मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री किसनगिरी विजय| अध्याय बारावा श्री किसनगिरी विजय चरित्र अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा ॥ श्री सद्गुरु बाबांची आरती ॥ श्रीसमर्थ सद्गुरु पादुकास्तोत्र श्री किसनगिरी विजय - अध्याय बारावा देवगडचे श्री किसनगिरी महाराज यांचा जन्म सन १९०७ साली झाला आणि त्यांनी १९८३ साली समाधी घेतली. Tags : kisangirisantकिसनगिरीसंत श्री किसनगिरी विजय - अध्याय बारावा Translation - भाषांतर श्री गणेशाय नम: ॥ श्री दत्तात्रयाय नम: । श्री हनुमंताय नम: । श्री शनिदेवाय नम: ॥१॥नमो शारदा ब्रह्मसूता । नमो सिध्देश्वर । गजताता । मार्कंडेय मुनी महंता । नमन माझे सकळासी ॥२॥नमन माझे किसनगिरी । जगतगुरु योगी शंकरा । आणिक नमितो भास्करगिरी । संतसेवेची तत्परी ॥३॥किसनगिर कथेची गोडी । श्रोते श्रवण केली आवडी । नामरुपाची करुनी सांगडी । परि उतरिले जनांसी ॥४॥तूं दयाळू कृपाळू संतजनांचा । आणिक माई भगिनीचा । अवतारु गुरुदत्ताचा । पंचक्रोशीत मिरविला ॥५॥दु:खीतांचा दु:ख हारु । मुमुक्षुंचा मोक्ष तारु । आदिपुरुष ॐकारु । नमन असे तुजला ॥६॥कथा ऐकिली संतजने । तयासी मोक्षपदा नेणे । आणिक काही मागणे । न आवडे माझिया मना ॥७॥मशिद मंदिर भक्तांचे घर । एक मानिसी तूं ईश्वर । करुनी जगावरी उपकार । स्वदेहासी कष्टिले ॥८॥आता ऐका श्रोतेजन । कथा सांगितली मुळापासून । अकरा अध्याय निरुपण । श्रीकिसनगिरी कथेचे ॥९॥ज्या देही अवतरले । त्या देहाचे कार्य संपले । हे सद्गुरुने जाणिले । म्हणुनी पुढे बोलिले ॥१०॥गुरुदास भास्करगिर । तयांसी बोले गुरुवार । सप्ताह सोहळा लवकर । करावा ऐसे बोलले ॥११॥जमवावे संतजन । करावे कीर्तन पारायन । आणिक करावे अन्नदान । तोषवावे जनांसी ॥१२॥त्याच अवधित किसनगिर । स्थिर राहीले असनावर । प्रकृतीस जडला आजार । त्रास बहु होतसे ॥१३॥भक्तजन येती दर्शनास । परि काहीच न बोले तयांस । तेणे अंतरी गुरुदास । दु:खी कष्टी होतसे ॥१४॥ऐसी स्थिती पाहून । रुग्णालयी बाबांसी नेऊन । सुप्रसिध्द वैद्यांकडून । नाना उपचार करविले ॥१५॥करवंदे वैद्य शस्त्रज्ञ । तयाने बहूत कष्ट घेउन । सद्गुरुंची सेवा घडावी म्हणून । शुश्रृषा केली बाबांची ॥१६॥आणिक वैद्य पटर्वधन । तयासी आली सेवा घडून । त्यांनी औषधोपचार करुन । पाहिले सद्गुरु बाबांसी ॥१७॥नगर येथील दवाखान्यात । बाबाअ होते सेवका समवेत । तेथे त्याच अवधीत । घटना एक वर्तली ॥१८॥सुर्वे नामक अधिकारी । नेवाशास होते नोकरीवरी । निरोप दिला तयाचे घरी । भेटीस यावे म्हणुनी ॥१९॥निरोप कळता तयासी । त्वरीत आला घरासी । घरी काळाची फेरी चहुदेशी । तयावर झडपली ॥२०॥ह्रदयविकाराचा झटका आला । तव तो कासाविस झाला । वार्ता कळता मित्रमंड्ळीला । जमा झाले झडकरी ॥२१॥तव ता म्हणी मित्रासी । मज जाणे आहे बाबांच्या भेटीसी । बाबा ज्या ठिकाणासी । तेथे मला न्यावे हो ॥२२॥मग तातडीने गाडी करुन । निघाले नगरचा मार्ग धरुन । रुग्णालयासी नेउन । उपचार केले तयांवरी ॥२३॥त्याची रुग्णालयात बाबा होते शिष्या समवेत । सुर्वे बाबांच्या भेटीप्रत । येथपर्यंत पोहोचले ॥२४॥बाबांचे दर्शन घेउन । राहिले खाटेवर पडून । बाबा तयासी देखून । समाधान भेटीचे मिरविले ॥२५॥याचि रुग्णालयात । आपण राहावे निर्धास्त । ऐसे बाबा तयासी बोलत । वेळ्काळ जाणोनि ॥२६॥तेवढया पुरते बरे वाटले । पुन्हा झटके येउ लागले । मित्रमंडळी घाबरले । सुर्वेची स्थिती पाहूनि ॥२७॥मग त्यांनी विचार करुनी । पुण्यास न्यावे ऐसे म्हणुनी । तेथील वैद्यास विचारुनी पुढचा मार्ग क्रमियेला ॥२८॥पुढे लागता वाटेला । यमाचा फासा पडला । अखेरचा निरोप घेतला । सुर्वेंनी सकळांचा ॥२९॥मित्रमंडळी घाबरली । म्हणे देवा कैसी वेळ आली । तैसीचि गाडी फिरविली । नेवाशास आणिले ॥३०॥सुर्वेची वार्ता कळाली । तालुका कचेरी बंद झाली । अधिकारी मंडळी जमा झाली । अखेर निरोप देण्यासी ॥३१॥जमले सरकारी अधिकारी । राजकारणी पुढारी । अंत्ययात्रेसी झडकरी । येउनी पोचले त्या ठायी ॥३२॥दहन विधी उरकून । सर्व आले मागे परतून । म्हणती कोण काळपाशातून । आजपर्यंत सुटला हो ॥३३॥किसनगिरींनी ही वार्ता ऐकुनी । खिन्न झाले आपुले मनी । म्हणे अखेरची भेट होऊनी । आमुचे पुढे पोचले हो ॥३४॥इकडे बाबांवरी उपचार । वैद्य करिती वारंवार । परि आहे कोणता आजार । तो ना उमगे तयांसी ॥३५॥बाबा बोलती वैद्यासी । दुखणे नाही आम्हासी । न्यावे आम्हा देवगडांसी । ऐसे भक्ता बोलिले ॥३६॥पाठक वैद्य बोले गुरुदासास । आजार काही नसे बाबांस । परि सेवित नाहीत अन्नास । आम्ही काय करावे ॥३७॥मग त्या रुग्णालयातून । आले गडावरी घेउन । किसनगिरींची इच्छा मानून । कामासी लागले भक्तजन ॥३८॥किसनगिरी बोलती भक्तांस । बांधून घ्यावे समाधीस । सुरुवात करावी सप्ताहास । वेळ कासया घालविता ॥३९॥ऐसे ऐकिता गुरुदास । म्हणे आपुल्या शब्दांस । मग जमउनी भाविकांस । इच्छा बाबांची सांगितली ॥४०॥भक्तजनांनी ऐकुनी । मानवले सकळांच्या मनी । सप्ताहाची तयारी करुनि । सोहळ मांडिला गडावरी ॥४१॥गांवोगांवीचे गांवकरी । आणून देती माधुकरी । सकलजनांस किसनगिरी । आशिर्वाद देती प्रेमाने ॥४२॥सप्ताहाचे चवथे दिनी । बाबा बोलती गुरुदासालागुनी । ऐसे बाटते माझ्या मनी । श्रीरामकथा रस घ्यावा ॥४३॥आम्हास श्रीरामाची आवड । काम झाले अवघड । ते नोहेत नुसते दगड । निर्गूणरुपी प्रभू असे ॥४४॥तो तुम्हासही साह्यकारी । ऐसे बोलती किसनगिरी । पूर्ण कृपा गुरुदासावरी । श्री किसनगिरींनी केली हो ॥४५॥बाबांची इच्छा ऐकोनी । तैसेच केले गुरुदासांनी । सुप्रसिध्द गायक आणूनी । श्रीरामायण ऐकविले ॥४६॥गायक जणु गंधर्व । सुधीर फडके तयाचे नांव । शुध्द अंत:करणी भाव । श्रीरामायण गात असे ॥४७॥पंचवीस हजार समुदाय । मंत्रमुग्ध होऊनी जाय । आणिक सांगावे नवल काय । समाजा जणू समाधी लागली ॥४८॥इकडे गुरुभुवनी । श्री किसनगिरी महामुनी । रामकथा श्रवण करुनी । समाधान मिरविले ॥४९॥चवथ्या दिनापासुनी । बाबांनी अन्नत्याग करुनी । सोहं धुनी लाउनी । निवांत पडुनी राहिले ॥५०॥अधिक फाल्गुन पंचमी । ते अधिक फाल्गुन त्रयोदशी । समाप्ती झाली या दिवशी । सप्ताहाची तेधवा ॥५१॥पुढे बाबा बोलू लागले । समाधीचे काम अपूर्ण राहिले । ते पाहिजे पूर्ण केले । उशीर नका लावू आता ॥५२॥गुरुदासास खूण कळली । मनी चिंता वाटू लागली । मम वत्साची माउली । कोण्या वनी जाईल ॥५३॥दृश्य ते अदृश्य होईल । आठव तो मनी राहील । पुन्हा कव्हा चर्ण दावील । ऐसे मनी वाटतसे ॥५४॥सद्गुरुंची आज्ञा थोर । तेथ न चले मनाचा विचार । बांधिअले समाधी मंदीर । श्रीगुर्वाज्ञा पाळुनी ॥५५॥जेव्हा झाले समाधान । अंतर्ध्यान पावले बाबा किसन । मध्यान्ह समयी समाधिस्थ होऊन । ब्रह्मरुपी मिळाले ॥५६॥तरी तो दिन रविवार । रात्र उलटली तीन प्रहर । सोडिला देहाचा व्यवहार । गुरुभुवनाच्या ठिकाणी ॥५७॥दिनकर उगवला पूर्वेसी । वार्ता प्रसरली चौदेशी । भक्तगण झाले उदासी । वार्ता ऐकुनी बाबांची ॥५८॥दुरदूरच्या भक्तालागुनी । वार्ता कळविली आकाशवाणीनी । मिळेल त्या साधने घेउनी । धाव घेती गडावरी ॥५९॥एक बाबांचे ध्यान । लागले सकळ जनांलागून । दूर जाई नयनापासून । मूर्ती बाबांची तेधवा ॥६०॥कुणी पायी लगबग धावती । कुणी वाहने घेउनी येती । काय सांगे तयाची स्थिती । दु:खसागरा खवळला ॥६१॥हातातली कामे टाकुनी । सैरावैरा येती धावोनी । कुणी हंबरडा फोडोनी । कैसे झाले म्हणताती ॥६२॥अफाट जमला समुदाय । म्हणती अमुची बापमाय । आम्हा सोडूनी कैसी जाय । आक्रोश तेधवा करीताती ॥६३॥तेथील श्री देवगडक्षेत्र । दिसू लागले अतिविचित्र । तेथील वृक्षांचा मित्र । निमाला ऐसे भासतसे ॥६४॥तेथील वृक्ष अति कोमाईले । उदासवाणी दिसू लागले । स्मशानरुप झाले । वृक्षपाषाणे तेधवा ॥६५॥गायीवासरे हंबरडा फोडिती । अन्नपाणी ना सेविती । पहा मुक्या प्राण्याची स्तिती । सद्गुरुसाठी तळमळली ॥६६॥श्वान झाले दीनवाणी । वृक्षानिकट राहती पडूनी । ऐशारिती किसनगिरींनी । दु:ख दिधले सर्वासी ॥६७॥आमुची माय किसनगिरी । तुजवीण आम्हा कोण तारी । दीनादु:खीतांचा कैवारी । सोडूनी कैसा गेलासी ॥६८॥जगदुपकारासाठी अवतरला । भक्तिमहिमा वाढविला । कष्टउनी स्वदेहाला । सोडुनी कैसा गेलासी ॥६९॥दया क्षमा धरुनी अंतरी । देह झिजविला चंदनापरी । कृपा करुनी गुरुदासावरी । सोडुनी कैसा गेलासी ॥७०॥नाव आणिली मध्यंतरी । येथवर होता आमुच्या बरोबरी । सोडूनी आम्हा जलोदरी । टाकुनी कैसा गेलासी ॥७१॥वनी हिंडतसे हरिणी । पाडस झाले केविलवाणी । तैसा आमुचा श्रीकिसनमुनी । सोडून कैसा गेलासे ॥७२॥ऐशा रिती भक्तजन । आक्रोश करिती आठवून । अंत्ययात्रेचे दर्शन । डोळे भरुन घेताती ॥७३॥आठव करिती मायभगिनी किसनगिरीचे गुण आठवुनी । कृष्णबंधु म्हणूनी । बोधे केला आम्हासी ॥७४॥जैसा कृष्ण गोकुळीचा । बंधु होता द्रौपदीचा । तैसाचि तूं आमुचा । बंधु झाला होतासी ॥७५॥आमुच्यासाठी किसनगिरींनी । तोडविली आडरानी । येतसे पायी चालुनी । घरी आमुच्या भेटण्या ॥७६॥बा सुखाचे राहा म्हणून । जात होताअ आशिर्वाद देऊन । आम्हासी सुख देउन । दु:ख आपण सोशिले ॥७७॥ऐशा रीती दु:खसागरी । बुडाली जनता सारी । इकडे महायात्रेची तयारी । भक्तगणे करविली ॥७८॥गुरुभुवनापासून । यात्रा निघाली तेथून । समाधीपासी आणून । अंत्यदर्शन घेतले ॥७९॥देह समाधिस्थ करुनी । श्री किसनगिरींचा जयजयकार करुनी । जन परतले म्लान वदनी । घराकडे आपुलिया ॥८०॥तरी एका श्रोतेजन । चिरंजीव असती बाबा किसन । आत्मा गेला देहातून । परि तो तेथेची राहिला ॥८१॥समाधीत राहूनी । दु:ख निवारील चक्रपाणी । आपुला भाव दृढ धरुनी । वंदन तयासी करावे ॥८२॥दृश्य ते अदृश्य झाले । निराकारामधी राहीले । इच्छिले ते देऊ लागले । भक्तजनांसी आपुलिया ॥८३॥नित्य जाउनी समाधीपासी । दृढभाव धरुनी मानसी । दु:ख सांगावे किसनगिरीसी । निवारण होईल तत्काल ॥८४॥ईश्वर प्राप्ती झाल्यावरी । मग नाही जन्मफेरी । ऐसे वेदही चारी । सांगून गेले पूर्वीचि ॥८५॥युगायुगाच्या ठिकाणी । परमेश्वर अवतार धरुनी । नेमिले ते कार्य करुनी । अदृश्यपणे मिरवितसे ॥८६॥दैवी संपत्तीची साठवण । तयासी मोक्षपद जाण । आसुरी संपत्तीची खूण । नरकवास भोगिती ॥८७॥कवणेही वंशी जन्मला । परि ईश्वर भजनी लागला । म्हणोनि देवानिकट पोहचला । सत्संगती धरुनिया ॥८८॥करण्या स्वदेहाचा उध्दार । कर्तव्य करावे बहु थोर । मग सर्व अंगे ईश्वर । सांभाळितो तयासी ॥८९॥पवित्र गोष्ट ज्ञानासारखी । त्याविण कोणी नसे सुखी । आणिक सत्संगती सारखी । संगत नसे इतरांची ॥९०॥फलाशा मनी धरुन । देवास भजती जन । सत्यस्वरुप जाती विसरून । परमेश्वराचे तेधवा ॥९१॥दृढ धरावे संतचरण । तेणे होईल स्वधर्म पाळण । जिवात्म्याची स्थिती जाणून । सन्मार्गाने चालावे ॥९२॥ईश्वराच्या साह्यावाचून । सुखी होऊ पाहती अज्ञजन । अंती पश्चाताप पावून । दु:खाचा वाटा भोगिती ॥९३॥असो आता श्रोतेजन । समाधिस्थ झाले बाबाकिसन । देवगड क्षेत्री संतजन । जयजयकार तयांचा करिती ॥९४॥वाचा वदता श्रीकिसनगिर । पळूनी जाती दु:खे दूर । भूत पिशाच्च होती दूर । नाम तयाचे ऐकता ॥९५॥बाबा बोलत होते जनांसी । मानव जन्म दिला तुम्हासी । विसरू नका देवासी । कदाकाळी जनहो ! ॥९६॥जन्मी आले आणि गेले । कर्तव्य काहीचि नाही केले । मेले तरी माहीत नाही झाले । ऐसी स्थिती होत असे ॥९७॥मातीचा देह मातीत । जाणार हे निश्चित । भोगून कर्माचे प्रायश्चित । मगच सुट्क्का होत असे ॥९८॥माती बोले कुंभाराशी । तूं जरी खोदितो मजसी । परी अंत:समयासी । मीचि तुजला पुरवीन ॥९९॥लाकुड बोले सुतारासी । तूं तोडितोस मजसी । मीची जाळील । तुजसी भस्म करीन क्षणार्धे ॥१००॥ऐशा रीति वर्म धर्म । जाणोनि करा शुध्द कर्म । नित्य आचरावे सत्कर्म । एक निश्चय करोनि ॥१०१॥द्वादशाध्यायीचे कथन । केले असे सद्द्गुरुकृपेनं । श्रीगुरुदास भास्करगिरीने । वेळोवेळी बोधीयेले ॥१०२॥र्ह्स्व दीर्ध अक्षर खूण । काना मात्रा तपासून । तयावरी खूण करुन । शुध्द करी जनार्दन ॥१०३॥गुरुदासास नमस्कार । माझा असो निरंतर । श्री किसनगिरीचे कार्य थोर । पुढे नेटाने करितसे ॥१०४॥श्री किसनगिरीचे वैकुंठगमन । ह्या अद्यायी केले कथन । याचे करिता पठण । सुख समाधान मिळेल ॥१०५॥ऐसे संत जगी येती । महान कार्य करुनी जाती । आठवणी ठेवुनी जाती । विवेक वैराग्य धरुनिया ॥१०६॥मोह ममतेचा त्याग करुनी । भक्तीपंथे मार्ग क्रमुनी । देवऋषींच्या संन्निध जाउनी । निवांत बैसले योगी हे ॥१०७॥पवनगतीचा हनुमान । ऐसे होते श्री बाबाकिसन । दत्त अवतार म्हणवून । प्रसिध्द झाले या जगती ॥१०८॥नेमिले कार्य करण्यासाठी । प्रत्यक्ष अवरतले जगजेठी । जगदोध्दार करण्यासाठी । देवग्ड क्षेत्र उभारिले ॥१०९॥धन्य धन्य श्री किसनगिरी । त्यागमूर्ती श्री मुनीश्वरा । सांडूनिया जगपसारा । वैकुंठवास सेवियेला ॥११०॥समाधीत चैतन्य अससी । मागितले ते भक्तास देती । स्तुती करता प्रगटा होसी । धन्य धन्य जगी तूं एक ॥१११॥आता मागणे काय मागावे । तुमची कृपा सर्वत्र आहे । अनंत नयन वृत्त आहे । यात संशय नसेची ॥११२॥हे चरित्र पठण करिता । नाश पावे भवरोग चिंता । सांकडे पडेल भगवंता । प्रेम भक्ती पाहुनिया ॥११३॥ग्रंथी ठेवुनी एक भाव । श्रोते असोत चिरंजीव । आम्ही क्रमितो अमुचा गांव । राम राम आमुचा सकळांसी ॥११४॥इति श्री नासिकेतरचित । श्री किसनगिरी बाबांचे चरित्र ॥ वैकुंठगमननामपवित्र । द्वादशोऽध्याय: गोड: ॥११५॥॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥हरेराम हरेराम रामराम हरेहरे । हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्णकृष्ण हरेहरे ॥॥ समाप्तोऽयं ग्रंथ: ॥ॐ नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा N/A References : N/A Last Updated : November 30, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP