उध्दवगीता - अध्याय तेरावा

उध्दवगीता

श्रीभगवान्‍ म्हणतात, उध्द्वा ! ज्या मुमक्षू भक्ताने श्रुतीचे श्रवण, मनन, निदिध्यासन करुन साक्षात्कारापर्यंत आपला आत्माभ्यास आणिला व प्रत्यक्ष साक्षात्कार करुन घेऊन ‘मीच परब्रह्म आहे’ असा निश्चय स्वानुभवाने संपादिला , त्याने ‘हे सर्व दृश्य जग मायामय म्हणजे मिथ्या होय’ असे जाणावे आणि ‘ही माया व  मी त्या मायामय विश्वाचा ज्ञाता, तसेच ब्रह्मज्ञाता’ हे ज्ञानही मला समर्पण करावे. ॥१॥
परमार्थज्ञाला मी परमेश्वरच, पूर्ण ब्रह्म स्वरुपच अत्यंत प्रिय . तोच त्याचा स्वार्थ म्हणजे खरा पुरुषार्थ असतो; परब्रह्मज्ञान हेच त्याचे ज्ञानसाधन असते. त्याचा ‘स्वर्ग’ परब्रह्म, त्याचा मोक्षही परब्रह्म. माझ्याशिवाय दुसरा कोणताही अर्थ त्याला प्रिय नसतोच. ॥२॥
याप्रमाणे शास्त्रज्ञानी आणि साक्षात्कारसंपन्न मद्भक्तास माझे, परब्रह्माचे स्थान म्हणजे स्वरुप समजते. अर्थात्‍ असा ज्ञानविज्ञानी मला अत्यंत प्रिय असतो आणि तो ज्ञानी, ज्ञानस्वरुपाने माझे धारण करतो. ॥३॥
उध्दवा ! अशा ब्रह्मज्ञानाच्या एकाच अंशात जे मोक्षसामर्थ्य आहे, त्या अंशाच्या अंशाचे सुध्दा सामर्थ्य नुसत्या तपात, तीर्थाटनांत, दानात किंवा इतर पवित्र म्हणून मानलेल्या कोणत्याही कर्मात नाही. ॥४॥
परब्रह्माच्या ज्ञानसहित तू आपल्या जीवत्मस्वरुपाचे ज्ञान संपादन कर आणि याप्रमाणे ज्ञानविज्ञानसंपन्न झालास, परमात्मा व जीवात्मा यांचे ज्ञान तुला झाले म्हणजे ती दोन्ही स्वरुपे एकात्मकच आहेत, अभिन्न आहेत, असे ज्ञान प्राप्त होईल. याकरिता एकनिष्ठ भक्तीने तू माझे भजन कर. ॥५॥
भक्तोत्तम उध्दवा ! आतांच सांगितलेल्या ज्ञानविज्ञानयज्ञानेमी आत्मस्थ जो परम आत्मा, त्याचे जीवात्म्याच्या स्वरुपात, जीवात्मस्थानात यजन करुन अनेक मुनी मुक्त झाले आहेत. मी सर्व यज्ञांचा स्वामी आहे त्याची एकांतिक भक्ती ज्ञानरुपाने करणारा व ती त्यालाच अर्पण करणारा ज्ञानी भक्त मुक्त झालाच पाहिजे. ॥६॥
उध्दवा ! भौतिक, दैविक व मानसिक विकार तुझ्या आश्रयाने मात्र राहतात. ते तुझे स्वरुप नव्हेत. अर्थात्‍ ते अनात्मकाचे, मायेचे राज्यात राहणारे असतात. तेव्हा हे भौतिकादी विकार जन्मास आले, किंवा काही वेळ राहिले, अथवा यांचा नाश झाला, तरी तू निर्विकार अशा तुला त्यासंबंधाने हर्षखेद मानण्याचे काहीच कारण नाही. शिवाय, जे जन्मापूर्वी नसते, ते मधील स्थितीतही स्वरुपत: नसतेच. जे दिसते, तो नुसता भास मात्र आहे. ॥७॥
उध्दव म्हणतो, हे विश्वनायका, विश्वरुपा, भगवान्‍ श्रीकृष्ण ! वैराग्य आणि विज्ञान यांनी युक्त असलेले शुध्द व सनातन आत्मज्ञान मला अशा रीतीने कृपा करुन सांग. त्याचप्रमाणे मोठमोठया ब्रह्मदेवादिकांसही हुडकून काढावा लागतो , तो भक्तियोगही मला सांग. ॥८॥
प्रभो ! भौतिकादि त्रिविध तापांनी मला सतावून सोडले आहे, भयंकर असा हा जो संसाराचा मार्ग त्यावरुन जाता जाता मी होरपळून निघालो आहे. देवा ! अमृताचा नित्य वर्षाव करणारे जे तुझे चरणकमलव्दय, त्याच्या शिवाय मला तारक करणारा दुसरा आश्रय दिसत नाही. ॥९॥
हे अत्युदार मनाच्या पुराणपुरुषा ! या संसाराच्या विवरांत - वारुळांत - पडलेल्या मला काळरुपी सर्पाने अनेक चावे घेतले आहेत, तरी पण क्षुल्लक सुखाची तीव्र अशा करणे ही आमची जीवांची खोड जातच नाही. म्हणून कृपा कर , आणि मोक्ष देणार्‍या उपदेशामृताचा वर्षाव कर. माझी क्षुद्रसुखतृष्णा शांत कर, तात्पर्य माझा उध्दवा कर. ॥१०॥
श्रीभगवान्‍ म्हणतात, उध्दवा ! सध्दर्माचे ज्ञान पूर्ण असून तद्‍नुसार आचरण करणांमध्ये श्रेष्ठ असणारा, जो वयोवृध्द व ज्ञानवृध्द पितामह भीष्म त्याला निर्वैर असणार्‍या राजा धर्माने आमच्या सर्वांच्या समक्ष अशाच प्रकारचा प्रश्न विचारला होता. ॥११॥
भारतीय महायुध्दात घडून आलेल्या आप्तेष्टांच्या निधनाने सारखी तळमळ लागलेल्या धर्माने शेवटी मोक्षधर्मासंबंधाने भीष्मास पुष्कळ प्रश्न केले. ॥१२॥
त्यावेळी देवव्रत जो भीष्म त्याने जगत्कल्याणार्थ व धर्मराजाच्या समाधानार्थ जे धर्म ( हे ज्ञान व जी कर्तव्ये) सांगितले, तेच तुला सांगतो. उध्दवा ! भीष्माने केलेला उध्दारक उपदेश, ज्ञान, वैराग्य, विज्ञान, श्रध्दा, भक्ती या सर्वांनी ओतप्रोत भरलेला होता. ॥१३॥
पुरुष, प्रकृति, महत्तत्त्व, अहंकार आणि पांची भूतांच्या पांच तन्मात्रा मिळून नऊ; मन, पांच ज्ञानेंद्रिये व पांच कर्मेद्रियें मिळून अकरा; पांच पृथ्वीप्रभृति महाभूते आणि सत्त्व,  रज आणि तम मिळून तीन; याप्रमाणे ९+११+५+३ = २८ अठठावीस तत्त्वे आहेत.(ब्रह्मदेवापासून तो थेट गवताच्या काडीपर्यंतच्या )आणि सर्वगत अठठावीस तत्त्वांतही एकच परमात्म वस्तु सदैव विद्यमान असते, असे ज्यामुळे ज्ञात होते, तेच ज्ञान होय, असा माझे नि:संदेह मत आहे. सृष्टीची घटना २८ तत्त्वांनी झाली आहे व या अठ्ठावीस तत्त्वांची विद्यमानता एका परमात्मस्वरुपाशिवाय नसते,असे ज्या ज्ञानाने समजते, तेच तत्त्वज्ञान होय. ॥१४॥
आणि ज्या ज्ञानाने हा अवघा प्रपंच परमात्मस्वरुपच आहे असे समजते, ते ज्ञानही अनेकात्मक नसून केवळ परमात्मस्वरुपच आहे असे समजते, ते ज्ञानही अनेकात्मक नसून केवळ परमात्मरुपच आहे, एकच एक आहे, असे (स्वानुभवाने) कळले म्हणजे त्या ज्ञानाला विज्ञानाचे रुप येते. उध्दवा ! त्रिगुणात्मक जे यच्चावत्‍ पदार्थ आहेत, त्यांची उत्पत्ति, स्थिति व लय ही सर्व घटना त्या परब्रह्मस्वरुपी कारणापासून मात्र होते. ॥१५॥
उध्दवा ! भाव म्हणजे त्रिगुणांनी उत्पन्न केलेले जड पदार्थ व मानसिक भावना या उत्पन्न होण्याच्या पूर्वी, यांचा नाश झाल्यानंतर व यांचा नाश झाल्यानंतर व याची रुपांतरे (मातीपासून कपाल, कपालापासून घट अशी) होत असतानाही जे सर्वदा विद्यमान असते आणि (घटाचे कपालात (खापरात) व कपालाचे मातीत असा) उलट क्रम झाल्यानंतरही जे अवशिष्ट राहते, ते सत्‍ होय. अविकृत स्वरुपाने जे नित्य व सर्वव्यापी असते, ते सत्‍ होय. ॥१६॥
भगवान्‍ म्हणतात, उध्दवा, प्रमाणे चार प्रकारची आहेत. श्रुति, प्रत्यक्ष, ऐतिहासिक आणि अनुमान ही ती चार प्रमाणे होत. या चार प्रमाणांच्या कक्षेत नसणारा किंवा या प्रमाणांनी खंडित न होणारा भेदबुध्दीपासून विरक्त असतो. ॥१७॥
कर्म व कर्मफले नश्वर होत. ब्रह्मदेवापर्यंत सर्व उत्पन्नजात नश्वर, दु:खकारक होय. अदृष्ट अशा वस्तू देखील दृश्य वस्तूंप्रमाणे अमंगल आहेत, असे शहाण्या माणसाने समजावे. ॥१८॥
उध्दवा, तू माझा सखा. तेव्हा मी तुला भक्तियोग सांगितला आहे ! तथापि माझ्या मोक्षदायी कथांवर श्रध्दा ठेवणे, त्यांचे श्रवण करणे, नेहमी माझ्या गुणांचे संकीर्तन करणे, माझी पूजा करण्यात एकनिष्ठता ठेवणे , व अनेक स्तोत्रे म्हणून माझी स्तुति करणे. ॥२०॥
माझ्या सेवेत परम आदरभाव ठेवणे, मला सादर साष्टांग नमस्कार करणे, माझ्या भक्तांचे प्रेमाने पूजन करणे , सर्व भूतांत माझे अस्तित्व आहेच  असे ज्ञान असणे, माझ्या सेवेसाठी व मला प्रिय असणारी कर्में करण्यासाठी शारीरिक कर्म करणे, माझे गुणानुवाद गाणे, आपले मनच मला अर्पण करणे, अर्थात्‍ सर्व इतर वासनांचा त्याग करणे माझ्यासाठी सर्व उपभोगांचा व भोगसुखांचा धि:कार करणे, जे काय यजन, दान, हवन, जप, व्रताचरण व तपश्चरण करणे ते माझ्या प्रीत्यर्थच करणे. ॥२१-२३॥
उध्दवा, असे धर्माचरण करुन मुमुक्षूंनी मला आत्मार्पण केले म्हणजे माझ्या ठिकाणीच त्याला भक्तीचा लाभ होतो. नंतर त्या मत्स्वरुप झालेल्या भक्ताल दुसरा पुरुषार्थच राहत नाही. ॥२४॥
असा हा अनन्य भक्त आपले शांत झालेले व सात्त्विक गुणांनी परिपूर्ण झालेले शुध्द चित्त आत्म्याला म्हणजे मला अर्पितो, तेव्हा त्याला शुध्द धर्माचा, ज्ञानाचा, उत्कृष्ट वैराग्याचा व भगवंताच्या ऐश्वर्याचा लाभ सहजच होतो. ॥२५॥
परंतु याच्याच उलट जेव्हा जीवाचे चित्त विषयभोगी होऊन इंद्रियांच्या पाठीमागे धावते, रजोगुणी होते ,  असत्‍ ठिकाणी असक्त होते, तेव्हा तेच चित्त  विपरीत होते. अर्थात्‍ त्या पुरुषाचे सर्व आचरण अधार्मिक होते. ॥२६॥
याप्रमाणे धर्म म्हणजे माझ्या भक्तीने निर्माण होणारे आचरण, ज्ञान म्हणजे ऐक्यात्मज्ञानविज्ञान, वैराग्य म्हणजे गुणांसबंधी अनासक्ती, ऐश्वर्य म्हणजे अणिमादी सिध्दी असे समज. ॥२७॥
उध्दव म्हणतो, हे शत्रुंजया ईश्वरा कृष्णा ! यम किती,नियम किती, शम काय, दम काय, तितिक्षा कशाला म्हणतात, धृती म्हणजे काय? ॥२८॥
तसेच दान, तप , शौर्य, सत्य व ऋत, त्याग, इष्टधन, यज्ञ, दक्षिणा यांची लक्षणे सांगा. ॥२९॥
श्रीमान्‍  केशवा ! पुरुषाचे बल, त्याचे भाग्य, त्याचा लाभ याची स्वरुपे व विद्या आणि विनय काय, परम श्रीमंती कोणती, सुख काय, दु:खस्वरुप काय हे सांग. ॥३०॥
तसेच पंडित कोण? मूर्ख कोण? सन्मार्ग कोणता सुमय कोणता, स्वर्ग-नरकाचे लक्षण काय, बंधू कोण, गृह कशाला म्हणावे? हे सर्व सांगा. ॥३१॥
श्रीमंत कोण , दरिद्री कोण, कृपण कोण , ईश्वर कोण? सत्प्रभो ! या प्रश्नांचा व यांच्या विपरित जे पदार्थ त्यांची उत्तरे मला कृपा करुन सांगा. ॥३२॥
श्रीभगवान्‍ म्हणतात, उध्दवा, यथार्थ, भाषण परापहार न करणे, विषयादिकांशी अनासक्ति, मर्यादा ठेवणे, संग्रह न करणे,  वेदावर विश्वास ठेवणे, ब्रह्मचर्य पाळणे, मूक असणे, मनाला स्थिर करणे, क्षमा आणि सर्वांस अभय देणे हे बारा यम होत. ॥३३॥  
शरीर स्वच्छ ठेवणे, मन निर्मळ ठेवणे, मंत्राचा जप करणे, तप आचरणे, हवन करणे, श्रध्दा-धर्माविषयी आदर असणे, अतिथींचा सत्कार करणे, माझे भजनपूजन करणे, तीर्थांस जाणे , परोपकार अथवा परलोकसाधक कर्म करण्याची इच्छा असणे, संतोष, गुरुची सेवा करणे हे बारा नियम होत. ॥३४॥
उध्दवा ! हे बारा नियमांसह बारा यम श्लोकांत सांगितले आहेत. मुमुक्षुला यम महत्त्वाचे व संसार्‍याला नियम महत्त्वाचे असतात. यांच्या अर्थाप्रमाणे आचरण केले व तशी सेवा झाली म्हणजे हे उपासकाच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. ॥३५॥
माझ्या ठिकाणी एकाग्र बुध्दी ठेवणे हाच शम, इंद्रियांचा निग्रह करणे हाच दम, दु:ख सहन करणे हीच तितिक्षा, जीभ व कामलिंग यावर प्रभुत्व गाजविणे हेच धैर्य, असे म्हणावे. ॥३६॥
दंड टाकणे (अपकार न करणे) हाच त्याग म्हणजे परमश्रेष्ठ दान, आशेचा नाश हेच तप होय. असे स्मृती म्हणते. आपल्या स्वभावावर जय मिळविणे- स्वभाव ताब्यात ठेवणे हेच शौर्य, उच्चनीचभाव नसणे हेच सत्य होय. ॥३७॥
मधुर व सत्य भाषण हेच ऋत असे विव्दान लोक म्हणतात. कर्मामध्ये आसक्त नसणे हीच शुध्दी, त्याग संन्यास हाच होय असे म्हणतात. ॥३८॥
धर्म पाळणे हेच उत्तम धन, मी भगवान्‍ हाच यज्ञ, ज्ञानाचा उपदेश करणे हीच उत्तम दक्षिणा, प्राणाचा निग्रह करणे हेच श्रेष्ठ बल होय.॥३९॥
माझे जे धर्म-यश-ऐश्वर्यादि सहा गुण त्यांचे ठिकाणी श्रध्दा ठेऊन त्या त्या परमेश्वरी गुणांचे अनुकरण करणे हेच भग म्हणजे भाग्य, माझी भक्ती हाच उत्तम लाभ होय. आत्मस्वरुपात भेद नाही, या निश्चयाला विद्या म्हणावे आणि अकर्माविषयी (कर्म अवश्य असता न करणे व वाईट कर्म करणे याविषयी) तिरस्कारबुध्दी हीच ही होय. ॥४०॥
तसेच निरपेक्षतादी गुण संपादणे (कशाची आशा नसणे, स्वतंत्र असणे वगैरे सात्विक गुणांचे संपादन करणे) हीच संपत्ती, दु:खाच्या व सुखाच्या पलिकडे जाणे (विषयसुखद:खातीत होणे) हेच परम सुख इष्ट भोगांपासून सुख मिळावे ही इच्छा असणे हेच दु:ख होय. बंध व मोक्ष जाणणारा तोच पंडित होय. ॥४१॥
देह- गेह वगैरे मीच आहे असे म्हणणारा तोच मूर्ख, माझी प्राप्ती करुन देणारा तोच पंथ म्हणजे सन्मार्ग. चित्त विक्षिप्त होणे- विषयांत गुंतणे हा कुमार्ग आणि सत्त्वगुणांचा उदय होणे, उत्कर्ष  होणे,हा स्वर्ग होय.॥४२॥
तमोगुणांचा (आळशीपणा वगैरेंचा) उत्कर्ष होणे, हाच नरक होय. गुरु आचार्य म्हणजे वस्तुत: मीच खरा बंधू (हितकर्ता) होय. मोक्ष मिळणे ज्यांत संभवनीय ते मानवी शरीर हेच गृह होय. गुणसंपन्न असतो तोच श्रीमंत होय. ॥४३॥
जो सदा असंतुष्ट, असमाधानी, रडतोंडया, तोच दरिद्री. आणि इंद्रिये ज्याच्या आधीन नाहीत तोच कृपण म्हणजे दीन होय. गुणांमध्ये (पदार्थांच्या गुणधर्मांमध्ये व इंद्रियांमध्ये ) जो आसक्त नसतो, तोच खरा ईश्वर म्हणजे प्रभू, आणि गुणांतच मग्र झालेला तो परतंत्र होय. ॥४४॥
याप्रमाणे सख्या उध्दवा ! तुझ्या प्रश्नांची समर्पक उत्तरे मी तुला सांगितली आहेत. फार काय सांगावे? गुणदोषांचे लक्षण म्हणजे गुण-दोष पाहणे ह्याचेच नांव दोष होय;  आणि गुणदोषांतील सर्व आत्मरुप आहे असे ज्ञान व आचरण असणे, हा गुण होय ! ॥४५॥
अध्याय तेरावा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : March 14, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP