स्कंध ४ था - अध्याय २४ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१७३
पृथूसम राज्य करी ‘विजिताश्व’ । बंधूसीही राज्य अर्पी सौख्यें ॥१॥
अंतर्धानविद्या अर्पी तया इंद्र । तेणें तया तेंच पुढती नाम ॥२॥
‘शिखंडिनी’ पत्नी, पावक, पवमान । शुचि, ऐसे तीन पुत्र त्यातें ॥३॥
वसिष्ठशापें ते अग्निचि जन्मले । योगमार्गे गेले निजस्थानीं ॥४॥
‘नभस्वती’ तया होती अन्य कांता । ‘हविर्धान’ पुत्रा प्रसवली ॥५॥
राजधर्म तया कठोर वाटला । पुण्यमार्गे गेला मुक्तीसी तो ॥६॥
वासुदेव म्हणे हविर्धानाप्रति । पुत्रषट्‍कप्राप्ति पूर्वपुण्यें ॥७॥

१७४
बर्हिषद, गय, शुक्ल, कृष्ण, सत्य । तेंवी जितव्रत नामें त्यांचीं ॥१॥
बर्हिर्षद योग यज्ञांत निष्णात । तयानें बहुत यज्ञ केले ॥२॥
यज्ञमंडपही करी भिन्न भिन्न । दर्भे त्या आच्छत्र अवनीतल ॥३॥
‘शतद्रुति, नामें समुद्राची कन्या । कांता बर्हिषदा रुपवती ॥४॥
स्वरुपें तियेच्या अग्नीतेंही काम । बाधला, चलन देवांतेंही ॥५॥
‘प्रचेते’ तियेसी पुत्र झाले दश । नामें गुणें एक शास्त्रज्ञ ते ॥६॥
तयश्चर्येस्तव सागरीं ते जाती । दर्शन तयांसी शंकराचें ॥७॥
वासुदेव म्हणे शिवदर्शनाचा । वृत्तान्त मैत्रेयां विदुर पुशी ॥८॥

१७५
दुर्लभ शिवाचें दर्शन नरासी । मैत्रेय निवेदी विदुराप्रति ॥१॥
प्रचेते तयार्थ जातां पश्चिमेसी । सरोवर मार्गी रम्य दिसे ॥२॥
हंस चक्रवाक विविध कमळें । प्रचेते हर्षले पाहूनियां ॥३॥
इतुक्यांत रम्यनाद येई कर्णी । विस्मित ते मनीं तालसुरें ॥४॥
पार्षदांसवें तो शिव येती वरी । प्रचेते अंतरीं हृष्ट तदा ॥५॥
शंकरांसी भावें केला नमस्कार । बोध त्या शंकर करिती प्रेमें ॥६॥
वासुदेव म्हणे शिवोक्त उपदेश । देऊनियां चित्त परिसा आतां ॥७॥

१७६
प्रचेत्यांचें असो सर्वदा कल्याण । हेतु ओळखून प्रगट झालों ॥१॥
परात्पराचे त्या भक्त प्रिय मज । धर्माचाररत शतजन्म ॥२॥
कंठील, तो पावे विरंचीचें रुप । तयाहूनि श्रेष्ठ पावे मज ॥३॥
परी आम्हांसीही वैष्णवपदाची । प्राप्ति होई अंतीं देवांसवें ॥४॥
वैष्णव तें पद एकाचि जन्मांत । पावती सद्भक्त भक्तिमार्गे ॥५॥
आतां मी तुम्हांसी निवेदितों एक । जपावा तो गुप्त पंथ नित्य ॥६॥
वासुदेव म्हणे बोलूनियां ऐसें । स्तोत्र श्रीविष्णुचें कथिती शिव ॥७॥

१७७ (शिवोक्त विष्णुस्तोत्र)
ईश्वरा, आत्मज्ञ श्रेष्ठ त्या भक्तांसी । उद्धरण्या घेसी दिव्यरुप ॥१॥
ऐशा मोक्षदा, हा घेई नमस्कार । विश्वासी आधार तूंचि एक ॥२॥
चित्तदेवता तो वासुदेव तूंचि । अहंची तूं शक्ति संकर्षणा ॥३॥
प्रद्युम्नही तूंचि बुद्धीची देवता । मनाची देवता अनिरुद्ध तूं ॥४॥
ऐशा हे सर्वेशा, तुज नमस्कार । सकलही शास्त्रकर्ता तूंचि ॥५॥
व्यक्ताव्यक्त रुपें आकारलें जें जें । स्वामी तूं तयातें, नमन घेईं ॥६॥
वासुदेव म्हणे स्तवन यापरी । भोळा सांब करी पुरुषाचें त्या ॥७॥

१७८
भगवंता, तुझें लोकोत्तर रुप । भक्त उत्कंठित दर्शनासी ॥१॥
दर्शन दयाळा, देईं रे आम्हांसी । उतावीळ चित्तीं झालों बहु ॥२॥
सर्व इंद्रियांचा एकचि विषय । होई, निरामय प्रभो, तूंचि ॥३॥
घननीळरुप चारु चतुर्बाहु । रेखींवचि बहु सरळ नाक ॥४॥
नेत्रकमलें तैं धनूचि भ्रुकुटि । दिव्य दंतपंक्ति रम्य गाल ॥५॥
कर्ण - केशांचीही अपूर्व ते शोभा । शंख, चक्र, गदा, पद्म शोभे ॥६॥
पीतांबरतेज शालूही झळके । श्रीवत्सांकित तें वक्षस्थल ॥७॥
कसोटीवरी ते सुवर्णाची रेखा । वक्षस्थलीं शोभा लांछना तैं ॥८॥
वासुदेव म्हणे कौस्तुभ कुंडलें । स्कंधही शोभले सिंहासम ॥९॥

१७९
श्वासोच्छ्‍वास घेतां हाले । बलित्रय तें शोभलें ॥१॥
आवर्तचि तो उदकीं । तैसी गंभीर ते नाभि ॥२॥
जणुं पाचारी जगासी । पूर्वस्थळ त्यातें इच्छी ॥३॥
मेखला तैं पीतांबर । तेणें रुप तें उज्जवल ॥४॥
अवयव सप्रमाण । शोभा अपूर्व ते जाण ॥५॥
दृष्टि स्थिरावतां तेथें । अन्यत्र न जाई कोठें ॥६॥
वासुदेव म्हणे रुद्र । वर्णी यापरी स्वरुप ॥७॥

१८०
पुढती प्रार्थना करी भोलानाथ । नखाग्रेचि नाश अज्ञानाचा ॥१॥
यास्तव दयाळा, दाखवीं चरण । भक्तावीण अन्य प्रिय न तुज ॥२॥
विश्वपते, केंवी वर्णावें तुजसी । नाहीं सामर्थ्यासी तुलना कोठें ॥३॥
भृकुटीभंगेंही संहारील विश्व । मृत्यु तो भक्तांस बाधेचिना ॥४॥
समागम तुझ्या भक्तांचा दुर्लभ । मोक्षश्रीही तुच्छ तयांपुढें ॥५॥
सत्यचिहें विश्व देवा, भासविसी । शरण तुजसी असों आम्हीं ॥६॥
उत्पत्ति-स्थिति तैं संहारकारका । नित्य विषयासक्तां काळचि तूं ॥७॥
बुभुक्षित सर्प जेंवी मूषकासी । तैसा तूं खलांसी, चरण दावीं ॥८॥
वासुदेव म्हणे निर्भय ते पाय । आठवी तो देव शंकरही ॥९॥

१८१
प्रचेतेहो ‘योगादेश’ नामें स्तोत्र । जपा हें सर्वत्र विजयप्रद ॥१॥
ब्रह्मदेवें पुरा कथिलें हें आम्हां । निरसी अज्ञाना जपतां नित्य ॥२॥
आधार एक तो ईश्वर मानूनि । जपतां हें जनीं कार्यसिद्धी ॥३॥
अज्ञाननिवृत्ति हेंचि फल श्रेष्ठ । ज्ञानचि तारक सकलांप्रति ॥४॥
प्रात:काळी शांतचित्तें हें पठतां । मुक्ति लाभे भक्तां नि:संशय ॥५॥
वासुदेव म्हणे शिवोक्त हें स्तोत्र । जपतां सर्वार्थ पूर्ण होती ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP