स्कंध २ रा - अध्याय १० वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
५४
शुक रायाप्रति ऐका निवेदिती । कथिले भागवतीं विषय तेची ॥१॥
सर्ग, विसर्ग, तैं ऊति, मुक्ति स्थान । निरोध, पोषण मन्वन्तरें ॥२॥
ईशकथा तेवीं आश्रय हीं नामें । मुख्य एक जाणें आश्रय त्यां ॥३॥
प्रामुख्य ज्यापरी कुटुंबमुखा । दशमचि तैसा प्रमुख भाग ॥४॥
ज्ञानार्थ तयाच्या नांवांचें वर्णन । आश्रयाचें ज्ञान पुढती घडे ॥५॥
आख्यानादि द्वारा अप्रत्यक्ष बोध । श्रुति ते प्रत्यक्ष बोध करी ॥६॥
वासुदेव म्हणे यथाक्रम बोध । करिती रायास शुक ऐका ॥७॥
५५
गुणवैषम्यें तीं पंचमहाभूतें । एकादशेंद्रियें सविषय ॥१॥
महतत्त्व अहंकार तैशापरी । सर्ग नामधारी विराट हें ॥२॥
स्थावर जंगम सृष्टि हे भौतिक । जाणें तो विसर्ग विराटाचा ॥३॥
मर्यादापालनें ईश जो उत्कर्ष - । करी, नाम त्यास स्थान ऐसें ॥४॥
भक्तानुग्रह तें पोषण जाणावें । ऊति त्या म्हणावें वासनांसी ॥५॥
ईशकृपापात्र मन्वन्तराधिप । जाणें तद्धर्मास मन्वन्तरें ॥६॥
वासुदेव म्हणे पुढती द्या लक्ष । ईशकथादिक ऐका आतां ॥७॥
५६
भक्त भगवंत चरित्रवर्णन । ईशकथा नाम तयाप्रति ॥१॥
योगनिद्रेमाजी इंद्रियांसमेत । लीनत्व निरोध जाणें तया ॥२॥
अभिमान त्यागें स्वरुपावस्थान । मुक्तीचें लक्षण तेंचि राया ॥३॥
उत्पत्त्यादिप्रलयान्त सर्व क्रिया । यदिच्छेनें तया आश्रय नाम ॥४॥
आश्रय सर्वांसी एक हाचि असे । आश्रय जीवातें म्हणती व्यर्थ ॥५॥
इंद्रियप्रेरक तोचि आध्यात्मिक । जीव आधिदैवि देवता त्या ॥६॥
दोहोंचा त्या जेथ वियोगचि होई । जीव तोचि पाहीं आधिभौतिक ॥७॥
परस्पराधीन असती हे सर्व । यास्तवचि जीव परतंत्र हा ॥८॥
वासुदेव म्हणे तिघांचाही ज्ञाता । आश्रय सर्वांचा तोचि एक ॥९॥
५७
भेदूनि ब्रह्मांड विराट पुरुष । स्थान आपणांस भिन्न इच्छी ॥१॥
शुद्ध स्वच्छ तदा निर्मिलें उदक । राहिला असंख्य वर्षे तेथें ॥२॥
नार तें उदक अयन तें स्थान । जयासी तो जाण नारायण ॥३॥
नारायणाचें त्या अतर्क्य सामर्थ्य । काल कर्मादिक यदिच्छेनें ॥४॥
इच्छामात्रें अध्यात्मादि तेज त्रिधा । स्वीकार मायेचा करुनि केलें ॥५॥
क्रियाशक्तीनें तो सह ओज बल । प्राणाचें तें मूळ निर्मितसे ॥६॥
वासुदेव म्हणे प्राण तोचि राजा । तयाविण देहा निर्जीवत्व ॥७॥
५८
प्राणसंचार त्या विराट शरीरीं । होतांचि वाढली क्षुधा, तृषा ॥१॥
मुख, तालुस्थान तेंवी रसनेंद्रिय । वाणी अग्नीसह उदित झाली ॥२॥
ऐसीं इच्छामात्रें विशेष इंद्रियें । तत्तद्देवांसवें प्रगट होती ॥३॥
इंद्रियें आपुले भोगिती विषय । अहंकारकार्य विषय भूतें ॥४॥
कामक्रोधादिकां मनाचा आधार । संकल्प विकल्परुप त्याचें ॥५॥
निश्चयशक्ति ते जाणावी बुद्धीची । दुष्ट निश्चयही तेचि करी ॥६॥
स्थूलरुपासी या आवरणें अष्ट । भूतें अहंकार प्रकृति महत् ॥७॥
सूक्ष्मरुप नित्य निराकार एक । वासुदेव चित्त द्यावें म्हणे ॥८॥
५९
स्थूल सूक्ष्म दोन्ही रुपें ईश्वराचीं । सुविद्य बोलती मायामय ॥१॥
असत्यचि परी साधनें ध्यानाचीं । नामरुप त्यासी मायायोगें ॥२॥
देव मानव तैं पश्चादिक होनि । लाभताती जनीं पुण्यपापें ॥३॥
सत्त्व रज तमें प्रकार असंख्य । जाणें आरोपित मायागुणें ॥४॥
विरंचीचा दिन तोचि नित्य कल्प । महाकल्पीं अंत विरंचीचा ॥५॥
वासुदेव म्हणे कल्पाचें वर्णन । तेंवी पद्मज्ञान पुढती असे ॥६॥
६०
शौनक सूतासी बोलले विदुर । त्यागूनि ऐश्वर्य वनीं गेला ॥१॥
तीर्थाप्रति तया भेटले मैत्रेय । कथिलें तें काय कोठें सांगा ॥२॥
संवाद तयांचा सकळ कथावा । विदुर कां जावा सदनांतूनि ॥३॥
परतूनि येई कदा तो सदनीं । कृपाळु होऊनि कथीं सूता ॥४॥
ऐकूनि तो प्रश्न शुकोक्त उत्तर । सूत तो चतुर देई ऐका ॥५॥
वासुदेव म्हणे द्वितीय हा स्कंध । ऐकतां गोविंद तोष पावे ॥६॥
इतिश्री वासुदेवकृत अभंग-भागवताचा स्कंध २ रा समाप्त
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2019
TOP