उध्दवगीता - अध्याय सोळावा

उध्दवगीता

अध्याय सोळावा
उध्दव म्हणाला, विश्वपते प्रभुराया ! या सृष्टीची घटना करणारी मूळ द्रव्ये,  तत्त्वे, ऋषींनी अशी सांगितली आहेत ती आपण अठ्ठावीस तत्त्वे आहेत असे प्रतिपादन केले आहे, असे ऐकतो. ॥१॥
परंतु कोणी ऋषी २६, कोणी २५, कोणी ७, कोणी ९, कोणी ६, कोणी ४, कोणी ११, कोणी १७, कोणी १६, व कोणी १३ तत्त्वे आहेत असे सांगतात. म्हणून जो हेतु ध्यानात ठेऊन निरनिराळ्या ऋषींनी निरनिराळी तत्त्वसंख्या सांगितली, तो हेतु, ते रहस्य कृपा करुन आम्हाला सांगावे.॥२-३॥
श्री भगवान्‍ म्हणाले, ज्ञानी पंडित जे काही सांगतात, त्याला तसे आधार आहेतच. उध्दवा ! माझी माय गृहीत केली म्हणजे वाटेल ते बोललेले असो ते मायेच्या राज्यांत काही अशक्य नाही. ॥४॥
‘तू म्हणतोस ते खोटे व मी म्हणतो तेच खरे’ असे प्रत्येक वादी म्हणतो म्हणून वाद होतो. अंत:करणांत उद्भवणार्‍य माझ्या सत्त्वादि शक्ती प्रचंड बलवती असतात. ॥५॥
अर्थात्‍ या शक्ती प्रक्षुब्ध झाल्यामुळे उत्पन्न होणारा भेद, त्या शक्तीचे शमन व दमन झाले म्हणजे नष्ट होतो आणि नंतर लागलीच तज्जन्य वादही थांबतो. ॥६॥
हे नरपुंगवा उध्दवा ! ही सर्व कार्यकारणात्मक तत्त्वे एकमेकात प्रविष्ठ होत असल्यामुळे, बोलणाराच्या इच्छेनुसार कार्यत्व अथवा कारणत्व ठरविता येते. ॥७॥
कारणरुपी अथवा कार्यरुपी एकाच तत्त्वामध्ये इतर कार्यरुप अथवा कारक्षरुप तत्त्वे, सर्वदा प्रविष्ट झालेली दिसतात. ॥८॥
म्हणून वक्ता आपल्या बोलण्याच्या उध्देशानुसार वस्तूचे कार्यत्व अथवा कारणत्व ठरवितो; आणि ते संयुक्तिक असते म्हणून आम्ही त्याचा स्वीकारही करतो. ॥९॥
जिचे कारण व स्वरुप सांगता येत नाही, अशी अविद्या जीवाच्या ठिकाणी असते; म्हणून त्याला स्वत: च आत्मज्ञान होत नाही. दुसरा कोणी तरी ज्ञानविज्ञानी गुरु त्याला ज्ञान देतो. ॥१०॥
परंतु या ठिकाणी जीव आणि परमेश्वर यांच्या स्वरुपांत रेसभर सुध्दा फरक नाही; म्हणून जीव व परमेश्वर निराळे ही कल्पना अर्थशून्य होते. तेव्हा जीवशिव एक झाले म्हणून २५ तत्त्वेच होतात. शिवाय ज्ञान हा प्रकृतीचा गुण आहे. ॥११॥
प्रकृति म्हणजे गुणसाम्य, सृष्टि, स्थिति, लय करणारे सत्त्व, रज, तम हे गुण प्रकृतीचे होत; आत्म्याचे मुळीच नव्हेत. ॥१२॥
सत्त्व म्हणजे ज्ञान, रज: म्हणजे कर्म आणि तम: म्हणजे अज्ञान अशा तीन प्रकृतिगुणांचे वर्णन करतात. हे गुण कालरुपी ईश्वराच्या प्रेरणेने क्षुब्ध होतात. प्रकृतीचा व्यक्त स्वभाव (स्वरुप) म्हणजे सूत्र, महत्तत्व होय. पुरुष, प्रकृती , महत्तत्व, अहंकार आणि आकाशादी पंचमहाभूते मिळून नऊ तत्त्वे होतात. कर्णनेत्रादी पाच ज्ञानेंद्रिये आणि हस्तपादादी पांच कर्मेंद्रिये, व ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय असणारे मन, मिळून अकरा तत्त्वे होतात. शब्दादि पांच विषय ही तत्त्वे होत. गमनादि पांच ही कर्मफळे म्हणून निराळी तत्त्वे नव्हेत. ॥१३-१६॥
कार्यरुपी व कारणरुपी प्रकृती विश्वोत्पत्तींच्या आधी, आपल्या सत्त्व,रज व तम या विकारोत्पादक गुणांनी उत्पत्तीला योग्य असे स्वरुप धारण करते, म्हणजे विश्वाचे ती उपादन कारण होते. पुरुष ईक्षण करणारा म्हणून निमित्तकारण होतो. ॥१७॥
पुरुषाच्या ईक्षणाने शक्तिवंत झालेले प्रक्षुब्ध महत्तत्त्वादी धातु एकत्र होऊन प्रकृतीच्या आश्रयाने एक ब्रह्मांड उत्पन्न करतात. ॥१८॥
सातच तत्त्वे प्रतिपादणारे तत्त्वज्ञ, फक्त ५ महाभूते, जीव आणि सर्वांधार आत्मा मिळून सात तत्त्वे मानतात; आणि त्यांपासून शरीर, इद्रिये व प्राण ही उत्पन्न झाली असे म्हणतात. ॥१९॥
सहा तत्त्वे मानणारे फक्त ५ महाभूते व परम पुरुष -ईश्वर अशी ६ तत्त्वे मानतात; आणि आपणच निर्माण केलेल्या भूतांस उपादान करुन ईश्वर हे विश्व उत्पादितो व त्यांत प्रविष्ट होतो, असे म्हणतात. चारच तत्त्वे मानणारे- तेज , जल  व पृथ्वी अशी आत्म्यापासून उत्पन्न तीन तत्त्वे व आत्मा मिळून चार तत्त्वे होत, असे म्हणतात. आणि चार तत्त्वांपासूनच हे विश्व म्हणजे ही अवयव असणारी कार्ये झाली, असे त्यांचे मत आहे. ॥२१॥
सतरा तत्त्वे मूळ असे म्हणणारे ५ महाभूते, ५ तन्मात्रा व ५ इंद्रिये, या १५ तत्त्वांचा आणि मन- जीव -व आत्मा मिळून दोन तत्त्वांचा समावेश करतात. ॥२२॥
तत्त्वसंख्या सोळा आहे अस म्हणणारे विव्दान्‍ आत्म्यातच मनाची-जीवाची- परिगणना करुन भूतादि १५ तत्त्वे घेतात आणि तत्त्वे १६ असे म्हणतात. तेराच तत्त्वे मानणारे ५ भूतें, ५ इंद्रियें, १ मन, १ जीव व १ आत्मा मानणारेही काही आहेत. ॥२४॥
याप्रमाणे अनेक विव्दान ऋषींनी अनेक प्रकारे मूळ तत्त्वांची भिन्न भिन्न संख्या सांगितली आहे. प्रत्येक मत सप्रमाण म्हणून न्याय्य आहे. ॥२५॥
उध्दव प्रार्थनापूर्वक म्हणाला, कृष्णा ! आपापल्या भिन्नभिन्न स्वरुपांनी जरी पुरुष आणि प्रकृती विलक्षण असतात, तरी ती उभयतां एकमेकांच्या आश्रयाने राहत असल्यामुळे त्यांच्यामध्ये भेद आहे असे दिसत नाही. ॥२६॥
प्रकृतीच्या आश्रयाने आत्मा राहतो आणि आत्म्याच्या आश्रयाला प्रकृति येते, असा अनुभव येत असल्यामुळे, हे  कमलाक्षा ! माझ्या मनांत जो मोठा संशय उत्पन्न झाला आहे, तो संशय, हे सर्वज्ञ कृष्णा,  युक्तिकुशल प्रवचनाने छिन्नविच्छिन्ना करण्याला तूच योग्य आहेस. ॥२७॥
जीवांस ज्ञान देणारा, तू त्यांचे ज्ञान विनष्ट करण्याची शक्ती तुझीच होय. तुझ्या मायेचे विलास तूच जाणतोस. इतरास ते  समजणे शक्यच नाही. ॥२८॥
श्रीकृष्ण म्हणाले, नरश्रेष्ठ उध्दवा ! पुरुषाचे स्वरुप आणि प्रकृतीचे स्वरुप यात अत्यंत मोठा भेद आहे. प्रकृतीचे गुण मात्र संक्षुब्ध झाल्यामुळे ही सर्व सृष्टि विकारपूर्ण होऊन  राहिली आहे. ॥२९॥
उध्दवा ! माझी माया गुणमयी आहे. तीच आपल्या गुणांनी भेद उत्पन्न करते व जीवांच्या अंत:करणांत अनेक प्रकारच्या भेदबुध्दी उत्पादिते. सृष्टीमध्ये तीन प्रकारचे विकार असतात. आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक असे ते तीन विकार होतात. ॥३०॥
नेत्रेंद्रिय, त्याला दिसणारे रुप आणि नेत्रगोलकांत राहणारा सूर्यांश ही त्रय़ी व तिची सिध्दि परस्परांवर अवलंबून असते. पण आकाशांतील सूर्य स्वयंसिध्द असतो, त्याप्रमाणे वरील त्रयीचा सर्वकारण जो आत्मा तो यांच्यापासून भिन्न असून स्वयंसिध्द आणि सर्वसाधक आहे. वरील नेत्रत्रयीप्रमाणेच इतर त्वचा, कान, डोळे, जीभ, नाक या इंद्रियांचे मनासह व सांगितल्याप्रमाणे त्रिकूट तयार होते. त्याचा अधिष्ठाता आत्मा होय. ॥३१॥
गुणांमध्ये क्षोभ झाला म्हणजे प्रधानाच्या महत्तत्त्वापासून होणारा जो  हा विकार, तो अहं-अहंकार होय. तो सत्त्वादि तीन प्रकारचा आणि मोह व भेद या बुध्दींचा हेतु आहे. तो विकारजन्य अहंकार सात्त्विक , तामस, राजस अशा तीन प्रकारचा आहे. ॥३२॥
परंतु आत्मा हा पूर्ण ज्ञानस्वरुप आहे. भेदाच्या बुध्दीमुळे मात्र ‘ तो आहे की नाही’ याची आम्हाला पडलेली भ्रांती सार्थ होते. वस्तुत: ती व्यर्थच होय. तथापि माझ्यापासून दूर झालेल्या लोकांच्या बुध्दीतून हा वाद नाहीसा होणार नाही. ॥३३॥
उध्दव म्हणाला, प्रभो ! तुला पराड्‍मुख झालेले जीव आपाआपल्या कर्मानुसार उत्तमाधम योनींत जन्ममरण कसे पावतात हे मला सांग. ॥३४-३५॥
श्री भगवान्‍ म्हणाले, विषयग्राहक पंचेद्रियांसहित म्हणजे १० इंद्रियें व ५ प्राण यांसहित असणारा, कर्मप्रधान कर्मरुप मन असते. हा देह सोडून दुसर्‍या देहांत जातो ! ॥३६॥
कर्ममय झालेले मन, इंद्रियगम्य विषय प्रत्यक्ष पाहून श्रुतिव्दारा ऐकून सर्व विषयांचे चिंतन करते. नंतर ते ते दृष्टश्रुत विषय विद्यमान असता मन जागे असते, आणि ते विषय नसले म्हणजे मन क्षीणबल होते. त्यामागून लवकरच स्मृतीही नष्ट होते. ॥३७॥ विषयाच्या (देहाच्या) उत्कट अभिनिवेशाने  व इतर कित्येक कारणांमुळे पूर्वदेहाचे स्मरण होत नाही, तीच अत्यंत विस्मृती म्हणजे जीवाचा मृत्यु होय; आणि सर्वथा आपलेच स्वरुप म्हणून वर्तमान विषयाचा ((देहाचा) स्वीकार करणे हा  जीवाचा जन्म होय, असे म्हणतात. स्वप्ने व मनोराज्ये ही उदाहरणे या श्लोकव्दयांतील जन्ममृत्यूचे विधान स्पष्ट करतात. ॥३८-३९॥
(नवीन) स्वप्न किंवा (नवीन) मनोराज्य चाललेले असले म्हणजे पूर्वीचे स्वप्नमनोरथविषय मुळीच स्मरत नाही. याप्रमाणे मनाच्या स्मरणविस्मरणांचा भावार्थ, अनादी जीव असा समजतो की, आपल्यास जन्ममरणे येतात. ॥४०॥
इंद्रियास आश्रय देणार्‍या मनोवस्थेनुसार, पदार्थांमध्ये तीन अवस्था प्रकट होतात. स्वप्नस्थ पुरुष आपणच मिथ्यारुपी होऊन आपणास निरनिराळ्या तर्‍हेने पाहतो, तसे हे इंद्रियसाह्य घेणारे मन स्मरणास्मरणामुळे हे विश्व व आपलाअ देह यांस तीन प्रकारे (जन्म आहे , स्थिती आहे, मृत्यु आहे असे) पाहते. ॥४१॥
उध्दवा ! सर्वभक्षक काळाच्या प्रचंड सामर्थ्याने सर्व जडाजड वस्तू प्रतिक्षणी जन्ममरणाच्या अवस्थेत जात असतात; पण त्या अवस्था अतिसूक्ष्म म्हणून दिसत नाहीत. ॥४२॥
उदाहरणार्थ दिव्याची ज्योत, नदीच्या प्रवाहांतील पाणी किंवा वृक्षफले यांचे वय, त्यांची स्थिती, मृत्यू ही प्रतिक्षणी बदलत असतात. ॥४३॥
दिव्याच्या ज्योतींतील तैलपरमाणु प्रतिक्षणी बदलतात प्रवाहांतील पाणी प्रतिक्षणी बदलते, तरी तोच हा दिवा, तोच हा नदीप्रवाह, असें अज्ञानी लोक बोलतात. त्याचप्रमाणे पुरुषाच्या शरीरांतील घटक प्रत्येक क्षणी बदलत असतांही तोच हा पुरुष असे अज्ञानी माणसाचे बोल असतात. ॥४४॥
स्वकर्माच्या बीजाने तोच पुरुष येथे जन्मतो व मरतो, असे म्हणूच नका. कारण तो स्वरुपत: अज व अमर आहे . तो जन्मतो व मरतो, ही भाषा भ्रांतिजन्य आहे. लाकूड पेटले म्हणून अग्नी जन्मत नाही किंवा विझले म्हणून मरतही नाही. ॥४५॥
मातेच्या उदरांत रेतोरुपाने असणे, गर्भावस्था, जन्म, बाल्य,  कौमार्य, तारुण्य, प्रौढत्व , वृध्दत्व व मृत्यु ह्या नऊ अवस्था शरीराच्या मात्र आहेत, जीवाच्या नव्हेत. ॥४६॥
पूर्वी सांगितलेल्या ज्या देहाच्या वरिष्ठ-कनिष्ठ अशा नऊ अवस्था त्या मनाने उत्पन्न केलेल्या आहेत. परंतु गुणांवर आसक्त असणारे जीव, त्या अवस्था आत्म्याच्या असे समजतात. कचित्‍ एखादा शहाणा तसे समजत नाही. ॥४७॥
आपल्या वडिलांच्या देहाला मृत्यू आला, आपल्या  पुत्राच्या देहाचा जन्म झाला, यावरुनही आपल्या देहाच्या जन्ममरणांचे अनुमान होते. वस्तू उत्पन्नविनष्ट होतात, पण त्यांचा ज्ञाता एकच अव्दितीय व नित्य असतो. ॥४८॥
तरुबीज तरुला जन्म देत व फल शेवटी त्याला मारते;  हे जाणणारा विव्दान्‍ जसा तरुहून निराळा, त्याप्रमाणे देहाचे जन्ममरण पाहणारा देहाहून विलक्षण म्हणजे देहधर्म नसणारा असतो. ॥४९॥
प्रकृती व पुरुष यांमधील भेदाचे ज्ञान विवेकाच्या अभावामुळे न होऊन प्रकृतिसंगतीने ‘आपण प्रकृतिच’ असा जीवाला भ्रम होतो व तो संसारात पडतो. ॥५०॥
गुणसंगती असेल तसा त्याला संसारांतील जन्म येतो. सत्त्वगुण प्रबल असला तर तो ऋषिकुलांत किंवा देवयोनीत, रजोगुण प्रबल असेल तर राक्षसयोनीत किंवा मानवयोनीत आणि तमाचाच प्रभाव जास्त असेल तर तिर्यक्‍ म्हणजे पशुपक्ष्याच्या योनीत जन्मतो. ॥५१॥
जो नृत्य आणि गायन करतो, त्याचीच नक्कल दुसरा उठवितो. त्याचप्रमाणे अनुकरण करणारा हा जीव त्या इतर वस्तूंचे बुध्दिगुण घेतो; आणि त्याची इच्छा नसली तरी त्या गुणांच्या जोराने तो इतरांप्रमाणे वागू लागतो. ॥५२॥
नदीचा प्रवाह चालत असता आपण नावेत बसलो म्हणजे नदीकाठची झाडे चालतातसे वाटते आणि मनोबरोबर डोळे गरगर फिरविले म्हणजे सर्व पृथ्वी हालत आहे असा भ्रम होतो. ॥५३॥
उध्दवा ! मनोरथ जसे खोटे, स्वप्नातील अनुभव जसा खोटा, त्याप्रमाणेच आत्म्याला संसार भासविणारा अनुभव खोटा आहे. ॥५४॥
वस्तुत: विषयवस्तु नसतात, तरी जीवाचा ससार नष्ट होत नाही. याचे कारण जीव विषयाचे ध्यानच अखंड करतो. स्वप्नात खरे पदार्थ नसताही त्या त्या विषयांचा आभास खरा भासतो. ॥५५॥
म्हणून उध्दवा ! अवास्तवाचाच स्वीकार करणार्‍या इंद्रियांचे साह्य घेऊन संसाराचा उपभोग घेऊ नको. संसारामध्ये नित्य जिवंत असणारा भेदभाव, आत्मस्वरुपाचे यथार्थ ज्ञान नसल्यामुळे मात्र प्रकट होतो. ॥५६॥
उध्दवा ! मोक्षेच्छु पुरुषाचा कोणी दुष्टांनी तिरस्कार केला, त्याचा अपमान केला, त्याला फसविले, त्याचा मत्सर केला , त्याला मारले, किंवा बांधून टाकले, त्याची वृत्ती काढून घेतली, अथवा त्याच्या शरीरावर थुंकले, मुतले, सारांश त्याला अनेक प्रकारे जरी गांजले, तरी अशा संकटप्रसंगी सुध्दा मोक्षेच्छूने स्वत: मोक्षसाधनांनी आपला उध्दार करावा. ॥५७-५८॥
उध्दव म्हणाला , श्रेष्ठ उपदेशकां’ हे म्हणणे मला नीट समजून सांग. दुष्टछल मला तर देवा असह्यच वाटतो. ॥५९॥
कृष्णा, विव्दानांची देखील प्रकृती प्रबळ असते. तुझ्या चरणाचा आश्रय करणार्‍या शांत, नि:सीम, एकनिष्ठ भक्तांशिवाय इतराला आपल्या शरीराचा हा असला छल सहन होणे अशक्यच आहे॥६०॥
अध्याय सोळावा समाप्त.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-03-14T19:52:22.7430000