श्री किसनगिरी विजय - अध्याय चवथा

देवगडचे श्री किसनगिरी महाराज यांचा जन्म सन १९०७ साली झाला आणि त्यांनी १९८३ साली समाधी घेतली.


श्रीगणेशाय नम: ॥ सद‍गुरु शंकरायनम: ॥ ॐ नमोजी सद्‍गुरु देवा ॥ नमो केशवा माधवा ॥१॥
गर्जना चाले पंढरपुरी ॥ संतसखा चंद्रभागेतीरी ॥ तेथे संत कीर्तन करी ॥ प्रेमभरे नाचतसे ॥२॥
संत जनीचे बरोबर ॥ जाते ओढिले भराभर ॥ गोरोबांचे लहान पोर ॥ नाम ध्यानी तुडविले ॥३॥
संकट पडता भक्तांसी ॥ धावोनि येतसे वेगेसी ॥ सोडविले दामाजीसी ॥ रुप पालटोनी आपुले ॥४॥
ऐसा अनंतोपकारी जगत्पालक तूं मुरारी ॥ वारंवर चरणावरी ॥ दास मस्तक ठेवितसे ॥५॥
आता ऐकावे कथन ॥ सांगेन सद्‍गुरु कृपेकरुन ॥ श्रोते सात्विक सज्जन ॥ कथारस परिसावा ॥६॥
कोमल तंव वैखरी ॥ तूं दयाळू किसनगिरी ॥ तुझिया कृपेच्या लहरी ॥ दु:खातून सोडविती ॥७॥
जैसे घडले चमत्कार ॥ तैसे वदविले साचार ॥ बाबांचे बहु उपकार ॥ झाले असती जनावरी ॥८॥
तरी उपकार कशाशी म्हणावे ॥ हेच खरे जाणून घ्यावे ॥ महासंकट येता धावावे ॥ संतचरण सेवेशी ॥९॥
परमार्थ नाही सापडला ॥ अतो संतकृपे लाभला ॥ भक्तिमार्गासी लागला ॥ संत उपकार जाणावा ॥१०॥
संसारतापे तापला ॥ बध्दपणे आचरला ॥ तोचि पुढे साधक बनला ॥ संतोपकार जाणावे ॥११॥
बद्धाचा मुमुक्षु बनला ॥ साधकाचा सिध्द बनला ॥ माया भ्रांतीचा मोह सुटला ॥ संत उपकार जाणावा ॥१२॥
शरीर दु:खानें बहु पिडीला ॥ वैद्य हकिमांचा इलाज खुंटला ॥ उदी भस्माने नीट झाला ॥ संत उपकार जाणावा ॥१३॥
दैवताचा कोप झाला ॥ अंगी भूताचा संचार झाला ॥ चौकी बांधिताची गुण आला ॥ संत उपकार जाणावा ॥१४॥
रात्रभरी कीर्तनी बैसला मनावरी परिणाम झाला ॥ ध्यान पूजा करु लागला ॥ संत उपकार जाणावा ॥१५॥
कुणांस पाहिजे परमार्थ ॥ कुणास पाहिजे अर्थ स्वार्थ ॥ जाणोनि तयाचा भावार्थ ॥ तैसेचे त्यासीं देत असे ॥१६॥
देऊळगांवची एक कुमारी ॥ होती मुकी बिचारी ॥ तिज आणता गडावरी ॥ वाचा आली तियेसी ॥१७॥
जंव कुमारीस दु:ख लागले ॥ माता पिता बहुदु:खी झाले ॥ नाना उपाय शोधिले ॥ परि उपाय काही चालेना ॥१८॥
ऐशा रिती राहाटी ॥ सदा राहे दु:खी कष्टी ॥ काय करावे शेवटी ॥ उपाय काही चालेना ॥१९॥
मग सर्व मार्ग खुंटले ॥ दु:ख मनातची राहिले ॥ पूर्व कर्माचे फळ आले ॥ त्यासी काय करावे ॥२०॥
अनंतरुपी परमेश्वर ॥ सत्ता त्याची विश्वावर ॥ मार्ग तयाचा लवकर ॥ सापडेना जनांसी ॥२१॥
पुढे पहा योग कैसा घडला ॥ सहज मुकीचा विषय निघाला ॥ तंव एक गृहस्थ वदला ॥ देवगडाची कहाणी ॥२२॥
म्हणे हीस गडावरी न्यावे ॥ किसनगिरी साधूंसी सांगावे ॥ सांगतील तैसे वागावे ॥ गुण पडेल निश्चयेसी ॥२३॥
महादु:खे भयंकर ॥ दूर झाली गडावर ॥ दत्तप्रभुंचा अवतार ॥ मानिती जन बाबांसी ॥२४॥
नेम धरुन गुरुवार ॥ मुलीस न्यावे गडावर ॥ किसनगिरीचा चमत्कार ॥ अनुभवरुपे कळेल ॥२५॥
बहुत जन तेथे येती ॥ दत्तप्रभुचे दर्शन घेती ॥ बाबा भाव ठेवा म्हणती ॥ अवघ्या जनांकारणे ॥२६॥
आपण तेथेची जावे ॥ बाबांसी दु:ख सांगावे ॥ बोलती ते ऐकून घ्यावे ॥ आपुल्या हिताकारणे ॥२७॥
ऐसी ख्याती ऐकून ॥ पाहा योगची आला घडून ॥ मग कुमारीस घेऊन ॥ देवगडासी आणिले ॥२८॥
सुंदर दत्ताचे मंदीर ॥ बाबांचे आसन महाद्वारा समोर ॥ चहुबाजुनी भक्तगण ॥ दर्शन दुरोन घेताती ॥२९॥
मग तेथे उभयता जाउन ॥ हात जोडले दुरुन ॥ सुखाचे राहा म्हणून ॥ बाबा आशिर्वाद बोलले ॥३०॥
मुलीकडे दृष्टी करुन ॥ बाबांनी घेतले जाणून ॥ म्हणे पांच खेटी करुन ॥ भाव ठेवा देवावरी ॥३१॥
बाबाचे शब्द ऐकुन ॥ उदी घेतली पदरी बांधून ॥ नम्रभावे हात जोडून ॥ निरोप घेतला बाबांचा ॥३२॥
पुढे नित्य नेमाने ॥ पंच गुरुवार खेटी करुन ॥ पुढे पाहा विलक्षण ॥ चमत्कार काय जाहला ॥३३॥
शेवटच्या गुरुवारी ॥ मुक्काम केला गडावरी ॥ भक्त मंडळी भजन करी ॥ रात्र बहु लोटली ॥३४॥
मध्यरात्रीच्या प्रहरी ॥ भक्तगण झोपले निर्धारी ॥ तैसीचि आई आणि कुमारी ॥ निद्राधीन झाले हो ॥३५॥
तव एकाएकी मुकी मुलगी ॥ मोठ्याने ओरडू लागली ॥ मंडळी दचकून उठली ॥ काय झाले म्हणतसे ॥३६॥
तव कुमारी बोले ॥ बाबांनी मज मारिले ॥ गुप्तरुपी बाबा प्रगटले ॥ अचानक त्या ठायी ॥३७॥
मुलगी बहू मधूर बोले ॥ जनांसी नवलच वाटले ॥ मुकि यासी बोलके केले ॥ धन्य धन्य किसनगिरी ॥३८॥
 मातापिता आनंदले ॥ म्हणे हे देवचि अवतरले ॥ जयाने हे जाणितले ॥ तयांसी देव भेटला ॥३९॥
श्रोते ऐकोनि सावधान ॥ आता ऐका पुढील कथन ॥ प्रवरामाईचे दर्शन ॥ सहजचि घडेल ॥४०॥
बहिरवाडी पवित्र क्षेत्र ॥ काळभैरवाचे स्थान पवित्र ॥ मध्यधारात असे जागृत ॥ संजीवनी नाथ हे ॥४१॥
किसनगिरी महामुनी ॥ नित्य येती तये स्थानी ॥ भैरवाची भेट घेउनी ॥ गोधेगांवी जातसे ॥४२॥
तेथे अगस्तीची वस्ती ॥ तया ठायी जाऊनी गभस्ती ॥ भेटूनी त्या समाधी प्रती ॥ गडावरी येतसे ॥४३॥
एकोणीसशे शेहेचाळ सालास ॥ महापूर आला प्रवरेस ॥ कार्तिक महिना मंगळवारास ॥ प्रवरा अफाट भरली असे ॥४४॥
दोन्ही तीर सोडून ॥ पाणी दूरवर पसरून ॥ धर्मशाळाही बुडून ॥ गेली असे तेधवा ॥४५॥
नदीकिनारी थडी ॥ असे टरबुजांची वाडी ॥ गच्च भरली असे होडी ॥ टरबुजांनी तेधवा ॥४६॥
जो जाये नदीकठी ॥ तेणे भरूंनी आणावी पाटी ॥ टरबुजे असती भली मोठी ॥ घागरी एवढे म्हणा की ॥४७॥
ओढे नाले नदीकिनारी ॥ कुणाची वस्ती तिये शेजारी ॥ वाहवले असती गुरेढोरी ॥ गंजीचारा तेथवा ॥४८॥
कुणाचे संसार वाहवले ॥ अंगाचे कपडेही गेले ॥ ऐसे संकटी सापडले ॥ नदीकाठचे रहिवासी ॥४९॥
दिवसाचे तीन प्रहर ॥ भयानक दिसे महापूर ॥ चहुकडे माजला कहर ॥ नुकसानी बहु झाली असे ॥५०॥
तये वेळी बाबा किसन ॥ पैलतीरी येई जावून ॥ कुणास दिसे अलिकडून ॥ कुणांस पलिकडे दिसतसे ॥५१॥
ऐसा कहर पाहूनी ॥ बाबांचे मन गेले भांबाउनी ॥ म्हणती आपण येथे असोनी ॥ उपाय काही शोधावा ॥५२॥
कुणी रानोमाळ पळती ॥ गुरेढोरे घेवोनी जाती ॥ आपुला जीव वाचविण्या प्रती ॥ जो तो धडपड करीत असे ॥५३॥
मग बाबांनी काय केले ॥ मडकी पाणवठयावरी गेले ॥ कुमारी अनुसूयेच्या हाताने ॥ पूजा केली प्रवरेची ॥५४॥
मग ध्यानस्थ बैसले मुनी ॥ सोहं धुनी लावुनी ॥ मग प्रवरा जाय उतरुनी ॥ संथपणे वाहतसे ॥५५॥
दिनकर मावळे गगनी ॥ नदीकाठी येउनी कोणी ॥ जात असे पाणी पाहूनी ॥ म्हणे उतार लागला ॥५६॥
दुसरे दिनी सूर्योदयी ॥ लोक तेथे येऊनी पाही ॥ तयेवेळी सर्व काही ॥ पाणी उतरुनी गेले हो ॥५७॥
मग गांवोगांव चर्चा चाले ॥ नदीकाठी बाबा दिसले ॥ प्रवरामांईस पूजिले ॥ म्हणोनि पाणी उतरले ॥५८॥
द्वादशवर्षे तप करुनी ॥ बसत होते प्रवरेत जाउनी ॥ त्या तपाची फळे गुणी ॥ येथ कामा आले असती ॥५९॥
ऐसे बहु चमत्कार ॥ पुढे वदविन गुरुकृपेवर ॥ पंचतत्वांचा अधिकार ॥ तयांच्या हाती असे ॥६०॥
एकदा आषाढीची वारी ॥ गांवकरी निघाले पंढरी ॥ बाबांस बोलती त्या अवसरी ॥ आपण चलावे दर्शना ॥६१॥
बाबा बोलती जनांशी ॥ तुम्ही जावे पंढरीसी ॥ आमचा निरोप विठठलासी ॥ कळवावा तेवढा ॥६२॥
पंढरीची वारी ॥ आहे माझ्या घरी ॥ ऐसे म्हणोनि किसनगिरी ॥ गडावरी परतले ॥६३॥
मग गांवीचे भाविक जन ॥ पंढरीस निघाले मेळ्याने ॥ नगरमार्गे गाडी धरुन ॥ पंढरीसी पोहचले ॥६४॥
चंद्र्भागेवरी जाऊन ॥ स्नान घेतले उरकून ॥ दर्शनाची रांग लावून ॥ उभे राहिले तिष्ठत ॥६५॥
तंव महाद्वारा सामोरी ॥ उभे दिसले किसनगिरी ॥ रांग सोडिओनि झडकरी ॥ चरण धरिले तयांचे ॥६६॥
अंगात बारबंदी ॥ काखे लटकली झोळी ॥ गोजिरा मूर्ती सावळी ॥ काठी घेवोनी उभी असे ॥६७॥
दर्शना समाधान पावले ॥ म्हणे विठठलची भेटले ॥ वायुरुपी येथे प्रगटले ॥ भक्तकामना पुरवावया ॥६८॥
मंडळी मंदिरी जाउनी ॥ विठठलरुक्मीणीचे दर्शन घेवोनी ॥ पुन: आले परतोनी ॥ बाबांस शोधिती त्याठायी ॥६९॥
चार द्वारे शोधिले ॥ परी बाबा नाही दिसले ॥ हे तो आश्चर्यची झाले ॥ जो तो शोधी मनासी ॥७०॥
मग मंडळी घरी येवोनी ॥ देखती गडावरी जाउनी ॥ तंव किसनगिरी महामुनी ॥ तेचि ठायी भेटले ॥७१॥
देवगडावरी आसन ॥ असती शनि हनुमान ॥ तया ठिकाणी राहून ॥ चैतन्यरुपी नांदतसे ॥७२॥
शिवप्रभु तेथ वसे ॥ नारदमुनीही राहतसे ॥ मार्कंडेय वस्ती असे ॥ दक्षिणभागी गडाच्या ॥७३॥
नाना दैवते प्रगटून ॥ घेतली तेथे जागा मागून ॥ बाबांनी तयाचा बहुमान ॥ ठेविला असे आदरे ॥७४॥
सिध्दपूर येथील गृहस्थ ॥ रामराव जाधव गुरुभक्त ॥ तयासी भेट साक्षात ॥ किसनगिरीने दिधलीसे ॥७५॥
भेट दिली म्हणाल कैसी ॥ तो खिळला होता अंथरुणासी ॥ येणे न झाले गडासी ॥ ध्यास बाबांचा धरिला ॥७६॥
ऐशा समयी तपोधन ॥ प्रगटले तेथे जावून ॥ तयाच्या माथ्यावरुन ॥ हस्त फिरविला प्रेमाणे ॥७७॥
आजार बहु कठीण ॥ बैसले अंथरुन धरुन ॥ नाईलाज झाला म्हणून ॥ तळमळ अंतरी करीतसे ॥७८॥
कपाळी भस्म लावून ॥ क्षणात झाले अंतर्धान ॥ गुप्त झाले घरीतून ॥ भक्ता भेट देवोनी ॥७९॥
रामरावांसी नवल झाले ॥ तात्काळ आजारातूनी उठले ॥ तैसेचि गडावरी आले ॥ बाबांच्या भेटीकारणे ॥८०॥
झालेला वृत्तांत ॥ जनापुढे ते सांगत ॥ भक्तांसाठी भगवंत ॥ धावोनी येई वेगेसी ॥८१॥
इती श्री नासिकेतरचित ॥ श्री किसनगिरी बाबांचे चरित्र ॥ गंगेसम असे पवित्र ॥  चतुर्थोऽध्याय: गोड: ॥८२॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 25, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP