उध्दवगीता - अध्याय एकोणिसावा

उध्दवगीता

उध्दव विनयपूर्वक म्हणाला, हे परमेश्वरा ! तुझी आराधना करणे हे जे कर्म आहे, त्याचा योग आराधनविधी कसा तो मला समग्र सांग. यादवश्रेष्ठा ! तुझे आराधन तुझे भक्त का व कसे करतात, ते मला ऐकू दे. ॥१॥
नारद, श्रीव्यास, अंगिरसाचा पुत्र श्रीबृहस्पति आचार्य हे मुनी वारंवार सांगत आले आहेत की, तुझी पूजा यथासांग करणे हे मोक्ष मिळविण्याचे उत्तम साधन जीवास उपलब्ध झाले आहे. ॥२॥
भृगुप्रमुख सर्व पुत्रांस ब्रह्मदेवाने जे सांगितले, शंकरांनी पार्वती देवीस उपदेश केला, ते सर्व तू स्वत:च स्वमुखाने प्रथम प्रकट केले आहेस. ॥३॥
हेच तुझे पूजा -विधान ब्राह्मणादी तिन्ही वर्णास, स्त्रियांस व शूद्रांस मान्य असून पुन: मोक्ष देणार्‍या साधनात उत्तम आहे. ॥४॥
म्हणून हे कमलनेत्र देवाधिदेवा, हे कर्माचे जाळे तोडून टाकणारे तुझे पूजाविधान मला सांग मी तुझा नि:सीम भक्त व अनुयायी आहे. ॥५॥
श्री भगवान्‍ म्हणतात, उध्दवा ! हे पूजा- विधान अनंत असून अपार आहे. तथापि क्रमाक्रमाने पण संक्षिप्त रुपाने ते मी तुला सांगतो. हा संक्षेप माझ्या पूजाविधानाचे यथार्थ सारसर्वस्व होय. ॥६॥
उध्दवा ! माझी पूजा तीन प्रकारांनी करता येते. वैदिक, तांत्रिक व उभयमिश्रित, असे ते प्रकार होत. यापैकी जो इष्ट व शक्य वाटेल तो किंवा ते प्रकार स्वीकारुन माझे पूजन यथासांग करावे. ॥७॥
पुरुषाची मुंज होऊन तो व्दिज झाला म्हणजे त्याने भक्तिश्रध्दापूर्वक माझे पूजन कसे करावे, ते आता सांगतो ऐक. ॥८॥
मी प्रत्येक जीवाचा उध्दार करणारा आहे अशा माझी स्थापना मूर्तीमध्ये अथवा इतर कोणत्याही पवित्र स्थळी निष्कपटपणे करुन माझी पूजा भक्तिपूर्वक यथामिलित द्रव्यांनी करावी. ॥९॥
दात वगैरे घासून व स्नान करुन देह शुध्द करावा. माती, भस्म इत्यादि घेऊन अंग स्वच्छ करताना जे वेदाने व तंत्रशास्त्राने मंत्र विहित केले आहेत, ते म्हणावेत. ॥१०॥
याप्रमाणे स्नान केल्यानंतर वेदविहित संध्या, ब्रह्ययज्ञ , इत्यादी जी नित्य कर्मे ती करावी आणि कर्माचा बंध तोडणारी जी माझी पवित्र पूजा ती सत्संकल्पपूर्वक करावी. ॥११॥
माझी प्रतिमा (मूर्ती) आठ प्रकारांनी सिध्द करता येते. सुवर्णादि , दगड, माती, लाकूड, चित्राचा कागद, वाळू , रत्न व अंत:करणांतील मन यांपैकी कोणत्याही द्रव्याची मूर्ती असली तरी चालते. ॥१२॥
उध्दवा, जीवाचा उध्दार करणारे देवालय म्हणजे प्रतिमा होय. ही प्रतिमा चल अथवा अचल असते. अचल मूर्तीचे आवाहन व विसर्जन करु नये. ॥१३॥
चल मूर्तीला आवाहन- विसर्जन करणे न करणे भक्ताच्या मर्जीवर आहे. यज्ञकुंडी आवाहन विसर्जन हे मंत्रोक्त विधी अवश्य करावे. मातीची मूर्ती किंवा चंदनादिकांनी चितारलेली चित्रमूर्ती ह्याखेरीज इतर पाषाणादिकांच्या मूर्तीस स्नान घालावे. मातीच्या मूर्तीला व काढलेल्या चित्राला फक्त मार्जन करावे. ॥१४॥
गंधपुष्पादी यथाप्राप्त मंगल द्रव्यांनी पूजकाने निष्कपट होऊन माझे प्रतिमादिरुपांनी पूजन करावे. तसेच अंत:करणपूर्वक मानसपूजा करावी. ॥१५॥
उध्दवा ! स्नान, अलंकार हे उपचार मूर्तीच्या (माझ्या) रुपातच मला फार आवडतात. यज्ञकुंडांत माझे सांगोपांग पूजन समंत्रक मात्र असावे. आग्रीच्या रुपात मला घृतपूर्वक आहुती द्याव्या. हे मला प्रिय आहे. ॥१६॥
मत्स्वरुप सूर्याला अर्घ्यप्रदान व उपस्थान आणि जलांत तर्पण हे पूजन, मला आवडते. माझ्या भक्ताने मला पाणी जरी अर्पिले तरी ते मला अति प्रिय वाटते. ॥१७॥
पण अभक्ताने मोठे मोलवान्‍ पदार्थ मला दिले तरी ते असमाधानकारक होतात. आता नुसत्या भक्तार्पित जलावरही मी संतुष्ट होतो. श्रध्दाळू भक्ताने गंधादि षोडशोपचारी पूजा केली तर मला संतोष होतो. सांगणे नकोच. ॥१८॥
अंतर्बाह्य शुध्द होऊन, पूजासामग्री मिळवून, दर्भासन घालून पूजकाने पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे तोंड करुन पूजेस बसावे. मूर्तीच असेल तर तिच्या सन्मुख आसनस्थ व्हावे. ॥१९॥
उध्दवा, सहा प्रकारचे न्यास करुन मूल मंत्राने संस्कृत केलेल्या माझ्या मूर्तीला निर्मळ करावी, व प्रोक्षणीपात्रे, कलशादी पात्रे यथाशास्त्र सिध्द करावी. ॥२०॥
कलशातील जलाने पूजास्थान, पूजासाहित्य व आपला देह यांचे पूजकाने प्रोक्षण करावे. पाद्यपात्र, अर्ध्यपात्र व आचमनपात्र ही शास्त्रोक्त द्रव्यांनी सिध्द असावी. ॥२१॥
ही तीन पात्रे पूजकाने अनुक्रमे हृदय, शीर्ष शिखा या मंत्रांनी व सर्व पूजासाहित्य गायत्रीमंत्राने संस्कारावे. ॥२२॥
नंतर वायु व अग्रि यांनी शुध्द केलेल्या शरीराच्या आत म्हणजे पूजकाच्या हृदयात जी अति शुध्द, सूक्ष्म व योगी सिध्दानी ध्यानात धरलेली माझी जीवकला नादाच्याही पलीकडे आहे, तिचे ध्यान करावे. ॥२३॥
ध्यानामुळे पूजकाच्या शरीराला व्यापणार्‍या जीवकलेला तन्मय पूजकाने आमंत्रून तिची मानसपूजा करावी आणि मग तिची मूर्तीत न्यासांसह स्थापना करुन ती सांगोपांग पूजावी. ॥२४॥
उध्दवा, धर्मादी नऊ मंत्रांनी माझे आसन सिध्द करुन मला, पाद्य, आचमन , अर्घ्यप्रभृती  उपचार करावेत. आसन, पाद्य, आचमनप्रभृती उपचारांनी आर्य गृहस्थ अतिथींचा सत्कार करतो. ॥२५॥
असो, याप्रमाणे मजकरीता सिध्द केलेल्या त्य आसनावर आठ पाकळ्याचे कमल काढावे व त्याला कर्णिका केसर यांनी सुशोभित करावे. नंतर ह्या जगात उत्कर्ष व्हावा व परलोकी आत्यंतिक सुख मिळावे एतदर्थ माझी वेदोक्त व तंत्रोक्त मंत्रांनी पूजा करावी. ॥२६॥
त्यानंतर सुदर्शन, पांचजन्य, गदा, खड्‍ग, तीर, धनुष्य, नांगर व मुसळ या माझ्या आठ आयुधांची व कौस्तुभ, वनमाला, श्रीवत्स या भूषांचीही पूजा करावी. ॥२७॥
 नंद, सुनंद, प्रचंड, चंड, महाबल, बल, कुमुद आणि कुमुदेक्षण हे आठ माझे पार्षद- अनुयायी होत. यांची व दुर्गा, विनायक, व्यास, विष्वक्‍ सेन, गुरु व देव याची पूजा करावी. ॥२८-२९॥
म्हणजे सामर्थ्य असेल तर नित्यश: चंदन, वाळा, कापूर, केशर,  अगुरु या सुवासिक द्रव्यांनी सुगंधित जलाने प्रथमत: मला व माझ्या आयुधादिकांस स्नान घालावे. ॥३०॥
आपस्तंबशाखेतील ‘सुवर्णधर्मांनुवाक’ किंवा पुरुषसुक्त व ‘इंद्रं नरो’ इत्यादी सामगायनाचा मंत्र म्हणून मला स्नान घालावें. ॥३१॥
नेसण्या पांघरण्याची वस्त्रे, जानवे, अलंकार  ,मुद्रा, माळा, गंध, उटी मला लेऊन यथयोग्य पध्दतीने भक्ताने माझे पूजन करावे. ॥३२॥
तसेच पाद्य, आचमन, गंध, फुले, अक्षता, धूप, दीप, नैवेद्य इत्यादि षोडशोपचारात्मक पूजा पूजकाने मला अर्पावी. ॥३३॥
नैवेद्यांत यशाशक्ती गूळ, क्षीर, तूप, करंज्या, पुर्‍या, मोदक, सांजोर्‍या, दही व रुचकर व्यंजक पदार्थ असावेत. ॥३४॥
सुवासिक तेलांचे मर्दन, आरशाचे दर्शन, दंतधावन, अभिषेक,  भक्ष्यभोज्यसमर्पण, गीत-नर्तन, हे सर्व उपचार निदान पर्व दिवशी तरी करावे. ॥३५॥
उध्दवा आता अग्रिपूजेचा विधी सांगतो. मेखला, गर्ता, वेदी हे सर्व शास्त्रोक्त संपादून सिध्द केलेल्या यज्ञकुंडांत अग्रिस्थापना करावी आणि तो वेढल्यावर हाताने उदक शिंपडून एकत्र करावा. ॥३६॥
नंतर दर्भ प्रोक्षण करावे. मग आज्यस्थाली , व्याहृतिपूर्वक समिधा यांनी अन्वाधान यथाविधि करावे. होमद्रव्ये एकत्र करुन त्यांचे प्रोक्षण करावे आणि मग अग्रिस्वरुपात, ‘तप्त सुवर्णाप्रमाणे उज्वल, चारी हातांत , शंख , चक्र, गदा व कमल या आयुधांनी सुशोभित, पीतांबरधारी व शांत’ असे माझे ध्यान करावे. ॥३७-३८॥
दैदीप्यमान मुकुट, पोची, कडदोरा, कडीतोडे या सुवर्णालंकारांनी व श्रीवत्स, कौस्तुभ, वनमाला,  यांनी भूषित अशा माझ्या रुपाचे ध्यान करावे. ॥३९॥
याप्रमाणे ध्यान करुन (व करीत असता) शहाण्या साधकाने अष्टांगांची पूजा करुन घृताने भिजलेल्या शुष्क समिधा अग्रीत टाकाव्यात, आज्यभागाच्य दोन व आधाराच्या दोन अशा चार आहुति देऊन घृतपूर्ण होमद्रव्य अग्रीत टाकावे. यावेळी ऊँ नमो वासुदेवाय हा मूलमंत्र म्हणावा. पुरुषसूक्ताच्या १६ ऋचांनी सोळा अवदाने मागे उल्लिखिलेल्या ‘धर्मादिकांस’ समंत्रक द्यावी आणि शेवटी ‘स्विष्टकृती’ मंत्रपूर्वक आहुती द्यावी. ॥४०-४१॥
नंतर गंधपुष्पादिकांनी अग्रिपूजा झाल्यानंतर अग्रिदेवतारुप अंश मला नमस्कार करावा. पुढे पार्षादांस बली द्यावे. पूजा चालली असता व नंतर, श्रीनारायणाचे स्वरुपाकडे ध्यान ठेऊन ‘ऊँ नमो वासुदेवाय’ या मूलमंत्राचा जप करीत असावे. ॥४२॥
मग आचमन देण्याचा विधि करुन शेषनैवेद्य विष्वक्सेनाला द्यावा. नंतर विडा वगैरे सुवासिक मुखशुध्दि देवाला अर्पून मंत्रपुष्पांजलीचा विधी करावा. ॥४३॥
मग गायन, नर्तनादि करावे, माझ्या लीला आचराव्यात, हरिकथा सांगाव्यात व ऐकाव्यात. हे झाल्यावर घटकाभर निश्चिंत मनाने ध्यानस्थ बसावे. ॥४४॥
पुराणातील किंवा प्रचलित असणारी अशी निरनिराळी स्तोत्रे मोठयांदा गर्जून म्हणावी, नंतर स्तुती करावी आणि परमेश्वरमूर्तींचे दोन्ही चरण आपल्या दोन्ही हातात अवलंबून आपले मस्तक मूर्तीच्या पायांवर ठेवावे.साष्टांग नमस्कार करावा; आणि ‘दयाघना ! भवसागरात वावरणारा मी मृत्यूला भिऊन तुला शरण आलो आहे, प्रसन्न हो, माझे संतारण कर’ अशी प्रार्थना मनोभावाने करावी. याप्रमाणे यथोक्त पूजा आटोपल्यावर पूजकाने मी दिलेला निर्माल्य मोठया भक्तिपूर्वक आदराने आपल्या मस्तकावर ठेवावा.नंतर मूर्तीतील देवाचे विसर्जन करावयाचे असेलच तर ती देवज्योती मुख्य चिज्ज्योतीत विसर्जावी.॥४५-४७॥
मूर्ती असो, अग्री असो, जेथे जशी श्रध्दा असेल, , तेथे तसे माझे पूजन करावे. अधिष्ठानात उच्चनीच भेद नाही. कारण मी सर्वात्मा आहे. माझे वास्तव्य सर्वत्र सर्वकाळी असते. पूजकाच्या हृदयातही मी असतो. ॥४८॥
याप्रमाणे वेदोक्त व तंत्रोक्त पूजा यथासांग केली असता इहपरलोकीचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. ॥४९॥
माझ्या मूर्तीची स्थापना उत्तम व टिकाऊ मंदिरात करावी. फुलांसाठी बागा कराव्या आणि नित्याचे व पर्वणीचे पूजादि समारंभ अखंडकालपर्यंत टिकवण्यासाठी जमिनी, गावे, नगरे, पेठा, वगैरे इनाम द्यावी, अशा दात्या मद्भक्ताला माझे ऐश्वर्य प्राप्त होते. ॥५०-५१॥
मूर्ती स्थापणाराला सार्वभौम राज्य, मंदिर बांधणाराला त्रैलोक्याचे राज्य आणि पूजकाला ब्रह्मदेवाचा लोक, असे फल मिळते. मूर्तिस्थापकच मंदिर बांधणारा व पूजक असेल तर त्याला ‘सरुपता मुक्ती’ मिळते. ॥५२॥
निष्काम भक्तालाच उपरिनिदिष्ट शास्त्रोक्त निष्काम पूजेने मात्र खरा श्रेष्ठ भक्तियोग साध्य होतो व तो मत्स्वरुप म्हणजे परमात्मरुप होतो. ॥५३॥
पण जो देवब्राह्मणाला आपण किंवा इतरांनी दिलेली वृत्ती काढून घेतो, तो किडा होऊन लाखो वर्षे रौरव नरकात खितपत पडतो. ॥५४॥
उध्दवा ! कर्मकर्त्याला जे फल तेच सर्व प्रकारच्या म्हणजे प्रेरक- अनुमोदकादी साह्यकर्त्यांस मिळते. जितके साह्य अधिक, तेवढे परलोकी फलही अधिकच असते. ॥५५॥
अध्याय एकोणिसावा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : March 14, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP