स्कंध २ रा - अध्याय ७ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


३५
ब्रह्मा नारदासी म्हणे तो अव्यय । होऊनि वराह दंष्ट्रायुक्त ॥१॥
आदिदैत्य हिरण्याक्षविदारण । करी, उद्धरुन भूमीप्रति ॥२॥
रुचि-आकूतीसीं सुयज्ञ जाहला । तोचि इंद्र झाला देवांस्तव ॥३॥
कर्दमासी देवाहूतीच्या उदरीं । मातेसी उद्धरी कपिलरुपें ॥४॥
अत्रि-अनसूयापुत्र दत्तात्रेय । उद्धरी हैहय यदु आदि ॥५॥
अद्वैतमार्गाचें पुन:प्रस्थापन । कुमार होऊन हरिनें केलें ॥६॥
धर्मर्षीची कांता मूर्ति दक्षकन्या । नरनारायणां प्रसवली ॥७॥
अप्सरा तयांसी आड येतां अंकीं । निर्मूनि ऊर्वशी हरिला दर्प ॥८॥
क्रोध, काम तयां बाधती न कदा । वंदितो तत्पदां वासुदेव ॥९॥

३६
अतर्क्य हरीची लीला हे नारदा । अर्पी अढळपदा ध्रुवासी तो ॥१॥
पृथुरुपें वेनअंकी तो अवतरे । भूमीतें दोहिलें कल्याणार्थ ॥२॥
नाभिराजकांता मेरुदेवीप्रति । होई समदृष्टि ऋषभ पुत्र ॥३॥
यश-पुण्यें माझ्या हयग्रीव होई । वेदवाणी पाहीं श्वास त्याचे ॥४॥
वेदरक्षणार्थ तोचि झाला मत्स्य । कूर्मही समुद्रमंथनीं तो ॥५॥
भक्तास्तव तोचि नृसिंह जाहला । शरण तयाला वासुदेव ॥६॥

३७
नक्रगस्त गजेंद्राची येतां हाक । धांव दयावंत घेई तेथें ॥१॥
आदितितनय होऊनि वामन । बळीसी जिंकून सुखवी इंद्रा ॥२॥
नारदा, तुजही होऊनियां हंस । केला आत्मबोध श्रीहरीनें ॥३॥
रोगनिवारक देवांचा श्रीहरी । झाला धन्वंतरी वैद्यराज ॥४॥
अधार्मिक नृपां कराया शासन । होई परशुराम जगन्नाथ ॥५॥
होईल नारदा, पुढती तो राम । संहारील जाण रावणातें ॥६॥
भूभाहरण होऊनियां कृष्ण । पुढती नारायण करील तो ॥७॥
पूतनासंहारादिक बाललीला । करील त्याकाला नवलकारी ॥८॥
वासुदेव म्हणे ब्रह्मा नारदासी । प्रभुलीला ऐसी कथोतो स्वयें ॥९॥

३८
क्षीण अल्पायुषी मंदबुद्धि जन । उद्धरी होऊन व्यास हरी ॥१॥
ढोंगी असुरांचा व्हावा बुद्धिभेद । होईल तो बुद्ध याकारणें ॥२॥
पुढती पाखंडा घरोघरीं माजे । शूद्रचि ते राजे अवनीवरी ॥३॥
कीर्तन वा स्वाहास्वधा संपतील । कल्कि तैं होईल नारायण ॥४॥
वासुदेव म्हणे कलीचा विनाश । होतां धर्मराज्य जगीं नांदे ॥५॥

३९
सृष्टिकार्यास्तव नारदा, विभूति । अनेक असती श्रीहरीच्या ॥१॥
मरीच्यादि नऊ प्रजापति, तप । जाण उत्पादक मजसवें ॥२॥
चतुर्दश मनु विष्णु तेंवि धर्म । करिती पालन सृष्टीचें या ॥३॥
शंकर अधर्म, सर्प, असुरादि । संहारक होती विभूति या ॥४॥
वासुदेव म्हणे विभूतीच ऐशा । उत्पत्तिअ स्थितीचा करिती खेळ ॥५॥

४०
रज: कणही पृथ्वीचे । गणितां येतीलचि साचे ॥१॥
परी हरीचे विक्रम । असंख्यात जगीं जाण ॥२॥
क्षणीं व्यापिलें त्रैलोक्य । त्रिविक्रम तो अद्भुत ॥३॥
शेष सहस्त्र मुखांनीं । थकला तयातें वर्णूनि ॥४॥
दुस्तर हे ईर्शमाया । आटे स्मरतां त्या माधवा ॥५॥
शिव, प्रल्हादादि मात्र । जाणताती या मायेस ॥६॥
नित्यानंद शोकहीन । परम पुरुष तेंचि ब्रह्म ॥७॥
वासुदेव म्हणे भक्ति । एक आधार जगासी ॥८॥

४१
ईश्वरस्वरुपीं लीन होतां चित्त । कर्तव्य तयास नुरे कांहीं ॥१॥
वृष्टिपति इंद्रा कूपाचें न काम । धनी होतां कोण कुदळ घेईं ॥२॥
स्वरुपनिमग्ना तेंवी हे शरीर । साधनांचा भार अन्य काय ॥३॥
कर्मफलदाता तोचि भगवान । वर्णाश्रमधर्म तयाचेचि ॥४॥
तयाचीच लीला तपेंचि भूतादि । नश्वरत्व त्यांसी जीव नित्य ॥५॥
स्वरुपविस्मृति होऊनि स्वकर्म । फलयोगी, ज्ञान होतां मुक्त ॥६॥
संक्षेपें तुज मी कथिलें हें सर्व । करुनि विस्तार जनीं कथीं ॥७॥
भक्तिभाव जनीं येणें वृद्धि पावे । श्रोत्यांवक्त्यां द्यावें अनुमोदन ॥८॥
वासुदेव म्हणे ऐशा भाविकासी । माया हे कदापि बाधेचिना ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP