सुभद्राचंपू - सर्ग चौथा

निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


॥श्रीबलभद्रप्रियानुजाय नम: ॥
चूर्णिका
अहो अस्मिन्नवसरीं । सकळ अमरासुरनर - नमस्कृत -चरण भवभयहरण नारायणांशकळाष्टमावतारमूर्तिमंत श्रीमंत भूभारसंहारक संकर्षण सात्वत वृंदानंदसंदोह महानुभाव । देवगंधर्वनरनागवनितासमूहसमावेष्टित । क्रीडार्थ निजदयित रैवतकपर्वतवनीं । अवनीभुजमंडण तालांकध्वजभूषित महारथारुढ आरुढयौवन महापुरुष परंज्योतिस्वरुप लीलानाट्कसूत्रधार सकळजगदाधार येता झाला ॥१॥
प्रथम - वर्षागम- समयीं । नानाद्रुमफलपकभारभूषित नतितशाखामंडित खर्जुर जंबु जंबीर रसाल पनसाद्यनेक तरुवर नम्रशिर विनीतवत परम सादर । निज सेवनार्थ तत्पर विलोकित आनंदभरित नाना तरुकोटरस्थित - वारूणीरस - पानासक्त । प्रगत्त - आरक्त - कमलदलायत- चारुनेत्र । विकसित- मंदार- सुमन - दाम- कलित- कंधर । पुरंदरादिदिविज-वंदित- पदार्विंद सानंदसुंदरीसह संचार करितां अकल्पित अर्जुनाश्रमकृत -शोभित - नगराजदरी अवलोकिली ॥२॥
श्लोक
देखे तैं यतिराज राजकुळिचा संन्यासवेषाधरी ।
काषायांबर दंडमंडित दिसे जो शोभवीतो दरी ।
संन्यासि - प्रिय राम मानित तदां आश्चर्य चित्तांतरीं ।
हातों नूतन- सव्दयस्क असतां भिक्षुत्व कां स्वीकारी ॥३॥
वैराग्यें धरिलें स्वरुप सगळें तैसा दिसे लोचना
नाहीं यासम निस्पृही कवणहीं कामीं न योनी मना ।
कंदें मूळ- फळें जळें करितसें प्राणाचियव धारणा ।
कध्दीं ते उपवास निर्जळ करी कध्दीं करी पारणा ॥४॥
लोकांचा सहवास टाकुनि कसा एकांत अंगीकरी ।
नालोकी नगरापुरासि अटवीं हे सेविलीसे दरी ।
याला पूर्ण विरक्ति बाणुनि असे नि:संग ऐसा दिसे ।
नैरापेक्ष्यपदासि पाउनि वसे स्वानंद या उल्लसे ॥५॥
ऐसें चिंतुनि मानसीं झडकरीं आला समीप -स्थळीं ।
याची दीप्ति विलोकितां म्हणतसे हा धन्य पृथ्वीतळीं ॥
श्रीनारायणमंत्रपूर्वक करी दंडापरी वंदना ।
संन्यासी हरिरुप मानव नव्हे हे अंतरीं भावना ॥६॥
तो नारायण उचरोनि बसवी तालांक दर्भासनीं ।
संतोषें करि सुप्रसन्न - मनसें संप्रश्न रामा मुनी ॥
त्यातें राम पुसे सतोषविनयें बुध्दांजुळी सादरें ।
येणें कोठुनि या स्थाळासि अपुलें स्वामी वदा विस्तरें ॥७॥
इंद्रप्रस्थापुरासमीप वसतां धर्में धरानायकें ॥
केला मान परंतु निस्पृह अम्हीं आहों यती संगती ।
नोहे योग्य कधीं गृहाश्रमवतांसगें अम्हां सन्मती ॥८॥
आलों भूभ्रमणार्थ तीर्थनिवहीं स्नानें तनू पाविली ।
श्रीविष्णू - शिवमंदिरें सुखकरें दृष्टी यया देखिलीं ॥
ज्ञानी श्रेष्ठ महानुभाव बहुतां क्षेत्रीं अम्हां भेटले ।
सत्संगामृत - भाषणें दिवस म्यां कित्येक ते लोटिले ॥९॥
आतां रैवतपर्वतासि सहजें मीं पांथ आलों पुरी ।
वर्षाकाळ समीप देखुनि बरी म्यां सेविली हे दरी ।
चातुर्मास्य - दिनासि कंठुनि पुन्हा जाऊं तया सुस्थळा ।
जेथें धर्मज सत्यधर्म विलसे जो सत्यसंधागळा ॥१०॥
ऐसें ऐकुनि पार्थभाषण मनीं संतोषला राम तो ।
प्रार्थी वंदुनि सादरें यतिवरा योगींद्रविश्राम तो ॥
चालावें विभु मंद्रिरासि अमुच्यव कंठोनि वर्षादिना ।
द्यावा सत्सहवास पावन करा बधां गृहस्थांजना ॥११॥
तुम्हीं सूर्य तसे जगांत फिरतां लोकांचिया तारणा ।
हृत्पद्मीं निशिवार ठेउनि असां त्या आदिनारायना ॥
तोहीं तों तुमच्या हृदब्जनिलया सोडीचना श्रीहरी ।
भक्तिप्रेमनिबध्द गुंतुनि वसे अन्य स्थळां  नादरी ॥१२॥
तुम्हां जे भजती सतोष पुजिती अन्नोदका अर्पिती ।
ते त्रैलोक्यपती हरीस पुजिती ऐशा फळा पावती ।
यासाठी करुणा करोनि सदना चाल प्रभू सत्वरें ।
साक्षाल्लोकनिवास कृष्ण निरखा नेत्रीं यया सादरें ॥१३॥
ज्यासाठीं करिती तपें कठिण तें ध्याताति योगी मनीं ।
ज्यासाठी व्रतनिष्ठ आचरति तें कित्तेक तीर्थाटणी ।
यज्ञें याज्ञिक नित्य अर्चिति तया तो यादवांच्या कुळीं ।
झाला भूभरवारणार्थ सुजना रक्षावया भूतळीं ॥१४॥
भूपांचे मद दर्प मंथुनि करी सोळा सहस्रांगना ।
सर्वांही सदनांत नित्य वसतो जो अंतरायाविना ॥
सत्यज्ञानसुखस्वरुप विभु तो निर्लेप सर्वांघटीं ।
राहे व्योम तसा अलिप्त करितो याहीं जगीं राहटी ॥१५॥
त्याचा कीं सहवास होयिल तुम्हां देखोनि तुम्हांप्रती ।
तोही पावल तोष फारचि पहा भिक्षुप्रिय श्रीपती ।
तो निष्किंचनवित्त यास्तव मुनी निष्काम जे निस्पृही ।
त्यांचें दास्य करी समस्त पुरवी राहोनि त्यांचे गृहीं ॥१६॥
ऐसा हा जगदीश नांदत असे व्दारावतीभीतरीं ।
चालावें करुणाधनीं जरि मना माने विनंती तरीं ॥
ऐसा राम सुधोपमान वचनें विज्ञापना ती करी ।
तेव्हां पार्थ सदुत्तरें श्रुतिमतें बोलोनि तोषा करीं ॥१७॥
यावें त्वसदनासि तूं विनविसी आम्हां वनें काननें ।
श्रीदेवायतनें गुहादरकुटया केल्या विधीनें मनें ॥
नाना हे नगराज अर्पिति सदां स्वाधिष्ट भिक्षाफळें ।
गोडा वाहति या नद्या अघहरा देती जळें शीतळें ॥१८॥
कंदें मूळ फळें अम्हासि रुचती कंथाजिनें वल्कुलें ।
काषायांबर आमुचे जिणति त्या पीतांबरातें बळें ॥
रुद्राक्ष स्फटिकादि दिव्यतुळसी पद्माक्षधात्रीफळें ।
माळा या नवरत्नासाम्य,  न गणूं या तुल्यमुक्ताफळें ॥१९॥
हो का चंदन एणनाभि अथवा काश्मीरपंकाहुनी ।
आम्ही शुभ्र विभूति भूतिद असी सानंद मानूं मनीं ॥
आम्हातें करकंजपात्र मिरवे तोयाचिया प्राशाना ।
बाहू हे उपबर्व्ह काय करणें ऊंशा अम्हां सद्‍गुणा ॥२०॥
शय्या भूमितळीं सुरम्य पुलिनी कीं शावलीं कोमलीं ।
राका चंद्र सुदीप, चामर अम्हा संप्राप्त मंदानिळीं ॥
भोगूं श्रेष्ठ विरक्ति मुक्ति बरव्या तुर्यानुभूति स्त्रिया ।
आम्ही तों यतिराज, राजस जनीं संसर्ग तो कासया ॥२१॥
त्वां पूर्वीं कथिलें हरी विलसतो व्दारावतीभीतरीं ।
तो आहे जड जंगमांत समुद्या व्योपोनि नानापुरी ॥
आम्ही तो निरखीतसों जनिवनीं सर्वाद्य सर्वास्थळीं ।
त्यासंगेंचि सदां अम्हीं रमतसों अंतर्विविक्तस्थळीं ॥२२॥
भोगी एकचि वेळ राहुनि घरीं सोळा सहस्रांगना ।
याचें कैं नवलावर्णन किजे या आदिनारायणा ॥
जो मायी अपुल्या अनंत रमवी शक्तीस सव्दैभवें ।
नाना नाटकशक्तिचक्र नटवी आश्चर्य कैं संभवें ॥२३॥
सर्वत्रीं विभु पूर्ण चिद्रगन हा सर्वेश सर्वां घटीं ।
आहे व्यापक एकला गुण तसा व्यापोनि सारा पटीं ॥
भांडीं मृत्कनकेंचि जाण वसिजे सर्वस्व आभूषणीं ।
तैसा हा जगदात्मरुप विलसे सर्वत्र आत्मा धणी ॥२४॥
ब्रह्मा आदि पिपीलिकांतकरुनी कोठेंचि नाहीं उणा ।
चेष्टेना परि तूळतंतु तरिही त्या श्रेष्ठसत्तेविना ।
आम्हांही हृदयीं प्रकाशक असे पाहोनि नारायणा ।
आहों स्वस्थ पुरीं प्रवेश करिजे कोणा तरीं कारणा ॥२५॥
प्रारब्धार्पण देह का करुनियां जाळोनिया संचिता ।
केलें तें क्रियमाण भर्जित पुढें नाहींच चिंताकथा ॥
आम्हीं शांति वरोनि निर्भय असों डोहीं बुडाल्या गजा ।
मोठा ग्रीष्मज ताप काय भय दे संदेह नाहीं दुजा ॥२६॥
आम्हां हेचि दरी पुरंदरपुरी हें काननें नंदनें ।
हे सारे तरु कल्पवृक्ष समजों संतोषपूर्णें मनें ॥
ज्याच्या अंतरिं पूर्ण तोष विलसे ऐद्री तरी संपदा ।
मानी तुच्छ, यती तयासि म्हणिजे जो निंद्य नेच्छी कदां ॥२७॥
आम्ही हा तरि लोकसंग समुदा सर्पापरीं मानितों ।
व्याघ्री आसवली वृकी मरकटी नारी तशा पाहतों ।
सोनें आणि शिळा मृदासम गणूं जाणू मणी शर्करा ।
आम्ही निस्पृह, काय कारण कथी यावें हळी त्या पुरा ॥२८॥
वैराग्योक्ति असी बरी परिसतां श्रीराम संतोषला ।
मानी हा यति फार निस्पृह असे वैराग्यसिंधू भला ॥
यातें नेउनि मास च्यारि सदनीं ठेऊनि पूजूं बरें ।
ऐसें चिंतुनि राम त्याप्रति वदे जें युक्त प्रत्युत्तरें ॥२९॥
स्वामींनीं कथिलें यथार्थ परिचें मानूं अम्ही सादरें ।
तत्रापी गृहवंत त्यां गति तुम्हीं नाहींच कीं दूसरें ॥
ज्ञानी सर्वग लक्षिती यदुवरा तोहीं तया अंतरा ।
सोडीनाच यथार्थ पैं परि असे व्यापोनि सर्वांतरा ॥३०॥
आहा निर्मम निष्प्रपंच यतिहीं आहांचि संगाविना ।
तत्रापी करिजेचि मान्य अमुची अव्यंग हे प्रार्थना ।
प्रारब्धार्पण हें शरीर करिती ज्ञानी सदा वर्तती ।
नाहीं आग्रह त्यांसि जाण सहसां ते साम्य सर्वा स्थिती ॥३१॥
कंथाही धरिती कधीं सुवसनें कध्दीं फळें भक्षणा ।
मिष्टान्नें मिळती कधीं परि कधीं जाताति भिक्षाटण ॥
कोणेका दिवसीं सुरत्नभुवनीं राजांगना सेविती ।
कत्धा तें मलिन स्थळीं उकरडां धूळींतही लोळती ॥३२॥
कत्धीं तें पिचुमंद तोय मिनलें स्वाधिष्टसें भक्षिती ।
कत्धीं आजगरी व्रताचरण तें कैं सोपवासव्रती ।
अन्येच्छेस्तव वर्तती सुजन ते नाहीं तया आग्रहो ।
अस्ताहीं विषयीं उदासिन तरी बाधीचना निग्रहो ॥३३॥
यासाठीं मुनिनायकीं न धरितां संकल्प कांहीं मनीं ।
चालावें मम मंदिरासि वसिजे अत्याग्रहा टाकुनी ।
एकांतीच तुम्हां करीन वसती सध्यान - योग्या स्थळीं ।
जेथें तो जनसंघबाध न घडे येना वधूमंडळी ॥३४॥
वर्षाकाळ सरेल त्यावरि बिजें कीजे मना मानल्यां ।
ऐशी हे विनती बरी परिसिजे हे युक्तसी वाटल्यां ।
तेव्हां हांसुनि पार्थ त्याप्रति वदे इच्छा हरीची असी ।
आहे तैं कवणासि लंघवल बा नाहीं तरी मानसीं ॥३५॥
तुम्ही ईश्वर या जगांत नटतां क्रीडा अनेका करा ।
कीर्तीनें त्रिजना भरोनि समुद्या लोकांस या उध्दरा ॥
भूमीचा अतिभार दूरकरणी बंधू तुम्हीं शोभतां ।
एकत्वीं आपणांत दोनिपणहें माये जगी दावितां ॥३६॥
तूं संकर्षण सर्व भूमि धरिसी सिध्दार्थसी मस्तकीं ।
तेथे स्थापिसि लोक सर्व आपुल्या तेजेंचि नेमस्त कीं ॥
कल्पांतीं जग सर्व एक अपुल्या वक्त्रानळीं होमिसी ।
मायेचें परतीर पाउनि सुखें तूं एकला राहसी ॥३७॥
तूं जें बोलसि मान्य तें मज असे नीलांबरालंकृता ।
येतों व्दारवतीस रम्य विलसे सर्वाढय सालंकृता ॥
ऐसें ऐकुनि राम तोषितमनें या अर्जुनातें रथीं ।
प्रेमें बैसवि देव आपुण घडे स्वच्छंद तो सारथी ॥३८॥
जेव्हं हेमरथी यती वळघवी आणी पुरीकारणें ।
तेव्हां देखति नागरीक जन ते दृष्टी घड पारणें ॥
आधीं सुंदर वेषहीं बहु तसा शोभे नटाचे परीं ।
जो कार्यार्थ पृथाकुमार असला श्रीकृष्णवाक्यें धरी ॥३९॥
वाद्यांच्या गजरें महोत्सवभरें सप्रेमयुक्तांतरॆं ।
आणी राम महानुभाव यतिला ठेवी गृही सादरें ॥
आले आनकदुंदुभीप्रभृति ते ऐकोनि संदर्शना ।
श्रीकृष्णासह उग्रसेन नृपती वंदोनि नारायणा ॥४०॥
झाले तुष्ट सुपुष्ट हृष्ट म्हणती हा श्रेष्ठ सर्वागुणीं ।
आला कीं यति इष्ट दैवत तसा कष्टाविना आंगणीं ॥
यातें मिष्ट सदन्न अर्पुनि पुजूं सप्रेम सुष्टप्रदा ।
निष्ठेनें भजतां हरोनि समुद्या कष्टासि दे संपदा ॥४१॥
॥इति श्री सुभद्रास्वयंवरे चंपुकाव्ये अर्जुनबलिरामसंदर्शन संवादंसतोषण व्दारकापुरप्रवेशोनामचतुर्थ: सर्ग: ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP