सुभद्राचंपू - सर्ग सातवा

निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


मार्गी ते हरिली बहीण तुमची देवी सुभद्रा सती ॥
हेही आरुढली उगी रहिंवरी घेवोनि जातो यती ।
आहे वीर नव्हेचि भिक्षु समजा मोठा प्रतापी दिसे ॥
गेले वीर समस्तहीं हटविलें हें वीर्य कोणा असे ॥१॥
रामा अर्जुन आपणा म्हणवितो माता था सांगतो ।
माझी मातुळकन्यका मम असे हा भाग हें बोलतो ॥
जा सांगा म्हणतो तुम्हासि दिसतो युध्दीं नव्हे घाबिरा ।
द्रोणाचा तरि शिष्य मुख्य म्हणवी शस्त्रास्त्रवेता पुरा ॥२॥
आम्ही युध्द करावयासी अडवे झालों तया रोधुनी ।
केलीं चूर्ण समस्त खड्धनुषें गांधर्व तें सोडूनी ॥
नोहे धीर अम्हासि यादव महा संमिन्न केले रथी ।
कैसे ते असिवार पावति तया कैं पायिंच्यांच्या गती ॥३॥
शस्त्रास्त्रें अमुची गळोनि पडलीं केली महा दुर्दशा ।
हें ऐकोनि महांत रोष चढला रामाचिया मानसा ॥
क्रोधवेशवशें त्वरेंचि वळघों पाहे रथीं तो हळी ।
कृष्णाचें मुख तेधवां अतिभरें शोणाक्ष तो न्याहळी ॥४॥
बोले मीं अति दृष्ट भूप दमितॊं निर्दाळिता वर्ततां ।
माझी नेयिल ते स्वसा कवणरे वंचोनि मीं देखतां ॥
झालाही म जरि वीर अर्जुन तरी मारीन मीं आहवीं ।
पाहा मत्पुरुषार्थ रक्तसरिता मी पांडवी वाहवीं ॥५॥
माझी हे यतिवेषधारक कसा वंचोनि नेतो स्वसा ।
मृत्यूपासुनि केंवि त्यास घडला नेणों सके भर्वंसा ॥
हे हीं यादवसत्कुलोद‍ भव वधू त्या वश्य झाली कसी ।
म्यां सेवेस्तव लाविली तपनिधी जाणॊनियां मानसीं ॥६॥
उपजाति वृत्त.
मैंदापरीं घेउनि वेष ऐसा । विरक्ति विज्ञान वदोनि कैसा ॥
माझ्या मना मोहुनि धीट मोठा । प्रवेशला मत्सदनांत खोटा ॥७॥
लोकीं असे ते असती असंत । बाह्य क्रिया दाउनियां जगातें ॥
ते नाडिती मांडिति दंभ नाना । तैसाचि हा दुर्जन साच माना ॥८॥
मीं भाळलों बाह्य गुणासि याच्या । अध्यात्मबोला रिझलों खळाच्या ॥
गानस्वरें तो मृगयू मृगाला । मोही करी घात तसाचि केला ॥९॥
मारीन ऐसा कपटी कुबुध्दी । टिकेल मत्सन्मुख काय युध्दीं ॥
गदाप्रहारें शतचूर्ण त्याचें । करीन मी दुर्जनमस्तकाचें ॥१०॥
अपांडवी आजि करीन धात्री । नेतो स्वसा चोरुनि हेमगात्री ॥
यती असें मानुनि म्यां तयाला । आणॊनि गेहीं बहुमान केला ॥११॥
तो व्यर्थ माझा उपकार झाला । विद्या गुरु नेणुनि दे खळाला
झाला कसा मायिक हा त्रिदंडी । मोठा कसा दंभ जनांत मांडी ॥१२॥
दंडीन मी त्याप्रति दंडधारी । यमाप्रमाणें हलदंडधारी ॥
येतील बंधू जरि पक्षपाती । मारीन मी जों न लगेति पातीं ॥१३॥
युध्दासि येतांचि वृकोदरातें । फोडीन त्याच्या पृथुकोदरातें ॥
मी तों कदां त्या नकुळा गणीना । सव्दिप्र त्या हीनकुळा गणीना ॥१४॥
आला तरीं तो सहदेव कांहीं । समर्थ माझ्या समतेसि नाहीं ॥
युध्दांगणीं दक्ष नव्हेचि धर्म । आधीं नये मानुनि तो अधर्म ॥१५॥
ज्याच्या घरीं हे तनु पुष्ट केली । त्याचीच ने काय हरोनि बाळी ॥
अधर्म हा मानल काय त्याला । सत्यात्मका भूप युधिष्ठिराला ॥१६॥
सेना त्वरें सर्वही सिध्द कीजे । जावोनि पार्थासह युध्द कीजे ॥
मारा धरा बांधुनि त्यासि आणा । तो शत्रु माझा अनुपम्य जाणा ॥१७॥
झाला जरी पितृस्वसाकुमार । देईन त्याला दृढ एक मार ॥
नाटोपतां जायिल वीर जेव्हां । एका रथें मीच धरीन तेव्हां ॥१८॥
वंचोनि नेतो अमुची कुमारी । तो शूर मानी समरांत मारीं ॥
केली असे ख्याति जगांत येणें । धनुर्ध्दरीं वीर म्हणॊनि शानें ॥१९॥
पाहेन त्याचा पुरुषार्थ आतां । माझ्या कसा तों भिडवील हाता ॥
हळें विदारीन तया उरातें । या मूसळें फोडिन मी शिरातें ॥२०॥
दिशां बळी टाकिन अंग त्याचें । करीन खाजें वृकजबुकांचें ॥
भूतावळी पीतिल शोणितातें । मारीन जेव्हां अरि दुष्ट हातें ॥२१॥
या योग्य नोहे ललिता कृषांगी । सरोजनेत्रा अति मोहनांगी ॥
त्या वेदवाणी प्रति शूद्र जैसा । स्पर्शावया योग्य नव्हेचि तैसा ॥२२॥
संकल्पिली म्या करुनायकातें । दुर्योधनातें सुखदायकातें ॥
हे पांचही पांडव ते भिकारी । देउं नये सुंदर या सिकारी ॥२३॥
ऐसे करी वल्गन फार रांगे । श्रीकृष्ण त्याच्या चरणासि लागे ॥
सायास हा व्यर्थ किमर्थ कीजे । होयील जैं पार्थ न युध्द कीजे ॥२४॥
पूर्वीच म्यां जाणविलें विभूला । अंत: पुरीं योग्य नव्हे स्थितीला ॥
तथापि कन्या तरुणी सुभद्रा । सेवा करी कारण हे अभद्रा ॥२५॥
झालें असो जें घडणार आतां ॥ तो जिंतिजे योग्य नव्हे समर्था ॥
तूं वेगळे जातिल सर्व कांहीं । ते शूर त्यांचें तरि काम नाहीं ॥२६॥
अग्रीपुढें काय तृणें करावें । वीरीं वृथा जाऊनि कां मरावें ॥
समर्थ तूं एक तया जिणाया । या यादवांमाजि तरी म्हणाया ॥२७॥
तथापि त्या जिंतुनि पांडवातें । महोद्भटाते हुतखांडवातें ॥
दीजे पुन्हां नेउनि कौरवातें । त्या धिकरावें रणभैरवातें ॥२८॥
न ठेविजे ते सदनांत कांहीं । न्यावीच कीं ते वधु आणिकांहीं ॥
जे स्पर्शिली त्या नरनायकानें । मी नायकें अन्य वरील कानें ॥२९॥
जे कां सुभद्रा वश त्यासि झाली । ते काय अन्याप्रति माळ घाली ॥
ठेवील ते जीव कसी क्षणार्ध । टाकील ते देह जसा तृणार्ध ॥३०॥
तो कोण आहे परकीय रामा । पितृस्वसापुत्र गुणाभिरमा ॥
जितोनि त्याला अणिकासि द्यावी । हे मात चित्तांत वसों न द्यावी ॥३१॥
करी विधी हे वधु त्याजसाठीं । घडोनि आल्या म्हणवोनि गोष्टी ॥
टाकीं वृथा आग्रह तूं सुदक्षा । बळीयसी केवल ईश्वरेछा ॥३२॥
माया जयाची अघटें घडीतें । घडील ऐशाप्रति बीघ्रडीतें ।
हा खेळ तीचा नकळेचि तुछा । बलीयसी केवळ ईश्वरेछा ॥३३॥
हे सृष्टि जीणें रचिली विचित्रा । भिंतीवरी लेखन जेंवि चित्रा ॥
तेथें नसे की अणुहीं परेछा । बलीयसी केवळ ईश्वरेछा ॥३४॥
सर्वज्ञ सर्वेश्वर सर्ववेत्ता । तूं सर्वलोकीं अससी अनंता ॥
आतां करावी सहसा उपेक्षा । बलीयसी केवळ ईश्वचेछा ॥३५॥
ऐसा हरी प्रार्थित त्याचि काळीं । तैं यादवी सर्व सभा मिळाली ॥
ते देखती आग्रह या हळीचा । तैं स्तब्धल्य अयादववीरवाचा ॥३६॥
आला तदां आकदुंदुभी तो । देखोनि रोषाकुळ राम भितो ॥
हें मानलें भाषण उग्रसेना । कांहीं पुढें यत्न तया दिसेना ॥३७॥
तैं बोलिला उध्दव रम्यवाणी । वीरार्जुना योग्यचि कीरवाणी ॥
माने अम्हां सत्य वदे हरी हा । तुलाचि कां आग्रह अंतरीं हा ॥३८॥
हे पांचही पांडव जीव याचे । सांगीतलें कर्म करावयाचे ॥
श्रीकृष्णापायीं दृढ ज्यांसि निष्ठा । म्हणोनि त्यांची मिरवी प्रतिष्ठा ॥३९॥
हा प्राण कीं केवळ पार्थ याचा । या भूमिभारासि हरावयाचा ॥
तूं नेणसी काय महानुभावा । धनुर्ध्दारा लोकनुतप्रभावा ॥४०॥
हे क्षत्रियाचें तरि कर्म रामा । वधू हरावी स्वमनोभिरामा ॥
तें आचरें अर्जुन वीर्यशाली । चित्तांत तां हे धरिजे खुशाली ॥४१॥
द्यावी तया चंद्रमुखी विधीनें । हे निर्मिली यास्त्व त्या विधीनें ॥
हे सुंदरी त्या अनुरुप रामा । हे अर्पिजे त्याच गुणाभिरामा ॥
तो काय दुर्योधन यीस जोडा । कस्तूरिके योग्य नव्हेचि रेडा ॥
कं चंदनी ऊटि खरासि द्यावी । कोण्या गुणें मात मला वदावी ॥४२॥
वधूवरां आणविजे प्रयत्नें । नसे महाकाज विशेषयत्नें ॥
सभासदां सर्व महाजनांते । हे मानली मात बरी मनातें ॥४३॥
ऐसेंचि बोले वसुदेव आहुत्क । मातामहा देवक वृध्द बाहुक ॥
सर्वांमते हें करणेंचि आलें । हळायुधाचें मग काय चाले ॥४४॥
प्रवृध्द कोपानळ शांत झाला । मेघें जसा दावशिखी विझाला ॥
ऊर्मीं जिराली समुदी मनाची । येतां शरत्काळ तसी घनाची ॥४५॥
विचार रामें तरि आयकीला । तो पाठवी उध्दव सात्यकीला ॥
जावोनि ते भेटति अर्जुनातें । तो आदरी पाहुनि पूर्वनातें ॥४६॥
ते पाहती हांसति या यतीतें । अंकासनीं लक्षुनि त्या सतीतें ॥
तूं धन्य होसी विजया प्रतापी । यथार्थ तूं शोभसि शत्रुतापी ॥४७॥
तां जिंतिली आजि वधू सुभद्रा । कैं ठाव आतां उरला अभद्रा ॥
तुझा हरी केवळ पक्षपाती । रक्षी तसा नेत्रयुगासि पातीं ॥४८॥
तालांक चक्रांक साअहुकाशीं । करोनि आलोचन सावकाशीं ॥
आलों तुम्हातें फिरवावयातें । मनोरथाब्धी पुरवावयातें ॥४९॥
ते पाठवीती म्हणवोनि आलों । पार्था तुला देखुनि धन्य झालों ॥
फिरा पुरातें अति उत्सवासीं । भेटा सुतोषें बळकेशवासी ॥५०॥
महोत्सवें हे परिणोनि भद्रा । नारीमणी कामलता सुभद्रा ॥
जावें स्वगेहा अतितोषचित्तें । समर्पिलीं घॆऊनि रत्नवितें ॥५१॥
तूं साच होती पुरुषार्थसिंधू । तूं शोभसी केवळ धर्मबंधू ॥
पृथा जनित्री अति धन्य झाली । तापोर्मि तीच्या मनिची विझालीं ॥५२॥
ऐशा प्रकारें मधुभाषणानें । स्नेहार्द्र आलोकनिमेषणानें ॥
सन्मान -सौहार्द -सुतोषणानें । त्या भूषविलें मणिभूषणानें ॥५३॥   
आप्तोक्ति ते मानुनि सर्व साची । संतोष मानी मग सव्यसाची ॥
ऐकोनिया उध्दवभाषणातें । स्वीकारिलें वासवि भूषणातें ॥५४॥
टाकोनिया दंडकमलडातें । काषाय - कौपीन - मृगाजिनाते ॥
रुद्राक्षधात्री -स्फटिकादि माळा । त्यागोनि मुक्तामणि हार ल्याला ॥५५॥
उष्णीष सत्कंचुक राजवस्त्रें । धरोनि बांधी अनुपम्म्य शस्त्रें ॥
नीहार - निर्मुक्त दिनेश जैसा । विराजला अर्जुनवीर तैसा ॥५६॥
होता यती भूपति त्याच वेळे । दिसे जनाचे भरि सर्व डोळे ॥
बधूवरां मंडित दिव्ययानीं । तैं आणिलें मान करोनि यांनीं ॥५७॥
गेल अपुढें केशव शार्डगधारी । तलांक बंधू सह तोषकारी ॥
करावया लग्न महोत्सवातें । उत्साह वाटे अति केशवातें ॥५८॥
श्रृंगारिली व्दारवती विराजे । देखोनियां विस्भित देवराजे ॥
नानपरीं तोरण रंगमाळा । दीपावळी नाशिति त्या तमाला ॥५९॥
ते पूररंभादिक वृक्षपंक्ती । व्दारीं उभ्या शोभति गेहपंक्ती ।
नानापताका अतिचित्रवर्णी । ते स्तंभ सारे मढिले सुवर्णी ॥६०॥
लक्ष्मीनिवासी सुख सर्व भोक्ता । नांदे महायोग विलास - धर्ता ।
तेथें उणें काय असेल बोला ॥ कैं वर्णवें या कवी - अल्पबोला ॥६२॥
सोळा सहस्रतरुणीसह चक्रपाणी । ज्या उत्सवीं मिरवितो अखिलांडखाणी ॥
ज्यातें सविस्मित विलोकिति देवराणी । ज्याचें चरित्र बदती निगमीं पुराणीं ॥६३॥
त्या काय वर्ण करुं सकवेल वाणी । हे मानवी लघुतरा अति दीनवाणी ॥
वेडावती फणिविधी शिवमुख्य सारे । ते काय येतिल कवीवचना पसारे ॥६४॥
तैं आणवी नृप युधिष्ठिर याज्ञसेनी । आला वृकोदर सहानुज दिव्ययांनीं ॥
माता पृथा विदुर धौम्य ऋषी अनेक । व्दैपायनादि मुनिनायक आप्त लोक ॥६५॥
मुहूर्तकाळीं विजयासि मंटपीं । आणॊनि अत्युत्सवयुक्त साक्षपीं ॥
कन्या दिली आनकदुंदुभीनें । भरी त्रिलोकी यशदुंदुभीनें ॥६६॥
संतोषले तैं वसुदेवदेवकी । फुलें शिरीं वर्षति सिध्ददेव कीं ॥
भेरी तुरें वाजविती अनेक । त्या अप्सरा नाचति निर्विशंक ॥६७॥
धरामरांचा गण अक्षतेशीं । आशीर्गिरा वोपिति वोहरासी ॥
शोभे सुभद्रा गुणरत्नखाणी । लक्ष्मी तशी पावुनि चक्रपाणी ॥६८॥
किंवा शशी अर्जुन रोहिणी हे । सूर्यप्रभासाम्य ययासी लाहे ॥
शची सुरेंद्रासह संपदेशीं । विराजणें त्या धनदें सुखेशीं ॥६९॥
प्रताप कीर्तीसह वर्त्तताहे । धर्म क्रियेशीं अति शोभताहे ॥
साजे जसा तो क्रतु दक्षिणेशीं । तैसा विराजे जय यादवीसीं ॥७०॥
संतोष वाटे सकळा जनाला । पाहोनि कांतेसह अर्जुनवला ॥
रुपें गुणें शील- वयें समान । म्हणोनि ते डोलविताति मान ॥७१॥
वेष्टी अर्जुनापादपासि ललिता प्रेमें सुभद्रालता ॥
सव्दक्षोजफलान्विता सुकुसुमें नेत्रांबुजालंकृता ॥
संशोणाधरपल्लवा सुकलिका दंतावळीमंडिता ॥
भृंगालीसम केशपाशरचिता सानंद संफुल्लिता ॥७२॥
देखोनिया वोहर या प्रकारीं । त्या नागरीचे गण दाट भारी ॥
ओवाळिती त्याप्रति अक्षवाणी । पृथा तथा देवकि लिंबलोणी ।७३॥
ऐसें करी कौतुक शेषशायी । जो भक्तदीनोध्दर मुक्तिदायी ।
सारोनिया लग्नमहोत्सवातें । यथाविधी पूजूनि पांडवातें ॥७४॥
समर्पिलें आंदणभार हातें । सुवर्णरत्नें वसनें अनंतें ॥
गजाश्वपती रथ कांचनाचे । समर्पिले भार महा धनाचें ॥७५॥
कीरीट माळा पदकें विचित्रें । केयूरमुद्रामणि हेमसूत्रें ॥
झषाकृती कुंडल हस्तमात्रा । त्या लेववी कामसमानगात्रा ॥७६॥
तसेंचि कन्याधन दे अपार । देवी सुभद्रेसि बहुप्रकार ॥
दे दास- दासी- गण सर्वदानी । उदार लक्ष्मीपति चक्रपाणी ॥७७॥
माता -  पृथा - धर्म - वृकोदरातें । माद्रीसुतातें मग द्रौपदीतें ॥
तैं व्यासधौम्यादिमुनीश्वरांतें । सन्मानिलें प्रेमभरें महंतें ॥७८॥
तो पाठवी फाल्गुन आलयाला । अशक्य हे काय गुणालयाला ॥
मनोरथाब्धी तरला धनंजय । श्रीकृष्ण दे त्यासि यशोधनंजय ॥७९॥
भक्तिप्रभावें भुवनत्रयांतरीं । सत्कीर्तिभेरीजयघोष जो भरी ॥
गाती सुराधीश्वरहीं जयाला । श्रीकृष्ण तो साह्य धंजयाला ॥८०॥
सुभद्रा नवोढा रथीं उत्सवासीं । निघे पार्थ देवेंद्रप्रस्था सुतोषीं ॥
पृथा - धर्म - भीमा यमा द्रौपदीला । महानंद - सिंधूच संप्राप्त झाला ॥८१॥
हरी साह्य ज्याला उणें काय त्याला । हरिप्रेम चित्तीं जगीं तोचि ज्याला ॥
वृथा त्या कथा आणखीं सर्व काहीं । तयाचें यया मंडपीं काम नाहीं ॥८२॥
सुभद्राविवाहाख्य गाथा अपूर्वा । पढे नित्य पूजोनियां सांबशर्वा ॥
तयालागिं संपत्ति सत्पुत्र कन्या । इहामुत्र दे भुक्तिमुक्ती सुधन्या ॥८३॥
मनीं इच्छिलें सर्वही प्राप्त त्याला । घडें या जगीं वीणकष्टें नराला ॥
महद्भक्ति विज्ञान वैराग्यबोध । सदा लाभ चातुर्य ही सर्व साधे ॥८४॥
रसालंकाराची अति सरण वाणी विलसली ॥
यथासामर्थ्यें म्यां गुरुभजनयोगें विरचिली ॥
हरीच्या पायीं हे विमलतर सुश्लोककमळें ॥
समर्पोनी माळा पुनित घडलों मीं शतकुळें ॥८५॥
पढे भक्तीनें जो हरिजन महाभागवत तो ॥
हरीलाहीं जैसा प्रिय विजय वरितो तैसाचि घडतो ॥
सुभद्रा नाम्नी तो सहज वरितो मुक्तिपदवी ॥
मुखीं माझ्या ऐसें यदुपति समारंग वदवी ॥८६॥
विश्वामित्रकुलारविंदतरणी ऋग्वेदसिंधूमणी ॥
सर्वालंकरणज्ञ पंडितगणीं जो शोभतो सद्‌गुणी ॥
श्रीमन्माधवराव पूज्य जनिता भागीरथी माउली ॥
गंगासागरसंगमीं उपजलों मी चंद्र विव्दत्कुळीं ॥८७॥
श्रीलक्ष्मीधरबापेदवकरुणे मी मूढ हीं यापरीं ॥
श्रीमत्सज्जनपंडितांसि नाचवितसे ते सूत्रधारक्रिया ॥
जैशी सांयिखडयासि नाचवितसे ते सूत्रधारक्रिया ॥
तैशी मद्रसनेसिहीं नटविते श्रीसद्‍गुरुची दया ॥८८॥
मातें दिव्यनिरंजनाभिपदा देवोनि संतारिलें ॥
माझें हृत्तम बोधचंडकिरणें सर्वस्व संहारिलें ॥
माझें प्राक्तनकोटिजन्म - अघ तें एकाक्षणीं वारिलें ॥
जेणें मद्भय दैन्य विघ्र परतें एकीकडें सारिलें ॥८९॥
सर्वां सत्कविनायकांसि नमितों मीं दीन अंगीकरा ॥
माझ्या या विनतीस मान्य करुनी हा ग्रंथ वाचा बरा ॥
दोषा टाकुनि सर्वथा गुण तुम्हीं निर्मत्सरें आदरा ॥
तेव्हां बालक धन्य होयिन जगीं हातीं कृपेनें धरा ॥९०॥
देवालयीं श्री- तुळसीवनांतीं । श्रीमारुतीसन्निध नित्यभक्ती ॥
पढेल जो पार्थ चरित्र त्याला । यथार्थ ते घालिल मुक्ती माळा ॥९१॥
विवाहकामी तरि कृष्णरुक्मिणी । पूजोनि तत्सन्निध नित्य सन्मनीं ॥
पढेल त्याला तरि शीलसद्‍गुणा । मिळेल नारीमणि सत्कुलांगना ॥९२॥
कवी बनाज्फ़ी विनवी समस्तां । जोडोनियां सादर युग्महस्ता ॥
कृपार्णवीं साच मदीय वाणी । म्हणो नये बोलवि चक्रपाणी ॥९३॥
पाहावें शकुनासि सात करिजे राशी बर्‍या तंडुलें ॥
तेथें चिंतुनि ठेविजे स्वमनिचें तीन्ही सुपार्‍या फुलें ॥
आधीं सर्ग गणा दुजा दशक तो घ्या श्लोक तो तीसरा ॥
त्या अर्थांत्न शुभाशुभासि विवरा सर्वार्थसिध्दी वरा ॥९४॥
श्रीमछालिवहीं शर्कीं ख - नव - सा - एकांक (१६९०) अंगीकरा ॥
साजे वत्सर सर्वधारि बरवासे सौख्यदेता नरां ।
मासीं मार्गशिरीं सुकृष्णदशमीं पूर्णेंदुवारीं बरी ॥
झाली रम्य विवाहमंडित कथा पार्था सुभद्र वरी ॥९५॥
सर्वालंकरणी रसासह वसे हे काव्यगी रंगभू ॥
येथें तांडव शारदा करितसे पाहा तुम्ही हे प्रभु ॥
तो श्रीकृष्णचि सूत्रधार नटवी मायागुणें नाटकी ॥
हा प्रेमोत्सव देखतांचि घडती ते संतसाधू सुखी ॥९६॥
इतिश्री पार्थचंपू हा केला कवि निरंजनें ।
श्रीकृष्णार्पणबुध्दीनें प्रेमानंदात्मभक्तिनें ॥९७॥
इति श्रीमत्कविकुलतिलक श्रीमन्निरंजनमाधवविरचिते सुभद्रा स्वयंवरे चंपुकाव्ये बळिराम - क्रोधावेश - सांत्वन

विवाहोत्साववर्णनं नाम सप्तम:  सर्ग: ॥
सर्वधारीसंवत्सर फाल्गुनवद्यसप्तमी गुरुवासरे लेखनं समाप्तिमगमत् ।
श्लोक - ३०३ चंपू - ७७ - ग्रंथसंख्या ३८० ग्रंथसंख्या ९९०.


N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP