मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध|
अध्याय ९० वा

स्कंध १० वा - अध्याय ९० वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥१०४०॥
निवेदिती शुक राया, द्वारकेचा । अधिकार मोठा काय वर्णू ॥१॥
वास्तव्य ज्या स्थानी केलें श्रीहरीनें । यादव भक्तीनें रमले तेथें ॥२॥
ह्र्दयंगम ती अंतर्बाह्य शोभा । विहारभूमि त्या जागोजागीं ॥३॥
प्रफुल्लित वृक्षलतांवरी भृंग । पिकही हर्षित करिती शब्द ॥४॥
मधुर त्य शब्दें विलासी जनांसी । अत्यानंद पोटी न मावेसा ॥५॥
वासुदेव म्हणे मार्ग त्या पुरीचे । वर्णूनि नृपातें कथिती मुनि ॥६॥

॥१०४१॥
वस्त्रालंकार तैं नेत्रकटाक्षांनीं । कामिनी हरुनि घेति चित्त ॥१॥
कंदुकादि क्रीडासाहित्यसंयुक्त । ललना गृहास जाती यदा ॥२॥
तदा दिव्यकांति पाहूनि तयांची । वृत्ति प्रेक्षकांची गुंग होई ॥३॥
राजपथीं सालंकृत मत्त हत्ती । अश्वही शोभती जागोजागीं ॥४॥
स्त्रियांसमवेत बहुरुपधारी । गृहाश्रमीं करी लीला कृष्ण ॥५॥
वासुदेव म्हणी राणीवशामाजी । पुष्पवाविकांची शोभा बहु ॥६॥

॥१०४२॥
स्फटिकासमान उदक जयांचे । सरोवरें तेथें ऐसी बहु ॥१॥
प्रफुल्लित तेथें कुमुदें, कल्हारें । सुगंधें व्यापिले सकल नभ ॥२॥
सारसादि पक्षी आकर्षिती चित्त । क्रीडा भगवंत करी तेथें ॥३॥
क्रीडेसमयीं त्या अमरांची वाद्ये । वाजताती हर्षे स्तवन होई ॥४॥
कृष्णस्त्रिया यदा मारिती पिचकार्‍या । भिजवी तयांला तदा कृष्ण ॥५॥
यक्षकांतांसवें कुबेराची क्रीडा । तैसीच हे क्रीडा गोविंदाची ॥६॥
क्रीडासक्त स्त्रिया धांवती त्या सदा । पुष्पांचा तैं सडा पसरें तेथें ॥७॥
वासुदेव म्हणे केशपाशमुक्त । कुसुमांचा गंध पसरे बहु ॥८॥

॥१०४३॥
पिचकारी घ्यावी हरुनि कृष्णाची । यास्तव धांवती समीप यदा ॥१॥
प्रणयलिंगन देती तो तयासी । राया, अपूर्व ती शोभा बहु ॥२॥
मारिती त्या यदा मिठी कंठाप्रति । वर्णू तरी कैसी शोभा ते मी ॥३॥
सहचरीसवें गजेन्द्रचि क्रीडे । प्रेक्षकांसी वाटे तयावेळीं ॥४॥
विलास यापरी करुनि बहुत । वस्त्रें ती रंजित सेवकांसी ॥५॥
अर्पिति, ती शोभा अपूर्वचि भासे । पाहूनि दृष्टीचे फिटती पांग ॥६॥
वासुदेव म्हणे गायक -वादक । नट- नर्तकांस मिळती वस्त्रें ॥७॥

॥१०४४॥
राया, श्रीकृष्णाचें चालणे-बोलणें । विनोद करणें तेंवी हास्य ॥१॥
प्रेमलिंगनादि सकल त्या चेष्टा । स्त्रियांच्या मानसा सौख्यकारी ॥२॥
तन्मयता त्यांची श्रीकृष्णस्वरुपीं । अन्य न तयांसी कांहीं भान ॥३॥
प्रियतमाचा जैं विरह तयांसी । तदा तेंचि चित्ती ध्यान तयां ॥४॥
चिंतनें त्याच्याचि वेडया-पिशा होती । काय बरळती न कळे कोणा ॥५॥
वासुदेव म्हणे कोणातेंहीं कांही । बोलाती त्या पाही परिसा आतां ॥६॥

॥१०४५॥
कुररीवो, तुज निद्रा न लवही । वटवट कां ही लाविलीस ॥१॥
क्षणभरी डोळा लागो बल्लभासी । नसे त्या विश्रांती जगत्कार्यी ॥२॥
कटकट ऐसी डोक्याशीं न करी । बाईंग, आंबएरी वदन तव ॥३॥
वाटे तूंही वेडी होसी आह्मांसम । लाभे न दर्शन म्हणुनि काय ॥४॥
म्हणूनीच निद्राभंग ऐशापरी । करिसी कुररी काय सांगें ॥५॥
वासुदेव म्हणे कुररीचा शब्द । ऐकूनि स्त्रियांस कृष्णस्मृति ॥६॥

॥१०४६॥
चक्रवाकी कांवो, मिटलेसी नेत्र । वाहसी प्रियास करुणस्वरें ॥१॥
सन्निध तो तुझ्या नसे कींग, सांगें । तूंही की कृष्णातें चिंतितेसी ॥२॥
पुष्पमाला त्याच्या पदकमलींची । लाभावी तुजसी इच्छिसी हे ॥३॥
म्हणूनीच कां गे, होऊनि तन्मय । बाहतेसी काय जगन्नाथा ॥४॥
वासुदेव म्हणे चक्रवाकीप्रति । यापरी बोलती कृष्णस्त्रिया ॥५॥

॥१०४७॥
रात्रींच्या समयी सागराचा शब्द । ऐकूनि गंभीर, वदती त्यासी ॥१॥
आपांपते, कांरे ओरडसी ऐसा । विश्रांति नको का तुजसी सिंधो ॥२॥
क्रीडासमयीं हे कुंकुमाची उटी । पुसली, पुष्पांची गेली शोभा ॥३॥
यास्तव आमुते खिन्नता ज्यापरी । तैसी कांहीतरी स्थिति तव ॥४॥
लक्ष्मी कौस्तुभही हरुनि कृष्णानें । तुज खिन्न केलें काय सांगें ॥५॥
वासुदेव म्हणे यास्तव आक्रोश । मांडिला कां सांग म्हणती स्त्रिया ॥६॥

॥१०४८॥
रजनीकांतासी म्हणती क्षयानें । तुजसी पीडिलें म्हणती जन ॥१॥
यास्तव क्षीणत्व म्हणती तुजसी । परी कृष्णस्मृति होई तुज ॥२॥
मधुर भाषणें ऐकावी तयाची । हेचि इच्छा मोठी भासे तव ॥३॥
याचि चिंतनानें कर्तव्यविन्मुख । जाहलासी काय आह्मांपरी ॥४॥
वासुदेव म्हणे चंद्राचें दर्शन । तयां कृष्णविण व्यर्थ भासे ॥५॥

॥१०४९॥
मलयमारुता, कृष्णकटाक्षांनीं । विदीर्णता ध्यानी आमुची घेई ॥१॥
ऐसेंही असूनि उद्दीपित काम । करिसी, हें कर्म उचित नव्हे ॥२॥
मेघा, मेघ:श्याम कृष्णाचा तूं मित्र । आठवूनि त्यास रडसी कांरे ॥३॥
जगद्वंद्याची त्या मैत्री हेचि चूक । अनुरक्तां दु:खदाय़ी हरि ॥४॥
वासुदेव म्हणे विरक्त जे तेचि । सौख्य भोगिताती, म्हणती स्त्रिया ॥५॥

॥१०५०॥
कोकिळे, अमृतासम तुझे बोल । प्रियाची नक्कल हुबेहुब ॥१॥
ऐसेच मधुर वल्लबाचे शब्द अर्पू काय तुज त्वरित कथीम ॥२॥
अचला, तूं ध्यान करिसी कोणाचें । वरिलेंसी ऐसें स्थिरत्व कां ॥३॥
वक्षस्थळीं आह्मीं इच्छितों चरण । कथीं तेचि मन इच्छी काय ॥४॥
सरितांनो, आह्मांसम तुह्मीं दु:खी । पाहूनि मानसी खेद वाटे ॥५॥
वल्लभानें चित्त चोरिलें आमुचें । जल तैं अंबुजें सुकूनीं गेलीं ॥६॥
मेघवर्षावानें सागर अद्यापि । सौख्य तुम्हांप्रति देईचिना ॥७॥
वासुदेव म्हणे तैसीच आमुची जाहली हे स्थिति म्हणती स्त्रिया ॥८॥

॥१०५१॥
हंसा, भेटलासी आह्मां योग्य समयासी ॥
येई, अल्पकाळ येथें वैस दुग्ध प्राशीं ॥१॥
निवेदी आह्मांसी प्रियतम कृष्णकथा ॥
कुशल असे की हंसा, वल्लभ आमुचा ॥२॥
’ तूंचि लाडकी ’ यापरी बोलला सर्वांसी ॥
आठवतो काय कदा आपुली तो उक्ति ॥३॥
काय आमुतें स्मरोनी तुज धाडियेलें ॥
हंसा, सांग जा आह्मींचि तया पाचारिलें ॥४॥
परी निक्षूनि तयासी निवेदीं हे हंसा ॥
कमलेसी आणूम नको समोरी आमुच्या ॥५॥
वंचूनि आह्मांतें भोगी एकटी विलास ॥
निष्ठा आमुचीही हंसा, जाणावी तैसीच ॥६॥
वासुदेव म्हणे ऐशा स्त्रिया एकभावें ॥
आठविती कृष्णाप्रति व्याकुळ ह्र्दयें ॥७॥

॥१०५२॥
राया, ऐशापरी होऊनि तल्लीन । कृष्णस्त्रिया धन्य जगीं झाल्या ॥१॥
सद्गति तयांसी अंतीं प्राप्त झाली । कथाही हे तारी श्रीकृष्णाची ॥२॥
मग सहवास कां न उध्दरील । पतिभावें ज्यांस कृष्णलाभ ॥३॥
सेवा ते जयांसी लाभली त्या धन्य । पुण्य न सामान्य खचित त्यांचें ॥४॥
धर्म, अर्थ, कार्यसिध्दि गृहस्थाची । दाविली जनांसी स्वयें कृष्णें ॥५॥
महारथी अष्टादश पुत्र-पौत्र । नांवे त्यांची एक कथितों आतां ॥६॥
वासुदेव म्हणे पुत्र श्रीहरीचे । ऐका, श्रेष्ठत्व तें लाभो जनीं ॥७॥

॥१०५३॥
प्रद्युम्न, अनिरुध्द, भानु, दीप्तिमान्‍ । सांब, मधु, जाण बृहद्भानु ॥१॥
चित्रभानु, वृक, अरूण , पुष्कर । तेंवी श्रुतदेव, सुनंदन ॥२॥
वेदबाहु , चित्रबाहु तैं विरुप । कवितो न्यग्रोध अंत्य जाणा ॥३॥
प्रद्युम्न रुक्मिणीपुत्र रुपवान । अनिरुध्द जाण पुत्र त्याचा ॥४॥
बल तया दशसहस्त्र नागांचें । वज्र नामें त्यातें पुत्र होता ॥५॥
रोचनेपासूनि जाहला तो धन्य । कुलाचें रक्षण केलें तेणें ॥६॥
प्रतिबाहु तेंव्वी सुबाहु पुढती । शांतसेन ऐसी वंशवेल ॥७॥
श्रुतसेन त्याचा पुत्र पुण्यवंत । वासुदेव वृत्त पुढती कथी ॥८॥

॥१०५४॥
ब्रह्मण्य याकुळीं सकलही राजे । अल्पायूही नसे दीन कोणी ॥१॥
लक्षावधि राजे वंशांत जाहले । गुरुचि कथिले तीन कोटी ॥२॥
सहस्त्राष्ट अष्टशत त्यांची संख्या । ऐकतों, हे राजा, ध्यानीं घेई ॥३॥
उग्रसेनाचें त्या वैभव हें ऐसें । वर्णूं तरी कैसें नृपा, वद ॥४॥
समुद्रमंथनसमयीं जें रण । संग्रामीं मरण तदा ज्यांसी ॥५॥
दैत्य ते जन्मूनि पीडिएती भूमीसी । हेंचि अवतारासी जाण मूळ ॥६॥
एकोत्तरशत कुळें यादवांचीं । मुख्य यादवांसी जगन्नाथ ॥७॥
वासुदेव म्हणे कृपेनें तयाच्या । अधिकार ऐसा यादवांतें ॥८॥

॥१०५५॥
लवही न दु:ख कदा यादवांसी । श्रीकृष्णपदाची प्रीति बहु ॥१॥
श्रीकृष्णकथेनें गंगेचें महत्व । राया, होई अल्प ध्यानीं घेई ॥२॥
अगाध चरित्र असे श्रीहरीचें । उध्दरले त्याचे शत्रु -मित्र ॥३॥
ब्रह्ययादि इच्छिती लक्ष्मी, ते तयाची । होऊनियां दासी राहियेली ॥४॥
नाममात्रें त्याच्या पातकांचा नाश वासुदेवचित्त ह्र्ष्ट होई ॥५॥

॥१०५६॥
प्रत्यक्ष वा पर्यायानें ऋषिकुळीं । धर्मवृध्दि केली श्रीकृष्णानें ॥१॥
सामर्थ्य तयांचे चितितां सद्धर्म । रक्षिला हें कर्म सहज तया ॥२॥
देवकीउदरीं जन्म हा लौकिक । वास्ताविक अज सर्वश्रेष्ठ ॥३॥
युध्दावीणही तो रक्षील धर्मातें । नियंता मायेतें तोचि एक ॥४॥
वृदावनस्थित जीवजात तेणें । उध्दरुचि नेले स्वसामर्थ्ये ॥५॥
कामानेंही गोपी गेल्या उध्दरुनि । यादवही जनीं धन्य केले ॥६॥
वासुदेव म्हणे कृष्णाचें सामर्थ्य । जगीं अलौकिक एकमात्र ॥७॥

॥१०५७॥
राया, बहु मत्स्यादिक । अवतार त्याचे श्रेष्ठ ॥१॥
परी कृष्णावतारीची । लीला अलौकिक त्याची ॥२॥
कृष्णकथा कर्मपाश । छेदीतसे हो नि:शंक ॥३॥
यास्तवचि मुमुक्षुनें । ऐकावी ही कथा प्रेमें ॥४॥
मनन-चिंतन हें होतां । कृष्णासक्ति लाभे भक्तां ॥५॥
अंती जिंकूनि काळासी । भक्त तदाकार होती ॥६॥
जाणा सुलभ उपाय । मुक्तिसीही एकमेव ॥७॥
बहु राजेही या पंथें । प्राप्त झाले कैवल्यातें ॥८॥
ऐसी श्रेष्ठ हरिकथा । श्रवण-मननें तारी जगा ॥९॥
दशमस्कंध ऐसा भावें । गावविला वासुदेवें ॥१०॥
वासुदेव म्हणे देवा । गोड मानावी ही सेवा ॥११॥

इतिश्री वासुदेवकृत अभंग-भगवताच्या दशम स्कंधाचा उत्तरार्ध समाप्त .
॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP