स्कंध ४ था - अध्याय १६ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


११८
निस्पृह ते वाणी ऐकूनि गायक । पावूनि आनंद करिती स्तुति ॥१॥
अनुज्ञा तयांसी लाभलीं मुनींची । म्हणती प्रगटलासी विष्णूची तूं ॥२॥
गायक म्हणती जनहो, हा ‘धर्म’ । करील शासन दुर्जनांसी ॥३॥
ईश्वरीशक्तींनें पाळील हा लोकां । प्रत्युपकारकां करां घेई ॥४॥
शीत उष्णकाळीं उदकग्रहण । सूर्यनारायण करी परी - ॥५॥
वर्षाकाळीं त्याची करीतसे वृष्टि । पुरवील तैसी जनेच्छा हा ॥६॥
समभावें नित्य जनां वागवील । पर्जन्य पाडील इष्ट वेळीं ॥७॥
वासुदेव म्हणे निशिकांतासम । पृथूचें दर्शन सकलां प्रिय ॥८॥

११९
गुप्तवित्त, गूढकार्य तेंवी मार्ग । सर्वदा अव्यक्त वरुणासम ॥१॥
बेनारणीमाजी प्रगटला अग्नि । टाकील जाळूनि कंटकांसी ॥२॥
सर्वव्यापी निर्विकार जेंवी आत्मा । निर्विकार जाणा तेंवी यासी ॥३॥
दंडणार नाहीं अदंडय शत्रूसी । पुत्रही अपराधी दंडार्ह या ॥४॥
प्रकाशेल सूर्य तेथ तेथ याचें । निष्कंटक साचें राज्य जाणा ॥५॥
दृढव्रत सत्यसंध हा ब्रह्मण्य । तैसाचि शरण्य वृद्धसेवी ॥६॥
मानद हा भूतां वास्त्सल्य दीनांचें । परस्त्रिया यातें मातेसम ॥७॥
वासुदेव म्हणे निजपत्नीवरी । आत्मभावें करी प्रेम ज्ञाता ॥८॥

१२०
प्रजेप्रति पिता, ज्ञात्यांचा हा दास । प्रिय सकलांस आत्म्यासम ॥१॥
मित्रानंदकारी सत्संगनिरत । दुष्टदंडनार्थ सिद्ध सदा ॥२॥
बैसूनि विजयरथीं मही गोल । शौर्ये संरक्षील सूर्यासम ॥३॥
दोहूनियां मही रक्षील प्रजेसी । भेदील गिरींसी चापबळें ॥४॥
समान यापरी करील हा भूमि । सिंहचि हा वनीं अरिंसे तेंवी ॥५॥
वासुदेव म्हणे अलौकिक ऐसा । प्रभाव नराचा उद्धारक ॥६॥

१२१
सरस्वतीच्या उगमीं । निर्मील हा यज्ञभूमि ॥१॥
तयास्थानीं शत यज ।करितां इंद्राचें या विघ्न ॥२॥
पुढती कुमारांचा बोध । नृपेंद्रासी या लाभेल ॥३॥
देवदैत्यही ते जाण । याचे करितील गुणगान ॥४॥
ऐसा पृथुपराक्रम । वर्णिताती बंदीजन ॥५॥
वासुदेव म्हणे सर्व । ईशकृपेचा हा खेळ ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP