चौक १
लक्ष्मी देवी आली भूवरी स्वर्ग सोडोनी । जणू वीज गगनिची आली वाटे कडकडूनी । स्वातंत्र्य देवि जणू आली वाटे अवतरुनी । भरघाच घोडा फ़ेकित । इंग्रजा चिरीत, धन्य ती आली, झाशिची राणी ॥ जी ॥
जशी यावी शुर्क्र चांदणी । सरसरत गगनीं । झाशिची राणी । करण्यां मायभूचें दास्यमोचन । चरित्र पहा जरा उघडा लोचन । गुणाचे करुन घ्यावे शोधन ॥ १ ॥
लक्ष्मीबाई झाशीची राणी । नांव त्रिभुवनीं स्वातंत्र्य़चरणीं । बिजलीसम गाजविली तलवार । रणांगणीं केली शत्रू संहार । इंग्रजा धडकी भरली अनिवार ॥ २ ॥
बाई असोनी भव्य मर्दानी । होति देखणी । जणू हिरकण । रोहिणी जशी शोभे चंद्रास । लक्ष्मीबाई तशी गंगाधर पंतास । अतुल ज्यांची कीर्ति भरतखंडास ॥ ३ ॥
शिक्षण तिला बापाचें । क्षात्र तेजाचें । वीर वृत्तीचें । म्हणून परतंत्र देश पाहून । कृष्ण कृत्यें इंग्रजांचीं निरखून । बाईचें ह्दय गेलें करपून ॥ ४ ॥
चाल १:- बावीस उमर बाईचें । तारुण्य मुसमुसें साचें ॥
दांडपट्टा भाला फ़ेकीचें । कौशल्य अजब बाईचें ॥
दुदैव तोंच बाईचें । वैधव्य पदरीं येण्याचे ॥
नाहीं मिळाले सौख्य पुत्राचे । आयुष्य गेले दु:खाचें ॥
चाल २:-
भर्त्याने पुत्र दत्तक मृत्युसमयाला ॥
कारभार त्याच्या नावानें केला ॥
सरकारनें परी दत्तक नामंजूर केला ॥
पार्लमेंटकडे राणीने अर्ज ठोकला ॥
उपयोग त्याचा राणीला नाहीं पर झाला ॥
होईल कसा इंग्रजांचा स्वार्थ वाढला ॥
दरबार राणीचा इंग्रजांने भरविला ॥
जाहिर केले खालसा मुलुख हा केला ॥
अशी कैक राज्यें खालसा केली त्या काला ॥
ऎकुनि प्रजा राणीची ढाळी अश्रुला ॥
प्रतिपाळ स्वपुत्रासम राणीनें केला ॥
यास्तव सरकारचा राग प्रजेला आला ॥जी॥
चाल ३:- इंग्रजी लोकांचा कावा । ख्रिस्ती हा देश बनवावा । हिंदुंना जाहला लावा । दुहेरी दावा । त्यामुळे पेटला वणवा ॥
काडतूसें दिली हातांत । गाईची चरबी ज्या दाट घालुनि तींच तोंडात । तोडा झटक्यांत । ऑर्डर अशी शिपायांत ॥
शिपायास कपाळी गंध । लावण्या केला प्रतिबंध । ज्यांना शिक्षणाचा नाही गंध । तोडिला बंध हिंदु धंर्मांध ॥
मंगलपांड्याने केला । बंडाचा ओनामा पहिला । अधिकारी गोरा ठार केला । यास्तव त्या दिला सर्वांपुढे फासाला ॥
चा. मो. - नाखुष इंग्रजी राज्याला । प्रजाजन झाला । फ़ार योग्य संधीची पाहती वाट । तोच स्वातंत्र्य युध्दाची लाट । उसळला सर्व हिंदुस्थानांत ॥
चौक २
सरकार करिल धर्मभ्रष्ट । तयाला नष्ट । कराया स्पष्ट । झाले तयार सर्व देंशात । गोरा दिसला तो ठार करण्यांत । गुंतले तरुण सूड घेण्यांत ॥
तुरुंगाची दारे फ़ोडून । दिले सोडून । लोक जमवून । तात्या टोप्यास केलें पुढियार । सेनापती नाना पेशव्यांची । ज्यानेइंग्रजा केलें बेजार ॥
कानपूर हातीं घेऊन । विजय मिळवून झेंडा रोवून । सर्व गोर्यास दिले हाकलून । जाउ लागतां गंगा उतरुन । ठार केलें कैक गोळ्या घालून ॥
चाल १:- हॅवलाक वृत्त ऎकून । तात्काळ गेला खवळून ॥
धावला सैन्य घेवून । दिला हल्ला तेथें चढवून ॥
कबजांत कानपूर घेवून । कत्तल केली सपाटून ॥
कटाव ४- अमानूष नील साहेबानें, होउनी बेभान, केली जोराने राक्षसी कत्तल कानपुराला, जो जो तेथे दिसला बंडवावाला, ठार तात्काळ त्यासं केला, बंडवाल्याचा सूड घेतला, प्रेतांचा खच तेथे झाला, रक्ताचा पूर वाहू लागला, एवढ्याने शांत नाही झाला, मोर्चा बीबी घरावर आला, ऎका तिथें प्रकार काय झाला, रक्ताचा थेंब सांडलेला, चाटण्याचा हुकूम त्यांनी केला, आधी चाटा नाही तर प्राणाला, मुकावे लागले याच काला, काही लोक जिवावर उदार झाला, चाटणार नाही त्यास बोलला, ठार केले त्यांना त्याच क्षणाला, कैक असा तेथे ठार केला, कैकांचा छळ त्यांनी केला कृत्ये अशी करणाराचा पुतळा, तुमच्या उरावर त्यानीं बांधला, इंग्रज आहे असा नीतिवाला, डंका जगभर त्याचा गाजला, दादा दादार जी जी दाज ॥
चाल २- नाना साहेब आले काल्पीला घेऊनी टोप्याला ।
सैन्याचा पुन्हा जमाव दोघांनी हो केला ।
झाशिची राणी अंतस्थ होती सहाय्याला ।
संशय असा राणीचा सरकारला आला ।
बाई पाहून इंग्रज हल्ला करण्यास धावला ।
इंग्रजाने झाशि किल्लास वेढा घातला ।
चाल ४- बाई असोनि इंग्रजावर घेऊनि हाति तलवार । स्वातंत्र्य युध्दा तयार । झाली सत्बर । जमविला लोक अनिवार ॥
तुम्ही यावे सैन्य घेऊन । टोप्यास असे सांगून । करते मी मारा वरतून । तुम्ही खालून । इंग्रजा टाकू चिरडून । झाशिच्या किल्लावर हल्ला । सर ह्युरोजनें चढविला । तोफ़ेचा मोर्चा बांधला । चारी बाजुला । तोफ़ांचा धडाका सुरुं केला ॥
चाल मोडत
गोळ्यांचा वर्षाव केला । डाव परि फ़सला । गोळा नाहीं गेला । एकही तोफ़ेच्या किल्ल्यांत । पाहुनि खजिल झाला चित्तांत । सर ह्यूरोज म्हणे जाहला घात ॥जी॥
चौक ३ रा
राणीने किल्ल्यावरतून । तोफ़ा डागून । हल्ला चढवून । तोफ़खाना त्यांचा बंद पाडून । इंग्रज सैन्याचा धुव्वा उडवून । पाणी इंग्रजा पाजल पाडून ॥
आशेचा किरण इतुक्यांत । इंग्रज सैन्यांत । आला जोरात । तोफ़ेचा गोळा गेला तटावर । पाडून खिडार मार्ग सत्वर । इंग्रजा पाहुनि वाटाला धीर ॥जी॥
इंग्रज त्याच मार्गान । घुसला जोरान । परी बाईन । स्वत: त्यावर हल्ला चढवून नेले रेटीत सैन्य कापून । ऎकां वर्णन लक्ष देऊन ॥
चाल १- झाडून सार्या लोकाला । बाईंनें नेले युध्दाला ॥
भय नाहीं तिच्या चित्तला । सैन्याच्या गेली सदरेला ॥
कापते बिजली मेधाला । कापिले तसे शत्रुला ॥
कटाव १ घेऊनी हाती तलवार । आली तटावर । जणु सुस्वार । देऊनी धीर । म्हणे सत्वर । बोला हर हर । शत्रु संहार । करुं भराभर । जा तरी लाज । झाशीची कोण राखील बोला हो आज ॥
घेऊनि स्त्रिया बरोबर । घुसली ती नार फ़िरली तलवार । चमकली धार । गोरा केला ठार । विजय त्या दिवशी देऊनि । शौर्य राणिंने राखिली झाशी ॥
खिंडार पाहूनी भिती, राणिच्या चित्तीं, शत्रूची होती, म्हणुन त्या रातीं, तटाच्या भिंती, बांधुनि केला, शत्रूचा मार्ग तो बंद एका रात्रीला ॥५॥
चाल २- खिंडार बंद पाहूनी चकित रिपु झाला । तारीफ़ बाईची केली शत्रूनें काला ॥
इतक्यांत सैन्य घेऊनि तात्या टोपे आला । तात्यांस पाहूनी आंनद बाईला झाला । जीवास जीव देणारा जणु भेटला । परि सर ह्युरोज पाहून सैन्य चरकला । इंग्रज परि संकटी नाही डगमगला । धैर्यानें तोंड तात्यास दिले झटक्याला । बाजार बुणगा सैन्यात तात्याच्या भरला । नेटाचा हल्ला इंग्रजानें जवा चढविले । सैरावैरा तात्याचा लोक धावू लागला । तात्याचा धीर पार त्याचमुळे हो खचला । तात्काळ काल्पीचा मार्ग त्यानें सुधारिला बाईनें परि धैर्यानें किल्ला लढविला । चाल ४- टोप्याच्या तोफ़ा बंदूका । इंग्रजाला मिळाल्या फ़ुका झाडुनी त्याच बंदुका ठार केले लोका, याच्याहि पुढची मजा ऎका ॥जी॥
तोफ़ेचा मोर्चा चकलेला, दावण्या कोण पुढे आला, हिंदुच फ़ितुर ना झाला, त्त्यामुळे गेला, किल्लाच शत्रू हाताला ॥जी॥ इंग्रजानें झाशी गांवात, केली फ़ितुरी जावून लोकांत, त्यासाठी यत्न अटोकात, पैसा खर्चीता फ़ितुर हातांत ॥जी॥
चाल मोडते- येताच फ़ितुर हातात । बाईंवर मात । केली जोरात । इंग्रजाने हल्ला पुन्हा चढवून । तोफ़ेचे मोर्चे पुन्हा बांधून । चार बाजूने सैन्य धाडून ॥जी॥
चौक ४ था
इंग्रजाने तोफ़ेचा पल्ला । पाहुन सुरु केला । चौफ़ेर हल्ला । तोफ़ेचे गोळे पाहूनी किल्यांत । सर ह्युरोज म्हणे आता इतुक्यात । झाशीचा किल्ला घेतो कब्जात ॥ जी ॥
वर्षाव गोळ्यांचा झाला । इंग्रज मातला । आग डोंवाळा । झाशी किल्यात सर्व झाला । ज्वालामुखी जणू जागृत झाला । बाईचा धीर पार सुट्ला ॥जी॥
चाल १ किल्लांत पहावें जिकडे । तोफ़ांचे गोळे चहुकडे । त्यामुळे मोठाले वाडे । जमिन दोस्त झाले ओसाडे ॥
बाईचे ह्यदय गडबडे । ऎकुनि बालकांचे रडें ॥
चाल २ विझविण्या आग धांवली बाई किल्लांत । घेऊनी लोक विझविण्या केली शीकस्त । परी नाही जाहली सर्व आग ती शांत । अंबर फ़ाटले तिथे ठिगळ काय करत ॥
कटाव १- बाई म्हणे फ़ितुराने घात, केला निश्चीत, नाही धडगत, परी शिकस्त, यत्न अटोकाट, करु जोरांत, भिंती तिळमात्र, नाही ह्यदयात, धैर्याची पुतळी, हरमहादेव ठोकळी तिने आरोळी ॥ जी॥
कटाव ४- दोघांची झाली खडाजंगी, सेना चतुरंगी, सामना चौरंगी, झाली सुरवातही युध्दाला, एकमेकांने हल्ला केला, तोफ़ांचा धडाका सुरु झाला, गोळ्यांचा पाऊस तेथे पडला, मुंग्या परी लोक ठार केला, शिकस्तीचा हल्ला बाईंने केला, दिवसभर सारा लोक लढला, पोट बांधूनी लोक लढला, कसुर नाहे केली हो लढ्याला, नाहीं परि कोणि कोणास हटला, बाईचा लोक फ़ार मेला, ढीग हो किल्याला, बाईने विचार रात्री केला, ऎका तुम्ही दादा. ॥
राणीने लोक जमविला, विचार करण्याला राजवाड्याला तोच बगा काय प्रसंग घडला, वाड्यावर गोळा एक पडला, मजले फ़ोडून खाली आला, इजेचा कडकडाट झाला, आगीचा लोळा जणू उठला, राणी शेजारी येवू लागला, राणीचा पराण जाण्याला, वेळ काही नव्हाता प्रसंगाला, देवपरि धावला साहाय्याला, राणीचा प्राण वाचवीला, देव जिला साह्या प्रसंगाला, कोण मारील ठार तिजला, राणी आली घेऊन लोकाला, वाड्याबाहेर मैदानाला, विचार करण्यास वेळ कुठला, लोक म्हणाले राणी साहेबाला, फ़ितुर जिथ वश इंग्रजाला, निभाव तिथे लगेच काय आपुला, आपण जाऊ आतांच काल्पीला, बाई म्हणे भेद फ़ार केला, तिजोरिच्या किल्या मिळाल्या त्याला, मोर्चाच्या जागा कोणी दावल्या, दॄष्टपणा असा कोणी केला, देशावर निखार कोणी ठेवला, देशद्रोही अशा दॄष्टांना ठार करा आतांच्या आता त्याला,राणीला क्रोध फ़ार आला, राग तिचा अनावर झाला, रागाने देह लाल झाला, प्रसंग जाणून केला क्रोध तिनें पार आवरीला, बेत काल्पीचा कायम केला, त्यावेळी दादा ॥जी॥
चाल मोडली - बाईने केली शिकस्त । नाही आटोपत । इंग्रज युध्दांत । लोक म्हणे जावू किल्ला सोडून । पलिकडे शत्रू फ़ळी फ़ोडून । रात्रीच्या वेळी बेत ठरवून ॥जी॥
चौक ५
बाई असून झाली तय्यार । चतुर ती नार । घोड्यावर स्वार । घेवूनीं हाती नंगी तलवार । पुत्र पाठीशी प्राणाहून प्यार । चालली करीत शत्रूसंहार ॥जी॥
काळाच्या तावडीतून । गेली निसटून । घोडा उडवून । बिजली जशी जाते मेघ भेटून । गेली तशी शत्रू फ़ळी फ़ोडून शत्रूच्या हातीं तुरी देवून ॥जी॥
लक्ष्मीबाई एका रातीत । घोडा उडवीत । आली काल्पींत । बाईचें पाहून धैर्य अलोट । शत्रु तोंडात घालतो बोट । गेली छातीचा करूनीया कोट ॥जी॥
चाल १:- बाहेर जाता सिंहीण । आपल्या गुहे मधून । पारध्याने तेथे येऊन । टाकावी पिलें मारुन । राणीचे तसे प्रजानन । ठार केले गोळ्या घालून । धन नेले त्यांनी लुबाडून । बायाहि कैक पळवून । असें शौर्य तेथे दावून । आम्ही विजयी म्हणे तोर्याने ।
चाल २:- तारीफ़ केली बाईची नानासाहेबानं । बाई म्हणे गप्पा मग शत्रू आला मागून । इंग्रजांची आली इतक्यात फ़ौज धावून । पराभव केला नानाचा तेथे इंग्रजानं । ग्वाल्हेरकडे जावू या सर्व मिळून । राणीने असें सुचवितां गेले झटक्याने । शिंदे तय्यार असें सहाय्यास पाहून । शिंद्याची फ़ौज घेतली सामील करुन । होतांच पराभव शिंदे गेला पळून । ग्वाल्हेरला आले इंग्रज त्याला घेऊन ॥
चाल ४:- ग्वाल्हेरचा विजय पाहून । नानासाहेब गेले हुरळून । उत्सव केला जोराने । पेशवे म्हणून । खाण्यात गुंग पक्वान्ने । बाई बोले त्यांना रागाने । तुम्ही असे लाडू खावून । पराभव घ्याल करुन इंग्रजांकडून । पश्चाताप होईल मागून ॥
असे म्हणून बाई झटक्याने । शत्रूची चाहूल ऎकून । भरधाव घोडा फ़ेकून सैन्य घेऊन । मांडणी केली हुषारीने ॥जी॥
चाल मो.- सैन्याचा असा बंदोबस्त । केला दरोबस्त करुन शीकस्त । पाहूनी नाना म्हणे बाईस । सेनापती तुम्ही याच संधीस काळिमा नाही तुमच्या कीर्तीस ॥जी॥
चौक ६
तात्काळ चारी बाजूस, नानासाहेबास, तात्या टोप्यास, राहिल्या दोन बाजू घेउन । स्वत: तोफ़ेचे मोर्चे बांधुन । सर्व सैन्यास सांगे निक्षून ॥जी॥
कटाव १ - हातात नंगी तलवार, घोड्यावर स्वार, पोषाख रुबाबदार करुन ती नार, लढण्या तय्यार, स्वातंत्र्य देवी, येऊनी तेथे जणु युध्दकर्णा वाजवी ॥जी॥
कटाव १- हातात नंगी तलवार, घोड्यावर स्वार, पोषाख रुबाबदार करुन ती नार, लढण्या तय्यार, स्वातंत्र्य देवी, येऊनी तेथे जणु युध्दकर्णा वाजवी ॥जी॥
देशार्थ करु बलिदान अर्पुया प्राण, करु धुळ धाण, शत्रू शिरकाण, तरिच स्वातंत्र्य, नातरी देश होईल खास परतंत्र ॥ जी ॥
सेनापति सर हुरोज, प्रचंड फ़ौज समरिं तरबेज, पाहूनि अंदाज, म्हणे करुं मौज, आज युध्दांत, जमिनदोस्त करुन टाकतो सर्व इतुक्यांत ॥जी॥
युध्दास झाली सुरवात, तारा गगनांत, जशा दिसतात, खड्गं हातांत, तसे दिसतात, आणि सैन्यांत लक्ष्मिबाई त्यांत, जणू गगनांत. शोभे चंद्रकोर, चमकत होती सैन्यात चतुर ती नार ॥
कटाव ४- दोघांची झाली खटपट, केली जोरांत, कत्तल सरसकट, गोळ्यांचा पाउस तेथे झाला, तोफ़ांचा धडाका सुरु झाला, हिंदु हिंदुला कापु लागला, एक रक्ताचा विसर पडला इंग्रजासाठी लढुं लागला, उडवि शिरकमल आस्मानाला, असा संहार फ़ार झाला, तात्या टोप्यास हटविण्याला, इंग्रजाने हल्ला जवा केला, लोक तात्याचा पळूं लागला, पाहूनि बाईने सवाल केला, त्यावेळी ॥दादा ॥
बाई म्हणे त्यांना त्वेषांत, कोठे इतक्यांत, जाता नरकांत, देशाचा नाश हो करण्याला, पळून कां जातां हो नरकाला, मर्द तुम्ही मराठा जातिवाला, मराठा कधी पळून नाहीं गेला, पराभव ठावा नाही त्याला, भागूबाई सारखे हो पळण्याला, लाज कां नाही हो तुम्हाला, खड्ग द्या फ़ेकुन धरणीला, भरा बांगड्या याच काला, पळून जा मग तुम्ही घरला, ऎकुनि मागे लोक फ़िरला, बाईने जोराचा हल्ला केला, नेले रेटीत इंग्रजाला, देशद्रोही धाडीले स्वर्गाला, बाईन ॥दादा ॥
कटाव २- इंग्रजाने चौफ़ेर हल्ला, बाई एकटी पाहूनि केली । नानासाहेब पळूं लागला, तात्या टोपे त्याच मागिला । शिकस्तीचा हल्ला एक केला, एकटी करील काय बोला । बाईचा धीर पार गेला, रक्तानें देह लाल झाला । धडगत नाही या काला, मी आहे जातिची अबला । पराजय आहे ठरलेला, परक्याचा स्पर्श देहाला । होईल म्हणून बाजूला, बाईंने घोडा काढला । दौडत घोडा चालला, पाणी पाहुन घोडा थबकला । बाईचा घात तवा झाला, देशाचा घात बघा झाला । विजेमागे जशी मेघामाला, तसा शत्रू मागे धावला । काळाने पाश टाकला, शत्रूनें भाला मारला । बाईचा डोळा पार गेला, बाहेर येवून लोंबू लागला । बाई तात्काळ आली धरणीला, शत्रूचा सूड घेण्याला । विश्चासू स्वार धावला. शत्रूला त्यानें निजविला । बाईला मग बोलला, बांधितो तुमच्या जखमेला । बाई म्हणे शत्रू पाठीला, नाहीं दिसत तुमच्या डोळ्याला । गंजित टाकुनि मला, पेटवा त्वरित गंजीला । बोलती तोच प्राण गेला, देशार्थ प्राण देणारी धन्य ती अबला । स्वार्गीची लक्ष्मी जणूं, गेली पुन्हा स्वर्गाला ॥जी॥