवी त्यास्थानीं । वासुदेव मनीं खेद पावे ॥७॥

॥६८॥
हिमाद्रीच्या उत्तरेसी । पुष्पभद्रा नामें नदी ॥१॥
चित्रा नामें शिला तेथ । मुनि वसे त्या स्थळास ॥२॥
स्वयेंचि तें रम्य स्थान । वसंतादिकां पाहून ॥३॥
हर्ष वाटला बहुत । पुण्यवृक्ष बहु तेथ ॥४॥
शुभपक्षी तयांवरी । कल्हारेंही सरोवरी ॥५॥
भृंग गुंजारवमग्न । मधुर कोकिलांचा स्वन ॥६॥
मत्त मयूर नाचती । पक्षी आलाप करिती ॥७॥
वासुदेव म्हणे मोद । ऐसा आश्रमीं चित्तास ॥८॥

॥६९॥
शीतकणांसवें मलयानिलाचा । प्रवेश तेंथींच अलौकिक ॥१॥
वृक्षलतांसी तो देई आलिंगन । पुष्पासी चुंबूण विचरे मोदें ॥२॥
मंद सुगंधित वायु तो वाहतां । येई अनुकूलता मदनाप्रति ॥३॥
पुढती वसंत प्रगटला तेथें । विहारस्थळ तें तपोवन ॥४॥
पुष्पगुच्छ तेथें शोभाले सर्वत्र । करी उद्दीपित्त चंद्रकांति ॥५॥
अप्सरांसवें तो पातला मदन । गंधर्व गायन सुरु होई ॥६॥
मुनीच्या समीप ऐसा परिवार । मोह अनावर करण्या येई ॥७॥
मूर्तिमंत अग्नि, मुनि भासे तयां । वंदी मुनिपायां वासुदेव ॥८॥

॥७०॥
अप्सरा नाचती गंधर्वही गाती । भोगेच्छा मुनींसी स्पर्शू पाहें ॥१॥
अविवेक साह्य जाहला तिजसी । मदनबाणही होई सज्ज ॥२॥
कंदुकक्रीडा तैं पुंजिअकस्थलेची । दृष्टि कंदुकीचि स्थिर होती ॥३॥
पीनपयोधरभारें ती श्रमली । सुमनें गळलीं केशांतूनि ॥४॥
पुष्पमाला छिन्न होऊनियां जाती । त्यजूनियां कटी, जाई सूत्र ॥५॥
वायुवेगें वस्त्र जाई तैं उडोनि । कामासी तैं मनी हर्ष वाटे ॥६॥
वासुदेव म्हणे मानूनियां सिध्दि । मुनींप्रति वेधी मदनबाणें ॥७॥

॥७१॥
परी दैवहीन प्रयत्नासमान । मदनाचे श्रम व्यर्थ होती ॥१॥
बाण व्यर्थ जातां निराशा तयाची । दाह सकलांसी होई बहु ॥२॥
अंती सर्पावरी घालूनियां घाव । व्यर्थ जातां होय अवस्था ते ॥३॥
नाइलाजे लाज वाटूनि ते जाती । होऊनियां चित्ती दीन बहु ॥४॥
वासुदेव म्हणे आश्चर्यचकित । होई तदा इंद्र पाहूनि त्यां ॥५॥

॥७२॥
अत्युग्र पाहुनि तपस्या मुनीची । भेटे तयाप्रति नारायण ॥१॥
नर-नारायणरुपें प्रगटूनि । दाविल्या नयनी मूर्ती दोन ॥२॥
शुक्ल-कृष्ण ऐसें स्वरुप तयांचे । तेजःपुंज त्यांचे कमल नेत्र ॥३॥
चतुर्भुज, मृगचर्म, वल्कलानें । देहही तयांचे विराजले ॥४॥
पवित्रकें यज्ञोपवीतेंही होतीं । दंडही शोभती कमंडलु ॥५॥
विराजल्या कंठीं कमलांच्या माला । कीट वारणाला कूर्च शोभे ॥६॥
वासुदेव म्हणे मूर्तिमंत तप । ऐसें त्यांचें रुप प्रगटी तेथें ॥७॥

॥७३॥
ऐसे जगद्वंध पाहूनियां देव । वंदी मार्कंडेय साष्टांग त्यां ॥१॥
अंतर्बाह्य शांति लाभली तयातें । अष्टभाव त्याचे प्रकट होती ॥२॥
सद्गदित कंठे जोडूनियां कर । देवा, नमस्कार घेई म्हणे ॥३॥
आलिंगन तया देई ऐसें वाटे । स्फुरण तयातें ऐसें होई ॥४॥
अर्ध्यपाद्यादिकीं पुढती पूजूनि । बैसवी आसनीं अत्यादरें ॥५॥
वासुदेव म्हणे मग मार्कंडेय । प्रार्थी नम्रभाव धरुनियां ॥६॥

॥७४॥
ईश्वरहो, काय वर्णू मी तुम्हांसी । प्रेरक जे शक्ति तुमचीच ते ॥१॥
त्रैलोक्य तुम्हांसी बाहुल्यांसमान । आपणासमान करितां भक्तां ॥२॥
धर्मऋषिपुत्र लेखणें तुम्हांसी । सर्वथा आम्हांसी अयोग्य हें ॥३॥
परमात्माचि तुम्हीं नर-नारायण । भक्तांचे कल्याण करण्या आलां ॥४॥
उर्णनाभीसम उद्भव-संहार । निश्चयें साचार करितां तुम्हीं ॥५॥
काल-कर्मादी़चें भय न भक्तांसी । ब्रह्मयातेंही भीति तुमची एक ॥६॥
वासुदेव म्हणे क्षणिक विषय । त्यागी मार्कंडेय ईश्वरार्थ ॥७॥

॥७५॥
रंगले तुमच्या पादपद्मीई त्यांसी । सकल सौख्याची प्राप्ति होई ॥१॥
त्रिगुणमायेच्या अंकीत, ते माया । शरण या पायां सर्वकाळ ॥२॥
त्यांतही सात्विकां सेवितां सायुज्य । सेवितां अन्यांस अंती दुःख ॥३॥
यास्तवचि ज्ञाते सात्त्विकां भजती । वैकुंठाची प्राप्ति तयां होई ॥४॥
सत्वमूर्ति तुम्ही सर्वातरवासी । चालना विश्वासी तुम्ही एक ॥५॥
वेदवाणीचेही नियंते तुम्हीचि । बोध हा श्रुतीचि करण्या योग्य ॥६॥
ब्रह्मयातेंही होई श्रुतीनेंच बोध । नमस्कार अद्य घ्यावा माझा ॥७॥
वासुदेव म्हणे मार्कंडेय ऐसा । आदरें त्या पदां नमन करी ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP