श्री किसनगिरी विजय - अध्याय सातवा
देवगडचे श्री किसनगिरी महाराज यांचा जन्म सन १९०७ साली झाला आणि त्यांनी १९८३ साली समाधी घेतली.
श्रीगणेशाय नम: । श्री गुरुवे नम: । श्री निवृत्तिनाथाय नम: । दशकर पंचमुखाय नम: ॥१॥
आता नमितो एकनाथा । जनार्दनाच्या भक्तिसूता । भागवताचा अमोल गाथा देवविला भक्तांसा ॥२॥
मागिले अध्यायी जाण । बाजीरावास डोळे येऊन । ज्ञानदेवाचे दु:ख निवारुण । सुखी केले तयासी ॥३॥
मूळ ब्रह्मयाची निजखूण । सांगितली भगिनीकारण शुध्द भक्तिभावाने । मंदिरी जावे दरुशना ॥४॥
आता पुढिले कथन । श्री भास्करगिरिच्या स्फुर्तीनं । त्याचे होता दर्शन । भाव उमटे भक्तीचा ॥५॥
भास्करगिरि म्हणाल कोण । हे दत्तकपुत्र जाण । दत्तकविधान सोहळा करुन । उत्तराधिकारी नेमले ॥६॥
सन एकोणिसशे पंच्याहत्तर । जेष्ठ शुध्द बीज बुधवार । दत्तदेवगडावर । अपार सोहळा झाला असे ॥७॥
बहु जमली भक्त मंडळी । शिंपीले सडे घातली रांगोळी । तेथ किसनगिरी तपोबळी । संतमंडळीत शोभतसे ॥८॥
सेवा करिता थकले शरीर । पर्रि नियम चालावा साचार । म्हणून पुढील कारभार । भास्करगिरीस दिधला ॥९॥
श्रीसंत मुक्ताई आदिशक्ती । महतनगरची संस्था विख्याती । ब्रह्मानिष्ठ गुरुभक्ती । श्रीराम महाराजांची असे ॥१०॥
वयाच्या पंचवीसाव्या वर्षात । पूर्ण भक्ति अभ्यासात । किसनगिरीने वरदहस्त । तयाचे माथा ठेविला ॥११॥
अपूर्व सोहळा पाहण्यात । बहुत जमले हरीचे दास । भजन किर्तानाचा जयघोष । दत्तक विधान चालले ॥१२॥
गुरुशिष्याचे नाते जुळले । जैसे मच्छिंद्र गोरक्ष शोभले । ऐशा रीति कार्य सोपविले । तयांच्या हाती बाबांनी ॥१३॥
गुरु शिष्य दोघेजण । झाले पहा चतुर्थ नयन । शोभविले नंदनवन । प्रवराकाठी तयांनी ॥१४॥
हरीभक्तपरायण । ठेवी संताचा मान । आवडीने भाविक कीर्तन । श्रवण करिती तयाचे ॥१५॥
ज्ञानबोध सांगे जनांस । विसरू नका हरिनामास । श्रीकिसनगिरीचा सहवास । लाभला आपणा प्रारब्धे ॥१६॥
भास्करगिरीने केली सुधारणा । द्वादशीच्या पंक्तीभोजना । पाकशाळेची अपूर्व रचना । आपुल्या डोळे पहावी ॥१७॥
एक भाग स्वयंपाकाचा । एक असे पंक्तीभोजनाचा । नेम प्रत्येक महिन्य़ाचा । धर्मदाने सांभाळिती ॥१८॥
दर महिन्याची वारी । नेमिली दर गांवावरी । आसपासचे गांवकरी । आपुला वाटा उचलिती ॥१९॥
भोजनशाळा अतिसुंदएर । उदाहरणे लिहीली मनोहर । रामकृष्णाचा जयजयकार । भोजनशाळे चालतो ॥२०॥
आता मंदिराची शोभा पाहावी । भासतसे स्वर्गमंदिर जेवी । किर्तनाची जागा तिही । दत्त चैतन्यासमोर ॥२१॥
तेथे अखंड वीणा गर्जतो । नाम गजर चालतो । प्रभुनामाचा जयघोळ होतो । पुण्यक्षेत्री जनहो ॥२२॥
नाना वृक्ष मनोहईर । निसर्ग सौंदर्य सुंदर । स्वर्गलोकीचे पुण्यनगर । जणू भासते भक्तांसी ॥२३॥
नित्य आरती भजन । प्रभात समयी गीतापठण । भास्करगिरीच्या मुखानं । भक्त सेवन करताती ॥२४॥
साधुसंतांचा ठेवी आदर । भासे जणू संताचे माहेर । बोलण्याचा भाव मधूर । शांती दया बहु असे ॥२५॥
येऊन पहावे गुरुभवन । तेथे चारदेवाची खूण । व्याघ्रांबराचे आसन । सदगुरुंचे असे हो ॥२६॥
तेथे बाबांचे पत्र वाचता । विसर पडतो या देहाचा । अंतरीच्या आत्म्याचा । शोध घ्याहो म्हणतसे ॥२७॥
भक्तगण तेथे येती । किसनगिरींचे दर्शन घेती । गुरुभवनाची शोभा देखती । शांतपणे बैसोनी ॥२८॥
गायी पाळील्या मनोहर । त्यांसी सांभाळण्य्या नोकर । घास चारा भरपूर । गायी गुरांस घालितसे ॥२९॥
पूर्वी बालवयापासून । गायी रक्षिल्या श्रीकिसनगिरीनं । तैसेची सांभाळिल्या । श्रीगुरुदासे प्रेमाने ॥३०॥
गोदुग्ध अति पवित्र । तेणे देह होतसे शुध्द । तैसेचि गुणकारी गोमूत्र । शरीररोगाकारणे ॥३१॥
तरी तेथील कारभार । गोठ्याची रचना अतिसुंदर । जैसे राहण्याचे घर । तैसीच व्यवस्था असे की ॥३२॥
बहुत नोकर चाकर । चोख चाले कारभार । तयासवे भास्करगिरी । बंधूप्रेम ठेवितसे ॥३३॥
विनोदाचे बोलणे । सदा हसतमुख राहणे । तेणे सकळांची मने । जिंकली असे प्रेमाने ॥३४॥
आत्मा तोची ईश्वर । देह असे नैश्वर । ज्याने जाणिले बरोबर । तेथे भेदाभेद कैसा ॥३५॥
किर्तन गायन करोनी । जनांस सांगे संतवाणी । तयाची मधूर अमृतवाणी । जन ऐकती प्रेमाने ॥३६॥
तरी गांवागांवावरुन । पाचारीती तयाकारण । मग तया गांवी जाऊन । भक्तां उपदेश करीतसे ॥३७॥
आणिक बहु केली सुधारणा । मोटारगाडीची योजना । येण्यां भक्तांस दर्शना । शासनाने सुरु केली ॥३८॥
घाट बांधिला सुंदर । वरती मनोरे मनोहर । प्रवरेकाठी शोभा अपार । वाढविली तयाने ॥३९॥
शासनाने सहकार्य देऊन । तेथील सुधारणा पाहून । घाटास बहु मदत देऊन । सोय केली भक्तांची ॥४०॥
या संताचे कार्य थोर निर्मिले । संताचे माहेर । नयनरम्य मनोहर । देवगड क्षेत्र निर्मिले ॥४१॥
जगी संत अवतार घेती । जन कल्य़ाणाचे कार्य करिती । सांगती न्याय धर्म नीती । अखंड सेवा करुनिया ॥४२॥
पुण्यक्षेत्रीचा विहार । ते साधुसंतांचे आगर । सांगे नीती भास्करगिरी । आपुल्या शब्दे जनांसी ॥४३॥
पुण्यक्षेत्री चालतांनी । करा सदाचाराची जोडणी । तेथील नीतीनियमांनी । चालत राहावे सुपंथे ॥४४॥
पुण्य पुरुषाच्या चरित्राचा । ठेवा ह्र्दयी आदर्शाचा । चालतांनी मनाचा । भाव दृढ ठेवावा ॥४५॥
जे पुण्यपुरुषांस आवडणार । तेचि करावे साचार । सावधानतेचा आधार ॥ आपुले आपण सांभाळी ॥४६॥
पुण्यपुरुषाचा उपासनाक्रम । ह्याप्रमाणे पाळावा नेम । ठरवू नये आपुल्या मनाने । जैसे तैसे आचरावे ॥४७॥
संकल्प पापमय । अवस्था विकारमय । पुण्यक्षेत्री तयाचे भय । कटाक्षाने पाळावे ॥४८॥
पुण्यक्षेत्रीचे तीर्थोदक । उदी प्रसाद आणि । प्रेमळजन भाविक । आनंदाने सेवावे ॥४९॥
पुण्यक्षेत्रा जमल्यास । जागवावे स्वआश्रमास । आपुले हस्ते स्वयंपाकास । गोडी आणावी अवीट ॥५०॥
विरागशील भावनेने । आणि विमल चित्ताने । संत आवडीच्या प्रेमाने । सेवा तयांची करावी ॥५१॥
तयाचे समाधी मंदिरात । प्रवेशतांनी असावे जागृत । जयाने केले उपकार बहुत । शरण जावे तयासी ॥५२॥
तरी संतनीती प्रमाणे । वागावे नीती नियमाने । विनयपूर्वक ठेउनी आचरणी । तयाचे घ्यावे आशिर्वाद ॥५३॥
दुष्ट वृत्तीचा नाश होवो । सदा समत्वास जागा हो । सदा विश्वाचे कल्याण होवो । अखेर आशिर्वाद संतांचा ॥५४॥
ऐसे रीती गुरुदासाने । श्रीकिसनगिरी कृपेने । तयाच्या इच्छेप्रमाणे । पुण्यक्षेत्र वाढविले ॥५५॥
हा दहा कलमांचा संदेश । सुखी करील भाविकांस । थोर गुरुशिष्यास । दास विनवणी करीतसे ॥५६॥
गुरुदासाचे कार्य महान । तेच केले येथे वर्णन । भाविक गाती तयाचे गुण । धन्य गुरुपुत्र म्हणोनि ॥५७॥
तरी ईश्वराच्या ज्ञानावाचून । जे केले ते व्यर्थ जाणून । अनन्य भाव शरण जाउन । आधार घ्यावा तयांचा ॥५८॥
या ज्ञाननौकेतूनि । तरून जाशी गुरुकृपेनी । तेचि घ्यावे समजाउनी । सात्विक सज्जन भक्तांनी ॥५९॥
ऐशा रीति चालविला नेम । सेवा करितसे निष्काम । प्रभू दत्तात्रयाचे धाम । सौंदर्यरुपे सजविले ॥६०॥
आता पुढीले कार्य । कृपा करील गुरुवर्य । गंगागिरीचे अवतारकार्य । पुढीले अध्यायी श्रवण करा ॥६१॥
मुक्तेश्वर यागाचे कथन । आणिक गंगागिरीचे दर्शन । गंगामायीचे प्रगट दर्शन । आपणांसी घडेल ॥६२॥
ह्या देवगडचा दत्तयाग । पुण्यक्षेत्रीचा योगायोग । तेथे संतमहामत्म्यांचा ओघ । सरिते समान लोटेल ॥६३॥
तरी आता श्रोतेजन । चित्त । करुनी सावधान । भक्तिभावे श्रवण करुन । मोक्ष मुक्काम गाठावा ॥६४॥
इति श्री नासिकेतरचित । श्री किसनगिरी बाबांचे चरित्र ॥ गंगेसम असे पवित्र । सप्तमोऽध्याय गोड: ॥६५॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 25, 2019
TOP