स्कंध २ रा - अध्याय ९ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
४६
नृपालागीं मुनि म्हणती स्वप्नसृष्टि । तेंवी ज्ञानीयासी संबंध हे ॥१॥
स्वप्नानुभव तें ज्यापरी अज्ञान । व्यवहार जाण तैसाचि हा ॥२॥
शय्येवरी विश्व निर्मी जैं स्वयेंचि । मी तूं मम ऐसी मति जेंवी ॥३॥
स्वप्नदृष्टा जेंवी स्वप्नाहूनि भिन्न । तेंवी मायेहून भिन्न ईश ॥४॥
स्वप्नभ्रम जातां जैसी ते जागृति । स्वस्वरुप स्थिती तैसी जीवा ॥५॥
वासुदेव म्हणे उत्तरें घ्या ध्यानीं । एकाग्र होऊनि शुकोक्त तीं ॥६॥
४७
अज्ञानत्वें मिथ्या देह हा जीवाचा । सत्य ईश्वराचा ज्ञानरुप ॥१॥
यास्तव तयातें भजतां लाभे मुक्ति । ईश्वरोक्त युक्ति बोधार्थ या ॥२॥
सृष्ट्युत्पत्तिज्ञान नसतां ब्रह्मदेव । सचिंत एकाग्र बैसे यदा ॥३॥
तप, तप ऐसा ध्वनि कानीं । तपांत रंगूनि जाई तदा ॥४॥
संयमूनि प्राण मन तैं इंद्रियें । उग्र तप केलें सहस्त्राब्द ॥५॥
तदा सुप्रसन्न होऊनि भगवान । दावी निजस्थान वैकुंठ त्या ॥६॥
वासुदेव म्हणे वैकुंठींची स्थिति । रायातें वर्णिती महामुनी ॥७॥
४८
स्तविती सज्जन वैकुंठलोकासी । अज्ञान भयादि नसती तेथें ॥१॥
सत्व मात्र एक तया स्थानीं गुण । माया काल दीन निष्प्रभाव ॥२॥
देवदैत्य वंद्य जयविजयादि । विष्णूसम त्यांसी रुचिर रुप ॥३॥
दिव्य अलंकार प्रभा ते विराजे । वैकुंठाचें फांके तेज बहु ॥४॥
महा भागवत तेंवी दिव्य स्त्रिया । प्रत्यक्ष त्या ठाया लक्ष्मी वसे ॥५॥
वासुदेव म्हणे ब्रह्मा त्या वैकुंठीं । पाही जगजेठी मूर्तिमंत ॥६॥
४९
श्रीपती तो जगत्पति यज्ञपति । पार्षद सेविती सुनंदादि ॥१॥
कृपादृष्टि हास्यवदन प्रसन्न । कमललोचन चतुर्भुज ॥२॥
किरीटकुंडलें पीतांबरधारी । शोभे वक्षस्थळीं लांछन तें ॥३॥
सिंहासनीं प्रभु तयाच्यासन्निध । प्रकृति-पुरुष कार्यासवें ॥४॥
अशाश्वत सर्व सौख्यें तीं शाश्वत । असूनि स्वरुपस्थित प्रभु ॥५॥
५०
ब्रह्मदेवा, मम लाभ सकामासी । दुर्लभ हें चित्तीं धरीं सदा ॥१॥
परी तुझें तप पाहूनि तोषलों । वर माग झालों सिद्ध देण्या ॥२॥
तप तप शब्द ऐकूनि त्यापरी । कष्टलासी भारी तोष तेणें ॥३॥
माझीचि ते इच्छा कथिलें तप मीचि । उत्पत्त्यादि शक्ति माझी तप ॥४॥
वासुदेव म्हणे ऐकूनियां ब्रह्मा । वदे नारायणा नम्रभावें ॥५॥
५१
बुद्धीचा तूं दाता आधार विश्वाचा । हेतु अंतरींचा जाणितोसी ॥१॥
मागणें तुजसी एक असे देवा । व्यक्ताव्यक्त व्हावा बोध मज ॥२॥
ऊर्णनाभीसम स्वयेंचि नटूनि । खेळ रंगवूनि आंवरिसी ॥३॥
गूढ नारायणा, न कळे तें मज । बुद्धि ते तद्बोध होई ऐसी ॥४॥
कथिसील तेंवी रचीन मी सृष्टि । बाधो न मजसी परी माया ॥५॥
वासुदेव म्हणे ब्रह्मयासी तैं ईश । चतु:श्लोकात्मक बोध करी ॥६॥
======
मूळ चतु:श्लोकी भागवत
श्रीभगवानुवाच -
अहमेवासमेवाग्रे नान्यद् यत् सदसद् परम् ॥
पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहम् ॥१॥
ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि ॥
तद्विद्यादात्मनो मायां यथाऽमासो यथा तम: ॥२॥
यथा महान्ति भूतानि भृतेषूच्चावचेष्वनु ॥
प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् ॥३॥
एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनाऽऽत्मन: ॥
अन्वयतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा ॥४॥
५२
स्थूल सूक्ष्म हेतु प्रकृती ही जाण । मजहूनि अन्य नव्हती पुरा ॥१॥
उत्पत्ति प्रलय होतांही शाश्वत । असें अवशिष्ट तो मी एक ॥२॥
आकाशस्थ चंद्र असूनियां एक । जेंवी द्विधारुप नेत्रदोषें ॥३॥
अथवा राहू तो असूनियां नभीं । न दिसेचि जगीं कृष्णवर्णे ॥४॥
तेंवी मायामय होती मिथ्याभास । असूनिही सत्य न दिसे कोणा ॥५॥
भूतकार्यामाजी असूनिही भूतें । कारण स्वरुपें असती भिन्न ॥६॥
तेंवी मी कारण असें या सृष्टीसी । सृष्टि मजमाजी अलिप्त मी ॥७॥
घटामाजी जेंवी मृत्तिकानियमें । घट न नियमें मृत्तिकेंत ॥८॥
अन्वय व्यातिरेकें ऐसा ईशबोध । कथी कल्याणार्थ वासुदेव ॥९॥
५३
रायाप्रति मुनि बोलती यापरी । बोलूनियां हरि गुप्त झाला ॥१॥
पुढती ब्रह्मयानें निर्मियेली सृष्टि । नारदें तयासी पुशिलें हेंचि ॥२॥
नारदासी ब्रह्मा निवेदी हा बोध । व्यासांसी नारद निवेदिती ॥३॥
आतां अन्य सर्व प्रश्नांचीं उत्तरें । देतों लक्ष द्यावें म्हणती मुनि ॥४॥
वासुदेव म्हणे विषय ते दश । भागवतस्तित ऐका आतां ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2019
TOP