स्कंध २ रा - अध्याय ६ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
३१
देवतेसहित वाणी ते मुखेंसी । सप्त धातूंमाजी सप्तछंद ॥१॥
जिव्हेपासूनि ते हव्यकव्यामृत । तैसेचि षड्रस रसनेसवें ॥२॥
नासापुटीं त्याच्या वायूसवें प्राण । गंधवर्ग जाण नासापुटीं ॥३॥
तेंवी रुप तेज सूर्य स्वर्गोलकीं । कर्णशष्कुली ती दिशा तीर्थे ॥४॥
शब्दाकाश श्रोत्र, वस्तुतत्त्वें शोभा । देहेंसी तयाच्या जगामाजी ॥५॥
स्पर्श वायु, यज्ञ त्वचा ते तयाची । वृक्ष वनस्पति रोम त्याचे ॥६॥
मस्तकीचें केश मेघ तेचि जाण । मुखस्थ ते जाण विद्युल्लता ॥७॥
नखापासूनियां पाषाण तैं लोह । सकल लोकपाळ बाहू त्याचे ॥८॥
धर्माधर्मादिक याचेंचि स्वरुप । वर्तमान भूत भविष्य हा ॥९॥
वासुदेव म्हणे व्यापूनि ब्रह्मांड । राही अवशिष्ट नारायण ॥१०॥
३२
स्वयें प्रकाशूनि प्रकाशी जैं सूर्य । स्वदेहाबाहेर तेंवी हाचि ॥१॥
सर्वत्र असूनि अलिप्तत्वें त्याची । अतर्क्यचि शक्ति सर्वकाल ॥२॥
स्थानभेदें तत्तल्लोकस्थित जीव । अनुरुपस्वभाव म्हणती ज्ञाते ॥३॥
ब्रह्मचारी, यति त्रैलोक्य भेदिती । एथेंचि वसती गृहस्थातें ॥४॥
दक्षिण उत्तर मार्ग ऐसी दोन । मार्ग ज्ञानाज्ञानरुप जाणा ॥५॥
नाभिकमलीं मी होऊन्नि उत्पन्न । संकल्पिला यज्ञ मनामाजी ॥६॥
साधकसाध्य तैं साधनहि तोचि । जाणूनि तयासी यजिलें यज्ञें ॥७॥
ऐसें सकळही तयाचेंचि रुप । मायेचा चालक तोचि असे ॥८॥
नारदा, मी त्याचें केलें आराधन । यास्तव वचन सत्य माझें ॥९॥
वासुदेव म्हणे भक्तीचा महिमा । स्वयें कथी ब्रह्मा ऐका आतां ॥१०॥
३३
असूनियां ब्रह्मा जाहलों मी कैसा । संदेह हा होता मनीं माझ्या ॥१॥
शरण तयासी जातां तो अचिंत्य । मूळ ऐसें मज कळूनि आलें ॥२॥
महिमा तयाचा नकळेचि कोणा । लीला मात्र आम्हां प्रिय त्याच्या ॥३॥
नित्य निर्गुण तो निरामय असे । ज्ञान इतरांतें नसे त्याचें ॥४॥
संयमी जे लीन होती तयापायीं । तद्रूपता येई तयांलागीं ॥५॥
भिन्नत्व वर्णाया न उरे तयांचें । जाणणें हें ऐसें ध्यानीं घेईं ॥६॥
वासुदेव म्हणे मायाचालक तो । अवतार घेतो प्रतिकल्पीं ॥७॥
३४
पुरुष तयाचा प्रथमावतार । कालादि द्वितीय शक्तिरुप ॥१॥
कार्यरुप तेंवी अवतार त्याचे । मनादिक साचे स्थावरान्त ॥२॥
गुणावतार ते शिव-विष्णु मीही । दक्षादिक पाहीं विभूति त्याच्या ॥३॥
ओजस्वी तेजस्ती भूति कांतिमंत । तें तें त्याचें रुप अद्भुत जें ॥४॥
प्राधान्येन त्याचे अवतार जे जे । कथितों तुजलागीं ते ध्यानीं घेईं ॥५॥
वासुदेव म्हणे मोक्षदायी कथा । ऐका भगवंताच्या परमानंदें ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2019
TOP