स्कंध ४ था - अध्याय ६ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


३६
मैत्रेय बोलती विदुरा वृत्त । देव विरंचीस निवेदिती ॥१॥
ब्रह्मा विष्णु वृत्त जाणूनि पूर्वीचि । दक्षयज्ञाप्रति नव्हते आले ॥२॥
ब्रह्मा म्हणे वैर करितां श्रेष्ठासी । जगीं हेचि गती होई नित्य ॥३॥
अपराध जरी असेल थोरांचा । द्वेष तरी त्यांचा करणें न्याय्य ॥४॥
स्वयेंचि अपराध करुनि दुर्बल । जय इच्छितील तरी व्यर्थ ॥५॥
वासुदेव म्हणे ब्रह्मा तैं देवांसी । म्हणे अपराधी एथ तुम्ही ॥६॥

३७
हर्विर्भाग शंकरासी । अर्पिला न कां योग्ग्यासी ॥१॥
क्रुद्ध होतां जटाधर । जगत्संहार करील ॥२॥
मर्मविदारक शब्दें । दक्षें अवमानिलें त्यातें ॥३॥
कांताही ते पतिव्रता । गेली त्यागूनियां देहा ॥४॥
ऐसें असतां वांचलांती । भाग्य मानितों मी हेंचि ॥५॥
कल्याणाची जरी इच्छा । आशीर्वाद मागा त्याचा ॥६॥
दयाळु तो करुनि क्षमा । सिद्ध करील त्या यज्ञा ॥७॥
न कळे शिवाचें सामर्थ्य । विष्णूसवें जाणा मज ॥८॥
वासुदेव म्हणे शिव । ठरवी स्वतंत्र निर्णय ॥९॥

३८
पुढती देवांसवें ब्रह्मा कैलासासी । शिवभेटीप्रति सिद्ध झाला ॥१॥
वर्णवेन शोभा कैलासगिरीची । शिवाची वसती तयास्थानीं ॥२॥
उत्तुंग तो सर्व गिरींमाजी, सिद्ध । वसताती नित्य तयाठाईं ॥३॥
जन्मसिद्ध कोणी तप मंत्रौषधि । योजूनियां सिद्धि संपादिती ॥४॥
गंधर्व अप्सरा नित्य तपस्थानीं । शिकरें घ्या ध्यानीं रत्नमय ॥५॥
ताल, तमाल, ते मंदार, कांचन । तोलुनि गगन धरिती वाटे ॥६॥
पुष्पफलांनीं तें स्थान बहरलें । शोभती कमळें उत्पलादि ॥७॥
वासुदेव म्हणे बहु पशुपक्षी । स्वैर संचारती काननीं त्या ॥८॥

३९
महानदी नंदा अलकनंदाही । हारचि ते पाहीं कैलासाचे ॥१॥
स्वर्गांगना देवांसवें तयास्थानीं । क्रीडती येऊनि अत्यानंदें ॥२॥
केशर-कस्तुरीसंयुक्त तें जल । गजही विहार करिती तेथें ॥३॥
अलगा नगरी शोभे कुबेराची । विमानीं हिंडती यक्षस्त्रिया ॥४॥
ब्रह्मदेवासवें मयूरांचें नृत्य । पिक गातां गीत हर्ष देवां ॥५॥
भ्रमरगुंजन पुष्पांचा सुगंध । देई ब्रह्मानंद देवांप्रति ॥६॥
वैडूर्यसोपानयुक्त पुष्करिणी । करिती जलयानीं क्रीडा यक्ष ॥७॥
वासुदेव म्हणे ऐसे जातां जातां । एका वटवक्षा अवलोकिती ॥८॥

४०
कोशानुकोश ज्या उंची तैं विस्तार । वटवृक्ष थोर ऐसा होता ॥१॥
सनकादि मुनि गुह्यक, राक्षस । कुबेरही तेथ दिसला तयां ॥२॥
मध्यभागीं शिवशंकर बैसले । दक्षिणांकीं ठेलें चरणपद्म ॥३॥
वाम जानूवरी शोभे वाम हस्त । तर्क मुद्रास्थित अवलोकिले ॥४॥
प्रसन्न वदन अंगीं चिताभस्म । रुद्राक्षधारण चंद्रकला ॥५॥
दर्भासनावरी बैसूनि नारदा । ब्रह्मबोध साचा करिती प्रेमें ॥६॥
शांत स्वस्थ ऐशा पाहूनि शंकरां । नमस्कार केला ब्रह्मदेवें ॥७॥
शिवही तयासी वंदूनि सन्मानी । बैसती वंदूनि सकल देव ॥८॥
वासुदेव म्हणे हांसताचि ब्रह्मा । बोलला वचना ऐका काय ॥९॥

४१
नम्रभावें शिवा, वंदिसी तूं मज । परी सर्वजग नियंता तूं ॥१॥
प्रकृति-पुरुषां आधार तूं एक । यज्ञाचा आरंभ केला तूंचि ॥२॥
वेदरक्षणाचा उद्देश धरुनि । धर्मही या जनीं केला त्वांचि ॥३॥
अधर्मे शासन धर्ममार्गें मोक्ष । देसी तूंचि एक सकलांप्रति ॥४॥
सर्वभावें तुज येती जे शरण । भय कदाहि न तयांप्रति ॥५॥
मायामोहित जे पराचा उत्कर्ष । न साहूनि निंद्य दुर्भाषणें - ॥६॥
स्वयेंचि आपुला करिताती नाश । क्षमाचि तयांस करणें योग्य ॥७॥
यास्तव दक्षाचे अपराध पोटीं । घालूनि तयासी उठवीं देवा ॥८॥
तेंवी भृग्वादींसी करुनियां क्षमा । हविर्भाग यज्ञामाजी घेईं ॥९॥
वासुदेव म्हणे ब्रह्मा ऐशा परी । नम्रभावें करी प्रार्थनेतें ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP