मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध|
अध्याय ६६ वा

स्कंध १० वा - अध्याय ६६ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥७७०॥

गोकुळांत राम असतां एकदां । येई आश्चर्याचा समय एक ॥१॥
करुष देशाचा पौंड्रक तो राव । म्हणे ’ वासुदेव ’ मीचि असें ॥२॥
द्वारकेचा कृष्ण तोतया जाणावा । निरोप माधवा कथिला दुतें ॥३॥
मीचि एक धीर सकल विश्वासी । त्यागीं आयुधांसी क्षणामाजी ॥४॥
नाही तरी होई युध्दालागीं सिध्द । उग्रसेनादिक हांसती तैं ॥५॥
वासुदेव म्हणे उत्तर तयासी । देई यदुपति ऐका काय ॥६॥

॥७७१॥
पौंड्रका, कृत्रिम आयुधें लेऊनि । मिरविसी जनी मम नामें ॥१॥
शंख-चक्रादींचा तडाखा तुजसी । कळला नाहींचि मुढमतें ॥२॥
आतां तो कळे सत्वरीच तुज । भक्षितील कंक, गृध्र देह ॥३॥
शरण यावया मज कथितोसी । श्वानादिक पोटी घालितील ॥४॥
वासुदेव म्हणे दुरात्मे जगतीं । न कळे करिती काय कदा ॥५॥
 
॥७७२॥
पौंड्रकाचा मित्र होता काशिराज । कृष्ण करि चाल तयावरी ॥१॥
काशिनगरीत होता तैं पौंड्रक । कृष्णासवें युध्द करिती दोघे ॥२॥
काशीराजसेना अक्षौहिणी त्रय । अक्षौहिणी द्वय पौंड्रकाची ॥३॥
कृत्रिम कृष्णासी निरिक्षी माधव । आंवरे न हास्य तदा त्याचें ।\४॥
शंख-चक्रादिक श्रीवत्सलांछ्न । वनमाला जाण कौस्तुभही ॥५॥
पीतपीतांबर ध्वजावरी पक्षी । भासला कृष्णासी नट दुजा ॥६॥
वासुदेव म्हणे पुढती संग्राम । जाहला दारुण उभयपक्षीं ॥७॥

॥७७३॥
प्रलयकालीन संहार जाहला । खेळचि मांडिला सुदर्शनें ॥१॥
पौंड्रकासी कृष्ण म्हणे ही आयुधें । टाकितों आतां घे अंगावरी ॥२॥
करितील नष्ट तव मिथ्याकृति । स्वयेंही तुजसी वधितील ती ॥३॥
बोलुनियां प्राण घेतला पौंड्रचा । क्रोधें काशिराजा तदा धांवे ॥४॥
शिर त्याचे क्षणी छेदूनि सत्वरी । फेंकी पुरद्वारी यदुनाथ ॥५॥
पाहुनि तें शोक करिताती स्त्रिया । नवल वासुदेव पुढती वाटे ।\६॥

॥७७४॥
विरोधभक्तिनें विमुक्त पौंड्रक । स्वरुपता त्यास प्राप्त झाली ॥१॥
काशिराजपुत्र खळवला चिती । शिवासी आराधी अटटहासें
कृष्णवध व्हावा हेचि धरी इच्छा । तुष्ट होई तदा भोलासांव ॥३॥
’ दक्षिणाग्रि ’ अभिचार देवता ती । म्हणे जा आराधी सिध्दीस्तव ॥४॥
योजिता तयासी विप्रद्वेष्टयावरी । विनष्ट सत्वरी होईल तो ॥५॥
विप्र-भक्तांवरी योजितां विपरीत । परिणाम स्पष्ट कथी शिव ॥६॥
वासुदेव म्हणे काशिराजपुत्र । आराधी अग्नीस घोर तपें ॥७॥

॥७७५॥
विकराल रुपें प्रगटाला अग्नि । शिखा, श्मश्रु जेंवी तप्तलोह ॥१॥
अग्नीचि वमती प्रखर ते नेत्र । गिळील त्रैलोक्य ऐसें वाटे ॥२॥
ओष्ठ तो आपुले चाटी रसनेनें । विवस्त्राचि जाणे रुप त्याचें ॥३॥
नाचवेई त्रिशूळ भोवती पिशाच्चें । लक्षूनि हरीचे नगर धांवे ॥४॥
उपवनें दग्ध करी द्वारकेचीं । कळतां हरीसी, फेंकी चक्र ॥५॥
चक्रासवें त्याचा जाहला संग्राम । चाले न विक्रम परी कांही ॥६॥
वासुदेव म्हणे उलटला अग्नि । स्वस्थानीं येऊनि पीडा देई ॥७॥

॥७७६॥
काशिराजपुत्रां ऋत्विजांसमेत । करी भस्मसात क्षणार्धे तो ॥१॥
सुदर्शन परी सोडी न तयासी । वाराणसीक्षेत्रीं प्रलय माजे ॥२॥
सभा, सुदनें तैं सौंध, गजशाला । रथ, अश्वशाला दग्ध होती ।\३॥
धान्याचीं कोठारें विध्वंसित होती । पुर ऐशारिति दग्ध पाहीं ॥४॥
निःपात यापरी करुनियां चक्र । येई द्वारकेंत कृतकार्य ॥५॥
ऐकवील किंवा ऐकेल ही कथा । दग्ध पातकांचा गिरि त्याच्या ॥६॥
वासुदेव म्हणे सामर्थ्य हरीचें । वर्णवेल कैसें मानवासी ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP