मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री किसनगिरी विजय| अध्याय दहावा श्री किसनगिरी विजय चरित्र अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा ॥ श्री सद्गुरु बाबांची आरती ॥ श्रीसमर्थ सद्गुरु पादुकास्तोत्र श्री किसनगिरी विजय - अध्याय दहावा देवगडचे श्री किसनगिरी महाराज यांचा जन्म सन १९०७ साली झाला आणि त्यांनी १९८३ साली समाधी घेतली. Tags : kisangirisantकिसनगिरीसंत श्री किसनगिरी विजय - अध्याय दहावा Translation - भाषांतर श्री गणेशाय नम: सदगुरुची धरुनी कास । तेणे आणिले दसकोस । पुरवी भक्त कामनेस । ऐसा थोर गुरु महिमा ॥१॥तरी मागील अध्यायीचे कथन । गुरुशिष्य दोघेजण । आणिक सवे भक्तगण । यात्रा करुनी पातले ॥२॥त्या यात्रेचे वर्णन । कैसे चमत्कार आले घडून । शबरी मायीस रामदर्शन । नवविधा भक्ति सांगितली ॥३॥देही असुनी विदेही । योगसाधन तेही नाही । दत्त म्हणुनी कोठेही । भक्तासमीप उभा असे ॥४॥बाबांचे शरीर जरी थकले । मन हे चिरामय राहिले । आत्मरंगी सदा रंगले । भान देहाचे नसेची ॥५॥परि तळमळ अंतरी । भक्तजनांवर कृपा करी । श्रीगुरुदास भास्करगिरी । ज्ञानामृत पाजितसे ॥६॥गाय जगाची जननी । चरण्यास्तव जाय वनी । परि ओढ तिये बहू लागुनी । पाडसाची आपुलीया ॥७॥बाबांनी सांगितला संदेश । तेणे टळतील बहु दोष । होईल पातकांचा नाश । स्मरण करिता तयांचे ॥८॥नाना शास्त्र पठण केले । अनंत दैवते पूजिले । आत्मज्ञानावाचून गेले । व्यर्थ पंडितपण ते वाया ॥९॥बाबांचे पत्र वाचता जाण । सहज ओळखेल आत्मखूण । श्रोते व्हावे सावधान । सार्थक साधण्या आपुले ॥१०॥ज्याची भक्ती एकनिष्ठ । तेणे देव होय संतुष्ट । जरी येता महा अरीष्ट । तमा ना धरी तयाची ॥११॥आत्म्याचे वास्तव्य देहपूर । तेथे जीवाजीपंत ठाणेदार । तयाच्या हाती कारभार । देहगांविचा असे ॥१२॥तयासी सनद देहगांवची । दिली असे शंभर वर्षाची । कलम तपशीलवार गांवची । आबादी राखावी सांगतसे ॥१३॥काम क्रोधे हे रयत । ते जिवाचे करिती अहित । प्रवृत्तीशी खेळ खेळत । कधिच नोहे निवृती ॥१४॥तरी ऐकावए न तयाचे । गावे पोवाडे हरी कथेचे । तेणे सदा चित्ताचे समाधान होईल ॥१५॥आशा मनीषा दुष्ट वासना । कधी स्पर्शु न द्यावए मना । तेणे अंतरीची सद्भावना । जागृत न राहे कधीच ॥१६॥स्वधर्माची वागणूक । ही भक्तिसी नाही बाधक । तेणी अखंडा साधक । निष्काक भक्ति पावतसे ॥१७॥शांती क्षमा असु देणे । ल्यावे वैराग्याचे लेणे । मग काय भक्तिसी उणे । आणिक साधन न लगे ॥१८॥भजनी किर्तनी आदर । हे क्षेत्र संतांचे माहेर । जगत्पालक सर्वेश्वर । याचि देही नांदतसे ॥१९॥ऐसी कलमे कबुल करुन । तुम्हांस पाठविले जाणून । तरी हे जाल विसरून । बाधक होईल सर्वस्वे ॥२०॥ऐसे सद्गुरु किसनगिरी । तळमळूनी सांगे अंतरी । थोर संत उपकारी । जडजीवांसी तारीतसे ॥२१॥प्रत्यक्ष आत्मा पांडुरंग । वाणी तयाची अभंग । ऐशा महात्म्याचा सत्संग । मोक्षपदासी धाडीतसे ॥२२॥एका जनार्दनी शरण । तैसे असावे गुरुस्मरण । मग सहज जन्ममरण । फेरा चुकवी जिवाचा ॥२३॥थोर योगी श्री किसनगिरी । वैकुंठ उभारिले प्रवरातीरी । साक्षात दत्त अवतारी । कलियुगी प्रगटला ॥२४॥ पाहता तयाचे मुख । जिवांना लाभे सुख । दूर पळोनि जाय दु:ख । सुखाचा अंकूर फुटतसे ॥२५॥ऐसे बाबांचे वचन । पाळतील संतजन । सदा निरंतर ध्यान । गुरुवचनी ठेवावे ॥२६॥ज्यांसी देवाजीचा लळा । त्यांसी कैसा अन्य चाळा । अनंतरुपी प्रगटे सावळा । साक्षात्कार देत असे ॥२७॥तिर्थ श्रीदेवगड क्षेत्र । महाराष्ट्रात पवित्र । दैवते येउनी एकत्र । तेथे वास्तव्य करीतसे ॥२८॥यारे यारे संतजन । घ्या जन्माचे हीत करुन । श्रीकिसनगिरीचे थोरपण । कैचे कळी अज्ञाना ॥२९॥आता उदी भस्माचे चमत्कार होई नाना आजारावर । सहावे अध्यायी सविस्तर । ऐकविले हे श्रोत्यांसी ॥३०॥तैसेच उडविलेल्या गायीव्वर । उदी फेइता अंगावर । स्तनपान करिती सत्वर । किसनगिरीच्या कृपेने ॥३१॥साधक मोठे विलक्षण । गुरु करिती अघोरीपण । वाईट विद्या घेती शिकून । त्रास देण्या जगासी ॥३२॥चेटक नाटक भानामती । ही विद्या निचाच्या हाति । आपणही नरका जाती । सहकुटूंबे आपुल्या ॥३३॥कुणी चेटकी होऊनी । स्वयंपाक नेती उडउनी । मुलाबाळांस पोसवूनी । परिवार चालविती आपुला ॥३४॥कुणाच्या खळयात रास । पडाली असे भरघोस । ती उडउनी नेई घरास । धान्य साठा करितसे ॥३५॥कुणी गाईगोठयात शिरुन । गाईच्या खुंटयासी लिंबु पुरुनी । दुध उडविती जाणून । कास जाळिती गायीची ॥३६॥कुणी ओली बाळंतीण । चेटकी तेथेही जाउन ॥ बाळा देखता डोळे भरुन । दु:ख पीडा लावितसे ॥३७॥कुणांस मोहिनी देउनी । त्याचे धन घेती लुबाडूनी । सुवासिनीस पगोर लावुनी । नाना कृत्ये करीतसे ॥३८॥कुणाचा करी गर्भपात । कुणाच्या लेकराचा करी घात । कुणांस चढविती वात । जडीबुटी देउनिया ॥३९॥कुणांस मूठ मारिती । कुणांस सुया टोचिती । कुणास बिबे उभारिती । प्रपंच चालाया आपुला ॥४०॥एकाने दु:ख लावावे । दुसर्याने नीट करावे । तयाकडूनि द्रव्य घ्यावे । भोंदुगिरी करुनिया ॥४१॥तरी चेट्की भानामती । येथे खुंटेल तयाची मती । क्षणात पळोनि जाय व्याधी । उदी चौकी बांधिता ॥४२॥पांडुरंग शिंदे सिध्दपुरचे । भाविक भक्त बाबांचे । तयाचे बंधूने किलो दगडाचे । पीठ केले चावुनी ॥४३॥तो दिवस होता शनिवार । मग त्या आणिले गडावर । नेउन त्यासी बाबांसमोर । वृत्तांत सर्व कथियेला ॥४४॥हरभर्यासम दगड चावून । हा घेत असे खावून । ऐकून आश्चर्य करी जन । म्हणे भूतबाधा असावी ॥४५॥बाबांनी उदी देउनी । चौंकी दिली बांधुनी । क्षणात शक्ति गेली पळुनी । भूतबाधेची तेधवा ॥४६॥मग रतन शुध्दीवर येउन । धरिले बाबाचे चरण । आपणा सारिखा महान । कोण आहे म्हणतसे ॥४७॥रतनलाल बंधु तयाचा । बंद झाला दगडा खाण्याचा । ऐसा महिमा श्रीकिसनगिरीचा । चरण न सोडी तयाचे ॥४८॥ऐसेच टोक्याचे हवालदार । तयाची कन्या सुकुमार । मंदाकिनी नामे सुंदर । नेली काळाने हिरोनी ॥४९॥एक वर्षाची कुमारी । स्थिर झाली अंथरुणावरी । नाथा मोहीम झडकरी । उदी शिरावरी टाकीतसे ॥५०॥बाबांची उदी घेउनी । आणखी अंगावर झोकुनी । किसनगिरीची प्रार्थना म्हणुनी । कुमारीजवळ बैसले ॥५१॥पाहा हो उदीचा प्रताप । श्वास चालला आपोआप । आश्चर्य करिती मायबाप । म्हणे वाचविले बाबांनी ॥५२॥मग तैसीच गडावर आणून । सांगे बाबांना वर्तमान । बाबा म्हणती टोक्याहून । एवढ्यात आम्ही आलो येथे ॥५३॥आम्हावरी ठेविला भाव । तुम्हासी आला अनुभव । म्हणुन वाचला जीव । आपुलिया कन्येचा ॥५४॥देव भावाचा भुकेला । किसनगिरी नामे अवतरला । भक्तिमार्ग वाढविला । उपकार बहु केलासे ॥५५॥काय होऊ ऊतराई । तूं जगाची बापमाई । सांभाळिसी ठायीठायी । निजभक्तांसी आपुल्या ॥५६॥जिवात्मा निर्विकार । जडला प्रकृतीचा विकार । चहुबाजूनि अंधार । झाला असे वाटते ॥५७॥परि सद्गुरु बहु थोर । अनंत नयन जगदीश्वर । दयेचा जणू महासागर । मोक्षमार्ग दाखवितसे ॥५८॥दयाळू माझा किसनगिरी । सेवका घडो तुमची चाकरी । भक्तरक्षक मुरारी । भोळ्या भक्तां सांभाळितो ॥५९॥तुमचे गुणवर्णन । ईश कृपे घड्ले मजकारण । सदा नयनास तुझे चरण । पहावे ऐसे वाटते ॥६०॥या मुखाने भजन । करावे रात्रंदिन । दोही करे टाळी वाजऊन ॥ रामकृष्ण म्हणावे ॥६१॥सदा लागो तुझा ध्यास । आणीक नसे मागायास । हात जोडूनी लीनपणास । जागृत सदा असेन ॥६२॥मतीहीन मी परदेशी । लोटांगण घालिती चरणासी । क्षणात भवभ्रांती हरसी । ऐसा थोर तुझा महिमा ॥६३॥धन दारा सूत नारी । हे तो भक्तीचे वैरी । करुनी तयांची चाकरी । काय मोक्ष मिळेल ॥६४॥सगे सोयरे आप्तजन । नाही हे कोणाचे कोण । अखेर एकलाचि प्राण । मातीसंगे जात असे ॥६५॥म्हणे हे माझे ते माझे । नित्य वाहतो कबाड ओझे । हे कां मोठेपणास साजे । त्याचे त्यासी कळेना ॥६६॥इति श्री नासिकेतरचित । श्री किसनगिरी बाबांचे चरित्र ॥ गंगेसम असे पवित्र । दशमोऽध्याय गोड: ॥६७॥॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 30, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP