सुभद्राचंपू - सर्ग दुसरा

निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


चूर्णिका.
सकळ ललनाशिरोभूषणा । सुभद्रा भद्रगुणा ॥ नवतारूण्य़चिह्वसंपन्ना ।
गतिविलासविलोकनभाषणमंदमृदुलचपलकोमलरचना । मनमोहना कंजाक्षी ॥१॥
देखोनि निजस्वसा सीरपाणी । वरविचारणा करितां योजी मनी । सकळभूपाळमंडणमणी ।
कुरुराज सुयोधना हे रमणी । रमणीयदृशा अर्पावी ॥२॥
ऐसा दाशार्हसभेमाजी । भोजांधक कुकुर यादव शूरसेन वृष्णि मुख्य समाजीं ।
भाषण करोनि विचार योजी । सुभद्रा हे भगिनी माझी ॥ कमलकोमलतनु कलानाथवदना
सौंदर्यसदना सद्‍गुणराजी । राजराजेश्वरा कुरुनायका सुयोधना म्यां संकल्पिली ॥३॥
ऐसा वृत्तांत बहुजन सखीजनमुखें । अभद्रकर सुभद्रा श्रवणीं आयके ।
परम दचकोनि मनीं शोकें । अंतरीच्या अंतरी धाकें । ग्रीष्मऋतुराजीवसमान सूकली ।
बसोनि एकांतीं एकली । चिंताज्वरें संतापली । नावडे संभाषणावलोकन सखीजनमंडळी ।
क्षुधातृषास्मृती विसरली । आधींच कृशांगी अतिकृशत्व पावली । कदलीपत्रपृष्ठवत पृष्ठभागीं दिसों लागली ।
मुखीं कनककेतकीपांडुरता प्रसरली । जैसी चित्रलिखित पूतळी तैसी निश्चेष्ट राहिली । चिंतातुरचतुरकामिनी
करकंजदळीं । मुखशशी निवेशवोनि नयनकुड्‍मलीं । घनाश्रुधारा मोकली । ऐशी भावी अंतरीं ॥४॥
अहो विधाता सर्वज्ञ परी । अपंडितसमान वर्तन कां करी । युक्तायुक्तविचार त्याच्या घरीं ।
नाही ऐसा मम मानसांतरीं । प्रत्यय वाटे विचारितां ॥५॥
मम गुणानुगुण पुरुषरत्न । सकळसुजनमान्यवीरशिखामणी अर्जुन । तरूण आजानुबाहु सुलोचन ।
समस्तकळानिधी वासवनंदन । सुहृज्जनहृत्तापहारक चंदन । मदनमोहन । मज पतीं कां करीना ॥६॥
तयाचा मज न घडवील संयोग । तरि माझा नुरेल प्राण शरीर योग । न करीन अन्यपुरुषपरिष्वंग ।
एका नरावीण अन्य नरदेव वसुदेवसमान मीं मानीं । ऐसें चिंतोनी मनीं ।
उमाधवचरणनलिन नलिनसहस्त्रें सततार्चन निरत । वीरव्रताचरण आरंभी । अंभोजपाणी समारंभी पूजनारंभीं ।
स्तवी त्रिकाळी भद्रकाळीसमेत रुद्राक्षाभरणप्रियवीरभद्रातें सुभद्रा ॥७॥

श्लोक.
भवा भवानीरमणा भयापहा । भोगींद्रभूषा भुवनैकविग्रहा ॥
भूतिप्रिया भर्मगिरीश भक्तिदा । भक्तार्तिहा भव्यगुणाश्रया सदा ॥८॥
हिमाद्रिजावल्लभ हेमवर्णा । हिरण्य़रेता हर नित्यपूर्णा ॥
हर्य्यश्वमुख्यामरपूज्यपादा । हविर्भुजा हव्यभुजार्कतेजा ॥९॥
देवोत्तमा दीनजनानुकंपा । दयार्णवा दिव्यनुतप्रतापा ॥
दाक्षायणीनायक दैत्यनाशा । दे पार्थ मातें पतिदान ईशा ॥१०॥
देवी दयाळे दनुजांतकारके । दुष्पारदु:खाटविदावपावके ॥
दुरत्यये देववरार्चिते शुभे । दुर्गे सुदुर्गातिहरे रविप्रभे ॥११॥
महानुभावे मदमत्तलोचने । मदालसे मानितपापमोचने ॥
मदीय चिंतार्णव शोषिजे सती । महायशा अर्जुन हो मला पती ॥१२॥
प्रार्थी अशी पुजुनियां त्रिकाळीं । उमार्द्धसद्विग्रहचंद्रमौळी ॥
शुद्ध स्वभावा वसुदेवबाळी । उमामहेशव्रत नित्य पाळी ॥१३॥

चूर्णिका.
अहो अस्मिन्नवसरीं । नारद देवऋषी सकळलोकसंचारी । श्रीकृष्ण
दर्शनानंतर सहज पातला इंद्रप्रस्थपुरी । शमदमतपस्वाध्यायायाध्यनत्यागसंतोष
तितिक्षाविनयविद्यानसूयादयाज्ञानानंदयुक्त युधिष्ठिरमहाराजसदनवरीं । देखतांचि
धर्मराजभीमार्जुननकुलसहदेवसह परिवारीं । साष्टांग प्रनमोनि कोमल चरणकल्हारीं ।
बैसवोनि भद्रासनीं पूजिला । परम विनयें सन्मानिला । द्वारकापुरनिवासीसुहृदजनकुशलवृत्तांत पूसिला ।
यदुपतिलीलाश्रवणोत्सुकें राजराजें ॥१४॥
सकळसात्वकुलकुशल कथन करितां । सांगतां सदुत्सवें रामकृष्णचरितामृतकथा ।
सुभद्रा भद्रलक्षणा दुर्योधनकौरवनाथा । बलभद्रें संकल्पिली ऐशी व्यवस्था ।
सूचवी चतुरचतुरानननंदन देवलोक लोकवंदितचरणारविंद मुनी ॥१५॥
परि सुभगसुभद्रामानसभ्रमर । सदां इच्छी अर्जुनवदनकनककल्हार । नेच्छी
कौरवेंद्रकटुकुटजविटपिवर । अनेकबंधुस्कंदप्रचुर । संपत्तिसुमनें प्रफुल्लित तर्‍हीं ।
रात्रौ निद्रा सेवन न करी । तळमळी उदकांविना जेंवि शफरी ।
अशनपानादिविलासइच्छा न धरोनि कृपोदरी । अति कृशत्व पावली सुंदरी ।
ऐसा तदीयहृद्गत वृत्तांत सहजपरी । परिसवी तदां मुनिनाथ ॥१६॥
महती वीणा वाहोनि खांदीं । गर्जे हरिकृष्ण गोविंद माधव वासुदेव गोवर्द्धनोद्धरण
नृसिंहराम यादवाधीश कंसचाणूरमर्दन मधुकैटभारी ऐशा सुंदर नाम प्रबंधीं ।
बंदीजन घडोनी गाय स्वछंदीं, सदानंदभरित श्रीकृष्णप्रियतम परमपुरुषचरणाधक
महापुरुष नारद महानुभाव धर्मासि पुसोनि स्वर्गमार्गे जाता झाला सप्तलोकादिलोकसंचारार्थी ॥१७॥
सुभद्रा सकळभुवननारीरत्न । वरील ऐकोनि दुष्ट दुर्योधन । धनंजय मनीं चिंताविषदिग्धकामबाण ।
नारदवाग्धनुर्मुक्त दारूण । जिंव्हार फोडोनि भेदला । हृदयीं तेणें परम खेदला । सदां सर्वदा तीच्या गुणीं वेधला ।
निद्रा आहार सुखविलासहास्य विनोद सुहृज्जनसंभाषण न रुचतां विव्हळमति अति तळमळी वीरकेसरी ॥१८॥
श्रीकृष्णसहोदरी गुणलावण्यरत्नपेटी । अगंनामणी मनीं भावी किरीटी ।
र्‍हीमती भीमति चारुमति भावज्ञा कंबुकंठी । कनकवर्ण गोरटी । शृंगारवल्ली सुस्मिता ॥१९॥
मजसारिखा वीर धनुर्धर असोनि धरणी । कैसा वरील दुर्योधन यादवाधीश्वरभगिनी ।
जे निरंतर मदीयभावबद्ध तरुणी । तरूणतामरससमानअरूणपाणी । बिंबोष्ठी मधुरपिकवाणी ।
वाणी मन शरीर अर्पोनि माझ्याकारणीं वर्ते रमणी सुभद्रा ॥२०॥
आजि मीं न वरीन तीतें । सर्व लोकीं धिक्कार मातें । ऐसा पार्थ आपणा माजि आपणातें ।
निंदा करोनि विषादातें । पावे तेजस्वी धुरंधर ॥२१॥

श्लोक.
झालें विश्व निरर्जुनी द्रुपदजा चौघां वरांची सती । कुंती पुत्रचतुष्टयासि जननी निर्वीर झाली क्षिती ।
झाला द्रोण अशिष्य, यादवपती निर्मित्र झाला हरी । धिग्माझा पुरुषार्थ अंधतनया जेव्हां सुभद्रा वरी ॥२२॥
नाहीं मी जठरींच कां विघरलों कां जन्म म्यां घेतला । अस्त्रग्राम महानुभाव गुरुला सेवोनि संपादिला ।
म्यां युद्धीं दितिजेंद्र फार वधिले अग्नीस त्या खांडवें । केलें तृप्त न यादवी परिणितां कां वांचणें पांडवें ॥२३॥
सेळीचे गळिंचे पयोधर तसे मीं आजि झालों कसा । नासाकेशसमान व्यर्थ घडलों लोंकी कशाला असा ।
षंढाचें अतिलंब मेहन जसें लोंबे दहा अंगुळें । वांचावें क्षितिभार होउनि वृथा मातापित्यांच्या मळें ॥२४॥
छाया शीतळ हींवराख्य तरुची ते तों नये कारणा । जाया ते उपयोग काय घडवी केली नटी अंगना ।
डोळे दीर्घ असोनि काय करिजे ते व्यर्थ अंधाजना । तैसा मीं नर मेदिनीवरि करीं भूभार कां आपणा ॥२५॥
श्रीमच्छंकर पूजिला प्रतिदिनीं म्यां सांब बिल्वें सुमें । केलें तद्‍व्रत एकनिष्ठ मनसें अत्युत्सवें संभ्रमें ।
याचें तों फळ सारसाक्षिणि मला संप्राप्त व्हावी बरी । यालोकीं परमेश्वरत्व वरिजे हें साच देहांतरीं ॥२६॥

चूर्णिका.
आतांचि जावोनि कुशस्थळीं । युद्धीं जिंतोनिया प्रबळ यादव मंडळी । हरोनि आणीन सुभद्रा वेल्हाळी ।
सुपर्णवत सुधा अमरलोकींची भूतळीं । सुरेश्वरा जिंतोनि आणिली । पुरुषार्थ त्रिजगीं विस्तारिला ॥२७॥
जरि मी धरीन चित्तीं । तरि हे पृथ्वीच घालीन पालथी । परम गंभीर तरी आपांपती ।
कोरडा करीन अस्त्रानळें निगुती । उडवीन ब्रह्मांड कंदुकप्राय सगळें हातीं । क्षणांत तोडोनि नक्षत्रपंक्ति ।
सडा घालीन एकवेळे क्षिती । तरिच म्हनवीन धरेमाजि निखळ वीरधुरीण पंडुनंदन ॥२८॥
परंतु द्वारकानिलयनिवासी । दाशार्ह माझा पक्षपाती कृपावारिरासी । असतां मदीय मानससरोवरासी ।
चिंताग्रीष्माग्निज्वाळा कैसेंन स्पर्शी । त्याच्या न जाणोनि गहनाभिप्रायासी । उचित नव्हे कीजे साहसासी ।
तो करूणा जलधर-अपांग वृष्टि करितां अनायासीं । मानसकासार पूर्ण करीन घन:शाम आत्माराम
राजीवदलनयन श्रीकृष्ण ॥२९॥
ऐसा सुभद्राभिलाषकामबाणें । केवळ संदीप्त केला अर्जुन । तळमळी अंतरविरहतापें दारूण ।
वदनसरोजीं सुवर्णपीतवर्ण । सांद्र प्रभा विनटली । चिंताज्वरजनित देहीं कार्षता वाटली ।
जैशी तरुवरकोटरीं हुताशज्वाला दाटली । करी नि:सार तयापरीं । अंतरीच्या अंतरी ।
कुंतीप्रियकुमार अति विव्हळमति संतापला ॥३०॥
अस्मिन्नवसरीं ब्राह्मण । निशीथसमयीं धर्मराजमंदिरा ये धाऊन । करी आक्रोशाट्टहासें गर्जन ।
म्हणे धांवा धांवा रे भीमार्जुन । माझें धनगोधनादिहरण । करोनि नेती चोरवत दानव दारुण ।
त्यांचा करोनि पाठलाग यांचक्षणें । त्यांचा वध करोनि माझें धन । मज देवोनि वांचवा प्राण ।
तुम्ही प्रजापालनप्रवीण । शरणागतक्षणार्थी धनुर्बाण । स्वीकार करोनि धर्मस्थापन । कर्त्ते दीनां सांभाळिजे ॥३१॥
तदां ब्राह्मणसंरक्षणार्थ । धनुर्बाणग्रहणीं पार्थ । त्वरित जातां अस्त्रशाळेंत अकस्मात । धर्मराज याज्ञसेनीसहित ।
असतां एकांतविलासरत । पाहतां नेत्र झांकोनि त्वरित । आयुध करोनि हस्तगत । चालिला विप्रवचन परिपाळणी ।
धांवोनि वधिले दुष्ट दानव रणीं । गोधन अर्पोनि नमोनि चरणीं । ब्राह्मणा संतोषवी कुरुमणी ॥३२॥
त्यानंतर नारदवाक्यमर्यादापाळणी । पुरुषार्थसागर अर्जुन प्रतिज्ञा सिद्धकरणी । प्राय:श्चित्तनिमित्तें तीर्थभ्रमणी ।
भ्रमण करितां पुण्यअवनी । गंगादिसकळतीर्थनिषेवणी । कार्पटिकवेषग्रहणी । पादचारी संचार करित वीरशिखामणी ।
प्रभासप्रदेशीं पातला ॥३३॥
तेथोनि समीप द्वारकाप्रदेश । तेथें नांदे निजमित्र हृषीकेश । तद्दर्शनाचा धरोनि अभिलाष ।
चिंता करी पार्थ विशेष ।मानसीं तया अवसरीं आठवी श्रीहरी तत्प्राण ॥३४॥

श्लोक.
कुशस्थळीं पुण्य वनस्थळीतें । अपुण्य मी देखन केंवि तीतें ।
असे सुरेंद्रालयसाम्य भूवरी । द्वारावती सर्व अघासि संहरी ॥३५॥
नानापरी उन्नत सौधमंदिरें । सौवर्णरत्नांचित जें मनोहरें ।
निजोच्चतेनें गगनासि चुंबिती । स्वदीप्तिनें भानुकरांसि दापिती ॥३६॥
नाना सुवर्णकलशें रमणीय गोपुरीं । वैकुंठतुल्य रचिली यदुनायकें पुरी ।
पृथ्वीतळीं म्हणुनि देवगुरु तर्‍हीं तया । वर्णावया धृति नव्हे जरि शारदा तिया ॥३७॥
तत्रापि षोडशसहस्त्र तयासि राणी, तो देव यादवपती विभु चक्रपाणी ।
नांदे सुवर्णसदनीं अति उत्सवासीं, सानंदती त्रिभुवनेश्वर कीर्तिघोषीं ॥३८॥
संपत्ति सर्व भरली सुरमानवांची, आणीक भौममुरमागधदानवांची
इंद्रादि दिक्पति समर्पिती ज्यासि पूजा, त्रैलोक्यनाथ करि शासन देवराजा ॥३९॥
ब्रह्मण्य देव गरुडध्वज शेषशायी, द्वारावतीस वसतो विभु मुक्तिदायी
सर्वां जनासि तरि वाटतसे दिवाळी, श्रीकृष्णनाथमुखदर्शन नित्यकाळीं ॥४०॥
त्यांचीं पुराकृत तपें अमितें म्हणोनी, ते सेविती प्रभु सनातन चक्रपाणी
श्रीवासुदेव जगदंतरवासकर्ता, तो सर्व पालन करी त्रिजगैकभर्ता ॥४१॥
संकर्षणासहित सर्वविलासकारी । तो देखती नर तशाचि सुधन्य नारी
कंदर्पकोटिसदृशा अतिसुंदरांगा । जे लक्षिती करिति पावन अंतरंगा ॥४२॥
माझा सखा परम तो हरि मातुलेय । भेटेल तो मज कसा विभु देवराय ।
एकांतसौख्य अनुभोगिन काय त्यासीं । आनंदसिंधु करुणामृतवारिरासी ॥४३॥
सांगेन हृद्गत तयाप्रति सर्व माझें । झाले बहूत दिस अंतरी फार वोझें ।
तापत्रया हरिल तोचि मनोरथातें, संपूर्ण तो करिल तारिल तोचि मातें ॥४४॥
सोळा सहस्त्र रमणी रमवी विलासी । देखेन पांथ कवणेपरि आजि त्यासी ।
सांगेल कोण मम वृत्त तयासि कानीं । आला सखा तव धनंजय राजधानी ॥४५॥
रामासि वृत्त न कळोनि हरीच भेटें । साधेल कार्य मनिचें मज साच वाटे ।
या वेगळा अणिक भिन्न उपाय नाहीं । भेटेल तो मज कधीं पसरोनि बाहीं ॥४६॥
ऐसा मनीं विजय तो करि फार चिंता । सर्वज्ञ सर्वगत त्या कळलें अनंता ।
कौंतेय तो प्रियसखा मम सव्यसाची । आला इहा धरुनियां मम दर्शनाची ॥४७॥
भेटोनि त्यासि करणें मनिचें मला कीं, नाहीं मला प्रिय तयासम अन्य लोकीं ।
हेही स्वसा परम रुपवती मदीया । देयीन त्यासि विरचोनि अगाध माया ॥४८॥
ऐसा विचार करि कंजदलायताक्ष, श्रीकृष्ण कृष्णसख सर्वहि लोक साक्ष ।
संजोगिला रथ निघे मृगये निमित्तें, जों एकला प्रमित घेउनि सेवकांतें ॥४९॥
॥ इतिश्री सुभद्रास्वयंवरे चंपूकाव्ये पार्थसुभद्राविरहवर्णन तीर्थसंचारप्रभासागमनं
नाम द्वितीय: सर्ग: ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP