स्कंध १२ वा - अध्याय २ रा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥११॥
निवेदिती शुक राया, कालगति । अतर्क्य कलीसी पुढती बल ॥१॥
धर्म सत्य, शुध्दि, आयुर्बल, क्षमा । स्मृति नष्ट जाणा यथाक्रम ॥२॥
कुलीनता लोकीं येईल द्रव्यानें । धर्म, न्याय जाणें बळानेंचि ॥३॥
विवेक लवही राहणार नाहीम । आवश्यक नाहीं गोत्र, कुळ ॥४॥
आवडीसमान स्त्री-पुरुषयोग । व्यापारीं कापटय प्राधान्येंसी ॥५॥
रतिकौशल्यचि आढळेल लोकीं । विप्र चिन्हधारी ज्ञानहीन ॥६॥
आश्रमही ऐसे राया, नाममात्र । सत्कर्माचा लोप सर्वत्रचि ॥७॥
वासुदेव म्हणे वेषांतर तेंचि । आश्रमान्तराची खूण होई ॥८॥

॥१२॥
द्रव्य तैसा न्याय प्रलापें पांडित्य । व्यर्थ शब्ददोष दरिद्यासी ॥१॥
दांभिक तो साधु, विवाहीं न विधै । अपेक्षा स्नानाची रुपास्तव ॥२॥
थोरां न सन्मान, दूर क्षेत्रीं पुण्य । समीप तें जाण क्षुद्र तीर्थ ॥३॥
केशधीरणा तें प्रमुख सौंदर्य । जीविका पुरुषार्थ, कलीमाजी ॥४॥
सत्यत्व तें धाष्टर्य, कुटुंबपोषण । करील तो जाण दक्ष येथें ॥५॥
कीर्तिलाभ हाचि धर्माचा उद्देश । चिन्हें ऐसीं स्पष्ट कलीमाजी ॥६॥
वासुदेव म्हणे अंतीं बळी तोचि । राव या जगतीं पुढती होई ॥७॥

॥१३॥
तस्कर नृपाचे दूत, तेंवी आप्त । इंद्रियांचे भोग साध्य तयां ॥१॥
परस्त्री, परधन, हरितील लोभें । कोणीही प्रजेतें न उरे त्राता ॥२॥
गिरिकंदरींचि सज्जन जातील । कष्टे भक्षितील कंद-मुळ ॥३॥
वृष्टिविहीनत्वें दुर्भिक्ष येईल । जर्जर होईल करें प्रजा ॥४॥
शीत, उष्ण, वायु, पर्जन्य कलह । दुर्दशा सर्वत्र ऐशापरी ॥५॥
विनाश यापरी होईल बहुत । क्षुधा व्याधित्रस्त अवशिष्ट ते ॥६॥
त्रिंशद्विशति वा वर्षे आयुर्मान । पावतील क्षीन सकल देह ॥७॥
वासुदेव म्हणे पाखंड माजेल । ज्ञातेही वरितील अधर्मातें ॥८॥

॥१४॥
तस्कर तैं नृप होतील समान । अनीतिसंपन्न तेणें प्रजा ॥१॥
अकर्म वा हिंसा जीविकेचा मार्ग । वरितील लोक अत्यानंदे ॥२॥
शूद्रप्राय जन होतील सर्वही । दैन्य तयां पाहीं मेंढयांसम ॥३॥
गृहस्थासमचि सर्वही आशमी । शालक सदनीं प्रमुख होई ॥४॥
वनस्पति त्याही निःसत्त्व होतील । मेघ वर्षतील विद्युल्लता ॥५॥
धर्मशून्य गृहें सकल होतील । यापरी, माजेल कलि यदा ॥६॥
वासुदेव म्हणे खरासम जन । होतां नारायण अवतरेल ॥७॥

॥१५॥
राया, धर्मरक्षणार्थ जगत्स्वामी । अवतार घेऊनि ऐशावेळीं ॥१॥
वारंवार येई जगद्रक्षणार्थ । प्रकारही तोच होई अंतीं ॥२॥
अनाचार ऐसा माजतां सर्वत्र । शंभल ग्रामांत विष्णुयश ॥३॥
विप्राच्या सदनीं प्रगटेल हरि । अष्टासिध्दि द्वारीं सेविती ज्या ॥४॥
सत्यसंकल्पादि सद्‍गुणसंयुक्त । कल्कि ’ देवदत्त ’ अश्वावरी ॥५॥
आरुढ होऊनि सवेग संचार । करुनि, संहार आरंभील ॥६॥
तस्करांसम जे कोटयवधि राजे । वधील खड्‍गातें घेऊनि त्यां ॥७॥
वासुदेव म्हणे नामधारी राव । वधूनियां देव सुखवी भक्तां ॥८॥

॥१६॥
यापरी सकल दुष्टांचा विनाश । होतां पसरेल उटिगंध ॥१॥
तया अंगरागगंधें चित्तशुध्दि । होऊनि जनांची भक्तिवृध्दि ॥२॥
पावूनि, अध्यात्मवृत्ति बळावेल । क्रमानें वाढेल सत्वागुण ॥३॥
हळु हळु बळ वाढेल जनांचे । कृतयुग ऐसें प्रगटेल ॥४॥
चंद्र, सूर्य, गुरु कर्कराशीमाजी । ते पुष्य नक्षत्रीं येति तदा ॥५॥
वासुदेव म्हणे मुख्य चिन्ह ऐसें । प्रथम युगाचें कथिती मुनि ॥६॥

॥१७॥
राजा, तव जन्मापासूनियां नंद । कुलासी प्रारंभ व्हावयासी ॥१॥
एकादशशत पंचदशवर्षे । जातील असावें ध्यानी तव ॥२॥
सप्तर्षीमाजी ते ऋतु तैं पुलह । भेदिती नक्षत्र तेंचि त्यांचे ॥३॥
शतवर्षे एका नक्षत्रीं त्यां स्थान । सांप्रत ते जाण मघांमाजी ॥४॥
हरिनिर्याणीही हीचि स्थिति होती । कृष्णासमक्षचि कलियुग ॥५॥
प्रभाव तयाचा चालला न तदा । उत्कर्ष तयाचा पुढती झाला ॥६॥
वासुदेव म्हणे दिव्याब्दें द्वादश । शत, कलिकाल कथिला ग्रंथी ॥७॥

॥१८॥
एकादशशत वर्षोत्तरीं नंद । होतांचि नृपाळ कलिसी बल ॥१॥
ऐसा कलिकाल जातां कृतयुग । येईल तैं चित्त शुध्द होई ॥२॥
तावत्काल ऐसें पतन जनांचें । सर्ववर्णीयांचे ध्यानीं असो ॥३॥
दुःख, दुःख तेणें माजेल सर्वत्र । अवशिष्ट एक कीर्तिमात्र ॥४॥
वासुदेव म्हणे इतर विनष्ट । होईल, समस्त ध्यानी असो ॥५॥

॥१९॥
शंतनूचा बंधू देवापि प्रसिध्द । तो सोमवंशज पुण्यवंत ॥१॥
इक्ष्वाकुकुळींचा तेंवी मरुराजा । बैसलें कलापामाजी तपा ॥२॥
युगान्तीं ते राव होतील पुण्यात्मे । वासुदेव त्यांतें आज्ञापील ॥३॥
वर्णाश्रमधर्म स्थापितील तेचि । राया, पुनरपि ईशाज्ञेनें ॥४॥
वसुंधरा, ’ माझी ’ ’ माझी ’ ऐसें किती । म्हणूनि नरकीं गेले राव ॥५॥
अभिमान ऐसा धरुनियां क्षुद्र । राया, चिरंजीव जगीं कोण ॥६॥
परंपराप्राप्त राज्य हें पुढती । नांदावें इच्छा ही बध्द करी ॥७॥
वासुदेव म्हणे निवेदिती मुनि । एकमेव जनीं कीर्ति राही ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP